आपले मराठी वर्ष म्हणजे
आषाढ म्हणजे
आषाढ हा हिंदू पंचांगा प्रमाणे वर्षातला चौथा महिना आहे . या महिन्याच्या पौर्णिमेस चंद्र पूर्वाषाढा नक्षत्राच्या आसपास असतो म्हणून या महिन्याला आषाढ महिना असे म्हणतात . आषाढ महिन्याला आखाड असेही म्हणतात .
मृगाचा पाऊस पडून गेल्यावर शेते बऱ्यापैकी ओली होतात.चिखलणी केलेल्या शेतामध्ये जमीन ओली झालेली असल्यामुळे बळिराजा बी पेरतो.मृगाचा पाऊस पडून गेल्यानंतर जेष्ठ महिन्यात किंवा पुढे येणाऱ्या आषाढ महिन्याच्या काही दिवसात सुद्धा कधी कधी पाऊस पडत नाही . हवेमध्ये अजूनही खूप उष्णता असते. मधून मधून वळीवाचा पाऊस पडतो पण नियमाने पावसाळ्याला सुरुवात मात्र आषाढ महिन्याच्या सुरुवातीच्या काळातच होते . ग्रीष्म ऋतूने तापलेला सारा निसर्ग आषाढ सरींनी प्रफुल्लित होतो आणि साऱ्या सृष्टीला उल्हसित करून जातो.
कवि कुलगुरू महाकवी कालिदास जयंती : आषाढ शुद्ध प्रतिपदा .
(मेघदूतम्)
आषाढ महिन्याच्या पहिल्याच दिवशी आकाशामध्ये हत्तीच्या आकाराचा काळ्या रंगाचा पाण्याने भरलेला पावसाळी मेघ ( ढग ) बघून कवी कालिदासांना मेघदूत हे नितांत सुंदर काव्य सुचले. एका शापित यक्षाच्या पत्नी विरहाची कल्पना मध्यभागी ठेवून त्या हत्तीसारख्या दिसणाऱ्या कृष्णमेघाला नागपूर जवळच्या रामटेक ( रामगिरी पर्वत ) पासून हिमालयातल्या यक्षपुरी (अलकानागरी ) पर्यंतचा प्रवास आपल्या कल्पनेने करायला लावून आपले मनोगत अलकापुरीत रहाणाऱ्या आपल्या पत्नीपर्यंत पोहोचवण्याचे नाजूक काम ते या मेघाला करण्याची विनंती करतात अशी या काव्याची मूळ कल्पना आहे , कारण तो यक्षरूपी नायक रामगिरी पर्वतावर रहात असतो . म्हणून मेघदूत या काव्याची सुरुवात खाली दिलेल्या श्लोकापासूनच होते.
आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानु
वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श।।
- महाकवि कालिदास
(मेघदूतम्)
मध्य प्रदेशातील माळवा प्रांतातील उज्जैन मधील राजा विक्रमादित्य यांच्या दरबारात कवी कालिदास हा राजकवी होता . महाकवी कालिदास मध्य प्रदेशातल्या उज्जैनमध्ये रहाणारे असल्यामुळे त्यांना त्या शहराबद्दल विशेष प्रेम होते म्हणून मेघदूतातल्या त्या मेघाला ते वाट वाकडी करून उज्जैनला जाऊन महाकालेश्वराचे दर्शन घेऊन पुढे जा असेही सुचवितात . उज्जैनमध्ये कवी कालिदासांचे स्मारक आहे ,आणि त्यांच्या नावाचे विद्यापीठ पण आहे .तेथे संस्कृत भाषेचे अध्ययन केले जाते . मध्य प्रदेश सरकार दरवर्षी महाकवी कालिदास यांच्या नावाने पुरस्कारही देते . कालिदास हे संस्कृत कवी आणि रचनाकार, नाटककार होते . उपमा या अलंकाराचा वैशिष्ठयपूर्ण वापर करून कालिदासांनी मानव आणि निसर्ग यांच्या संबंधावर अनेक अजरामर रचना केल्या आहेत. कालिदासांच्या रघुवंश मेघदूत,कुमारसंभव,अभिज्ञान शाकुंतलम, ऋतुसंहार या रचना विशेष गाजल्या. आषाढ शुद्ध प्रतिपदेला कवी कालिदासांचा जन्मदिवस असतो म्हणून हा दिवस महाकवी कुलगुरू कालिदास दिन म्हणून सगळीकडे साजरा केला जातो. कवी कालिदासांच संस्कृत कवींमधील उच्च स्थान दर्शविणार एक सुंदर सुभाषित खाली देत आहे .
पुरा कवीनां गणना प्रसंगे ll
कनिष्ठीकाधिष्ठति कालिदास: ll
अद्यापि तदतुल्य कवेर्भावादी ll
अनामिका सार्थवती बभूव ll
याचा अर्थ असा आहे की पूर्वीच्या काळी संस्कृत भाषेतल्या कवींची गणना करताना,त्यांना मोजताना आपल्या हाताच्या करंगळीवर पाहिलं नाव कवी कालिदास यांचे आले. पण त्यानंतरच्या हाताच्या बोटावर कोणाचेही नाव आले नाही कारण महाकवी कालिदासांच्या इतका उच्च प्रतीचा संस्कृत कवी कोणी नव्हताच. त्यामुळे करंगळीच्या आधीच्या बोटावर कोणाचेच नाव न आल्यामुळे त्या बोटाला अनामिका असे म्हणतात .
परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमंत वासुदेवानंद सरस्वती (टेंभे) स्वामी महाराज पुण्यतिथी. आषाढ शुद्ध प्रतिपदा.
एक जाज्वल्य दत्तावतार म्हणजे १८५४ ते १९१४ या काळात होऊन गेलेले परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमंत वासुदेवानंद सरस्वती ( टेंभे ) स्वामी महाराज होय . श्री. क्षेत्र माणगांव येथे श्री . गणेश टेंभे आणि रमाबाई टेंभे या दांपत्याच्या पोटी टेंभे स्वामींचा जन्म झाला. ते लहानपणापासूनच संसाराबद्दल विरक्त होते. वडिलांच्या दत्त भक्तीचा वारसा त्यांनी उचलला होता . श्री . नृसिंहसरस्वती स्वामी महाराज्यांच्या आशिर्वादाने गणेशपंतांना पुत्ररत्न प्राप्त झाले . या नवजात बालकाचे नाव वासुदेव असे ठेवण्यात आले . छोटा वासुदेव लहानपणापासूनच कुशाग्रबुद्धीचा होता. तो वयाच्या बाराव्या वर्षी दशग्रंथी ब्राह्मण म्हणून प्रसिद्ध झाला.. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांचा विवाह श्री . बाबाजीपंत गोडे यांची कन्या अन्नपूर्णा बाई यांच्याशी झाला. अखंड वेदाध्ययन,वैयक्तिक साधना आणि त्यासोबत पीडितांना मार्गदर्शन यांची त्यांना मिळालेली जोड यामुळे ते लहान वयातच उच्च अध्यात्मिक अनुभवाचे अधिकारी झाले .
भगवान श्री . दत्तात्रेय हे स्वामींशी संवाद साधत असत असे म्हणतात . इ.स.१८८९ मध्ये स्वामींनी माणगांव सोडून तीर्थयात्रेला प्रारंभ केला . पुढे या दांपत्याला एक पुत्ररत्न झाले परंतु ते मृत जन्मले. त्यानंतर गंगाखेड येथे इ.स.१८९१ मध्ये त्यांच्या पत्नीचे अल्पशा आजाराने अकस्मित निधन झाले . पत्नीच्या निधनानंतर चौदाव्या दिवशी स्वामींनी संन्यास ग्रहण केला. याच वर्षी दत्तात्रेयांच्या आज्ञेनुसार त्यांनी उज्जैनी येथील श्री .श्री . नारायणानंद सरस्वती स्वामी महाराजांकडून दंड ग्रहण केला आणि त्यांनी वसुदेवाचे नाव वासुदेवानंद सरस्वती असे ठेवले . त्यांनी गुरुचरित्राची अनेक पारायणे केली आणि गावागावातून प्रवचने केली . त्यांच्या तपस्वी जीवनात त्यांना खूप हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या आणि खूप कष्ट झाले. प्रवचनाच्या माध्यमातून जमा झालेले पैसे,फळे, यांच्या आधाराने रोज येणाऱ्या भक्तांना मिष्टांनाचे भोजन दिले जाई पण टेंभे स्वामी स्वतः मात्र भिक्षा मागून आणलेल्या अन्नावरच आपली भूक भागवत असत. कोणत्याही संकटात लोकोद्धाराचे काम आणि सद्गुरू निष्ठा यापासून टेंभे स्वामी दूर गेले नाहीत. त्यांनी उपासनेला मदत होईल अशा मौलिक साहित्याची निर्मिती त्यांनी केली. स्वामींची नर्मदा मातेवर अपार श्रद्धा होती. आषाढ शुद्ध प्रतिपदा या दिवशी (२४ जुलै,१९१४ ) श्री . स्वामी महाराजांनी चिरविश्रांती श्री.नर्मदा मातेच्या कुशीतच गरुडेश्वर येथे घेतली .(संग्रहित)
अण्णाभाऊ साठे स्मृतिदिन./ अण्णाभाऊ साठे जयंती
तुकाराम भाऊराव साठे म्हणजेच अण्णाभाऊ साठे . यांचा जन्म वाटेगाव या गावी,तालुका वाळवा,जिल्हा सांगली येथे १ऑगस्ट १९२० रोजी झाला. ते एका दलित समाजात जन्मले होते. ,ते कधी शाळेत शिकायला गेलेच नाहीत पण अगदी दीड दिवस शाळेत गेलेल्या अण्णाभाऊंनी दलित लोकांबद्दल त्या वेळचे सवर्ण लोक करीत असलेल्या उपहासामुळे शाळेतले शिक्षण सोडले .त्यांना समाजात वावरताना आयुष्यामध्ये जीवन शिक्षण मात्र खूप उंचीचे मिळाले होते . अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे होते . त्यांच्या साहित्यानी महाराष्ट्राच्या जडणघडणीला मदतच झाली. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ लोकमानसात रुजविण्याचे काम अण्णाभाऊ साठे यांनी केले. उपेक्षितांच्या बद्दलचे अण्णाभाऊंचे साहित्य वाचून महाराष्ट्रातील आणि सीमा भागातील माणसे प्रेरित होत असत. इ . स . १९५८ मध्ये मुंबईमध्ये स्थापन केलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनात आपल्या उदघाटनाच्या भाषणात ते म्हणाले की " पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित आणि कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे ". त्यांच्या जीवनात त्यांच्यावर कम्युनिझम आणि बौद्ध धर्माचा विशेष पगडा होता . त्यांच्या फकिरा आणि इतर बऱ्याच मराठी कादंबरीवर मराठी चित्रपटही निघाले होते .अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने १ ऑगस्ट २०१९ रोजी भारतीय टपाल खात्याने अण्णाभाऊंचे चित्र असलेले चार रुपयांचे पोस्टाचे तिकीट त्यांच्या स्मरणार्थ काढले होते . शाहीर अण्णाभाऊ साठे,शाहीर अमरशेख आणि शाहीर द. न . गव्हाणकर या तिघांनी मिळून महाराष्ट्राचे अवघे जीवनविश्व ढवळून काढले होते . १८ जुलै १९६९ हा त्यांचा स्मृतिदिन असतो .( संग्रहित )
कांदे नवमी. आषाढ शुद्ध नवमी.
आषाढ शुद्ध नवमीला कांदे नवमी असे म्हणतात. आषाढ महिना म्हणजे पावसाला सुरुवात झालेली असते. मृगाचा पाऊस जर चांगला झाला तर शेतकरी राजा आणि वारकरी आपापल्या शेतात खरिपाच्या धान्याची पेरणी करून पंढरपूरकडे जाण्यासाठी प्रस्थान ठेवतात. पंढरपूरकडे जाताना आषाढ शुद्ध नवमीच्या दिवशी कांदेनवमी वारीच्या प्रवासातच साजरी केली जाते.आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजेच देव उठनी एकादशी पर्यंत चार महिने कांदा ,लसूण, वांगी आणि मांसाहार वर्ज केला जातो. याला शास्त्रीय कारण पण आहे. चातुर्मासाच्या या काळात कधी कधी पाऊस नवरात्रापर्यंत पडत असतो.अगदी दिवाळीपर्यंत सुद्धा कधी कधी पाऊस पडतो..वर सांगितलेले आणि खायला वर्ज सांगितलेले पदार्थ पचनाला जड आणि वातुळ असतात. या दिवसात सूर्य दर्शन खूप कमी वेळा होते आणि त्यामुळे आपली पचनशक्ती क्षीण झालेली असते,म्हणून हे पदार्थ या काळात खाऊ नये असे त्यामागे कारण असावे. म्हणून चातुर्मास सुरू व्हावयाच्या आधी म्हणजेच आषाढ शुद्ध नवमीला जास्तीत जास्त कांदा घातलेले पदार्थ खाण्याची पद्धत आहे आणि त्यालाच कांदे नवमी असे म्हणतात.
देवशयनी आषाढी एकादशी . आषाढ शुद्ध एकादशी.
चातुर्मासारंभ.
आषाढ शुद्ध एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी या दिवसापासून भगवान विष्णू बळीराजाच्या विनंतीवरून पाताळ लोकात चार महिने वास करीत असतात.आषाढी एकादशीपासून ते कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजेच देव उठनी किंवा प्रबोधिनी एकादशीपर्यंत भगवान विष्णू पाताळ लोकात असतात. या काळात कोणतीही मंगल कार्ये करू नयेत असे सुचविले आहे. या दिवसात हवा पण उत्साहवर्धक नसते. त्यामुळे या दिवसात जास्तीत जास्त उपवास,व्रते,निरनिराळे नेम करण्याची पद्धत आहे. त्याचबरोबर निरनिराळ्या देवतांची उपासना,पूजा पाठ,सत्यनारायण वगैरे याच काळात केले जातात. आषाढी एकादशीपर्यंत जवळजवळ तीन आठवडे सतत चालणारे वारकरी आपापल्या भागातल्या संत शिरोमणींच्या पादुका ठेवलेल्या पालख्या घेऊन पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी पोहोचतात. पांडुरंगाच्या दर्शनासाठी अवघी वारकऱ्यांची मांदियाळी येथे जमलेली असते ,आणि हरिनामाच्या गजरामध्ये सारे वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी आसुसलेले असतात. आषाढी एकादशीचे दिवशी पूर्ण दिवस उपवास असतो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच आषाढ शुद्ध द्वादशीला तो सोडला जातो. वारकऱ्यांच्या आयुष्यात आषाढीला पंढरपूरला जाणे ही एक मोठी समाधानाची बाब असते.
वासुदेव द्वादशी व्रत. आषाढ शुद्ध द्वादशी.
पिता वसुदेव यांच्या नावावरून वासुदेव हे नाव मिळालेल्या भगवान श्रीकृष्ण यांची विधिवत पूजा करून जे व्रत केले जाते त्याला वासुदेव द्वादशी व्रत असे म्हणतात. या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मीमाता यांचीही पूजा करण्यास सांगितले आहे. या दिवशी पूजा करून झाल्यावर विष्णूसहस्त्रनामाचा पाठही केला जातो.( संग्रहित )
महाराष्ट्रीय बेंदूर आषाढ शुद्ध त्रयोदशी.
आषाढ शुद्ध त्रयोदशीला महाराष्ट्रात सगळीकडे बेंदूर हा बैलांचा सण साजरा केला जातो . या दिवशी बैलांना गरम पाण्याने अंघोळ घालून त्यांच्या अंगावर रंगीत छाप उठवून,अंगावर झूल घालून,शिंगांना बेगडी लावून ,डोक्याला बाशिंग आणि गळ्यात घुगुरांची माळ घालून सजविले जाते .भारत हा शेतीप्रधान देश असल्यामुळे शेतामध्ये काम करण्यासाठी बैल हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने फार महत्वाचे असतात.त्यामुळे त्यांना पुढे येणाऱ्या नांगरणीच्या कामासाठी खूप काम करावयाचे असल्यामुळे या दिवशी पूर्ण दिवस बैलांना विश्रांती दिली जाते .बैलांना हिरवा चारा खायला दिला जातो. बैलांना हळद कुंकू वाहून त्यांची पूजा करून,पुरण पोळीचा नैवेद्य दाखवून तीच पुरण पोळी बैलांना खायला देण्याची पद्धत आहे . शेतात काम करणारी बैल जोडी आणि बैलांना नांगर ओढायला लावणारा शेतकरी हे एकमेकांचे जवळचे मित्र असतात. कर्नाटकात या सणाला पोळा असे म्हणतात तर महाराष्ट्रात या सणाला महाराष्ट्रीय बेंदूर असे म्हणतात.
स्वामी विवेकानंद पुण्यतिथी : ,आषाढ शुद्ध त्रयोदशी.
भारताच्या पश्चिम बंगाल या राज्यातल्या कलकत्ता या शहरात सिमलापल्ली येथे पौष वद्य सप्तमी या दिवशी ,१२ जानेवारी ,१८६३ रोजी स्वामी विवेकानंद यांचा जन्म श्री . नरेंद्र दत्त यांच्या घराण्यात झाला . ,त्यांच्या आईचे नाव भुवनेश्वरी देवी असे होते . तरुणपणीच ते रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य झाले .पुढे रामकृष्णांचा संदेश जनमानसात पोहोचविण्यासाठी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशन सुरू केले . विवेकानंदांनी शिकागो येथे११ सप्टेंबर१८९३ या दिवशी भरलेल्या सर्व धर्म परिषदेमध्ये अमेरिकेतील माझ्या " बंधू आणि भगिनींनो " असे भाषणाच्या सुरुवातीलाच म्हणून भारताच्या विश्वबंधुत्वाचे महत्व सर्व जगाला पटवून दिले. संगीताची बऱ्यापैकी जाण असणारे आणि कायम तत्वचिंतनात मग्न असणाऱ्या या बंगाली माणसाने भारतभर प्रवास करून " उत्तिष्ठत जागृत प्राप्यवरान, निबोधत " (म्हणजे उठा जागे व्हा,ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका ) ,असे म्हणून भारतातला अवघा तरुण जागा केला. त्यांना व्यायामाचे महत्व पटवून दिले.स्वातंत्र्याची जणीव करून दिली. अशा स्वामी विवेकानंदांनी ४,जुलै ,१९०२ या दिवशी रात्री कोलकत्यातील बेलूर मठात महासमाधी घेतली. १२ ,जानेवारी हा त्यांचा जन्मदिन भारत सरकारतर्फे देशभर राष्ट्रीय युवकदिन म्हणून साजरा केला जातो. कन्याकुमारी येथे समुद्रात विवेकानंद केंद्र या संस्थेच्या पुढाकाराने त्यांचे विवेकानंद स्मारक उभे आहे .
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती : आषाढ शुद्ध चतुर्दशी
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी : आषाढ वद्य अष्टमी
"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" अशी सिंहगर्जना करणाऱ्या श्री . बाळ गंगाधर टिळक यांचा २३ जुलै,१८५६ हा जन्मदिन असतो.रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी गंगाधरपंत आणि पार्वतीबाई टिळक यांच्या पोटी जन्माला आलेल्या टिळकांनी गणित या विषयात बी. ए. करून पुढे एल.एल. बी. ही पदवी प्राप्त केली. वयाच्या सोळाव्या वर्षी सत्यभामाबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला .पुण्यात आल्यानंतर संस्कृतचे अध्ययन,अध्यापन करणाऱ्या वडिलांकडून शिक्षकाचे बाळकडू मिळालेल्या टिळकांनी एका खाजगी शाळेत गणित विषयाच्या शिक्षकाची नोकरी सुरू केली . पुढे ते पत्रकारिता शिकले आणि पत्रकार म्हणून कार्य करीत असताना सगळ्याच सामाजिक चळवळीत सहभागी झाले . त्यांनी मराठा आणि केसरी ही वृत्तपत्रे सुरू केली आणि त्यामधील अग्रलेखांच्या माध्यमातून ब्रिटिश सरकारवर कडाडून टीका पण केली . टिळकांनी महादेव बल्लाळ नामजोशी,गोपाळ गणेश आगरकर आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या मदतीने डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून त्या अन्वये न्यू इंग्लिश स्कूल आणि फर्ग्युसन कॉलेज यांची स्थापना करून शिक्षण क्षेत्रात आपली मोलाची भर टाकली. लोकांमध्ये स्वातंत्र्य मिळविण्याच्या दृष्टीने एकतेची भावना निर्माण व्हावी म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू केले. यामुळे टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हटले जाऊ लागले . ब्रिटिश सरकारने टिळकांवर राजद्रोहाचे खटले चालवून त्यांना एकदा दीड वर्षाची आणि पुन्हा सहा वर्षाची शिक्षा ठोठावून ब्रम्हदेशातल्या मंडाले येथील कारागृहात पाठविले होते. मंडालेच्या तुरुंगवासाच्या दरम्यान टिळकांनी गीतारहस्य नावाचा गीतेचा अर्थ सांगणारा अतीशय अभ्यासपूर्ण असा ग्रंथ लिहिला . आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालेच पाहिजे हे टिळकांचे मोठे स्वप्न होते.आणि त्यासाठी "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" हा त्यांचा शेवटपर्यंत ध्यास होता . पुढे १ ऑगस्ट , १९२० या दिवशी टिळकांचे निधन झाले .
गुरू पौर्णिमा : आषाढ पौर्णिमा
दरवर्षी आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला पूर्ण भारतात सर्वजण आपापल्या गुरूंचे पूजन करीत असतात. आषाढ पौर्णिमा म्हणजे महाभारतकार आणि वेदांचे निर्माते महर्षी व्यास यांच्या जयंतीचा दिवस असतो म्हणूनच या तिथीला गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा असे म्हटले जाते. महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार होते. भारतीय संस्कृतीची मूळ संकल्पना आणि पुढची जोपासना व्यासांनीच केली आहे. व्यासांनी वेदांचे नीटपणे विभाजन आणि संपादन केले.पूर्वी वेद एकच होता.त्याचे चार भाग व्यासांनी केले. व्यासांनी महाभारत लिहिले. महाभारत हा जगातील सर्व श्रेष्ठ आणि अलौकिक ग्रंथ.महाभारतात धर्मशास्त्र आहे,नीतिशास्त्र आहे,व्यवहार शास्त्र आहे आणि मानसशास्त्रही आहे . ज्ञानाच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये अभ्यास करावयाचा म्हटला तरी महर्षी व्यासांचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाता येत नाही ,इतके महर्षी व्यास सर्व क्षेत्रामध्ये पारंगत होते . ,त्यामुळे त्यांच्याबद्दल असे म्हटले जाते की " व्यासोच्छिष्टं जगत् सर्वम् " आणि म्हणूनच व्यास मुनींना आद्य गुरू असे म्हटले जाते , आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांचे पूजन केले जाते . माणसाच्या आयुष्यातला पहिला गुरू म्हणजे त्याची आई असते . दुसरा गुरू म्हणजे त्याचा पिता असतो ,आणि तिसरा गुरू म्हणजे त्याला शिकवून शहाणा करणारे त्याचे गुरुजन असतात. म्हणूनच असे म्हटले आहे की प्रत्येकाने आपल्या आयुष्यात तीन ऋणे फेडावयाची असतात. ती म्हणजे मातृ ऋण, पितृ ऋण,गुरुजन ऋण आणि ही तीनही ऋणे गुरुपौणिमेच्या दिवशी त्यांची पूजा करून ,त्यांना योग्य तो मान देऊन फेडली जातात. याच पौर्णिमेला जगाला प्रज्ञा,करूणा आणि मैत्रीचे शिक्षण देणारे जगतवंदे,जगतगुरु भगवान बुद्ध यांना विहारात जाऊन वंदन केले जाते.हा एक बौद्ध सण आहे. या दिवशी सारे भिक्खू भगवान गौतम बुद्धांना वंदन करून त्यांची पूजा करतात.
अवधूत चिंतन श्री. भगवान दत्तात्रेय अर्थात आद्य गुरू यांची महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे वासतिस्थाने आहेत तिथे,अक्कलकोट येथे स्वामी समर्थ यांच्या मंदिरात ,शिर्डीचे साईबाबा,गोंदवलेकर महाराजांचे मंदिर अशा सर्व ठिकाणी जिथे हजारो,लाखो लोकांची श्रद्धास्थाने आहेत तिथे गुरुपौर्णिमेला गुरुवंदनाचा कार्यक्रम दरवर्षी साजरा केला जातो.
"गुरुविण दूजा नाही आधार रडता पडता कोठे अडता तो नेतसे पार". आपल्याला ज्ञान देतो,सन्मार्ग दाखवितो,तोच गुरू.कृष्ण अर्जुन , धौम्य ऋषी आरुणी ,द्रोणाचार्य-एकलव्य,रामकृष्ण परमहंस-स्वामी विवेकानंद अशा काही गुरू शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. सगळ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या,शिकविणाऱ्या आणि आयुष्ये समृद्ध करणाऱ्या सर्व गुरुजनांना आपण शतशः वंदन करूया. (संग्रहित )
बाजी प्रभू देशपांडे पुण्यतिथी.
शिवाजी महाराज पन्हाळ्यावर बराच काळ सिद्दी जौहरने पन्हाळा किल्याला सर्व बाजूंनी वेढा घातल्यामुळे जवळ जवळ आठ ते नऊ महिने अडकून पडले होते. त्यावेळी शिवाजी महाराजांना मावळातील हिरडसचे वतनदार श्री . बांदल यांच्याकडे काम करणाऱ्या देशपांडे दिवाणजींचे चिरंजीव बाजी प्रभू देशपांडे भेटले . बाजींचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आपलेसे करून घेतले. बाजींनीही स्वराज्यासाठी आपली निष्ठा श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पिली. बाजी प्रभू देशपांडे हे पराक्रमी,लढवय्ये तर होतेच,तसेच ते त्यागी,स्वामिनिष्ठ,करारी, कोणत्याही अमिषाला बळी न पडणारे असे होते .
सिद्दी जौहरने पन्हाळ्याला घातलेल्या वेढ्यातून सुटण्यासाठी महाराजांना घेऊन बाजी विशाल गडाकडे निघाले होते. बाजी प्रभू हे बांदल यांचे सरदार होते. रायाजी बांदल फुलाजी प्रभू आणि सुमारे सहाशे बांदल मावळे यावेळी महाराजांच्या समवेत होते.त्यावेळी आपली फसवणूक झाली हे लक्षात येऊन विजापुरी सैन्य त्यांचा पाठलाग करीत होते. पुढचा धोका लक्षात घेऊन वडीलकीच्या अधिकाराने बाजींनी महाराजांना विशाळ गडाकडे पुढे जाण्यास सांगितले. बाजी आणि फुलाजी हे दोघे बंधू गजापुरच्या खिंडीत (घोड खिंडीत )सिद्दीच्या सैन्यासाठी महाकाळ म्हणून उभे राहिले. हजारोंच्या सैन्याला फ़क्त तीनशे मावळे घेऊन बाजी प्रभूंनी सिद्दी जौहरला रोखून धरले. त्या अवधीत महाराज विशाल गडावर व्यवस्थित पोहोचू शकले. या वेळी दोन्ही हातात तलवारी घेऊन लढणाऱ्या बाजी प्रभूंना मात्र या लढाईत वीर मरण आले . ही घटना १३ जुलै, १६६० रोजी घडली . विशाळ गडावर पोहोचल्यावर महाराजांनी केलेले इशारतीच्या तोफांचे तीन आवाज ऐकल्यावरच बाजींनी आपले प्राण सोडले. म्हणून ती खिंड एक प्रकारे पावनच झाली. म्हणूनच या खिंडीचे नाव पावनखिंड असे पडले. बाजी प्रभूंचे स्मारक विशाळगड आणि पन्हाळगड या दोन्ही ठिकाणी आहे .(संग्रहित )
सरखेल (दर्यासारंग ) कान्होजी आंग्रे स्मृतिदिन : आषाढ वद्य पंचमी.
सरखेल या शब्दाचा अर्थ आरमार प्रमुख असा होतो . मराठा साम्राज्याचे आरमार प्रमुख म्हणजेच सरखेल कान्होजी आंग्रे यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे या गावी एक संकपाळ कुटुंबात झाला .त्यांच्या वडिलांचे नाव तुकोजी आणि आईचे नाव अंबाबाई होते. देवाकडे मुलासाठी गाऱ्हाणं घातल्यामुळे आणि देवाच्या अंगाऱ्यानी आपल्याला पुत्रप्राप्ती झाली या विश्वासाने त्यांनी आपले मूळचे कडू हे नाव बदलून अंगारे हे नाव धारण केले. आणि पुढे ते आंग्रे या नावाने ओळखले जाऊ लागले. कान्होजी आंग्रे यांचे वडील शिवाजी महाराज्यांच्या सैन्यात एक सरदार होते.कान्होजींना लहानपणापासूनच समुद्री सफरी आणि साहसी मोहिमांची आवड होती..कान्होजी आंग्रे अठराव्या शतकातील मराठा आरमाराचे प्रमुख होते. आपले अखंड आयुष्य त्यांनी इंग्रज,पोर्तुगीज ,डच आणि फ्रेंच आरमाराबरोबर लढण्यात घालविले .भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर वर्चस्व गाजविण्यासाठी परकीय सत्तांमध्ये चढाओढ लागली होती. मोक्याच्या ठिकाणची बंदरे, किल्ले,काबीज करण्याची त्यांच्यामध्ये चढाओढ लागली होती , की ज्यामुळे युरोपमध्ये व्यापारी माल पाठविणे सोपे झाले असते.कान्होजींनी या परकीय सत्तांमधील गोंधळाचा फायदा घेऊन आपले आरमार स्थापन करून संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले . शेवटपर्यंत कान्होजी आंग्रे यांनी त्यांचे मराठे आरमार अजिंक्य ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न केला . कान्होजींनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारी जहाजांवर हल्ला चढवून केली . अनेक वर्षे ब्रिटिशांना कान्होजी आंग्रे यांचा पराभव करणे जमले नाही. म्हणून शेवटी ब्रिटिशांनी कान्होजी आंग्रे यांचे वर्चस्व मान्य करून त्यांच्याशी शांततेचा तह केला . पुढे आषाढ वद्य पंचमीला,म्हणजेच ४ जुलै , १७२९ रोजी कान्होजी आंग्रे यांचे दुःखद निधन झाले . अलिबाग येथे कान्होजी आंग्रे यांची समाधी आहे .(संग्रहित )
नाना शंकरशेट पुण्यतिथी :
जगन्नाथ शंकरशेट मुरकुटे उर्फ नाना शंकरशेट मुरकुटे उर्फ नाना शंकरशेट हे मराठी शिक्षणतज्ञ तसेच उधोगपती होते. मुंबई शहराच्या घडणीत त्यांचा मोठा वाटा होता. जगन्नाथ शंकरशेट यांचा जन्म ठाणे जिल्यातील मुरबाड या गावी १० फेब्रुवारी , १८०३ रोजी सोनार व्यापारी आणि सावकारी कुटुंबात झाला . त्या वेळच्या ब्रिटिश अधिकाऱ्यांशी जुळवून घेऊन नानांनी जे. जे .स्कूल ऑफ आर्टस्, जे. जे . हॉस्पिटल,एल्फिस्टन कॉलेज या संस्थांची निर्मिती केली . स्वतःजवळ असलेला पैसा सर्व क्षेत्रातल्या अनेक संस्थांना देणगीदाखल देऊन एक चांगला आणि विश्वासू माणूस म्हणून खूप नावलौकिक मिळविला. १८१८ मध्ये पेशवाई बुडाल्यावर ब्रिटिशांच्या इंग्रजी भाषेची भरभराट करून आणि त्यावेळच्या प्रचारात अडलेल्या संस्कृत भाषेची गळचेपी करून तिला नामशेष करण्याच्या प्रयत्नांना नानांनी कडाडून विरोध केला. संस्कृत भाषा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शिकावी आणि तिचा जास्तीतजास्त प्रसार व्हावा यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक शैक्षणिक संस्थांना देणग्या दिल्या. त्यांनी काढलेल्या एल्फिस्टन कॉलेजमध्ये बाळशास्त्री जांभेकर, दादाभाई नौरोजी,महादेव गोविंद रानडे,रा.गो .भांडारकर,लोकमान्य टिळक , नामदार गोखले इ.प्रमुख व्यक्तींनी शिक्षण घेतले होते.
ब्रिटिश इंडियाच्या मुंबई इलाख्याचे पर्यायाने महाराष्ट्राचे वैभव वाढविणाऱ्या नानांचे महाराष्ट्रावर खूप मोठे उपकार आहेत. मुंबईच्या जिजामाता उद्यानात त्यांचा पुतळा उभा केला आहे. मॅट्रिकच्या परिक्षेत संस्कृत भाषेमध्ये पहिला येणाऱ्या विद्यार्थ्यास जगन्नाथ शंकरशेट यांच्या नावाने शिष्यवृत्ती दिली जाते. ३१ जुलै,१८६५ या दिवशी वयाच्या बासष्ठाव्या वर्षी नाना शंकरशेट यांचे निधन झाले .
संत नामदेव महाराज पुण्यतिथी : आषाढ वद्य त्रयोदशी
महाराष्ट्रातल्या हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी नामदेव या गावी दामा शेट ( रेळेकर ) आणि गोणाई या दांपत्यांच्या पोटी कार्तिक शुद्ध एकादशी या दिवशी श्री . नामदेवांचा जन्म झाला . त्यांचे वडील व्यवसायाने शिंपी होते . छोट्याशा गावात उदरनिर्वाहाचे पुरेसे साधन न मिळाल्यामुळे दामा शेटनी आपल्या कुटुंबासहित पंढरपूरला जाण्याचा निर्णय घेतला . श्री . नामदेवांचे बालपण पंढरपुरातच गेले . लहानपणापासून त्यांना पांडुरंग खूप मित्रासारखा वाटायचा. श्री . नामदेवांच्या हट्टावरून पांडुरंगाने नैवेद्य खाल्याच्या गोष्टी सांगितल्या जातात. मोठे झाल्यावर श्री. नामदेव कीर्तन करीत असताना पांडुरंग स्वतः कीर्तनात दंग होऊन नाचणाऱ्या नाम्यासमोर नाचायचे असेही सांगितले जाते .संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत सांगितलेला भागवत धर्म श्री . नामदेवांनी भारतभर हिंडून,कीर्तने,प्रवचने करून लोकांपर्यंत पोहोचविला. ते पंजाबात पण जाऊन राहिले होते. पंजाबातील घुमान पर्यंत जाऊन तिथेही त्यांनी भागवत धर्माचा प्रसार केला ." नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी " हे जणू त्यांनी आपल्या आयुष्याचं कर्तव्य म्हणूनच मानलं होत. घुमान या गावी संत नामदेव बराच काळ वास्तव्यास होते . गुरुग्रंथसाहिब या शीख धर्माच्या शीर्षस्थ असलेल्या ग्रंथातही श्री . नामदेवांच शबद कीर्तन पहायला मिळत . शीख धर्माचे लोक त्यांना गुरुस्थानी मानतात. संत नामदेवांच्या या अलौकिक कार्यामुळे त्यांना संत शिरोमणी नामदेव महाराज असे म्हटले जाते. पंढरपूरला नामदेवांची पायरी या नावाने ओळखली जाणारी त्यांची समाधी आहे .आषाढ वद्य त्रयोदशी या दिवशी संत नामदेव महाराज पंढरपूरला पांडुरंग चरणी विलीन झाले. आषाढ वद्य त्रयोदशी हा श्री. संत नामदेव महाराजांच्या पुण्य स्मरणाचा दिवस आहे .(संग्रहित )
संत जनाबाई पुण्यतिथी : आषाढ वद्य त्रयोदशी.
संत जनाबाई यांचा जन्म परभणी येथील गंगाखेड येथील दमा आणि करुंड या विठ्ठलभक्त दांपत्याच्या पोटी झाला .संत जनाबाईला तिच्या वडिलांनी नामदेवांचे वडील दामाशेट शिंपी यांचेकडे नोकरीसाठी पाठविले.तेव्हापासून त्या संत नामदेव यांच्या कुटुंबातील एक घटक बनल्या. त्या स्वतःला नाम्याची दासी म्हणवून घेत असत. त्या नामदेवांच्या घरामध्ये कामे करिता करिता विठ्ठलाचे नामस्मरण करीत असत"दळिता कांडिता तुज गाईन अनंता, जणी नामयाची रंगली कीर्तनी, विठू माझा लेकुरवाळा" यासारखे तीनशे पेक्षा जास्त लोकप्रिय अभंग संत जनाबाईंनी लिहिले आहेत . संत नामदेवांवरील भक्ती, प्रेम -भाव,संत ज्ञानदेवांविषयी असलेला उत्कट भाव संत जनाबाईंच्या मनात होता. "परलोकीचे तारू l म्हणे माझा ज्ञानेश्वरु" असे संत जनाबाईंनी ज्ञानेश्वरांविषयी म्हटले आहे . संत नामदेवांच्या सांन्निध्यामुळे त्यांना संत दर्शनाचा भरपूर लाभ झाला होता . संत जनाबाईंच्या अभंगातली भाषा अतिशय साधी आणि सामान्य जनतेला कळेल अशीच होती . संत जनाबाई श्रीक्षेत्र पंढरपूर येथे महाद्वारीं आषाढ वद्य त्रयोदशी या दिवशी समाधिस्त होऊन पांडुरंगात विलीन झाल्या .(संग्रहित)
संत सावतामाळी पुण्यतिथी : आषाढ वद्य चतुर्दशी.
ज्ञानेश्वरांच्या समकालीन असणारे सावतामाळी सोलापूर जिल्ह्यातील अरण या गावचे होते. पुरसोबा हे त्यांच्या वडिलांचे नाव होते . सावतामाळींचे वडील नेहमी पंढरीची वारी करीत असत. त्यांच्यातला भक्तिभाव संत सावतामाळिंमध्ये पुरेपूर उतरला होता . सावतामाळी यांचा विवाह भेंड गावचे"भानवसे रुपमाळी" हे घराणे असलेल्या जनाई नांवाच्या मुलीशी झाला .त्यांना विठ्ठल आणि नागाताई अशी दोन अपत्ये झाली .पारंपारिक माळ्याचे काम करिता करिता " कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी" असे म्हणून आपल्या कामातच सावतामाळी पांडुरंगाचे रूप पहात असत.
"आमची माळीयाची जात,शेत लावू बागाईत" असे ते एका अभंगात म्हणतात. वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ आणि जेष्ठ संत म्हणून त्यांचा लौकिक आहे . धार्मिक प्रबोधनाचे आणि भक्तिप्रसादाचे कार्य त्यांनी निष्ठेने व्रत म्हणून आचरिले. त्यांना केवळ पंचेचाळीस वर्षाचे आयुष्य लाभले. आषाढ वद्य चतुर्दशी (१२ जुलै ,१२९५,) या दिवशी अरण येथे संत सावता महाराज अनंतात विलीन झाले .
संत सावतामाळी यांच्याबद्दल संत नामदेव महाराज म्हणतात की....
धन्य ते अरण,रत्नांचीच खाण l जन्मला निधान सावता तो ll
सावता सागर,प्रेमाचा आगर l घेतला अवतार माळया घरी l
(संग्रहित)
दिव्यांची अमावस्या : आषाढ अमावस्या .
आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी जी तिथी येते तिला आषाढ अमावस्या किंवा दिव्यांची आवस असे म्हणतात. हा दिवस जरी अमावास्येचा असला तरी तो पुढे येणाऱ्या सणांचा म्होरक्याच म्हटला पाहिजे,कारण या दिवसापासून सर्व सण सुरू होतात. त्यामुळे अमावस्येची तिथी असली तरी सणाचं पावित्र्य ठेवून हा दिवस साजरा केला जातो.
या दिवशी घराला ऊब देणारे घरातले सर्व चांदीचे,तांब्याचे,पितळ्याचे तेलाचे दिवे,समया, निरांजने,लामण दिवे स्वछ घासून पुसून त्यांना तेलवात करून ,ते उजळवून त्यांची पूजा केली जाते. आघाडा,दुर्वा,फुले ही या दिवसात मिळणारी पत्री वाहिली जाते . दिव्यांना गोडाचा नैवेद्य दाखविला जातो . दिव्यांची पूजा म्हणजे साक्षात त्या रुपातल्या अग्निदेवाचीच पूजा असते . त्या निमित्ताने अग्निदेवांकडून सुख,समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी मागणे मागितले जाते. दिव्यांची जी प्रार्थना केली जाते ती खाली दिली आहे,आणि तिचा अर्थही पुढे दिला आहे.
दीप सूर्याग्निरुपस्त्वं तेजसां तेज उत्तमम्| गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव॥
अर्थ:
‘‘हे दीपा, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस.
तेजा मध्ये तू उत्तम तेज आहेस.
माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर.’’.
(संग्रहित)
या दिवशी कणकेचे दिवे करून आपल्या घरातल्या वंशाच्या दिव्यांना ओवाळले जाते.या निमित्ताने चातुर्मासातल्या कहाणी वाचनाला सुरुवात होते . त्या वेळच्या लोकमानसाच,चालीरितींचं सुरेख वर्णन या कहाण्यांमध्ये असत. कुठलीही गोष्ट चांगल्या मनानी सुरुवात करून ती करायला न विसरण्याचा उपदेशही " उतू नको मातू नको घेतला वसा टाकू नको "या शब्दांमध्ये केला जातो.
आपल्या मराठी वर्षांमध्ये दर महिन्याच्या अमावास्येला जरी फारशी छान तिथी मानीत नसले तरी तीन अमावास्यांच्या तिथींना शुभ मानले जाते . त्यातलीच पहिली तिथी म्हणजे आषाढ अमावस्या. छान दिवे उजळवून जणू येणाऱ्या चातुर्मासातल्या सणवारांच ही अमावस्या स्वागतच करीत असते. दुसरी अमावास्या म्हणजे श्रावण अमावस्या,तिला पिठोरी अमावास्या असे म्हणतात .साऱ्या घरादाराला संतुष्ट करून घरची गृहिणी " अतित कोण आहे " असे म्हणून अवचित दारी येणारा अतिथी पाहुणा शोधीत असते. ही अतिथ्यशीलता आपल्या संस्कृतीच एक गौरवाच पान आहे. तिसरी अमावस्या म्हणजे अश्विन अमावास्या. हिला लक्ष्मीपूजनाची अमावस्या असे पण म्हणतात . या दिवशी लक्ष्मीमातेची पूजा करून तिला आपल्या घरी बोलाविले जाते आणि सुख समृद्धीची मनोकामना केली जाते.
तर असा हा आषाढ महिना. कधी आषाढ सरींनी चिंब भिजवणारा,कधी ऊन पावसाच्या खेळामध्ये इंद्रधनुष्याची कमान आभाळात दाखविणारा, तर कधी फळा फुलांनी सप्तरंगांमध्ये नटलेल्या हिरव्यागार वसुंधरेच लोभस रूप दाखविणारा. आषाढ शुद्ध द्वादशीपासून चातुर्मास सुरू होत असल्यामुळे कांदा, लसूण,आणि अभक्ष भक्षण न करायला सांगितल्यामुळे आषाढात कांदे नवमी आणि कांदा लसूण घालून निरनिराळे पदार्थ तळून खाण्याची पद्धत आहे .यालाच आषाढ तळावा असे म्हणतात . जसे जेष्ठमहिन्यात नवी नवरी आपल्या मोठ्या दिराच तोंड बघत नाही,तसेच आषाढ महिन्यात नवी नवरी आपल्या सासऱ्यांचे तोंड बघत नाही अशीही पद्धत आहे . याचे कारण मला तरी असे वाटते की खूप पूर्वी मुली लग्नामध्ये ६/७/८ वर्षाच्या असायच्या ,त्यांना माहेरी जाण्याची मुभा देण्याची ही एक
पद्धत असावी.
सौ . उमा अनंत जोशी , ११.०७.२०२१
४/४८,सोनल --२ , जयराज सहकारी गृहरचना
संस्था,आयडियल कॉलनी,
कोथरूड, पुणे ४११०३८
फोन : ०२०२५४६८२१३ / मोबा.९४२०१७६४२९.
मेल : anantjoshi2510@gmail.com
Comments