विश्व मराठी परिषद संकल्पना

भाषा, साहित्य आणि संस्कृती यांचा समाजमानसावर एक निश्चित असा पगडा असतो. कथा, कादंबरी, काव्य, ललितलेखन, अनुवाद, चरित्र लेखन, वैचारिक गद्य साहित्य, उपयुक्त उपयोजित आणि माहितीपर साहित्य इ. अनेक प्रकारांमधून निर्मिती व लेखन होत असते. साहित्याचा, लेखनाचा प्रभाव समाजावर पडतो. विशेषतः बालपणी आणि युवावस्थेमध्ये झालेले साहित्याचे, लेखनाचे संस्कार मानवी मनाला सुसंस्कृत आणि सभ्य जीवनप्रणालीचे धडे देत असतात. बडबडगाणी आणि इसापच्या, बिरबलाच्या कथांपासून सुरू झालेला प्रवास कथा, कादंबरी, कविता, वैचारिक गद्य-पद्य, आत्मचरित्र, उपयुक्त, उपयोजित विषयांवरील पुस्तके अशा मार्गाने वाचकाला समृद्ध करत जातो. साहित्य त्याला जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करते, प्रेरणा देते आणि त्याच्यात कल्पनाशक्ती, सृजनक्षमता आणि आत्मविश्वास  निर्माण करते. ग्रंथ हेच सर्वांत उत्तम गुरू असे म्हटले जाते. ते सर्वार्थाने खरे आहे. बृहद समाजमानस घडत असताना त्यावर साहित्याच्या लेखनाच्या विविध प्रकारांमधून प्रसारीत विचारांचा एक अदृश्य पण खोलवर ठसा उमटलेला आढळतो. अनेक पिढ्यांचे वैचारिक, भावनिक आणि मानसिक पोषण काही साहित्यिकांनी, लेखकांनी केल्याचे दिसते. मराठी साहित्यविश्वाचा विचार करता कितीतरी साहित्यिकांनी, लेखकांनी केलेल्या लिखाणामुळे विशिष्ट कालखंडातील समाजाचे वैचारिक भरणपोषण झाले आहे.

मात्र मराठी लेखन व साहित्यविश्वामध्ये अजूनही लेखक हे एक स्वतंत्र करिअर वा उपजीविकेचे साधन म्हणून विकसित झालेले नाही. स्व भाषेत लेखक म्हणून पूर्णवेळ काम करून आयुष्य जगता येते यावर कोणाचाही विश्वास नाही. बहुतांश साहित्यिक हे काही सांगण्याची गरज म्हणून, उर्मी म्हणून, हौस, प्रतिष्ठेचे साधन आणि पूरक आर्थिक मिळकतीसाठी लेखन करतात. पूर्णत: व्यावसायिक लेखक मराठी साहित्यविश्वात तर अपवादानेच आढळतील. याचबरोबर स्वामित्व हक्क, कॉपीराईट कायदा, लेखक-प्रकाशक करार अशा व्यावहारिक बाबतीत फारशी जागरुकता ही आढळत नाही. लेखक, प्रकाशक, वाचनालये, ग्रंथ विक्रेते आणि वाचक असा एक पंचकोन तयार झालेला आहे. याच्याशी संलग्न अनेक इतर घटकही आहेत. उदा. विविध साहित्य संस्था, वाचक संस्था, किरकोळ पुस्तक विक्रेते, मीडिया, सरकारी संस्था इ. मात्र या सर्वांमध्ये प्रत्यक्ष वाचक आणि साहित्यिक यांची एकत्र संवाद-व्यवस्था नाही. लेखक म्हणून स्वतंत्रपणे करिअर घडवावे म्हणून तसे अभ्यासक्रम, प्रशिक्षणाची व्यवस्था नाही. माहिती आणि मार्गदर्शन करणारी केंद्रे उपलब्ध नाहीत. साहित्य संस्थांना तर असे काही करणे गरजेचे आहे असे वाटतच नाही.

 

गेल्या काही वर्षांत संपूर्ण जगामध्ये सर्वच क्षेत्रांत संवाद – माध्यमांच्या सुलभ व स्वस्त तंत्रज्ञानाने आमूलाग्र बदल घडविले आहेत. साहित्य-पुस्तक-प्रकाशन हे क्षेत्रही याला अपवाद नाही. तंत्रज्ञानामुळे साहित्यिक आणि वाचक यांना जवळ आणले आहे. पुस्तक लिहिणे आणि ते वाचकांपर्यंत पोहोचवणे यातील वितरण-यंत्रणा सर्वांगाने बदलत चालल्या आहेत. साहित्यिक आणि वाचक यांना एकमेकांबरोबर मुक्त संवाद साधता येतो आहे. याचबरोबर फक्त लेखन झाले की माझे काम संपले असे म्हणणा-या लेखकाला तंत्रज्ञानामुळे वाचकांपर्यत पोहोचण्यासाठी अधिक वाव निर्माण झाला आहे. इंटरनेट, ई-मेल, फेसबुक, व्हॉट्स अप, यु ट्युब, ई बुक, किंडल बुक, ऑडिओ बुक, प्रिंट ऑन डिमांड, डिजिटल प्रिंटिंग इ. अनेक आधुनिक तांत्रिक आविष्कारांमुळे साहित्य आणि पुस्तकनिर्मिती हे क्षेत्र पूर्णत: ढवळून निघत आहे. मात्र साहित्य संस्थांच्या कार्यात या कशाचाच समावेश नसतो. भविष्यात प्रकाशन व्यवसाय आणि पुस्तक विक्री व्यवसायाचे चित्र संपूर्णत: बदलून ई बुक; तंत्राधिष्ठित पुस्तकनिर्मिती आणि वितरण अशी व्यवस्था उदयाला येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, पेटीएम यांनी थेट तंत्राधिष्ठित वितरण व्यवस्था निर्माण केली आहे. डिजिटल पेमेंट आणि कॅशलेस अर्थव्यवस्थेमुळे ऑनलाईन पुस्तक विक्रीला सुगीचे दिवस आले आहेत. एखादा लेखक आता प्रिंट ऑन डिमांडमुळे त्याच्या पुस्तकाच्या केवळ पन्नास ते शंभर प्रतींचीही आवृत्ती काढू शकतो. 

मात्र साहित्य वर्तुळातील घडामोडी आणि एकंदरीत बाह्य चित्र बघता या दोन्ही गोष्टी परंपरागत संस्था, साहित्यिक, नोकरशाही, वाचनालये, विक्रेते यांच्या जुनाट साचेबंद मानसिकेतेत व वर्तणुकीतच घुटमळताना दिसत आहेत. जणूकाही बाहेरच्या जगात काय चालले आहे याचा त्यांना थांगपत्ताही नाही, होणारे बदल त्यांना दिसतच नाहीत किंवा कोणत्याही बदलांची आपण पर्वाच करायची गरज नाही अशा थाटात हा वर्ग वावरत असतो. पुस्तकांच्या छापील किंमतीवर ८५ % पर्यंत सवलतींचा वर्षाव करून वाचनालयांना अत्यंत सुमार दर्जाचे साहित्य पुरवले जाते, पण त्याचवेळी सर्वसामान्य वाचकांच्या आणि तरुणाईच्या माथी आपण काय मारत आहोत याची कोणीही फिकीर करीत नाही, असे सध्याचे चित्र आहे.  खरे तर या योगे पुढील पिढ्यांना त्यांच्या हक्काचा वारसा न देता आपण त्यांचे अक्षम्य नुकसान करीत आहोत.

 

एकीकडे साहित्य क्षेत्रात क्रांतिकारी बदलाचे चित्र दिसत आहे, वाचकांची प्रगल्भता वाढत आहे, साहित्यक्षेत्राचा आवाका आणि क्षितिजे यांचा झपाट्याने विस्तार होत आहे, मराठी भाषिक समाजबांधवांमध्ये देशात आणि विदेशांमध्ये सर्वत्र साहित्य संमेलने, साहित्य परिषदा आणि साहित्यिक उपक्रम यांविषयी आत्यंतिक कुतूहल आहे. साहित्य संस्थांच्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, साहित्य संस्थांचे सभासद व्हावे अशी त्यांची इच्छा असते. पण मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती या क्षेत्रांमध्ये कार्य करणाऱ्या ज्या संस्था आहेत, त्यांविषयीदेखील सर्वसामान्य मराठी माणसांना फारशी माहिती नाही. मराठी साहित्यविश्वात कार्य करणाऱ्या संस्था कोणत्या आहेत, तेथे नक्की कोणते कार्य चालते, साहित्य संमेलनांचे आयोजन कोण करते, संमेलनाध्यक्षपदाची निवड कशी होते यांबाबतीत बहुधा सार्वजनिक अज्ञान आहे. साहित्य संमेलनाचे स्थळ व अध्यक्षांची निवडणूक जाहीर झाल्यानंतर मराठी साहित्यविश्वातील संस्था, त्यांचे प्रतिनिधी आणि त्यांची वक्तव्ये यांनी तीन - चार महिने वृत्तपत्रांचे रकानेच्या रकाने भरून वाहतात. सर्वसामान्य माणसाची करमणूक त्यातून होते. पण त्याचे कुतूहल शमत नाही. त्याला त्यामध्ये सक्रिय सहभागी व्हायचे असते; पण कसे व्हायचे, ते कळत नाही.

मराठी माणसांची लोकसंख्या सुमारे १२ कोटी असून भारतातील इतर राज्यांत राहणा-या मराठी भाषिकांची संख्या २.५ कोटींच्या आसपास आहे. परदेशांमध्ये राहणारे एकूण मराठी भाषिक ५० लाखांपर्यंत आहेत. अशा प्रकारे संपूर्ण विश्वामध्ये साधारणपणे १५ कोटी तरी मराठी बांधव आहेत. त्यातील किमान १२ कोटी लोकांची मातृभाषा मराठी आहे. फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे, तर भारतामधील इतर राज्यांमध्ये जे मराठी बांधव आहेत; त्यांनाही मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीविषयी  रुची असते. इतकेच नव्हे, तर अगदी साता समुद्रापलीकडे ज्या मराठी बांधवांनी मराठीचा झेंडा डौलाने फडकत ठेवला आहे; त्या अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इस्त्राइल, आखाती देश यांतील मराठी बांधवांनाही मराठी साहित्य जगतातील घडामोडींविषयी औत्स्युक्य असते. लेखक, कवी, वाचक, कलाकार, समीक्षक, अभ्यासक, वक्ते, प्राध्यापक, ग्रंथकार, प्रकाशक, श्रोते, गायक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकारणी, समाजाच्या सर्व स्तरांतील संवेदनशील बंधू - भगिनी  साहित्य आणि संस्कृतिविषयक उपक्रमांच्या निमित्ताने  आपल्या कार्य - कर्तृत्वाला कोणती संधी मिळते का, याची चाचपणी करीत असतात.

या पार्श्वभूमीवर  वाचक आणि लेखक यांचा थेट संपर्क व्हावा; लेखक हा वकील, डॉक्टर, सीए यांच्याप्रमाणे स्वतंत्र व प्रतिष्ठित असा व्यवसाय म्हणून नावारूपाला यावा, मराठीमध्ये जागतिक दर्जाचे लेखक घडावेत, मराठी लेखकांना बुकर, नोबेल इ. विश्व प्रसिद्ध पुरस्कारांपर्यंत पोहचता यावे, लेखक कसे बनावे, सृजनशील लेखन यासाठी अभ्यासक्रम चालवावेत, विविध प्रकारच्या लेखनकार्यशाळा महाविद्यालयांमध्ये आणि ग्रामीण भागांत घेतल्या जाव्यात, प्रत्येक सर्जनशील साहित्याची निर्मिती करणाऱ्या प्रत्येकाला व्यासपीठ मिळावे, विशेषतः युवापिढीला सहभागी करून घ्यावे, चांगल्या पुस्तकांची वाचकांना ओळख व्हावी, प्रत्येक मराठी बांधवाला साहित्य संस्थांचे सहजपणे सभासदत्व मिळावे, त्याला विविध उपक्रमांमध्ये सहजपणे सहभागी होता यावे, संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रत्येक सभासदाला मतदान करता यावे; सरकारी योजना, शिष्यवृत्ती, पुरस्कार यांची माहिती व्हावी. वेगवेगळ्या साहित्य संमेलनांची माहिती व्हावी इ. उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून ‘ विश्व मराठी परिषदेची ’  स्थापना करीत आहोत. मराठी भाषेतील अनेक जाणकार साहित्यिक, प्रकाशक, तंत्रज्ञ, रसिक आणि सुजाण वाचक इ. यासाठी एकत्र आले आहेत. यामुळे साहित्य आणि समाज यांतील दरी कमी होईल. साहित्य क्षेत्रामध्ये विधायक सुधारणा घडविता येतील आणि एकदंरीत समाजमानसाला एक सकारात्मक दिशा देता येईल, असा विश्वास वाटतो. मराठी साहित्य जगतामध्ये आमूलाग्र बदल घडवून तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कोट्यावधी मराठी बांधवांमध्ये एक साहित्यिक, सांस्कृतिक, भावनिक सेतू तयार करणे, त्यांच्या मनामध्ये एक स्फुल्लिंग चेतवणे आणि त्यातून भावी पिढीसाठी एक अलौकिक वारसा निर्माण करणे, असे क्रांतिकारी स्वप्न ‘ विश्व मराठी परिषद  ’ पाहत आहे.

विश्व मराठी परिषद

संस्था:
६२२, जानकी रघुनाथ, पुलाची वाडी,
झेड ब्रिज जवळ, डेक्कन जिमखाना,
पुणे, महाराष्ट्र - ४११००४
मो: ७०३०४११५०६
सोशल:
  • Facebook Clean
  • YouTube - White Circle
WhatsApp.png
# marathi
# marathibhasha
# marathikavita
वेळ: सकाळी ११ ते सायं. ७ 

© Vishwa Marathi Parishad