top of page

वेल डन सर



सर्जरी संपवुन मी हातातला नाइफ खाली ठेवला आणि ऑपरेशनसाठी मला मदत करणाऱ्या असिस्टंट, सिस्टर आणि भुलतज्ञाने टाळ्या वाजवल्या चक्क! सगळे अगदी एका सुरात म्हणाले “ वेल डन सर “. अशा प्रकारचा अनुभव मला सोलापुरात यापूर्वी फारसा आलेला नव्हता.एक सांगायच राहिलंच की, ही सर्जरी चालू होती नायजेरिया देशातल्या जोस शहरातल्या जोस युनिव्हर्सिटी टिचिंग हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटरमध्ये. रुग्ण होती साधारणपणे चाळीस वर्षांची स्त्री, जीच्या दोन्ही काखांमधे म्ह्णजेच बगलांमधे चक्क एक वेगळे असे स्तन होते.या गरीब बिचारया स्त्रिला एकुण चार स्तन होते. लाजुन तिने ते लपवुन ठेवले होते.या आजाराला ऑपरेशनशिवाय पर्याय नसतो आणि नायजेरियामधल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये हे ऑपरेशन करून घेणे तिच्या आर्थिक परिस्थितीचा आवाक्याच्या बाहेरचे होते.हो. नायजेरियामधल्या सरकारी हॉस्पिटलमध्येही ऑपरेशन करून घेण्यासाठी बऱयापैकी खर्च येतो .रोटरी मेडिकल मिशनच्या माध्यमातून जोस येथे कोणत्याही खर्चाशिवाय ऑपरेशन होणार म्हटल्यावर पटकन तिने आपले नाव या शिबिरात नोंदविले होते.नायजेरियातल्या मोफत सर्जरीच्या शिबिराचा आज पहिलाच दिवस होता.आणि आम्हा सर्जन्सच्या टीमने आज केलेले हे पहिलेच ऑपरेशन होते. त्यामुळेच एक वेगळीच उत्सुकता आणि धाकधूक ही होतीच.


तिच्या डाव्या बगलेतल्या स्तनावर वर माझ्या एका सहकारी सर्जनने शस्त्रक्रिया केली आणि त्यानंतर मी तिच्या उजव्या बगलेतला स्तन काढण्याची शस्त्रक्रिया पार पाडली. ऑपरेशननंतर मिळालेल्या टाळ्या आणि “वेल डन सर” या कौतुकाचा मी माझ्या मते सहज असा अर्थ काढला की नक्कीच माझ्या सहकारी सर्जन पेक्षा मी केलेली शस्त्रक्रिया जास्त चांगली झालेली होती. माझा एका सर्जनचा इगो सुखावला होता.मला ऑपरेशनसाठी मदत करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांना मग रुबाबात “थँक्यू व्हेरी मच” असे म्हणत मी माझा सर्जिकल गाऊन काढून ऑपरेशन थिएटरच्या बाहेर पडलो.



कॉरिडॉरमधून रेस्टरूमकडे जात असताना मला आणखी एक सिस्टर, एक वॉर्डबॉय आणि एक आया भेटली. तिघांनीही तत्परतेने मान झुकवून मला ‘वेल डन सर’ असे विश केले.मी उडालोच. एवढ्या लौकर आपल्या शस्त्रक्रियेच्या कौशल्याची ख्याती ऑपरेशन थिएटरच्या बाहेरपर्यंत पसरली याचे माझे मलाच आश्चर्य वाटले.आनंदही झाला.गर्वाने थोडीशी छाती इंचभर फुगली.रेस्ट रुममधून बाहेर पडताना तिथल्या सफाई कामगाराने मला पाहिले, मान झुकविली आणि म्हणाला. “वेल डन सर!” आता मात्र मला कळायचे बंद झाले. दुपारचे जेवण घेऊन मी पुन्हा पुढच्या ऑपरेशनसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये शिरलो.ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना जाणवत होते की जवळजवळ भेटणारा प्रत्येक जण ‘वेल डन सर’ असे म्हणत होता. आता मात्र हद्दच झाली.फारच झपाटयाने फेमस झालो होतो मी.छाती आणखी एक इंचभर फुगली. मोठ्या आनंदात पुढची सारी ऑपरेशन्स संपवुन साधारणपणे सायंकाळी सात वाजता मी ऑपरेशन थिएटरच्या बाहेर पडलो. ‘वेल डन सर’ चा वर्षाव चालु होता. माझा मीच माझ्यावर जाम खुश होतो. रात्री खूप शांत आणि छानपैकी झोप लागली.



दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा ऑपरेशन थिएटरमध्ये जात असताना वेल डन सर हे ऐकणे आता मला सवयीचे झाले होते. नवा देश, नवे लोक, नवी भाषा , नव्या पध्दती पण आनंद तर होत होताच.आज थोडासा वेळ मोकळा मिळाल्यानंतर मी इतर ऑपरेशन थिएटरमध्ये फेरफटका मारायला सुरुवात केली. आणि मग लक्षात आले की माझ्या बरोबरच्या प्रत्येक सर्जनला ‘ वेल डन सर ’ अशी बधाई मिळते आहे. हे काही तरी वेगळेच चाललेले आहे याची मला जाणीव झाली. आज मला ऑपरेशनला मदत करणाऱ्या रेसिडेंटला मग मी स्पष्टच विचारले “ हे प्रत्येक वेळी प्रत्येकाला तुम्ही वेल डन सर असे कसे म्हणता ?” तेव्हा तो म्हणाला “ सर, आम्हा नायजेरियन लोकांची ही धन्यवाद देण्याची पद्धत आहे. थँक्यू म्हणण्याच्या ऐवजी आम्ही वेल डन म्हणतो सर! अगदी सफाई कामगारालासुध्दा आम्ही टॅायलेट साफ केल्यानंतर वेल डन म्हणतो.” हे ऐकुन मात्र मला धरणी दुभंगुन पोटात घेईल तर बरे असे वाटले.एका सर्जनच्या इगोचे नाक चांगलेच कापले होते या “वेल डन सर” ने.



डॉ.सचिन जम्मा लॅपरोस्कोपिक व जनरल सर्जन जम्मा हॉस्पिटल व लॅपरोस्कोपिक सर्जरी सेंटर कुंभार वेस, भवानी पेठ, सोलापूर - ४१३००२ फोन: ०२१७ २७३२४७५ भ्रमणध्वनी : ९८५०८४७१७५ E MAIL ID : drsachinjamma@gmail.com

विश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअ‍ॅप लिस्टमध्ये सामील व्हा - 7066251262 हा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMP असा मेसेज पाठवा


376 views2 comments

2 Σχόλια


Jyoti Patil
Jyoti Patil
14 Απρ 2021

Well done Sir खुप छान लेख आहे. आपल्या देशात ह्या प्रथेची नितांत गरज आहे.

Μου αρέσει

Deepak Bhalerao
Deepak Bhalerao
10 Απρ 2021

छान आहे लेख ! अशी सुंदर प्रथा आपल्या भारतात ही का सुरु होऊ नये . केवळ वैद्यकीय क्षेत्रात नाही तर सर्वच क्षेत्रात सुरु केली पाहिजे.

Μου αρέσει
टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page