top of page

"युगंधर"

मला आवडलेले पुस्तकदहावीची परीक्षा झाल्यावर सुट्टीमध्ये ठरवलेली पुस्तके वाचून झाली. सुट्टी संपताना मला माझ्या एका मित्राने एका पुस्तकाचे नाव सांगितले. ते पुस्तक भगवान श्रीकृष्णावर आधारित आहे. अकरावी बारावीच्या दोन वर्षांमध्ये अभ्यास व इतर काही कारणांमुळे मला ते पुस्तक वाचता आले नाही. पण बारावीची परीक्षा संपत आली असताना एके  दिवशी मला एका पुस्तक प्रदर्शनाला जाण्याची संधी मिळाली. तिथे पुस्तके पाहता पाहता मला ते पुस्तक दिसले. क्षणाचाही विलंब न करता मी ते पुस्तक घेतले. सुट्टी लागल्यावर वाचून काढले आणि भगवान श्रीकृष्ण या पात्राने मी पूर्णपणे झपाटला गेलो. मला श्रीकृष्णाचे बऱ्याच अंशी खरे रुप समजले. तेव्हा या लेखात मी हे पुस्तक वाचून माझ्यावर किती प्रभाव पडला, मी काय काय शिकलो, त्याविषयी बोलणार आहे. पुस्तकाचे नाव आहे 'युगंधर' व लेखक आहेत 'मृत्युंजय', 'छावा' यासारख्या अजरामर कादंबऱ्या लिहिणारे,  'शिवाजी सावंत'.


तसं बघायला गेलं तरयुगंधरही मृत्युंजयच्या 'पॅटर्न'ने लिहिलेली कादंबरी आहे. यात एकूण सात पात्रे आपल्याला श्रीकृष्ण उलगडून दाखवतात. स्वतः श्रीकृष्ण, रुक्मिणी, दारूक, द्रौपदी, अर्जुन, सात्यकी आणि उद्धव अशी ती पात्रे आहेत. श्रीकृष्ण सोडला तर इतर पात्रांचं त्याच्या आयुष्यातील स्थान काय आहे, ते आपण आधी समजून घेतले पाहिजे. रुक्मिणी ही त्याची आठ पत्न्यांपैकी प्रिय पत्नी आहे. दारूक हा त्याचा सारथी व त्याने आपला 'सखा' मानलेल्यांपैकी एक आहे.  श्रीकृष्णाने त्याच्या आयुष्यात आलेल्या स्त्रियांपैकी केवळ दोघींना 'सखी' मानलं. द्रौपदी त्यापैकी एक आहे. अर्जुन हा त्याने मानलेला 'सखा' आहे. तेच स्थान सात्यकी व उद्धव यांचे आहे. या सर्वांपैकी केवळ 'उध्दवालाच' कृष्णाने 'परमसखा' असे म्हटले आहे.


आता एक-एक करून मी या पुस्तकातून आपल्याला ज्या ज्या गोष्टींचा उलगडा होतो ते सांगणार आहे. श्रीकृष्ण हे पात्र खरोखरच अलौकिक आहे. गेली पाच हजार वर्ष हे पात्र आम्हा  भारतीयांच्या मनाला भुरळ घालत आहे. पण जसजसा काळ पुढे गेला तसतसे अनेक गैरसमज ह्या पात्राबद्दल  निर्माण  होत गेले. त्यातील बरेच गैरसमज हे लेखकाने दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. माझा सर्वात मोठा संदेह जो  या ग्रंथामुळे दूर झाला तो राधे विषयी आहे. आजवर आपल्याला राधा सांगितली गेली ती श्रीकृष्णाची प्रेमिका याच रुपात. परंतु ते जे काही मत आहे ते या ग्रंथामुळे पूर्णपणे बदलून जाते. सर्वप्रथम आपण राधा या शब्दाचा अर्थ समजून घेतला पाहिजे. हा शब्द मुळातच एक जोड शब्द आहे. रा  म्हणजे मिळो  आणि धा म्हणजे मोक्ष. अर्थात राधा म्हणजे मोक्षासाठी तळमळणारा जीव. पण दुर्दैवाने आपण या दोघांबद्दल गैरसमज करून घेतले आहेत. लेखक शिवाजी सावंत आपल्याला या गैरसमजांचे मुळ कारण प्रस्तावनेत सांगतात. तेराव्या शतकात 'गीत गोविंद' हे काव्य लिहिले गेले. त्यात राधा आणि कृष्णाचे संबंध हे जसे आपण समजतो तसे लिहिले गेले. यानंतरच्या बहुतांश हिंदी कवींनी तोच आधार घेऊन आपली काव्ये लिहिली. यावर माझे मत असे आहे की राधा आणि कृष्ण यांच्यातील नाते हे केवळ भक्त आणि देव असे होते. तो एक भक्तियोग होता. या पुस्तकात लेखकाने राधेचा परिचय देताना 'रायाण गोपाची पत्नी' असा दिला आहे. यावर स्वतंत्र लेख लिहिला जाऊ शकतो जे मी लवकरात लवकर करेन.


श्रीकृष्णाच्या जीवनाबद्दल जर आपण विचार केला, तर अशा अनेक घटना आहेत ज्या त्याला 'युगंधर' ठरवतात. अन्यायी कंसाचा नाश करून त्याने माता-पित्यांसह अनेकांची मुक्तता केली.  समस्त आर्यवर्तातील अनेक अन्यायी राजांचा नाश केला. पांडवांची बाजु घेऊन त्यांना न्याय मिळवून दिला. अनेक दिवस नरकासुराच्या  कैदेत असल्याने ज्यांना माता-पित्यांनी अव्हेरले, त्या जवळ-जवळ सोळा हजार स्त्रियांना आपलं म्हणून द्वारकेत त्या सर्वांचं पुनर्वसन केलं. अनेक असुरांना देहदंड दिला. अर्जुनाला युद्धासाठी प्रवृत्त करताना त्याला मौलिक असा 'गीतोपदेश' केला, जो आजही आपला  मार्गदर्शक आहे.


श्रीकृष्ण हा नवे पायंडे घालणारा होता. पांचाल देशाची राजकन्या द्रौपदी हिच्या स्वयंवरात तिला जिंकण्याची इच्छा बाळगून तिथे गेलेला कृष्ण, ब्रह्मवेशातील अर्जुनाने तिला जिंकताच तिला आपली भगिनी मानणारा, इतकेच नव्हे तर तिला आशीर्वाद देताना 'सखी' असे संबोधणारा, हा आम्हा सर्वांसाठी आदर्शच असला पाहिजे. माझ्या मते, एक स्त्री व पुरुष यांच्या निरपेक्ष, निखळ मैत्रीचे  पहिले  उदाहरण म्हणजे श्रीकृष्ण व द्रौपदी. आज प्रत्येक स्त्री व पुरुष यांनी उभयतांचा आदर्श ठेवला पाहिजे. श्रीकृष्णाने स्त्री व तिचा आत्मसन्मान ह्याचा सदैव मान राखला. जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा  कृष्णाने आपल्या सखीचे रक्षण केले. ह्यातून श्रीकृष्णाने आपल्याला स्त्री-रक्षणाची शिकवण दिली आहे.


खरोखरच, जेव्हा आपण भगवान श्रीकृष्णाचा वेगळेपणाने, तर्कसंगतपणे अभ्यास करतो, तेव्हा पूर्णपणे झपाटून जायला होतं. वरील पुस्तकात लेखक आपल्याला त्याच्या जीवनातील एक रोचक रहस्य सांगतात. त्याने त्याच्या आयुष्यात आलेल्या व्यक्तींची आठवण म्हणून द्वारकेत 'श्री-सोपान' नावाचा एक स्तंभ बांधून घेतला होता. काळानुसार त्याच्या आदेशाप्रमाणे  त्यात एक-एक पायदंडी जोडण्यात येई. यावरुन आपल्या लक्षात येतं की श्रीकृष्ण आपल्या आयुष्यात संबंध आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे, मग ती धर्मनिष्ठ असो अथवा अधर्म करणारी, स्मरण ठेवत असे. त्याने कधीही कोणतेच ठराविक पद स्वीकारले नाही. असे असूनही तो सर्वांसाठी आदर्शच ठरला.


आज बऱ्याच विषयांचं जे  ज्ञान आपल्याला प्राप्त होतं, त्यासाठी आपण पश्चिमात्य देशांकडे पाहतो.परंतु गेल्या काही वर्षात पश्चिमात्य देशांमधील लोक श्रीकृष्णाचं जीवन व त्याचे विचार याबद्दल जास्तीत जास्त अभ्यास करत आहेत. प्रसिद्ध वक्ते व व्यापार, उद्योगविषयक प्रशिक्षक श्री डॉ.विवेक बिंद्रा हे तर म्हणतात की जीवनाबद्दल  आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे ही भगवान श्रीकृष्णाने भगवदगितेमध्ये देऊन ठेवली आहेत.जेव्हा आपण गीतेचे अध्ययन करतो, तेव्हा  आपल्याला याचा प्रत्यय येतो. श्रीकृष्ण हा केवळ जुन्या रूढी मोडून काढणारा नव्हता, तर त्याबरोबरच नवविचार  देखील देणारा  होता. त्याचे हे विचार आजही आपल्याला जीवन जगण्याचा मार्ग दाखवतात.


माझ्यामते  श्रीकृष्णाने या जगात एक नवीन योग रूढ केला. तो म्हणजे  'प्रेमयोग'. आजकाल प्रेम म्हटले की त्याचा अर्थ एका विशिष्ट पद्धतीने घेतला जातो. पण श्रीकृष्णाचे तसे नव्हते. त्याने सदैव निरपेक्षपणे त्याच्या प्रिय व्यक्तींवर प्रेम केले. मग ते आपल्या माता-पितांवर असो, बंधूंवर, भगिनींवर, पत्न्यांवर, सख्यांवर, किंवा सखी द्रौपदीवर असो. परंतु त्याने कधीही आंधळे प्रेम केले नाही. ते नेहमीच डोळस असे. 2013-14 साली स्टार प्लस या हिंदी वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या 'महाभारत' या मालिकेत श्रीकृष्णाच्या मुखी एक वाक्य आहे, ' वास्तव मे जहाँ प्रेम होता है, वहा मोह होता  ही नही| प्रेम का जन्म करुणा से होता है, और मोह का जन्म अहंकार से'|म्हणजे आपण म्हणू शकतो की 'प्रेम' या शब्दाची खरी व्याख्या आपल्याला भगवान श्रीकृष्णाने समजावली आहे. त्याने सतत निरपेक्ष प्रेम केले व करायला शिकवले.


कुरुक्षेत्रावर झालेल्या कौरव-पांडवांच्या युद्धात श्रीकृष्णाने पांडवपक्षाची बाजू घेतली.पण योद्धा म्हणून नव्हे, तर सखा अर्जुनाचा सारथी म्हणून. जेव्हा शत्रुसैन्यात आप्तजनांना पाहून अर्जुन युद्ध करण्यापासून परावृत्त झाला, तेव्हा त्याला कृष्णाने मार्गदर्शन केले व युद्धास प्रवृत्त केले. त्यावेळी त्यानं अर्जुनाला केलेला उपदेश हा आज 'भगवदगीता' या नावाने ओळखला जातो. जीवनातील सर्व समस्यांचे सार व समाधान यात आहे. पुढे युद्ध संपेपर्यंत कृष्णाने पांडवांना मार्गदर्शन केले. अवतारसमाप्तीपूर्वी आपला परमसखा उध्दवास त्याने केलेला उपदेश हा 'उद्धवगीता' म्हणून ओळखला जातो.


श्रीकृष्ण हा एक आदर्श पुत्र, विद्यार्थी, शासक, योद्धा, विचारवंत, आदर्श पती, सखा होता. खरं म्हणजे या विषयावर खूप काही लिहिता येईल असं वाटलं नव्हतं, पण ज्याच्या जीवनाबद्दल बोलतोय, त्या भगवान श्रीकृष्णाच्या कृपेनेचं हे सगळे लिहिता आले. आणखीही लिहिता आले असते, परंतु 'श्रीकृष्ण' हे व्यक्तिमत्वच मुळात असं आहे जे जीव लावतं, पण त्याविषयी व्यक्त होताना शब्द कमी पडतात. तेव्हा जे काही लिहिले आहे, ते त्याच्याच चरणांशी रुजू करतो, चूक झाली असल्यास क्षमा मागतो आणि  'कृष्णम वंदे जगतगुरुम' म्हणून थांबतो.


हे पुस्तक ऑनलाइन घरपोच मागवण्यासाठी येथे क्लिक करा


पुस्तकाचे नाव: युगंधर

लेखक: शिवाजी सावंत

प्रकाशक:मेहता पब्लिशिंग हाऊस


पुस्तक परिचय: अभिषेक गाडगीळ

मो: 7507309275

ईमेल: abhishekgadgil372@gmail.com

496 views0 comments

Comments


टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page