top of page
विश्व मराठी परिषद, आयोजित

मामाच्या गावाला जाऊया... 
वयोगट : ११ ते १४ वर्षे (मुले व मुली )

दहा दिवसांची कुटुंब संस्कार आणि व्यक्ती विकास शिबिरे
१) १ ते १० मे २०२४

२) ११ ते २० मे २०२४
३) २१ ते ३० मे २०२४

mamcha Gav.jpeg
संकल्पना

🟧 मामाच्या गावाला जाऊया... 🚌

संकल्पना - मामाचं घर आणि मामाचं गाव ही एक अद्भुत अशी अनुभूती अगदी गेल्या पंचवीस तीस वर्षांपर्यंत आपल्याला सहजपणे अनुभवता येत होती. एकत्रित कुटुंबपद्धतीमधील नाते संस्कार अत्यंत प्रभावी होते. काका, मामा, आत्या, आजी, आजोबा, साडू, दाजी, नणंदा, जावा इ. नात्यांनी आणि नातेसंबंधांनी कुटुंबे आणि समाज समृद्ध होता. सुट्टीच्या काळामध्ये आपल्या मामाच्या घरी, आजोळच्या घरी, आत्तेच्या घरी जाणे हे नित्याचे होते. मोठ्या शहरांपासून दूर विशेषतः ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या चौसोपी वाड्यांमध्ये, मोठमोठ्या घरांमध्ये नातेवाईकांनी एकत्र जमणे आणि विशेषतः बच्चे मंडळींनी सुट्टीच्या निमित्ताने भरपूर दंगा करणे, धिंगाणा घालणे हे सुट्टीचे मोठे आकर्षण होते. आपल्या कुटुंबातील विविध नातेवाईकांची, नातेसंबंधांची ओळख होणे, भावंडांची ओळख होणे, त्यांच्या स्वभावाचा परिचय होणे, प्रेम, आत्मीयता, माया यांची अनुभूती होणे, ग्रामीण जीवन पद्धतीचा परिचय होणे, मंदिरे, देवळे, बागा, शेते, डोंगर यातून मनसोक्त भटकणे, आंबे, करवंद खाणे, विविध प्रकारचे ग्रामीण खेळ खेळणे, लपाछपी, अबाधुबी, लंगडी, गोटया खेळणे, कबड्डी, हुतूतू, खोखो, डुक्कर मुसंडी, विंचवाची नांगी असे खेळ खेळणे, तसेच ताईचा रुमाल हरवला, ओळखा पाहू, सागरगोटे, पत्ते, कॅरम, भेंड्या असे बैठे खेळ खेळणे, अंगणामध्ये रात्रभर गप्पा मारणे, तारे मोजणे, शेकोटी पेटविणे अशा अनेक प्रकारांनी सुट्टीचा मनमुराद आनंद घेतला जात असे. त्या आठवणींच्या खजिन्यावर माघारी परतलेल्या कुटुंबीयांना पुढील सुट्टीचे वेध लागत असत. विशेषतः लहान मुलांवर यामधून अप्रत्यक्षरीत्या विविध प्रकारचे संस्कार होत असत. संवाद कौशल्ये, संभाषण कला, जिज्ञासा जागृती याचबरोबर भावनिक  प्रगल्भता विकसित होत असत. आई वडील सोडून या जगात इतरही कोणीतरी आपले आहे, आपली काळजी करणारे आहे, आपल्याला आधार आहे, आपले नातेवाईक आहे अशी एक सुरक्षिततेची भावना निर्माण होत असे. त्यातून आत्मविश्वास वाढत असे. जीवनाची कक्षा रुंदावत असे. मन मोकळे करायला नात्यातील कुणीतरी आपले मिळत असे.

🟧 आजची परिस्थिती -

                 हम दो हमारे दो ( आता तर एकच ) यामुळे नातेसंबंध आकुंचन पावत असून कुटुंब व्यवस्था संकुचित झाल्या आहेत. मी आणि माझे याच्या नादात जीवनातला सगळा आनंद आपण घालवून बसलो आहोत. मोबाईल आणि मोबाईल गेम्स याबद्दल न बोलणेच बरे ! याचबरोबर शहरी जीवन पद्धतीमध्ये मुलांचे बालपण नष्ट झाले आहे. सभोवतालची गर्दी आणि त्यातून मार्ग काढताना हे करू नकोस, ते करू नकोस, असे केले तर असे होईल, तसे केले तर तसे होईल अशा घरच्यांचा आरड्याओरड्याने मुलांचे बालपण पार कोमेजून गेले आहे. धड त्यांना ओरडता येत नाही, दंगा करता येत नाही, बोलता येत नाही अशी स्थिती आहे. ही मुले सतत कोणत्या ना कोणत्या दबावाखाली आहेत. शाळेतील रिक्षांमध्ये - व्हॅनमध्ये दाटीवाटीने बसून शाळेत जाताना, एकाच वर्गात शंभर शंभर मुलांबरोबर शिकत असताना, सतत स्पर्धा, परीक्षांचा ताण सहन करीत असताना त्यांचा मानसिक, भावनिक कोंडमारा होत आहे. आई-वडिलांना वेळ नाही, भावंड नाहीत, मित्र नाहीत, ओळखीचे नाहीत. अशावेळी सतत एक असुरक्षिततेची भावना, एकटेपणाची भावना त्यांच्या मनात त्यांना सतावत असते. सतत कोणत्या ना कोणत्या दडपणाखाली ही मुले वावरताना दिसतात. अशावेळी फार वाईट वाटते आणि आपले बालपण आठवते. त्यातूनच " चला..... मामाच्या गावाला जाऊया " ही संकल्पना विकसित झाली आहे.

 

मामाच्या गावाला जाऊन मुलांनी खूप धमाल करावी, ग्रामीण खेळ खेळावेत, सत्यनारायणाची पूजा घालावी, रात्री आकाशातील तारे मोजावेत, किर्तन, जाखडी नृत्यांचा आनंद घ्यावा, खूप खूप गप्पा माराव्यात, प्रश्न विचारावेत, अस्सल कोकणी पदार्थांचा स्वाद चाखावा, बोलायला, व्यक्त व्हायला शिकावे, आजोबांकडून गोष्टी ऐकाव्यात, रमणीय निसर्गाचा आनंद घ्यावा, मुक्तपणे हिंडावे, फिरावे, बैलगाडीतून खेप मारावी, होडीत बसावे, थोडा दंगा धुडगूस घालावा, खूप खूप मजा करावी अशी ही संकल्पना आहे.

🟧 शिबिर वैशिष्ट्ये

1) निसर्गरम्य परिसर

2) सुरक्षित परिसर
3) अनुभवी स्वयंसेवकांचा गट
4) सकस वैशिष्ट्यपूर्ण आहार
5) नाश्तासाठी विशेष कोकणी पदार्थ - घावण, आंबोळी, दडपे पोहे, मऊ भात, पापड, लोणचे, उसळ पाव, इ.  भोजनामध्ये, ज्वारी, तांदळाची भाकरी, पोळ्या, उकडीचे मोदक, साखरभात, खिचडी, दही गुत्ती, खीर, इ. शिवाय इतर वेळी खाण्यासाठी
रवा, डिंक, मेथी, बेसन यांचे लाडू, सुका मेवा, इ., करवंदे, कैऱ्या, स्थानिक प्रकारचे आंबे, अळू, काजू, बोंडे, इ.
6) सत्यनारायण पूजा - देवता परिचय - प्रत्येकाने संकल्प करणे, षोडशोपचार पूजन यांची माहिती
7) जवळील निसर्गरम्य परिसरात फेरफटका

9) विविध प्रकारचे खेळ

10) प्रत्येक मुलाला बोलतं करणार

11) आकाशदर्शन

12)विविध वृक्षांचा परिचय

13) जगात कसे वागावे याचे मार्गदर्शन

14) जीवन मूल्यांचा परिचय

15) माता प्रथमो गुरु, पिता द्वितीय - आई वडिल, ज्येष्ठांना रोज नमस्कार का करायचा, बसायचे कसे, अभिवादन कसे करायचे याचे संस्कार,

16) पंचतंत्र, हितोपदेश, कथा कल्पतरु यातील गोष्टी

17) भारतीय ज्ञान परंपरांची ओळख - वेद, पुराण ग्रंथाची ओळख

18)कीर्तन, जाखडी नृत्य यांचा कार्यक्रम

19) नाते संबंधांची ओळख

20) IQ बरोबर EQ- emotional quotient, SQ- Social quotient, Spiritual quotient विकसित करणारे संस्कार

शिबिर वैशिष्ट्ये

🟧 स्वरूप -  दहा दिवसांची कुटुंब संस्कार आणि व्यक्ती विकास शिबिरे

🗓️ कधी :  १) १ ते १० मे २०२४   २) ११ ते २० मे २०२४   ३) २१ ते ३० मे २०२४

✴️ पहिल्या दिवशी दुपारी ३pm पर्यंत reporting आणि शेवटच्या दिवशी दुपारी १ pm भोजन आणि समाप्ती

🏠 कुठे :  चिपळूण पासून २३ किलोमीटर मालदोली येथे.

🏠 ठिकाण - १२५ वर्षापूर्वी भारतरत्न डॉ. विश्वेश्वरय्या यांनी डिझाईन केलेला चौसोपी वाडा आणि भोवतालची रम्य आमराई.

🏠 कुणासाठी - ११ ते १४ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी.

🏠 निवास व्यवस्था - सामायिक- मुला मुलांसाठी स्वतंत्र  खोल्यांमध्ये, मुबलक पाणी, न्हाणी घरे, संडास व्यवस्था, इ.

🏠 संख्या किती - एका शिबिरासाठी ६० ते ७० ( ३० ते ३५ मुले - ३० ते ३५ मुली)

✴️ मार्गदर्शक - ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे,  प्रा. क्षितिज पाटुकले, शैलेंद्रजी बोरकर, डॉ.स्मिताताई कुलकर्णी (निवृत्त उपजिल्हाधिकारी), नीलिमाताई बोरवणकर (प्रख्यात लेखिका),  अभिजीत जोग,  ह.भ.प. मोहना नातू, अजित आपटे, ॲड. मुग्धाताई बिवलकर इ. इ.

✴️ शुल्क - रू. १३,५०० /- प्रती व्यक्ती... सवलतीमध्ये रु. १२,०००/- (२० एप्रिल पर्यंत नोंदणी केल्यास)                                         

✴️ सुरक्षा व्यवस्था - प्रत्येक १५ मुलांसाठी एक स्वयंसेवक आणि  सहाय्यक, शिवाय आयोजकांची टीम.

✴️ वैद्यकीय व्यवस्था - उपलब्ध आहे.

✴️ पालकांची निवास व्यवस्था नाही. पालकांनी राहणे अपेक्षित नाही.

✴️ पुणे ते पुणे प्रवास - वाहन व्यवस्था उपलब्ध (याचे स्वतंत्र चार्जेस असतील). ज्यांना वाहन व्यवस्था हवी आहे त्यांनी आयोजकांशी संपर्क साधावा. 

 

✅ अधिक माहितीसाठी 9225562403 या व्हॉटसअप क्रमांकावर " मामाचा गाव "  असा मेसेज पाठवा.

📱 संपर्क - प्रसाद जाधव (9156001600) |  शलाका शिंदे (8421951262)

प्रत्यक्ष भेटीसाठी : विश्व मराठी परिषद,

६२२, जानकी रघुनाथ, पुलाचीवाडी, डेक्कन जिमखाना पुणे - ४११००४

स्वरूप
संपूर्ण कार्यक्रम
नोंदणी
व्हिडिओ

🟧 शंका समाधान अर्थात नेहमी विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे

प्रश्न - मामाच्या गावाला जाऊ या - या उपक्रमाचे स्वरूप कसे आहे ?

उत्तर -  हा आजच्या बदललेल्या सामाजिक परिस्थितीमध्ये एक वेगळा प्रयोग आहे.  यातून मुलांना नातेसंबंध, कुटुंब संस्था यांचा परिचय व्हावा,  आई-वडिलांबरोबर कसे वागावे,  जगात कसे वागावे.... इ. गोष्टींचा परिचय व्हावा असा याचा उद्देश आहे. हे अगदी कडक शिस्तीत चालणारे शिबिर नाही. मात्र केवळ चैन करायला आणि झोपा काढायची जागा असेही याचे स्वरूप नाही. एक अनौपचारीक आणि आत्मीय असे या वास्तव्याचे स्वरूप असेल. मोकळेपणा आणि भावनिक - बौद्धिक - सांस्कृतिक भूक भागवणारे, जिज्ञासा जागृत करणारे आणि अदृश्यपणे संस्कार घडविणारे असे याचे स्वरूप आहे. 

 

प्रश्न - नोंदणी कशी करावी ? 

उत्तर - नोंदणी शक्यतो ऑनलाईनच करावी. विश्व मराठी परिषदेच्या पुणे येथील कार्यालयातही येऊन नोंदणी करता येईल. कृपया नोंदणी करण्यापूर्वी संकेतस्थळावरील सर्व माहिती नीट वाचून आणि समजून घ्यावी. त्या  संदर्भात कोणतीही शंका असल्यास मोबाईल कॉल करून किंवा प्रत्यक्ष भेटून  समाधान झाल्यावर मग नोंदणी करावी.  

प्रश्न - शुल्क किती आहे ? 

उत्तर - दहा दिवसाच्या वास्तव्यासाठीचे शुल्क रु.  13,500/- – (रूपये तेरा हजार पाचशे फक्त) एवढे आहे. दि. 9 एप्रिल 2024 पर्यंत नोंदणी करणाऱ्यांना विशेष सवलती मध्ये रु. 12000/- भरून नोंदणी करता येईल.

प्रश्न  - शुल्क कसे भरावे लागते ? 

उत्तर - पूर्ण शुल्क एकाच वेळी आगावू (ॲडव्हान्स) एकरकमी भरावे लागेल. हप्त्याने भरता येणार नाही. बँक खात्यात भरावे लागेल. 

 प्रश्न - एका शिबिरात मुलामुलींची संख्या किती असेल ?

उत्तर - एका वेळची एकत्रित संख्या 70 असेल. त्यामध्ये 35 मुले व 35 मुली अशी संख्या असेल. प्रतिसादानुसार ही संख्या 40 ते 45 मुले आणि 25 ते 30 मुली किंवा 40 ते 45 मुली आणि 25 ते 30 मुले अशीही असू शकते. 

 

प्रश्न - शिबिराच्या तारखा कोणत्या आहेत ?
उत्तर – पाहिले शिबिर - 1 ते 10 मे 2024 दुसरे शिबिर - 10 ते 20 मे 2024 तिसरे शिबिर - 21 ते 30 मे 2024

 

प्रश्न - प्रत्येक मुला मुलीने कोणकोणत्या गोष्टी सोबत आणणे अपेक्षित आहे ? 

उत्तर - प्रत्येक मुलामुलीने येताना बरोबर दहा दिवसांसाठी लागणारे कपडे, वैयक्तिक वस्तू, उदा. दंतमंजन, पांघरण्यासाठी चादर, टॉवेल, पिण्याच्या पाण्यासाठी बाटली इत्यादी आवश्यक गोष्टी बरोबर घेऊन याव्यात. गादी, बेडशीट, उशी उपलब्ध आहे. तसेच जर काही औषधे असतील तर बरोबर आणावीत.

 

प्रश्न - काही ड्रेस कोड आहे का ? 

उत्तर - विशिष्ट ड्रेस कोड नाही. मात्र सुती, आरामदायी असे कपडे असावेत. भारतीय पद्धतीचे कपडे असावेत. 

 

प्रश्न - निवास व्यवस्था कशी आहे ?
उत्तर - राहण्याची व्यवस्था एकत्रित - सामायिक पद्धतीची आहे. निवास जुन्या पद्धतीच्या चौसोपी वाड्यात आहे. त्यात अनेक खोल्या आहेत. एका खोलीत 10 ते 12 जणांनी एकत्रित रहावयाचे आहे. फॅन(पंखा) आहे. गादी, उशी, बेडशीट आहे. पांघरूण आणावे लागेल. 

 

प्रश्न - मुला मुलींना त्याच्या ताट वाट्या धुवाव्या लागणार आहेत का ? त्यांचे कपडे त्यांना धुवावे लागणार आहेत का  ?

उत्तर - होय. स्वावलंबन हा एक अतिशय महत्त्वाचा संस्कार आहे. मुलामुलींना कपडे धुवावे लागतील. ताट वाट्या धूवाव्या लागतील.

 

प्रश्न - मुलांना मोबाईल वापरता येईल का ? पालकांना कसा संपर्क करता येईल ?

उत्तर - मोबाईल वापरता येणार नाही. एक दोन संपर्क क्रमांक दिले जातील. त्यातून निरोप देता येतील. आणीबाणीच्या प्रसंगी त्वरित संपर्क साधता येईल. 

 

प्रश्न  - मुला मुलींची निवास व्यवस्था कशी आहे ? 

उत्तर - मुला मुलींची स्वतंत्र खोल्यांमध्ये व्यवस्था आहे. पहिल्या मजल्यावर मुलींची व्यवस्था आहे. तळमजल्यावर मुलांची व्यवस्था आहे. 

 

प्रश्न  - व्यवस्थापन कसे आहे ? 

उत्तर  - शिबिर स्थळी मुला - मुलींची स्वतंत्र व्यवस्था असेल. मुलींसाठी तीन स्वयंसेविका त्यांची काळजी घेण्यासाठी सोबत असतील. व्यवस्थापनामध्ये सुद्धा ज्येष्ठ महिलांचा सहभाग आहे.

 

प्रश्न - मुलांकडे पैसे असावेत का ?

उत्तर - गरज नाही. जास्तीत जास्त रु. 500/- पर्यंत रक्कम ( सुट्या रुपयात ) द्यावी. 

 

प्रश्न - मुलांना खाऊ म्हणून काही खाद्य पदार्थ बरोबर दिले तर चालतील का ?

उत्तर - नको. तेथे मुबलक प्रमाणात विविध प्रकारचे चविष्ठ आणि रुचकर खाद्य पदार्थ उपलब्ध आहेत. ते आपल्या मुलांना नक्की आवडतील. 

 

प्रश्न - शिबिराची सुरवात कधी होणार ?

उत्तर - शिबिराच्या पहिल्या दिवशी दुपारी 3 p.m. पर्यंत तेथे पोहोचणे आवश्यक आहे. चार ते साडेपाच उद्घाटनाचा कार्यक्रम होईल.  शेवटच्या दिवशी दुपारी 12 ते 1:30 समारोप कार्यक्रम आणि भोजना नंतर कार्यक्रम संपेल. शेवटच्या दिवशी पालकांची भोजन व्यवस्था उपलब्ध असेल. 

 

प्रश्न  - मामाच्या गावी कधी यायचे आणि कसे यायचे ? 

उत्तर - नोंदणी करणाऱ्या प्रत्येकाला मामाच्या घराचा पत्ता म्हणजे लोकेशन आणि रूट मॅप पाठवला जाईल.

 

प्रश्न  - पालकांना तेथे राहता येईल का ? 

उत्तर - पालकांनी मुलांना सोडायला यावे आणि न्यायला यावे.  पालकांना तेथे निवास करता येणार नाही. 

 

प्रश्न  - चिपळूण ते मामाचे घर प्रवास व्यवस्था उपलब्ध आहे का ? 

उत्तर - चिपळूण ते मामाचे घर अशी जाता येतानाची व्यवस्था सशुल्क उपलब्ध करून देता येईल.  त्यासाठी प्रती व्यक्ती रु. 300/- एवढा खर्च येईल. ( जाता येता रु. 600/- )

 

प्रश्न  - मामाच्या गावामध्ये मुलांना मार्गदर्शनासाठी कोण मान्यवर सहभागी होणार आहेत ?  

उत्तर - ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे,  प्रा. क्षितिज पाटुकले, शैलेंद्रजी बोरकर, डॉ.स्मिताताई कुलकर्णी (निवृत्त जिल्हाधिकारी), नीलिमाताई बोरवणकर (प्रख्यात लेखिका),  अभिजीत जोग, मोहनाताई नातू, अजित आपटे, ॲड. मुग्धाताई बिवलकर इ. ( उपलब्धते नुसार ) 

प्रश्न - एकदा केलेली नोंदणी रद्द करता येईल का ? 

उत्तर - एकदा केलेली नोंदणी कुठल्याही परिस्थितीमध्ये रद्द करता येणार नाही किंवा दुसऱ्या तारखेला बदलता येणार नाही. मात्र बदली व्यक्ती देता येईल.

शंका समाधान

🟧 महत्त्वाच्या सूचना नियम आणि अटी

1) कृपया नोंदणी करण्यापूर्वी संकेतस्थळावरील सर्व माहिती नीट वाचून आणि समजून घ्यावी. त्या  संदर्भात कोणतीही शंका असल्यास मोबाईल कॉल करून किंवा प्रत्यक्ष भेटून  समाधान झाल्यावर मग नोंदणी करावी.  पूर्ण शुल्क एकाच वेळी ॲडव्हान्स भरावे लागेल.

 2) चला... मामाच्या गावाला हा आजच्या बदललेल्या सामाजिक परिस्थितीमध्ये एक वेगळा प्रयोग आहे.  यातून मुलांना नातेसंबंध, कुटुंब संस्था यांचा परिचय व्हावा,  आई-वडिलांबरोबर कसे वागावे,  जगात कसे वागावे.... इ. गोष्टींचा परिचय व्हावा असा उद्देश आहे.

3) प्रत्येक मुलाने येताना बरोबर एका आठवड्यासाठी लागणारे कपडे, वैयक्तिक वस्तू, उदा. दंतमंजन, पांघरण्यासाठी चादर, टॉवेल, पिण्याच्या पाण्यासाठी बाटली इत्यादी आवश्यक गोष्टी बरोबर घेऊन याव्यात. गादी, बेडशीट, उशी उपलब्ध आहे. तसेच जर काही औषधे असतील तर बरोबर आणावीत.

4) नोंदणी करणाऱ्या प्रत्येकाला मामाच्या घराचा पत्ता म्हणजे लोकेशन आणि रूट मॅप पाठवला जाईल.

5) शिबिराच्या पहिल्या दिवशी दुपारी 3 p.m. पर्यंत तेथे पोहोचणे आवश्यक आहे. चार ते साडेपाच उद्घाटनाचा कार्यक्रम होईल.  शेवटच्या दिवशी दुपारी 12 ते 1:30 समारोप कार्यक्रम आणि भोजना नंतर कार्यक्रम संपेल.

6) पालकांनी मुलांना सोडायला यावे आणि न्यायला यावे.  पालकांना तेथे निवास करता येणार नाही.

7) चिपळूण ते मामाचे घर अशी जाता येतानाची व्यवस्था सशुल्क उपलब्ध करून देता येईल.  त्यासाठी प्रती व्यक्ती रु. 300/- एवढा खर्च येईल.

8) शिबिर स्थळी मुला - मुलींची स्वतंत्र व्यवस्था असेल. मुलींसाठी तीन स्वयंसेविका त्यांची काळजी घेण्यासाठी सोबत असतील. तसेच व्यवस्थापनामध्ये सुद्धा ज्येष्ठ महिलांचा सहभाग आहे.

9) मुलांना मार्गदर्शनासाठी अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत. ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे,  प्रा. क्षितिज पाटुकले, शैलेंद्रजी बोरकर, डॉ.स्मिताताई कुलकर्णी (निवृत्त जिल्हाधिकारी), नीलिमाताई बोरवणकर (प्रख्यात लेखिका),  अभिजीत जोग,  ह.भ.प. मोहना नातू, अजित आपटे, ॲड. मुग्धाताई बिवलकर इ.

 10) एकदा केलेली नोंदणी रद्द करता येणार नाही किंवा दुसऱ्या तारखेला बदलता येणार नाही.

 11) ऐनवेळी आवश्यकतेनुसार कार्यक्रमांमध्ये बदल करण्याचा अधिकार आयोजकांनी राखून ठेवला आहे.

12) सर्व प्रकारच्या तक्रारी आणि कायदेशीर कार्यवाही साठी पुणे शहर न्यायालयीन सीमा ही मर्यादा आहे.

नियम अटी
bottom of page