top of page

आपले मराठी वर्ष म्हणजे - श्रावण



श्रावण म्हणजे


आपल्या मराठी वर्षाच्या कालगणनेप्रमाणे श्रावण महिना हा वर्षातील पाचव्या क्रमांकाचा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्राच्या सान्निध्यात असतो .त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे . श्रावण महिन्याला हिंदी भाषेत सावन तर संस्कृतमध्ये श्रावण असे म्हणतात .


श्रावण महिन्यापासून जोरदार अशा वर्षाऋतूचा प्रारंभ होतो . क्षणात येणारी पावसाची जोराची सर आणि त्यानंतर पडणारे ऊन हा ऊन पावसाचा खेळ श्रावण महिन्यात सतत चालू असतो. श्रावण महिन्याबद्दल बोलताना बालकवींची श्रावण मास नावाची एक सुंदर कविता आठवते.


श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे

क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी उन पडे


ग्रीष्म ऋतूमध्ये पावसाची वाट पहाणाऱ्या धर्तीवर श्रावण धारा बरसू लागल्या की कवी बा. सी .मर्ढेकरांच्या आला आषाढ श्रावण या कवितेतल्या चार ओळी पण आठवतात .


आला आषाढ-श्रावण

आल्या पावसाच्या सरी;

किती चातकचोचीने

प्यावा वर्षा‌ऋतू तरी!


अशा तऱ्हेने वसुंधरेला मनसोक्त भिजवून तिला एक मनोहारी हिरवेगार देखणं रूप देणाऱ्या या श्रावण महिन्याचं मला खूप अप्रुप वाटतं. आता आपल्या मराठी वर्षातला श्रावण महिना जर अधिक महिना म्हणून आला तर त्या वर्षीचा चातुर्मास पाच महिन्यांचा असतो ,आणि ते वर्ष तेरा महिन्यांचे होते . असे म्हणतात की २०२३ साली येणारे मराठी वर्ष अधिक मासाचे वर्ष असेल आणि त्या वर्षी अधिक महिना श्रावण असेल. श्रावण महिन्याला सर्व वर्षातला व्रतांचा आणि सणांचा राजा असे म्हटले जाते .


श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या अक्षरशः प्रत्येक वाराला निरनिराळी पूजा व्रतवैकल्ये, नेम करायला सांगितले आहे. श्रावण महिन्यात सोमवारी जास्तीत जास्त ठिकाणी सत्यनारायणाची पूजा पण केली जाते. श्रावण प्रतिपदेच्या दिवशी घरातल्या देवांजवळ जिवतीचा फोटो लावला जातो आणि त्या फोटोची रोज पूजा केली जाते .ठिकठिकाणी मंदिरांमध्ये कथा पुराणांचे कार्यक्रम या महिन्यात असतात.


१ ) श्रावणी सोमवार :


श्रावण महिना सुरू झाला की अक्षरशः प्रत्येक दिवसाला,आठवड्यातल्या प्रत्येक वाराला एक वेगळे महत्व असतते. प्रत्येक वाराला साजेशी त्या त्या देवतेची पूजा-अर्चा,व्रत वैकल्ये,उपासतापास,आणि कहाणी पण असते. त्या वेळच्या समाजाचे यथार्थ वर्णन या कहाण्यांमध्ये असते. त्या इतक्या जुन्या आणि आपल्या रोजच्या व्यवहारातल्या शब्दात लिहिलेल्या नसल्यामुळे वाचताना खूप गम्मत वाटते. श्रावणी सोमवारच्या सोमवारची साधी, कहाणी सोमवारची खुलभर दुधाची, कहाणी सोमवारची शिवामुठीची, कहाणी सोमवारची फसकीची आणि कहाणी सोमवारची अशा निरनिराळ्या पाच कहाण्या आहेत. प्रत्येक कहाणीत एक वेगळी गोष्ट आणि वेगळा आशय असतो.


प्रत्येक श्रावणी सोमवारी धान्य फराळ असतो. म्हणजे धान्य भाजून ते शिजवून खाण्याची पद्धत आहे .आणि संध्याकाळी गोडाचा शिरा,कणकेचे गोड मुटके,शेवयांची खीर असा काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवून उपास सोडून जेवण केले जाते. नवीन लग्न झालेल्या मुली पहिल्या सोमवारी तांदूळ हातात घेऊन महादेवाच्या पिंडीवर " शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ,ईश्वरा देवा,सासूसासऱ्या ,दिराभावा,नणंदा जावा,भ्रतारा ( पती ), नावडती आहे ती आवडती कर रे देवा " असे म्हणून हातातले तांदूळ पिंडीवर वाहतात . दुसऱ्या सोमवारी तीळ,तिसऱ्या सोमवारी मूग,चौथ्या सोमवारी जव ,आणि पाचव्या सोमवारी सातू असे वाहून महादेवाची आपल्या साऱ्या कुटुंबावर कृपादृष्टी असू दे अशी प्रार्थना करतात . यालाच शिवामूठ वाहणे असे म्हणतात . संध्याकाळी बेलपत्र वाहून सोमवारचा उपवास सोडावयाचा असतो . त्याआधी सोमवारच्या कहाणीचे वाचन केले जाते . श्रावणी सोमवारच्या ज्या पाच कहाण्या सांगितल्या जातात त्यामधील घरातल्या आणि गोठ्यातल्या आपल्या जिवलगांना संतुष्ट करून उरलेलं खुलभर दूध शंकराला वाहिल्यावर पूर्ण गाभारा भरून जातो ती खुलभर दुधाची कहाणी मला वाचावयास आवडते मनाला पटते आणि त्यामुळे ती खरी पण वाटते. श्रावणी सोमवारी बऱ्याच देवळात, घरोघरी रुद्राभिषेक केले जातात. शंकराचा जप केला जातो. आपल्याकडे मूठभर असलेल्या धान्यातून गरजूंना मदत करण्याची छान भारतीय संस्कृती शिवामुठीतून पहावयास मिळते . श्रावणातल्या पहिल्या सोमवारपासून सोळा सोमवारांचे व्रतही सुरू करण्याची पद्धत आहे . आपल्या मनामध्ये काही एक हेतू धरून सोळा सोमवारांचे व्रत केले जाते . उद्यापनाला सोळा मेहुणे बोलावून त्यांचा योग्य आदर सत्कार करून त्यांना भोजन दिले जाते ,आणि या व्रताची सांगता केली जाते . श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी महादेवाच्या मंदिरात पिंडीवर आकर्षक सजावट केली जाते .


२ ) श्रावणी मंगळवार :


श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी सकाळी खरं तर सोळा मुली किंवा जमतील तेवढ्या मुलींना बोलावून त्यांच्या हस्ते मंगळागौरीची पूजा केली जाते . या पूजेसाठी धोतरा , मोगरा , माका , बेल , तुळस ,शमी, आघाडा , डोरली , कण्हेरी , रुई , अर्जुन , तुळद , दुर्वा इत्यादी पत्री गोळा करून जाई , जुई , चाफा , पारिजातक , गुलाब इ. सुवासिक फुले गोळा करून शिवपार्वती मंगळागौरीचे पूजन केले जाते. चौरंगावर मांडलेल्या पुजेला फुलांच्या सहाय्याने आरास करून आकर्षक केले जाते. या चौरंगाच्या चारी बाजूला केळीचे खांब बांधतात आणि चौरंगापुढे सुरेख रांगोळी काढली जाते . पूजेनंतर पुरणावरणाचा नैवेद्य दाखवून सोळा वातींची आरती केली जाते .आणि बोलाविलेल्या सोळा जणींचा यथाशक्ती मान सन्मान करून ओटी भरली जाते . यानंतर गोडाधोडाचे जेवण मुक्याने (न बोलता ) जेवावयाचे असते. रात्री परत मंगळागौरीची आरती करून मंगळागौरीची कहाणी वाचली जाते . त्यानंतर रात्रभर जागून मंगळागौरीचे खेळ खेळून दुसरे दिवशी सकाळी उत्तर पूजा करून दही भाताचा नैवेद्य दाखवून मंगळागौरीचे विसर्जन केले जाते .


प्रत्येक श्रावणी मंगळवारी नवीन लग्न झालेल्या मुली सलग पाच वर्षे मंगळागौरीची पूजा करतात. कहाणीत सांगितल्याप्रमाणे आपल्या सौभाग्याच्या म्हणजेच आपल्या पतीच्या सुखासाठी,आरोग्यासाठी दीर्घायुष्यासाठी हे मंगळागौरीचे व्रत आणि पूजा सलग पाच वर्षे केली जाते . पूर्वीच्या काळी मुली लग्न होऊन सासरी अगदी लहान वयात येत असत. खेळण्या बागडण्याचं त्यांचं वय अजूनही संपलेलं नसायचं. त्यामुळे मंगळागौरीची रात्र फुगड्या , झिम्मा खेळणे,गोफ विणून फेर धरणे,नाच ग घुमा सारखे खेळ खेळून जागविली जाते . या खेळांबरोबर प्रत्येक खेळाचं अस वेगळं गाणं पण असत,उखाणे असतात.आणि म्हणूनच सगळे वातावरण उत्साहाने भारलेले असते. त्यामध्ये अतिशय सुंदर रीत्या शरीराला व्यायाम पण होतो . पण अलिकडे मात्र लग्नाचे वय वाढल्यामुळे आणि मुली नोकऱ्या करीत असल्यामुळे जेमतेम एखादे वर्ष मंगळागौरीची पूजा करून आणि आईला कहाणीमध्ये सांगितल्याप्रमाणे वाण देऊन मंगळागौरीच्या व्रताचे उद्यापनही करतात. आता तर बायकांना पूर्वीसारखे मंगळागौरीचे खेळ कसे खेळावयाचे हे माहीत नाही आणि खेळताही येत नाही. त्यामुळे मोबदला घेऊन मंगळागौरीचे खेळ करून दाखविणाऱ्या तरुण मुलींचे गट तयार झाले आहेत .


३ ) श्रावणी बुधवार आणि श्रावणी गुरुवार


श्रावण महिन्याच्या प्रत्येक बुधवारी बुधाची आणि प्रत्येक गुरुवारी बृहस्पतीची म्हणजेच गुरुची पूजा केली जाते. यालाच बुध-बृहस्पतीचे व्रत असे म्हणतात.आपण जो देवाजवळ भिंतीवर जिवतीचा फोटो लावतो त्यामध्ये बुध - बृहस्पतींच्या प्रतिमा पण दाखविलेल्या असतात. दर बुधवारी आणि गुरुवारी या बुध - बृहस्पतींची पूजा केली जाते. पूजा केल्यानंतर त्यांना दही भाताचा नैवेद्य दाखविला जातो . हे व्रत सात वर्षे सलग करावे असे सांगितले आहे. बुध बृहस्पतीच्या कहाणीत लिहिल्याप्रमाणे हे व्रत राजाच्या सातव्या सुनेने केल्यामुळे तिच्या पतीला जसे राज्यपद, सुखसमृद्धी,धनदौलत मिळाली त्याप्रमाणे साऱ्यांना या व्रताचा लाभ मिळतो.बृहस्पतीची पूजा केल्यामुळे गुरूकडून शिष्याला विद्याधनाची प्राप्ती होते असे सांगितले आहे. या निमित्ताने अन्नदान करावे असेही सांगितले आहे. गुरुवार हा दत्तगुरूंचा वार असल्यामुळे त्यांची उपासना , पूजा ,स्तोत्रपठण केलं जातं.श्रावणातल्या पहिल्या बुधवारपासून पांढऱ्या बुधवारांचे व्रतही करण्याची पद्धत आहे . हे व्रत अकरा बुधवार करावयाचे असते , आणि उपवास सोडताना मीठ ,तिखट न घातलेले पांढरे पदार्थ खाण्याची प्रथा आहे .


४ ) श्रावणी शुक्रवार :


श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक शुक्रवाराचे पण वेगळे महत्व असते .भिंतीवर लावलेला जीवतीचा कागद किंवा फोटो मधील देवतांचे पूजन करून जरा-जिवंतीमातेचे पण पूजन केले जाते. पुरणाचे दिवे करून त्यात तुपाची वात उजळवून घरातल्या मुलांना औक्षण केले जाते आणि त्यांचे रक्षण करण्यासाठी जिवतीमातेचे स्मरण केले जाते . दर शुक्रवारी जिवतीमातेचे व्रत करून घरामध्ये पुरणा वरणाचा स्वयंपाक करून सव्वाष्ण जेवावयास घातली जाते. तिची सौभाग्यवाणाने साडी चोळी देऊन ओटी भरली जाते . शेजारच्या पाच घरच्या सुवासिनींनापण आपल्या घरी बोलावून दूध आणि फुटाणे देऊन हळदी कुंकवाचा समारंभ केला जातो .


श्रावण महिन्यातील प्रत्येक वाराची आणि प्रत्येक सणाची वेगवेगळी गोष्ट सांगणाऱ्या कहाण्या जशा आहेत तशाच शुक्रवारच्यापण दोन कहाण्या आहेत. एक जिवतीची कहाणी आणि एक लक्ष्मीची कहाणी.भावाने घातलेल्या लक्ष भोजनाच्या वेळी बोलाविले नव्हते तरीही आपल्या मुलांना घेऊन जेवावयास जाणारी बहीण गरीब असल्यामुळे तिचा अपमान करून तिला जेवणातून हाताला धरून बाहेर काढणारा भाऊ आणि लक्ष्मीच्या कृपेने श्रीमंत झालेली बहीण भावाकडे जेवावयास जाते त्यावेळेस तिच्या श्रीमंतीला भुललेला भाऊ या शुक्रवारच्या लक्ष्मी देवीच्या कहाणीत सांगितलेला आहे. त्या वेळच्या लोकमानसात मुरलेल्या या कहाण्या आजही तितक्याच ताज्या वाटतात याचे कारण मनुष्य स्वभावाला औषध नाही हेच खरे. त्या कहाण्यांपासून एक सुंदरसा बोध आचरणात आणण्यासाठी दिला जातो ,तो आजच्या काळातही योग्य असाच वाटतो .


५ ) जरा - जिवंतिका पूजन :


श्रावण महिन्यातल्या प्रत्येक शुक्रवारी जिवतीची प्रतिमेच्या रूपात पूजा केली जाते. संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेच पूजन आईकडून केलं जातं व आपल्या अपत्यांच्या सुखासाठी प्रार्थना केली जाते. ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे. या एकाच प्रतिमेत चार वेगवेगळ्या देवतांच्या, वरवर पाहता परस्परांशी संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचे पूजन केले जाते. यातील एकही प्रतिमा बदललेली दिसत नाही.


जिवती प्रतिमेत प्रथम नरसिंह, नंतर कालियामर्दन करणारा कृष्ण, मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा- जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध - बृहस्पती (गुरु) यांचा समावेश असतो. याच क्रमात त्यांना पुजले जाते त्याची कारण मिमांसा…(संग्रहित)


प्रथम भगवान नरसिंहचं का?


भगवान विष्णूंचा चवथा अवतार असलेले नरसिंह, आपल्या बाळ भक्तासाठी प्रगट झाले. हि कथा आपल्या सर्वांना परिचयाची आहे. बाळ प्रल्हादाचे हिरण्यकश्यपू पासून म्हणजेच दैत्यांपासून रक्षण करणे याच मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला. बालकांचा रक्षक आणि बाल भक्तासाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पुजले जातात.


म्हणजेच नरसिंह घरात ओढवणाऱ्या आपत्तीपासून बाळाचा बचाव करतात जसे उंचावरून पडणे, अन्नातून कधी विषबाधा होणे, आगीपासून होणारी हानी इत्यादी. (संग्रहित )


त्यानंतर येतात कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण-


यातील नाग आणि गोपाळकृष्ण दोन्हीही श्रावणातील आराध्य दैवत. मग नाग प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालियामर्दन करणारा श्रीकृष्णच का? आपण जर कालियामर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल कि या प्रसंगात कृष्ण आणि त्याचे मित्र खेळात असतांना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला. खेळणाऱ्या- बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला. तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला. नाग हा सरटपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य मानला जातो. सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा, त्याचबरोबर महत्वाच्या प्राण्यांना अभय देणारा, खेळात बागडत असतांना बालकांवर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे कालियामर्दन रूपात पुजला जातो.


म्हणजेच कालियादमनक कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून जसे खेळतांना येणाऱ्या आपत्ती, पाण्यापासूनचे संकट,सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय इत्यादींपासून बालकांचा बचाव करतात. घरात आणि घराबाहेर बाळांवर येणाऱ्या संकटांपासून हे दोन्ही देव बालकांचे रक्षण करतात म्हणून जिवती प्रतिमेत त्यांचे प्रथम स्थान आहे. ( संग्रहित )


नंतर येतात त्या जरा व जिवंतिका -


जरा व जिवंतिका या यक्ष गणातील देवता. जरा या यक्षिणीबद्दल महाभारतात एक कथा येते. मगधनरेश बृहद्रथ याला दोन राण्या असतात. दोन्हीही राण्यांवर त्याचे सारखेच प्रेम असते. परंतु राजाला पुत्र/ पुत्री काहीही नसल्यामुळे राजा चिंतीत असतो. याच सुमारास नगराजवळील उपवनात ऋषी चंडकौशिक आल्याचे राजाला समजते. राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रगट करतो. ऋषी राजाला प्रसादात आंबा देतात व राणीला खायला द्या म्हणून सांगतात. दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांना देतो. कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो परंतु अर्धा- अर्धा. अशा विचित्र आणि अर्धवट अर्भकांना राजा जंगलात नेऊन टाकतो. त्याच वेळेस तेथून जरा नामक यक्षिणी जात असते. ती दोन्ही अर्भक तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव सांधण्याच्या कलेने दोन्ही शकलं सांधते. जरा ते सांधलेले अर्भक संध्यासमयास बृहद्रथ राजाला आणून देते. जरा यक्षिणीने सांधले म्हणून राजा त्याचे नाव जरासंघ ठेवतो आणि जरा यक्षिणीच्या उपकाराप्रीत्यर्थ नगरात देऊळ बांधून तिला मगधाच्या इष्टदेवतेचा मान देतो. त्याच प्रमाणे जरा देवतेचा वार्षिक महोत्सव सुरु करतो, अशी हि जरा देवी. जरेचीच सखी जिवंतिका. जिवंतिका या शब्दाचा अपभ्रंश जिवती. जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी. बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात. ही देवी पाळण्यातल्या व आजूबाजूच्या बालकांना खेळवते अशा रूपात दाखवतात.


प्रतिमेत सगळ्यात शेवटी येतात बुध व बृहस्पती -


बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून हातात अंकुश धारण करतो. तर बृहस्पती (गुरु) वाघावर बसलेला आणि हातात चाबूक घेतलेला दाखवतात. बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता, आकर्षक व्यक्तिमत्व, वाक्पटुत्व इत्यादी गुण प्राप्त होतात. तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती, अध्यात्मिक उन्नती, विवेकबुद्धी जागृत होते.


बुधाचं वाहन हत्ती - हत्ती हे उन्मत्ततेचं प्रतीक आहे. मानवी मनाला येणारी उन्मत्तता आपल्या बुद्धिमत्तेने, व्यक्तित्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे बुध प्रतिमेवरुन लक्षात येते.


बृहस्पतीचं वाहन वाघ - हे अहंकाराचा प्रतीक आहे. मानवी मनाला अहंकार लवकर चिकटतो. अहंकार मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये व आध्यात्मिक साधनेतही बाधक ठरतो. त्यावर आपण ज्ञानाच्या, गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते. म्हणूनच बुध - बृहस्पती यांना सुद्धा जिवती प्रतिमेत स्थान मिळालं.


प्रथम रक्षक देवता.नंतर जन्मलेल्या बालकाचे रक्षण व दीर्घायुष्य देणारी देवता.आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणाऱ्या ग्रह देवता असा हा जिवती प्रतिमेचा क्रम.


एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजेच जिवती पूजन. जगातील सर्व प्राणिमात्रांच्या उज्वल भविष्याची, रक्षणाची प्रार्थना म्हणजेच जिवती पुजन


जरे जीवन्तिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी ।

रक्षाव्रते महाशक्ती पूर्णकामे नमोस्तुते ।।

जिवती मातेची पूजा करताना ही प्रार्थना म्हटली जाते.

( संग्रहित )


६ ) श्रावणी शनिवार :


नवग्रहांपैकी एक असा शनिदेव त्या शनिदेवाचा वार म्हणजे शनिवार. श्रावणातील शनिवारसाठी दोन कहाण्या सांगितल्या जातात त्यातली एक कहाणी म्हणजे संपत शनिवाराची कहाणी. या कहाणीमध्ये अंगावर कुष्ठ आलेल्या रोग्याचे रूप घेऊन शनिदेव घरी येऊन लेकी सुनांची परीक्षा घेतात आणि त्या रोग्याची सेवा करण्यासाठी नकार देणाऱ्या लेकीबाळीच्या घरी दारिद्रय येते. ज्या घरातून त्यांची नीट सेवा होते त्या घरामध्ये समृद्धी येते. नाहीतर शनी महाराजांचा कोप होऊन दारिद्र्य पण येते. आलेल्या पाहुण्याचं व्यवस्थित स्वागत करून त्याला जेवावयास देऊन त्याची सेवा करण्याचा जो संस्कार आपल्या जीवन पद्धतीमध्ये सांगितला आहे त्याचे या कहाणीत यथार्थ वर्णन केले आहे . दुसरी कहाणी मारुतीची कहाणी म्हणून सांगितली जाते . मारुती हा ब्रह्मचारी असल्यामुळे नुकतीच मुंज झालेल्या मुलाला आपल्या घरी श्रावणातील प्रत्येक शनिवारी बोलावून त्याला तेल लावून अंघोळ घालायला सांगितले आहे कारण ते बालब्रह्मचारी मारुतिरायाचच एक रूप असतं. त्याला मारुतीराया समजून त्याची पाद्यपूजा करून त्याला पक्वान्नाचे जेवणही खाऊ घातले जाते .


७ ) अश्वत्थ मारुती आणि नृसिंह पूजन :


अश्वत्थ मारुती पूजन :


श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वत्थाची पूजा करण्याची प्रथा आहे. अश्वत्थ म्हणजे पिंपळवृक्ष .दुधामध्ये बेलाचे पान घालून ते दूध पिंपळाच्या मुळात घालावे. त्यामुळे त्या दुधाचा सुगंध पिंपळाला मिळतो. पिंपळाची पूजा करणे म्हणजे विष्णूपूजा करणे, असे मानले जाते. पिंपळाच्या खाली मारुती असल्यास त्याचीही पूजा करण्याची प्रथा आहे. तसेच मारुती नसल्यास पिंपळाची आणि मारुतीची अशा वेगवेगळ्या पूजादेखील केल्या जातात. शनिवार हा मारुतीचा वार असल्यामुळे श्रावणात मारुतीरायाला तेल, शेंदूर, रुईच्या पानांची माळ अर्पण केली जाते. पिंपळाच्या पूजेने सर्व तऱ्हेच्या पीडांचा परिहार होतो, असा समज आहे. वेदकाळापूर्वीच्या सिंधुसंस्कृतीत अश्वत्थ वृक्षाला निर्मितीचे प्रतीक मानले गेले होते. तेव्हापासून हा वृक्ष पूजनीय ठरला.


अश्वत्थ पूजनाबद्दल पुराणांमध्ये एक कथा सांगितली जाते ती अशी.


विष्णूने धनंजय नामक विष्णूभक्त ब्राह्मणाची सत्त्वपरीक्षा घेण्याचे ठरविले. त्यानुसार त्याने धनंजयाला दरिद्री केले. परिणामी त्याच्या साऱ्या नातलगांनी त्याला एकाकी पाडले. ते थंडीचे दिवस होते. थंडीपासून स्वत:चे रक्षण व्हावे, या हेतूने धनंजय सुकी लाकडे गोळा करून शेकोटी पेटवीत असे. एकदा अशीच लाकडे तोडत असताना त्याने पिंपळाची एक फांदी तोडली. तत्क्षणी तिथे विष्णू प्रकटले. तू फांदी तोडण्यासाठी कुऱ्हाडीचे जे घाव पिंपळावर घातलेस त्यामुळे मी रक्तबंबाळ झालो आहे, मलाच जखमा झाल्या आहेत, असे विष्णूंनी सांगितले.


विष्णूंचे कथन ऐकून धनंजय अतिशय दुःखी झाला. तत्क्षणी त्याच कुऱ्हाडीने स्वत:ची मान मोडून प्रायश्चित्त घेण्याचे धनंजयने ठरविले. त्याची भक्ती पाहून विष्णू प्रसन्न झाले.आणि त्याला रोज अश्वत्थाची पूजा करण्यास सांगितले. त्याप्रमाणे धनंजय रोज भक्तिपूर्वक पूजा करू लागला. पुढे कुबेराने त्याला विपुल धनद्रव्याने श्रीमंत केले. प्रत्यक्ष भगवंतांनी गीतेमध्ये वृक्षांमध्ये श्रेष्ठ असा जो अश्वत्थ तो मी होय, असे म्हटले आहे. काही ठिकाणी पूजा करण्यापूर्वी महिला वटवृक्षाप्रमाणेच अश्वत्थ वृक्षालाही प्रथम दोरा गुंडाळतात. दुष्ट शक्तींना बांधून ठेवण्याचे एक प्रतीक म्हणून हा दोरा गुंडाळला जातो, असे सांगितले जाते. (संग्रहित )


अश्वत्थ वृक्ष म्हणजे आपल्या सर्वांना माहीत असलेला पिंपळ वृक्ष.भगवान बुद्ध गयेला ज्या वृक्षाखाली ध्यानस्थ बसत असत तो वृक्ष म्हणजे पिंपळ किंवा अश्वत्थ वृक्ष.याच वृक्षाखाली एकदा ते ध्यानस्थ बसले असताना त्यांना मानवी जीवनाचा खरा अर्थ ज्ञात झाला आणि त्याबद्दलचा खरा अर्थ कळला आणि बोध मिळाला म्हणून या वृक्षाला बोधी वृक्ष असेही म्हटले जाते . तेव्हापासून गया या गावाचे नाव बोधगया किंवा बुद्धगया असे ओळखले जाऊ लागले . भगवान श्रीकृष्णांना पण हा वृक्ष अतिशय प्रिय आहे . त्यामुळे सर्व वृक्षांमध्ये या वृक्षाला मान दिला जातो .


नृसिंह पूजाविधी :


श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी एका खांबावर अथवा भिंतीवर नृसिंहाचे चित्र काढावे. त्या चित्रावर तिळाच्या तेलाचे किंवा गाईच्या तुपाचे थेंब शिंपडून प्रोक्षण करावे. त्यानंतर साधी हळद, आंबेहळद, चंदन, लाल आणि निळी किंवा पिवळी फुले वाहून त्या चित्रातील नृसिंहाची पूजा करावी. कुंजरा नावाची पालेभाजी आणि तांदळाची खिचडी, असा नैवेद्य दाखवावा. सुखसंपत्ती आणि संततीसाठी नव्हे, पण प्रल्हादासाठी घेतलेल्या एका अवताराची आठवण म्हणून या व्रताकडे बघितले जावे, असे सांगितले जाते.


प्रल्हादासाठी विष्णूंनी नृसिंह अवतार घेतला. त्यावेळी तो खांबातून प्रगटला. त्याचे प्रतीक म्हणून खांब अथवा भिंतीवर चित्र रेखाटून ही पूजा केली जाते. आजच्या घराच्या जागांच्या अडचणींमुळे एखाद्या खांबावर अथवा भिंतीवर असे चित्र रेखाटून वा चित्र लावून पूजा करणे शक्य नाही. दुष्टांच्या संहारासाठी देवाने घेतलेला हा आणखी एक अवतार! प्रल्हादाच्या जीवनाशी निगडित ‘होळी’ जशी सामूहिक पद्धतीने साजरी केली जाते, तशीच ही पूजादेखील कोणत्याही एका शनिवारी सामुदायिक पद्धतीने करावी, असे सांगितले गेले आहे. (संग्रहित )


८ ) श्रावणी रविवार :


श्रावणी रविवारी आदित्य राणूबाईची जी कहाणी सांगितली जाते त्याप्रमाणे ब्राह्मणाला, मोळीविक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला, काणा डोळा,आणि मांसाचा गोळा असलेल्या माणसाला जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा होवो! ही एक आटपाट नगराची कहाणी सांगितली जाते. त्या कहाणीप्रमाणे सूर्यनारायणाच त्यांच्या पुजेच, त्यांची अर्चना,आराधना करण्याचं किती महत्व आहे हे सांगितले आहे . आणि हे कहाणी वाचणाऱ्यांच्या मनाला पटवून देण्यासाठी सात निरनिराळ्या परिस्तिथीतली माणसे आणि त्यांनी आदित्य राणूबाईंचं व्रत न केल्यामुळे झालेला तोटा आणि व्रत केल्यामुळे झालेला फायदा हे अगदी ठासून सांगितले आहे . आपण मात्र यातून सूर्योपासना करण्याचा उपदेश घेतला पाहिजे


आपण हिंदू लोक आर्य काळापासूनच पंचमहाभूतांना देवांच्या स्थानी ठेवून त्यांची उपासना करीत आलो आहोत. आणि आपल्या जीवनात निसर्गातील या देवतांचे महत्व पण खूप आहे. सूर्याच्या उपासनेतून किंवा तो आकाशात असेपर्यंत काम करण्याची सुद्धा आपली पद्धत आहे. सूर्याच्या उन्हामध्ये काम करून "ड " जीवनसत्त्व आपल्याला भरपूर मिळते त्यामुळे आरोग्यासाठी पण सूर्योपासना आपल्या ऋषीमुनींनी सांगितली आहे ,आणि हेच आदित्य राणूबाईंच्या कहाणीचे सार असावे असे वाटते. ही आदित्य राणूबाईंची पूजा श्रावण महिन्याच्या प्रत्येक रविवारी किंवा आदीतवारी केली जाते. कित्येक घरांमध्ये आदित्य राणूबाईंचा जोगवा पण मागून आणला जातो. श्रावण महिन्याच्या प्रत्येक वाराप्रमाणे या आदित्यवाराला पण तेवढेच महत्व आहे .


९ ) दुर्वा गणपती व्रत :


प्रत्येक मराठी महिन्यामध्ये प्रत्येक पंधरवड्यात एक अशा दोन चतुर्थी तिथी येतात. पहिल्या पंधरवड्यातल्या चतुर्थीला विनायकी चतुर्थी आणि दुसऱ्या पंधरवड्यातल्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हणतात .विनायकी चतुर्थी जर रविवारी आली तर त्या दिवशी श्री . गणेशाची पूजा , उपासना, आरती करून एकविसच्या पटीत दुर्वा वाहिल्या जातात आणि गणपती अथर्वशीर्षाचे पठण केले जाते. एकवीस मोदकांचा नैवेद्यही दाखविला जातो यालाच दुर्वा गणपती व्रत असे म्हणतात . या व्रतामुळे लक्ष्मी,विद्या, आणि यशश्री प्राप्त होते .


श्रावण महिन्याच्या प्रत्येक वाराचे महत्व आपण पाहिले. आता तिथीप्रमाणे त्या दिवसाचे महत्व आपण पाहूया.


१० ) मधुस्रवा तृतीया किंवा मधुश्रावणी तृतीया .

श्रावण शुद्ध तृतीया .


कालनिर्णय दिनदर्शिका बघताना श्रावण शुद्ध तृतीयेला मधुस्रवा तृतीया किंवा मधुश्रावणी तृतीया हा उल्लेख वाचावयास मिळाला ,. त्याचा शोध घेताना आम्हाला भारतातल्या उत्तर हिंदुस्थान,बिहार,झारखंड ,मिथिलांचल या सीतामाईंच्या माहेरच्या प्रदेशात खूप उत्साहाने आणि धुमधडाक्यात हा जवळजवळ पंधरा दिवस चालणारा महोत्सव आहे असे समजले. आपल्या पंचांगाप्रमाणे आषाढ वद्य पंचमी पासून श्रावण शुद्ध तृतीयेपर्यंत हा सण साजरा केला जातो. या दिवसात नवीन लग्न झालेल्या मुली माहेरी येतात आणि हे व्रत करतात,. या व्रतामध्ये बिन मिठाचे जेवण करावयाचे असते. एकभुक्त राहून संध्याकाळी आंब्यासहित जी फळे मिळतात त्यांचा फलाहार करण्याची पद्धत आहे. या काळामध्ये त्यांना जेवण आणि फळे पण त्यांच्या सासरच्या घरून येतात. जेवणाबरोबर कपडे पण सासरच्या घरून पुरविले जातात. या काळामध्ये जुन्या जुन्या पुराणामधल्या कथा वाचावयाची पण पद्धत आहे . सुवासिक फुले आणून श्री . गणेश,पार्वतीमाता, श्री .महादेव आणि नागदेवता यांची पूजा केली जाते. श्रावण शुद्ध तृतीयेला पौराणिक कथा वाचून दाखविणारी स्त्री आणि इतर स्त्रिया यांची खणा नारळाने ओटी भरून त्यांचा मान सन्मान करून व्रताचे उद्यापन केले जाते. या उद्यापनासाठी लेकी बरोबर जावयाची उपस्तिथी असावी असे म्हटले आहे. आजकाल कामाच्या निमित्ताने सगळ्या प्रदेशातली माणसे सगळीकडे जाऊन राहतात,त्यामुळे हा उत्सव महाराष्ट्रात मराठी माणसाचा नसला तरीपण हा एक छान उत्सव वाटला म्हणून ही माहिती दिली .


११ ) नागचतुर्थी आणि नागपंचमी : श्रावण शुद्ध चतुर्थी आणि श्रावण शुद्ध पंचमी.


श्रावण शुद्ध चतुर्थीला नागचतुर्थी असे म्हणतात. भारत हा कृषिप्रधान देश असल्याने शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी मदत करणाऱ्या नागांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस नागचतुर्थी म्हणून साजरा केला जातो. नाग हे महादेव शंकराचे जवळचे मित्र असतात, म्हणून दगडावर कोरलेल्या नागांच्या प्रतिमेचे या दिवशी पूजन केले जाते . या दगडी नागोबांना साध्या पाण्याने धुवून दुग्धाभिषेक करून लाह्या ,फुटाणे,फुले, आघाड्याची पत्री वाहून त्यांची पूजा केली जाते . ज्वारीच्या लाह्यांचे पीठ आणि गूळ किंवा फुटाण्याचे पीठ आणि गूळ किंवा तांदूळ पिठी भाजून त्यामध्ये गूळ आणि भाजलेले पांढरे तीळ घालून लाडू करून त्यांचा नैवेद्य दाखविला जातो. या लाडवांना तंबीटाचे लाडू असे म्हणतात . कर्नाटक राज्य आणि कर्नाटक - महाराष्ट्राच्या सीमेलगतच्या प्रदेशातील सुवासिनी जास्त करून हे व्रत करतात. त्या दिवशी दिवसभर धान्य फराळच करावयाचा असतो,या दिवसाला नागचतुर्थी असे म्हणतात .


श्रावण शुद्ध पंचमी म्हणजेच नागपंचमीचा सण. या सुमारास घरच्या लेकीबाळी ,नवीन लग्न झालेल्या माहेरवाशिणी श्रावण महिन्यातले सणवार साजरे करण्यासाठी माहेरी आलेल्या असतात. झाडांना उंच झोके बांधून त्याच्यावर झोके घेण्याचा एक सुंदर कार्यक्रम पण केला जातो . नाग हे शेतकऱ्यांचे मित्र असतात,त्यामुळे या दिवशी शेतामध्ये नांगर घालीत नाहीत. जेणेकरून जमिनीखालच्या नाग देवतेला त्रास होणार नाही असे पाहिले जाते . घरामध्ये चंदनाचे उगाळलेले गंध वापरून त्याने पाटावर नागोबा,नागीण,आणि त्यांची सात छोटी छोटी पिल्ले रेखाटली जातात. या सर्व नागकुटुंबाला लाह्या,फुटाणे आघाडा,दुर्वा,फुले वाहून त्यांची पूजा केली जाते .नागपंचमीच्या दिवशीचा स्वयंपाक पण वेगळा असतो .या दिवशी करावयाच्या भाज्या आदल्या दिवशी चिरून ठेविल्या जातात. त्याचप्रमाणे या दिवशी चिरणे, कुटणे, वाटणे ,तळणे,लाटणे खणणे या गोष्टी निषिद्ध समजल्या जातात . पुरण शिजवून किंचित मीठ घातलेल्या कणकेच्या किंवा तांदूळ पिठीच्या पारीमध्ये पुरण भरून त्याची पुडी करून ते उकडून खाल्ले जातात .यांनाच दिंड असे म्हणतात. याचाच नैवेद्य देवांना आणि नागदेवतेला दाखविला जातो . नागपंचमीच्या निमित्ताने सांगितलेल्या दोन कहाण्या आहेत त्यांचे वाचनही या दिवशी करतात. कोणी मातीचे नाग तयार करून त्यांची पूजा करतात. "नागोबाला दूध" असे ओरडत जिवंत नाग टोपलीत ठेऊन गारुडी घरोघरी जातात, या नागांची पण त्यांना दूध आणि लाह्या यांचा नैवेद्य दाखवून त्यांची पूजा करण्याची पद्धत आहे .


नाग चतुर्थीला किंवा नाग पंचमीला गावाबाहेर महादेवाच्या मंदिराबाहेर असलेल्या दगडावर कोरलेल्या नागांच्या प्रतिमेचे पूजन करण्यासाठी सुवासिनी स्त्रिया पूर्वी जात असत. यालाच वारूळ असे म्हटले जायचे. या वारूळाकडे पूजेसाठी निघालेल्या सुवासिनींचे छानसे वर्णन कवी श्री. ग. दि. माडगूळकर यांनी केले आहे ते कवितेचे बोल खाली देत आहोत पण ही पद्धत काळाच्या ओघामध्ये हळू हळू मागे पडत चालली आहे हे नक्की.


चल ग सये वारुळाला, वारुळाला, वारुळाला ग

नागोबाला पूजायाला, पूजायाला, पूजायाला ग


निसर्गातल्या या मूक प्राण्यांचे संरक्षण करणारी आपली भारतीय संस्कृती अतिशय उच्च विचारसरणीची आहे. त्याचा आपण अभिमान बाळगला पाहिजे.


१२ ) श्रावणी संस्कार :


श्रावण महिन्यामध्ये चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण,देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण,शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मण,आणि कृष्ण यजुर्वेदी ब्राह्मण या ब्राह्मण जातीच्या समूहांमध्ये शरीर शुद्धीचा दरवर्षी संस्कार केला जातो यालाच श्रावणी असे म्हणतात. हा श्रावणी संस्कार श्रावण शुद्ध चतुर्थी,पंचमी,षष्ठी किंवा नारळी पौर्णिमेला केला जातो . त्या त्या समूहाला श्रावणी करण्यासाठी जी तिथी किंवा जे नक्षत्र योग्य वाटेल त्या तिथीला हा संस्कार केला जातो. यजमानाकडे बाकी सारे ब्राह्मण जमतात. त्यानंतर सर्वांना एक एक पळी पंचगव्य हातावर दिले जाते. हे पंचगव्य म्हणजे देशी गाईचे मल-मूत्र,दूध,दही आणि तूप यांचे मिश्रण असते. त्यानंतर गायत्री मंत्र म्हणण्यासाठी होम पेटविला जातो . यजमानाने आधीच आणून आणि ओले करून ठेवलेले जानवी जोड प्रत्येकाच्या हातात देऊन तो जानवी जोड गायत्री मंत्र म्हणून सिद्ध केला जातो. जानवी जोडावर जी ब्रह्मगाठ असते ती गाठ हातात धरून गायस्त्री मंत्र म्हणावयाचे असतात. गायत्री मंत्राच पठण झालं की जुने जानवे काढून नवीन सिद्ध केलेलं जानवं गळ्यात घालावयाचे असते. श्रावण महिन्यापासून चातुर्मासाचा शुभ काळ सुरू होत असल्यामुळे बहुतेक या महिन्यात जुने जानवीजोड बदलण्याचा संस्कार केला जात असावा असे वाटते.


१३ ) कल्की जयंती : कल्की अवतार : श्रावण शुद्ध पंचमी.


हा हिंदू धर्मातील देवता विष्णूचा दशावतारांपैकी दहावा अवतार आणि भविष्यातील अवतार मानला जातो .सध्या कलियुग चालू आहे.असे म्हणतात की कलियुग संपता संपता कल्की या नावाचा विष्णूंचा दहावा अवतार जन्म घेणार आहे . त्या वेळेपर्यंत असेही म्हणतात की कलियुगातल्या वाईट शक्तींचा प्रकोप होऊन दुष्टांचा सुळसुळाट होईल आणि या दुष्ट शक्ती कलियुगाच्या अंतापर्यंत पापभिरू लोकांना छळत आणि नष्ट करीत रहातील. या पापकर्मांचा आणि ती करणाऱ्या दुष्ट लोकांचा विनाश करण्यासाठी विष्णूंच्या या अवताराचा जन्म होईल आणि समस्त पृथ्वी पाण्याखाली जाऊन परत सत्ययुगाची निर्मिती होईल. या कल्की अवताराचे नाव निष्कलंक भगवान असे असेल असेही सांगितले जाते . हा कल्की अवतार कलियुगाची सांगता आणि सत्ययुगाची सुरुवात यांच्यामधील काळात होणार आहे आणि तो अवतार भगवान विष्णूंचा दहावा अवतार असल्यामुळे कल्की भगवानची पूजा अर्चना,आराधना, आपण मानवाने आत्तापासूनच सुरू केली आहे. श्रावण शुद्ध षष्ठी या दिवशी कल्की जयंती साजरी केली जाते .(संग्रहित ).


१४ ) श्रीयाळ षष्ठी : श्रावण शुद्ध षष्ठी


श्रावण षष्ठी म्हणजेच श्रीयाळ षष्ठी. महाराष्ट्रातील काही भागात श्रीयाळ षष्ठी साजरी करण्याची प्रथा आहे. मात्र काळाच्या ओघात तेराव्या शतकात लोकहिताचे कार्य करणाऱ्या आणि "औट घटकेचा राजा" म्हणून ओळख असलेल्या श्रीयाळ श्रेष्ठचा (संक्रोबा) विसर लोकांना पडला आहे. परंतु काऱ्हटी ( तालुका बारामती ) येथे पारंपरिक पद्धतीने षष्ठी साजरी केली जाते . श्रीयाळ षष्ठी या दिवशी दातृत्व आणि गुणाची महती सांगितली जाते . दुष्काळामध्ये स्वतःचे धान्याचे कोठार जनतेसाठी खुले करणाऱ्या श्रीयाळ श्रेष्ठचे स्मरण या दिवशी केले जाते . दरम्यान श्रीयाळ श्रेष्ठचा बदलत्या काळाप्रमाणे तोंडात चिलीम धरलेला, ढेरपोट्या पोटाचा,चिखलाचा किंवा मातीचा बनविलेला शिराळ शेठ झाला आणि श्रीयाळ श्रेष्ठचे दानशूर आणि आऊट घटकेच्या राजाचे रूप जाऊन एक ओंगळपणा आला . श्रीयाळ श्रेष्ठ शंकराचे निस्सीम भक्त असल्यामुळे त्यांना शंकरोबा असेही म्हटले जाते . या दिवशी संध्याकाळी श्रीयाळ श्रेष्ठची मिरवणूक काढून त्यांच्या पुतळ्याचे विसर्जन केले जाते .(संग्रहित ).


१५ ) सुपोदन वर्ण षष्ठी : श्रावण शुद्ध षष्ठी.


आपली भारतीय शेतीप्रधान हिंदू संस्कृती आपल्या भागातल्या ऋतुमानाप्रमाणे येणारे सण,व्रत,नियम आखून तयार केलेली आहे. श्रावण शुद्ध षष्ठीला सुपोदन वर्ण षष्ठी असे म्हणतात . श्रावण महिना पूर्ण पावसाळा असतो. सूर्यदर्शन फार क्वचित होते त्यामुळे पचनक्रिया मंदावलेली असते. आपल्या रोजच्या आहारात षडरस असण्याची जरुरी पूर्वापार सांगितलेली आहे. त्यातला एक रस म्हणजे कडू रस. तो कडू रस मंदावलेल्या पचनशक्तीला अन्न पचविण्यासाठी मदत करतो. कडवे वाल या सुमारास पिकून तयार झालेले असतात . भरपूर कडू रस असलेलं हे धान्य खाण्यामध्ये वारंवार यावे म्हणून त्याचे दान देण्याचे व्रत या सुपोदन वर्ण षष्ठी या दिवशी करावयाच्या व्रतामध्ये ठळकपणे सांगितले आहे. या व्रतामध्ये एका केळीच्या पानावर तांदूळ आणि त्याच्या शेजारी पांढऱ्या रंगाचे कडवे वाल आणि त्याबरोबर ब्राह्मणाला द्यावयाची दक्षिणा असे ठेऊन उदक सोडून ते दान ब्राह्मणाला द्यावयास सांगितले आहे. वर्णषष्ठीच्या कहाणीमध्ये सांगितल्याप्रमाणे ब्राह्मणाच्या सातव्या मुलीच्या मेलेल्या किंवा मृतवत पडलेल्या नवऱ्याला हे तांदूळ आणि वाल मोठ्या दुःखाने त्या मुलीने भरवल्यामुळे कदाचित त्याला जीवनदान मिळून परत आयुष्य प्राप्त झाले असल्याची शक्यता वाटते. तेव्हापासून आपल्या कुटुंबातल्या साऱ्यांचे आयुष्य आरोग्य चांगले रहाण्यासाठी हे व्रत मदत करते असे या कहाणीद्वारे सांगावयाचे असावे असे मला वाटते. आपण जसे गोड ,आंबट, तुरट,तिखट ,खारट हे पाच रस तर अन्नातून घेतच असतो. पण अन्न पचविण्यासाठी कडू रसाचे महत्वही तितकेच आहे हे या कहाणीतून सुचवावयाचे असावे असे मला वाटते.


सुपोदनवर्णषष्ठीला गुजरातमध्ये रांधनछट असे म्हटले जाते . या दिवशी गुजरातमधील स्त्रिया शितला मातेची पूजा करतात. बंगाली स्त्रिया या दिवसाला लोटण षष्ठी असे म्हणतात. या दिवशी मुलांना दीर्घायुष्य लाभावे म्हणून बंगाली स्त्रिया हे व्रत करतात. त्यानिमित्ताने षष्ठी देवीला लोटणांचा (, लाडवांचा) नैवेद्य दाखविला जातो


१६ ) शितळा सप्तमी : श्रावण शुद्ध सप्तमी .


श्रावण महिन्यात श्रावण शुद्ध सप्तमीला शितळा सप्तमी किंवा शिळा सप्तमी असे म्हणतात .हल्लीच्या नव्या जमान्याच्या नगर रचनेप्रमाणे रस्ते ,इमारती बांधल्या जातात. पण हल्ली पूर्वीसारख्या विहिरी , तळी ,जलाशय घरांच्या जवळपास शक्यतोवर नसतात. पूर्वीच्या काळी गावागावांमधून बऱ्याच विहिरी आणि तळी असायची. श्रावण शुद्ध सप्तमी या दिवशी शितळा सप्तमीचे व्रत करायचे असते .पाण्यामध्ये रहाणाऱ्या जलदेवतांना दहिभाताचा नैवेद्य दाखवून त्यांची पूजा करावयाची असते, की जेणेकरून आपल्या कुटुंबातील सगळ्यांना पाण्यापासून अभय मिळेल आणि मृत्यूचे भय रहाणार नाही . शितळा सप्तमीच्या कहाणीत सांगितल्याप्रमाणे विहिरीला पाणी येण्यासाठी बळी दिलेला मुलगासुद्धा जलकन्यांच्या आशिर्वादाने जिवंत झाला ,आणि सगळीकडे आनंदीआनंद झाला असा उल्लेख आहे . जल म्हणजे जीवन, पाणी . पाण्याशिवाय आपण माणसं आणि सजीव प्राणी सुद्धा जगू शकत नाहीत. त्या पाण्यापासून विषबाधा होणे किंवा पाण्यामध्ये पडून मृत्यू होणे अशा दुर्घटना घडू नयेत म्हणून ही पूजा करावयाची असते . या दिवशी कुमारिकांची ओटी भरून त्यांची पूजा केली जाते


१७ ) भानु सप्तमी :


कोणत्याही मराठी महिन्यात सप्तमी या तिथीला रविवार आला तर त्या तिथीला भानुसप्तमी असे म्हणतात . भानू म्हणजे सूर्य देवाच्या बारा नावांपैकी एक नाव आहे . रविवार या वाराचा देव सूर्य असतो त्यामुळे या तिथीला भानुसप्तमी असे म्हणतात. या दिवशी आदित्यनारायणाची पूजा करून कहाणी वाचून सूर्यदेवतेचे स्तोत्रही म्हटले जाते . या दिवशी पहाटे लवकर उठून नदीत स्नान करून उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यावे असे सुचविले आहे. या वेळच्या कोवळ्या उन्हामध्ये व्यायाम करून आरोग्यसंपदा मिळविता येते असेही सांगितले आहे.


१८ ) गोस्वामी तुलसीदास जयंती : श्रावण शुद्ध सप्तमी.


,गोस्वामी तुलसीदासांचा जन्म श्रावण शुद्ध सप्तमीला सध्याच्या उत्तर प्रदेश या राज्यातील चित्रकूट जिल्ह्यातील राजापूर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव आत्माराम दुबे आणि आईचे नाव हुलसी दुबे असे होते . रत्नावली हे त्यांच्या पत्नीचे नाव होते . त्यांना हिंदू धर्माचा खूप अभिमान होता . हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम त्यांनी केले. त्यांनी श्री रामचरितमानस आणि विनय पत्रिका या रचना केल्या. मूळ संस्कृतात असलेले वाल्मिकी रामायण त्यांनी खूप छान पद्धतीने अवध भाषेमध्ये रूपांतरित केले आणि श्री रामचरितमानस हा एक अतिशय सुंदर ग्रंथ निर्माण केला. वाल्मिकी रामायणानंतर अभ्यासू लोक प्रमाण म्हणून तुलसी रामायणाची किंवा श्री रामचरितमानस या ग्रंथाची मदत घेतात.


संत कवी गोस्वामी तुलसीदास यांना युगप्रवर्तक हिंदी महाकवी असे म्हटले जाते . रामावर आणि हनुमानावर त्यांची अपार श्रद्धा होती . आपण भक्तगण हनुमानाचे हनुमान चालिसा हे स्तोत्र वाचतो ते संत तुलसीदासांनी रचलेले आहे .( संग्रहित )


१९ ) पुत्रदा एकादशी : श्रावण शुद्ध एकादशी.


श्रावणामध्ये शुद्ध पक्षात येणारी एकादशी पुत्रदा एकादशी या नावाने साजरी केली जाते. देवशयनी एकादशीनंतर येणारी ही दुसरी एकदाशी आहे. संतानप्राप्तीसाठी हे व्रत आचरले जाते, अशी मान्यता आहे.


पुत्रदा एकादशीचे व्रत प्रामुख्याने संतानप्राप्तीसाठी केले जाते आणि त्यासाठी श्री . विष्णूंची प्रार्थना केली जाते असे म्हणतात. या व्रतात श्री विष्णूंच्या पूजनासह पिंपळाच्या झाडाचे पूजन करावे, असे सांगितले जाते.(संग्रहित )


२० ) भगवान जिव्हेश्वर जयंती : श्रावण शुक्ल त्रयोदशी.


भगवान जिव्हेश्वर यांचा जन्म भगवान शंकर यांच्या जिव्हेद्वारे (जिभेतून) झाला आहे. त्यामुळे त्यांचे नामकरण जिव्हेश्वर करण्यात आले आहे. संसाराची निर्मिती झाल्यावर वस्त्र बनविण्यासाठी पुढाकार घेण्यासाठी जिव्हेश्वर भगवान यांची निर्मिती शंकर भगवान यांनी केली. अशी जिव्हेश्वर भगवान यांची अख्यायिका आहे. वस्त्रोद्योगाचे आद्यप्रवर्तक म्हणूनही भगवान जिव्हेश्वरांना ओळखले जाते.


स्वकुळ साळी समाजाचे आद्य दैवत भगवान श्री. जिव्हेश्वर यांचा जयंती सोहोळा महाराष्ट्रात स्वकुळ साळी समाज मोठ्या उत्साहात साजरा करतात. स्वकुळ साळी समाज भगवान जिव्हेश्वरांची विधिवत पूजा आणि आरती करून विविध फुलांनी सजविलेल्या पालखीतून त्यांची मिरवणूक काढतात. त्यानंतर समाज बांधवांना प्रसादाचे वाटप करण्याची प्रथा आहे .( संग्रहित)


२१ ) श्रावण वरदलक्ष्मी व्रत :


वरदलक्ष्मी हे व्रत श्रावण महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी सुरू करतात. हे व्रत लक्ष्मीमातेचे असल्यामुळे ते केल्याने लक्ष्मी माता आपल्याला धनधान्याची सुबत्ता, आरोग्य, संपन्नता हे वर देते अशी समजूत आहे म्हणून या व्रताला वरदलक्ष्मी व्रत असे म्हणतात . विशेष करून दक्षिण भारतातील गृहिणी वरदलक्ष्मीची पूजा मोठ्या भक्तिभावाने करतात . या दिवशी वरदलक्ष्मीची पूजा करून देवीला एकवीस अनरश्यांचा (अपूपांचा ) नैवेद्य दाखविण्याची प्रथा आहे. पूजेला आलेल्या स्त्रियांना वाण देऊन,कहाणी पठण करून त्यांची खणा नारळाने ओटी भरण्याची प्रथा आहे. या दिवशी व्रत करणाऱ्या गृहिणीने संपूर्ण दिवस उपवास करावा असे सांगितले आहे .


या व्रताबद्दल पुराणात एक कथा सांगितली जाते. या कथेत चक्रनेमी नावाच्या गणाने शिव - पार्वतीच्या सारिपाटाच्या खेळात शिवशंकराच्या बाजूने निर्णय दिल्यामुळे पार्वतीने चक्रनेमींना दिलेल्या शापामुळे तो कुष्ठरोगी झाला. पुढे शिवशंकरांच्या विनंतीवरून पार्वतीने दिलेल्या उ:शापाने चक्रनेमीने वरदलक्ष्मीचे व्रत केल्याने तो रोगमुक्त झाला .अशी वरदलक्ष्मी व्रताची महती या कथेत वर्णिलेली आहे . वरदलक्ष्मीचे व्रत हे प्रामुख्याने रोगमुक्ती मिळण्यासाठी केले जाते असे म्हणतात .( संग्रहित ).


२२ ) संत नरहरी सोनार (महाराज ) जयंती : श्रावण शुद्ध त्रयोदशी


नरहरी सोनार यांचा जन्म श्रावण शुद्ध त्रयोदशी या तिथीला झाला. नरहरी यांच्या पत्नीचे नाव गंगा व मुलांची नावे नारायण व मालू अशी होती. नरहरी महाराजांच्या घराण्याचे मूळ पुरुष रामचंद्र सदाशिव सोनार होते, असे म्हटले जाते. संत नरहरी सोनार यांचे मूळ आडनाव महामुनी होते. संत नरहरी सोनार हे वडिलोपार्जित सुवर्णकाम करीत असल्याने त्यांचे आडनाव पुढे सोनार झाले, असे सांगितले जाते. हा मुलगा हरि (विठ्ठल) व हराचा (शंकर) समन्वय साधणारा थोर संत होईल. याला दीर्घायुष्य प्राप्त होईल. तो शिवभक्त असला, तरी विठ्ठलाचा भक्त म्हणून त्रिखंडात प्रसिद्ध होईल, असा आशिर्वाद चांगदेव महाजांनीच नरहरी सोनार यांना दिला होता.


पंढरपूरमधील संत नरहरी सोनार यांनी आपल्या भक्तीचा ठसा महाराष्ट्रभर उमटविला. संत नरहरी सोनार यांचा व्यवसाय दागिने बनवण्याचा होता.नरहरी सोनार प्रसिद्ध शिवभक्त होते. रोज सकाळी उठल्यावर ते शिव-आराधना करीत असत.


एकदा एका गिऱ्हाईकाच्या मागणीवरून पंढरपूरच्या विठ्ठलाला कमरेला बांधायला सोन्याची साखळी त्यांनी तयार केली होती पण ती सोनसाखळी विठ्ठलाच्या कमरेला बसेना. त्या भक्ताने दोन वेळा पांडुरंगाच्या कमरेला साखळी लावून पहिली पण ती थोडी मोठी झाल्यामुळे कमरेला राहीना. आता नरहरी सोनारांनी विठ्ठलाच्या कमरेला साखळी बांधण्याचा प्रयत्न केला तरीही ती सोनसाखळी कमरेला ढिली होत होती. संत नरहरी महाराजांनी डोळे बांधून परत प्रयत्न केला तर त्यांना विठ्ठलाच्या जागी शंकर भगवान उभे आहेत असा भास झाला आणि ते बघताना त्यांच्या मनातला हरी आणि हर हा वाद संपून ते विठ्ठलमय झाले . पांडुरंग परमात्माच शंकर भगवान आहे. शिव आणि विष्णू भिन्न नाहीत पण एकच आहेत. हे सर्व देव विठ्ठलातच सामावलेले आहेत अशी त्यांची खात्री पटली . संत नरहरी महाराज संत ज्ञानेश्वरांचे समकालीन संत होते .


"सवंगडे निवृत्ती सोपान मुक्ताई" , "शिव आणि विष्णू एकचि प्रतिमा" , "माझे प्रेम तुझे पायी" , आणि "देवा तुझा मी सोनार" हे त्यांचे अभंग प्रसिद्ध आहेत .

संत नामदेव नरहरी सोनारांबद्दल असे म्हणतात की " नामा म्हणे नरहरी सोनार झाला अलंकार देवाचा". नरहरी सोनार हे विठ्ठलाचे नामस्मरण करता करता पांडुरंग चरणी समर्पित झाले . पंढरपूर येथे विठ्ठल मंदिरासमोर त्यांची समाधी आहे ( संग्रहित )


२३ ) हयग्रीवोत्पत्ती : श्रावण पौर्णिमा.


पृथ्वीला अनाचारापासून वाचवण्याचे महत्कार्य हयग्रीव या देवतेने केले असे आपली परंपरा सांगते. ज्ञानाचे रक्षण करणारी बुद्धिदेवता म्हणून हयग्रीव उपासना केली जाते. हिंदुस्थानातील वेगवेगळ्या भागात विविध पद्धतीने या देवतेची उपासना होते. श्रावण महिन्यातील पौर्णिमेला केल्या जाणाऱ्या या उपासनेनिमित्त हयग्रीव या अश्वमुखी देवतेसंबंधित कथा आणि परंपरा जाणून घेऊया.


हय म्हणजे अश्व आणि ग्रीव म्हणजे मान असलेली देवता म्हणजेच हयग्रीव देवता.त्यांच्या मांडीवर लक्ष्मी विराजित असून चार हातात शंख, चक्र, पद्म आणि पुस्तके आहेत. स्फटिकरूप असलेल्या हयग्रीव यांचा श्वेत वर्ण आहे. दक्षिण हिंदुस्थानात अत्यंत लोकप्रिय असे हे दैवत आहे. काही हिंदू कथांनुसार ब्रह्मदेव आणि सरस्वती यांनी हयग्रीव यांना आपला गुरू मानले आहे. अश्वमुख असलेले हयग्रीव यांचे शरीर हे मानवाचे आहे.


अक्षय्य तृतीया आणि श्रावण पौर्णिमेला हयग्रीव जयंती साजरी होते. दक्षिण हिंदुस्थानात श्रावण पौर्णिमेला तर उत्तर हिंदुस्थानात अक्षय्य तृतीयेला जयंती साजरी होते. एकाहून अधिक वेळा हयग्रीव अवतरल्यामुळे हा फरक असावा असे म्हटले जाते .श्री विष्णू हे हयग्रीव रूपात अनेक प्रसंगी अवतरल्याचे विविध पुराण कथातून स्पष्ट होते. सर्व कथांमध्ये हयग्रीव हे श्री विष्णू अवतार म्हणूनच वर्णिले आहेत.


दक्षिण हिंदुस्थानात हयग्रीव नावाचा गोड पदार्थ असून तो अत्यंत लोकप्रिय आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये पुरणपोळीसाठी जे पुरण आपण तयार करतो त्याला दक्षिण भारतात हयग्रीव असे म्हणतात. हयग्रीव अवताराची कथा अशी आहे.


एकदा ब्रह्मदेवास ग्लानी आली आणि ती संधी बघून मधू आणि कैटभ नावाच्या दैत्यांनी ब्रह्मदेवाच्या जवळचे वेद चोरले आणि रसातळाला घेऊन गेले. वेद परत कसे आणायचे या विवंचनेत ब्रह्मदेवाने श्री विष्णूचे स्मरण केले आणि श्री विष्णू यांनी हयग्रीव अवतार घेऊन रसातळात जाऊन मधू आणि कैटभला ठार मारले आणि वेद परत ब्रह्मदेवाच्या स्वाधीन केले. म्हणूनच कदाचित श्री. विष्णूंना मधुसूदन असे नाव मिळाले असावे .हयग्रीव अवतार घेण्यामागचा श्री. विष्णूंचा उद्देश आशा रीतीने पूर्णत्वास गेला .


तिबेटी परंपरेत हयग्रीव हे रोग बरे करणारे देव असल्याची मान्यता आहे. चीन, जपान आणि काही बौद्ध राष्ट्रांत हयग्रीव यांना ईश्वरीशक्ती म्हणून मान्यता आहे.(संग्रहित )


२४ ) श्रावण पौर्णिमा : नारळी पौर्णिमा

राखी पौर्णिमा : रक्षाबंधन


आपल्या भारताला पूर्व आणि पश्चिम या दोन्ही दिशांना खूप मोठा समुद्र किनारा लाभला आहे. गुजरात , महाराष्ट्र , कर्नाटक , केरळ , आंध्र प्रदेश , तामिळनाडू या सगळ्या प्रदेशांना समुद्र किनारा लाभला आहे . सर्वात जास्त मोठा किनारा महाराष्ट्राला लाभलेला आहे . श्रावण महिन्याच्या पंधराव्या तिथीला नारळी पौर्णिमा असे म्हणतात .समुद्र हा वरूण देवतेचे वसतिस्थान आहे असे म्हटले जाते.त्यामुळे नारळी पौर्णिमेच्या दिवशी या वरूण देवतेला श्रीफळ किंवा नारळ अर्पण करून त्याची पूजा करून,नैवेद्य दाखवून वरूण देवतेचा सन्मान करण्याचा हा दिवस म्हणजे नारळी पौर्णिमा . आषाढ माहिन्यापासूनच पावसाला सुरुवात होऊन श्रावण महिन्याच्या पौर्णिमेपर्यंत पावसाचे प्रमाण वाढत गेलेले असते आणि त्यावेळेला समुद्रालापण उधाण आलेले असते म्हणून समुद्र किनाऱ्यावर ज्यांचे जीवन अवलंबून आहे असे आपले कोळी बांधव आपल्या होड्या मासेमारीसाठी समुद्रात नेत नाहीत.. श्रावण महिन्याच्या पौर्णिमेनंतर पाऊस हळू हळू कमी होत जातो,. समुद्रही शांत असतो.नारळी पौर्णिमेपर्यंत समुद्रातील माशांचा प्रजननाचा काळही संपत आलेला असतो,त्यामुळे पौर्णिमेला समुद्राची पूजा करून त्याला श्रीफळ वाहून मासेमारीसाठी होड्या समुद्रात नेण्याची कोळी बांधवांची रीत आहे .


नारळी पौर्णिमा हा कोळी बांधवांचा सर्वात मोठा सण असतो. त्यानिमित्ताने घरामध्ये नारळ वापरून केलेला गोड भात, नारळी पाक,ओल्या नारळाच्या करंज्या केल्या जातात, आणि त्यांचा नैवेद्यही समुद्र देवतेला दाखवून कोळी लोकांच्या सुखी आणि समृद्ध भावी आयुष्यासाठी मागणं मागून प्रार्थना केली जाते .


समुद्र देवतेला जे नारळ किंवा जी श्रीफळे अर्पण केली जातात ती भरती ओहोटी बरोबर आत बाहेर करून शेवटी कुठेतरी किनाऱ्याला ओल्या वाळूमध्ये रुजतात आणि कालांतराने त्यातूनच कल्पवृक्षाची म्हणजेच नारळी पोफळीच्या झाडांची निर्मिती होते . या झाडांचा प्रत्येक अवयव माणसाच्या खूप कामी येतो त्यामुळे या नारळाच्या झाडांना कल्पवृक्ष असे म्हटले आहे .


नारळी पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भाऊरायाच्या उजव्या मनगटावर छानशी राखी बांधते . या दिवशी बहीण आपल्या भावाला गोड धोड खायला घालून त्याला पंचारतीने ओवाळून आपल्या रक्षणासाठी कायम पाठीशी उभे रहाण्याची मागणी करीत असते . हा सण उत्तर भारतात आणि राजस्थानमध्ये फार मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो . आता हा नारळी पौर्णिमेचा सण फ़क्त भारतातच नाही तर पृथ्वीच्या पाठीवर रहात असलेले सर्व भारतीय पण साजरा करतात.


२५ ) श्रीकृष्ण जयंती : श्रावण वद्य अष्टमी,.


जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी, कृष्ण जन्माचा दिवस. श्रावण महिन्यात कृष्ण अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत वासुदेव देवकीच्या पोटी भगवान विष्णूंचा आठवा अवतार म्हणजेच भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे.


या दिवसाला कृष्णाष्टमी,गोकुळ अष्टमी,जन्माष्टमी,श्रीकृष्ण जयंती उत्सव अशीही नावे आहेत .भारतामध्ये जिथे जिथे भगवान श्रीकृष्णांची मंदिरे आहेत,म्हणजे गोकुळ,मथुरा,वृंदावन,द्वारका,डाकोर ,जगन्नाथपुरी, या ठिकाणी हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. गावागावातल्या छोट्या छोट्या मंदिरातसुद्धा गावकरी हा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. गोकुळ अष्टमीला उपवास करण्याची पण पद्धत आहे . वृंदावन येथे या दिवशी दोलोत्सव साजरा केला जातो. आपल्या महाराष्ट्रात काही घरांमध्ये पाटावर मधोमध मातीचीच यमुना नदी दाखवून तिच्या एका बाजूला मथुरा आणि दुसऱ्या बाजूला गोकुळ दाखवून मातीच्याच छोट्या छोट्या मूर्ती करून त्यांची शोडशोपचारे पूजा करून हा जन्माष्टमीचा उत्सव साजरा केला जातो .छोट्याशा पाळण्यामध्ये भगवान श्रीकृष्णाला ठेऊन हा उत्सव साजरा केला जातो. गोपालकृष्णासाठी काही हौशी भगिनी छान कपडे शिवून छोटे छोटे अलंकारही तयार करतात अशा तर्हेने पूजेतील लंगडा बालकृष्णही या निमित्ताने नटविला आणि पूजला जातो


२६ ) संत श्री . ज्ञानेश्वर महाराज जयंती : श्रावण कृष्ण अष्टमी


अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र l

तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र ll

तया आठवीता महा पुण्यराशी l

नमस्कार माझा श्री.सद्गुरू ज्ञानेश्वरासी ll


अलंकापुरी किंवा आळंदी हे जरी संत माऊली ज्ञानेश्वर महाराज यांचे कार्यक्षेत्र असले तरी त्यांचा जन्म पैठण जवळील अपेगाव या ठिकाणी श्रावण कृष्ण अष्टमी या दिवशी श्री. विठ्ठलपंत आणि सौ . रुक्मिणीबाई कुलकर्णी या दांपत्याच्या पोटी झाला. विठ्ठलपंतांनी गृहस्थाश्रमातून संन्यास घेऊन परत गुरूंच्या आज्ञेप्रमाणे पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारला.त्यानंतर त्यांना चार अपत्ये झाली. (त्यांची नावे : निवृत्ती,ज्ञानदेव,सोपान, आणि मुक्ताबाई ) त्यामुळे त्यांना धर्मपिठाच्या आज्ञेनुसार प्रायश्चित्त म्हणून देहत्याग करावा लागला त्यामुळे त्यांची मुले अनाथ झाली . या अनाथ मुलांना त्या वेळच्या आजूबाजूच्या लोकांनी अगदी धर्मपिठाने सुद्धा सन्यासाची पोरे म्हणून हिणविले आणि त्यांना ब्राह्मणांना असलेला मौंजीबंधनाचा संस्कारही नाकारला. सततची समाजाकडून होणारी अवहेलना सोसूनसुद्धा पैठणच्या धर्मपिठापुढे सर्व सजीवांचा जीव एकच असतो.आत्मा पण एकच असतो हे ज्ञानदेवांनी रेड्याच्या तोंडी वेद वदवून सिद्ध करून दाखविले ..तेव्हापासून ज्ञान्याची ज्ञानेश्वर माऊली झाली ,आणि त्यांना गुरुस्थान दिले गेले. संत निवृत्तीनाथ हे ज्ञानदेवांचे गुरू होते. ,त्या वेळेच्या संस्कृतात असलेल्या गीतेचा "भावार्थ दीपिका"म्हणजेच ज्ञानेश्वरी या नावाचा प्राकृत भाषेमध्ये अर्थ समजावून सांगणारा ग्रंथ ज्ञानदेवांनी लिहिला. विठ्ठल हे ज्यांचे दैवत होते त्या वैष्णवांचा वारकरी पंथ पण ज्ञानदेवांच्या पासूनच सुरू झाला. ज्ञानेश्वर माउलींनी अमृतानुभव,चांगदेव पासष्ठी, हरिपाठाचे अभंग असे बरेच ग्रंथ लिहिले आहेत.श्री .ज्ञानेश्वरांनी आपले गुरू निवृत्तीनाथांना वंदन करून हा चालविलेला वागयज्ञ पूर्ण करून साऱ्या विश्वाच्या शांतीसाठी विश्वात्मक देवाकडे पसायदान मागितले. आयुष्यभर समाजाचे फटकारे सहन करूनही साऱ्या विश्वासाठी शुभ चिंतणारा हा फक्त एकवीस वर्षांचा तरुण एकमेवाद्वितीयच म्हटला पाहिजे.


श्रावण वद्य अष्टमीला मध्यरात्रीच्या बारा वाजता भगवान विष्णूंनी श्रीकृष्णाचा अवतार घेतला होता.त्याच तिथीला त्याच वेळेला माऊली संत ज्ञानेश्वर महाराजांचा पण इ.स.१२७५ साली जन्म झाला . हा मला तरी केवळ योगायोग वाटत नाही. त्यामागे नक्की काहीतरी दैवी योजना असली पाहिजे म्हणूनच आपण सामान्य लोक माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. श्रावण कृष्ण अष्टमी या दिवशी संत ज्ञानेश्वर महाराजांची जयंती असते.


२७ ) गोपाळ काला : श्रावण वद्य नवमी .


गोकुळ अष्टमीला रात्री बारा वाजता भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला . त्या दिवशी पूर्ण दिवसभर उपवास करतात. रात्री श्रीकृष्णांचा जन्म झाल्यावर दही,दूध,लोणी,चुरमुरे,लाह्या,पोहे, लिंबू आणि आंब्याचे लोणचे,चण्याची डाळ,साखर,फळांच्या फोडी असे हे सगळे पदार्थ एकत्र करून त्यांचा काला केला जातो .,आणि तोच गोकुळ अष्टमीचा प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटला जातो आणि हा प्रसाद खाऊन उपवासही सोडला जातो. यालाच गोपाळकाला असे म्हणतात . कोकणांत तर "गोविंदा आला रे आला गोकुळात आनंद झाला " असे गाणे गात अनेक लहान थोर पुरुष घरोघरी नाचायला जातात आणि दहीहंडी फोडतात .


२८ ) अजा एकादशी : श्रावण वद्य एकादशी.


श्रावण महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात येणारी एकादशी ही अजा एकादशी म्हणून ओळखली जाते . राजा हरिश्चंद्राने विश्वामित्र ऋषींना स्वप्नामध्ये आपले राज्य त्यांना देण्याचे वचन दिले . दानशूर आणि सत्यवादी तत्वनिष्ठ अशा राजा हरिश्चंद्राने त्यांना दिलेले ते वचन पाळले. त्यामुळे त्याला आपल्या पत्नी आणि मुलाचा त्याग करावा लागला, आणि स्वतःला एका चांडाळाकडे स्मशानात काम करावे लागले. हे आपल्या हातून घडलेले पातक गौतम ऋषींना सांगण्यासाठी हरिश्चंद्र राजा त्यांच्याकडे गेला असताना त्यांनी राजाला अजा एकादशीचे व्रत करायला सांगितले आणि ते व्रत केल्यावर हरिश्चंद्र राजाला त्याचे गेलेले राज्य आणि त्याचे कुटुंबही परत मिळाले.अशी या एकादशीच्या थोरपणाची किंवा महात्म्याची कथा सांगितली जाते .श्रीकृष्णाने पण अर्जुनाला हातून घडलेल्या चुकीच्या गोष्टींचं प्रायश्चित्त म्हणून अजा एकादशीचे व्रत करायला सांगितले होते. असा उल्लेख महाभारतात सापडतो .(संग्रहित )


२९ ) संत श्री. सेना महाराज पुण्यतिथी : श्रावण वद्य द्वादशी.


संत सेना महाराज यांचा जन्म श्री.देविदास आणि प्रेमकुवरबाई यांच्या पोटी मध्यप्रदेशातील बांधवगड येथे झाला .संत सेना महाराज एक अमराठी वारकरी संत आणि विठ्ठलाचे नि:सीम भक्त होते . संत सेना महाराज हे ज्ञानदेव,नामदेव,संत जनाबाई,संत परिसा भागवत यांचे समकालीन होते . ते व्यवसायाने नाभिक ( न्हावी ) होते. अतिशय उच्च विचारसरणी आणि पंढरीनाथांवर निष्ठा असणारे हरिभक्त संत सेना महाराज हे जरी महाराष्ट्राबाहेर जन्मले असले तरी घडले महाराष्ट्रीय संतांच्या सहवासात अशी त्यांची जीवनयात्रा अखेरपर्यंत चालू राहिली. संत सेना महाराज हे बहुभाषा पंडित होते..त्यांचे अनेक भाषांवर विलक्षण प्रभुत्व होते. अध्यात्माची उपजत बैठक ,संतांचा दिव्यसंग,साक्षात पांडुरंगाची अपार कृपा,लोककल्याणाची जन्मजात तळमळ या सर्व गुणवैशिष्ट्यांचा संगम म्हणजेच संत सेना महाराज . श्री. विठ्ठल आणि वारकरी संप्रदायाने फ़क्त जातीपातींच्या सीमा मोडल्या नाहीत तर प्रांता प्रांतांच्याही सीमा ओलांडल्या.संत सेना महाराज हे त्याचेच एक उदाहरण आहे .


श्रावण वद्य द्वादशी या दिवशी संत सेना महाराज विठ्ठलाचे नामस्मरण करण्यात दंग असताना त्यांना समाधी लागली आणि कुडीतील आत्मतत्त्व अनंतात विलीन झाले." जाता पंढरीसी सुख वाटे जीवा" असे म्हणत हा वारकरी संत विठ्ठल चरणी लीन झाला. हा दिवस म्हणजे संत सेना महाराज यांची पुण्यतिथी म्हणून पाळली जाते. (संग्रहित)


३० ) बैल पोळा : श्रावण अमावास्या


श्रावण अमावास्येला अर्थात पिठोरी अमावास्येला शेतकरी बांधव आपल्या सर्जाराजाचा हा सण अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात. बैल पोळा या सणाच्या आदल्या दिवशी बैलांना रीतसर आमंत्रण देण्याची पद्धत आहे . या दिवशी सकाळी बैलांना आंघोळ घालून त्यांच्या अंगावर गेरूने ठिपके देऊन शिंगांना बेगड,डोक्याला बाशिंग, गळ्यात घंटा बांधलेली कवड्यांची माळ, आणि घुंगुरांच्या माळा घालून त्यांना सजविले जाते . बैलांच्या पायामध्ये चांदीचे किंवा करदोट्याचे तोडे घालतात . नवी वेसण,नवा कासरा अंगावर रेशमी नक्षीकाम केलेली झूल पांघरली जाते. ,बैलांचा गोठा स्वच्छ करून घरातील सुवासिनी बैलांची विधिवत पूजा करतात. पोळ्याच्या दिवशी बैलांना कोणतेही काम करू दिले जात नाही . गोडाधोडाचा पुरणपोळीचा घास त्यांना भरवला जतो . सायंकाळी बैलांना गावाबाहेर मंदिरात नेले जाते . सर्व शेतकरी आपल्या सजविलेल्या बैलांच्या जोड्या घेऊन येतात आणि एकत्र जमून हा सण साजरा करतात. हिंदू संस्कृतीत वृक्षांप्रमाणेच वन्य जीवांनादेखील पूजनीय मानलं जातं. वर्षभर शेतात शेतकऱ्यांसमवेत बरोबरीने राबणाऱ्या बैलांप्रती एक दिवस उतराई होण्याची संधी म्हणून बैल पोळा या सणाकडे बघितले जाते . ( संग्रहित )


३१ ) पिठोरी अमावस्या : श्रावणी अमावस्या


श्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. आई आपल्या मुलांना वाण देते , म्हणजे पिठोरी व्रत करून आई पक्वान्न तयार करते. आणि ते डोक्यावर घेऊन 'अतिथी कोण?' असे विचारते. तेव्हा मुलं 'मी आहे' असे आपले नाव सांगून पक्वान्न मागील बाजूने स्वतःकडे घेतात. पिठोरी अमावास्येला वंशवृद्धीसाठी ही पूजा करण्यात येते. म्हणूनच याला मातृ दिन असेही म्हणतात.

(संग्रहित ).


श्रावण अमावास्येला उपवास करून सायंकाळी सर्वतोभद्र मंडलावर आठ कलशांची प्रतिष्ठापना करावी, त्यावर पूर्णपात्र ठेवून त्यात ब्राम्ही, महेश्वरी, वैष्णवी, वाराही, कोमारी, इंद्राणी, चामुंडा इत्यादी शक्ती देवतेच्या मूर्ती स्थापाव्यात असे सांगितले आहे .


तांदुळाच्या राशीवर चौसष्ठ सुपाऱ्या मांडून चौसष्ठ योगिनींना आवाहन करतात. काही ठिकाणी चौसष्ठ योगिनींना आवाहन देऊन पिठाच्या मूर्ती तयार केल्या जातात.या चौसष्ठ योगिनी म्हणजे उपजीविकेसाठी उपयुक्त चौसष्ठ कलाच आहेत असे म्हटले जाते . त्याचीच ही प्रतीके आहेत. त्यांची षोडशोपचारे पूजा केली जाते. तसेच पिठाने तयार केलेल्या पदार्थांचाच नैवेद्य दाखवण्यात येतो.नैवेद्याला वालाच बिरड, माठाची भाजी, तांदळाची खीर, पुर्‍या, साटोरी आणि वडे तयार करण्यात येतात. अशा रीतीने हे व्रत पूर्ण केले म्हणजे अखंड सौभाग्य व दीर्घायू पुत्र होतात असे म्हणतात .त्यानंतर पिठोरीची कहाणी वाचावी असे सांगितले आहे. ( संग्रहित )


३२ ) सोमवती अमावस्या : श्रावण अमावस्या.


अमावास्या तिथी सोमवारी सुरू होत असेल तर त्या अमावास्येला सोमवती अमावास्या असे म्हटले जाते. सोमवती अमावास्येला सूर्य ग्रहणाएवढे महत्व असते असे मानले जाते. सोमवती अमावास्येला महादेव शिवशंकराची उपासना करणे लाभदायक असते अशी मान्यता आहे. पौराणिक मान्यतेनुसार सोमवारी अमावास्या सुरू होणे हे भाग्यकारक मानले गेले आहे. या दिवशी गावातल्या नदीवर ( गंगेवर ) जाऊन स्नान करण्यास सुचविले आहे कारण ते जास्त पुण्यकारक असते असे म्हटले जाते. या दिवशी स्नान,दान आणि पूजा विधीचे वेगळे महत्व आहे. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते. त्यामुळे सोमवती अमावास्येला विशेष महत्व प्राप्त होते. (संग्रहित)


भरपूर सणवार,नित्य नैमित्तिक पूजाअर्चा,नेमधर्म आणि उत्साह या साऱ्यांनी भरगच्च भरलेला असा हा श्रावण महिना. तरी पण आषाढ महिन्यापासून सुरू झालेला पावसाळा,त्यामुळे होणारी गैरसोय,अडचणी,रोगराई ,तब्बेत नादुरुस्त होण्याची कारणे मध्येच उपटल्यामुळे " आला पावसाळा तब्बेत सांभाळा " असे सांगणारा आणि आपल्या शरीराला सोसेल,पचेल तेच अन्न खाण्याचा सल्ला पण देणारा असा हा श्रावण महिना.


रसिकहो २०२० साली श्री. गणेशाला वंदन करून त्यावेळच्या भाद्रपद महिन्यापासून आम्ही आम्हाला जमेल तशी प्रत्येक महिन्याची माहिती देण्याचा प्रपंच मांडला तो आज श्रावण महिन्याच्या माहितीने पूर्ण करीत आहोत. २०२० साली अधिक महिना आल्यामुळे अधिक महिन्याची माहिती देण्याची संधी पण आम्हाला मिळाली. आपल्या प्रोत्साहनाने आम्हाला उत्तरोत्तर आनंदच मिळाला. खूप खूप धन्यवाद.


लेखिका : सौ . उमा अनंत जोशी, पुणे

मो. : ९४२०१७६४२९

ई-मेल : anantjoshi2510@gmail.com

1,774 views0 comments

Recent Posts

See All

पारंपारिक अध्यात्म आणि आधुनिक विज्ञान :: पूर्ण ब्रम्ह

ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते | पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवा वशीश्यते || अर्थ :: (अेका धार्मिक पुस्तकात आढळला) ब्रम्ह...

Comments


टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page