top of page

विश्व मराठी परिषद

Updated: Feb 17, 2019

करोडो मराठी बांधवांना जोडणाऱ्या विश्व मराठी परिषदेच्या वैश्विक कुटुंबामध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही आपल्याला निमंत्रित करीत आहोत.


Vishwa Marathi Parishad - Olakh

महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी आहे. महाराष्ट्राबाहेर संपूर्ण भारतात विविध राज्यांमध्ये २.५ कोटी मराठी बांधव राहतात. जगातील १९२ देशांपैकी साधारणपणे ९० हून अधिक देशांमध्ये ६० लाखाहून अधिक मराठी बांधव वास्तव्य करून आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया न्युझीलंड, जपान, चीन, आखाती देश, इसरायल, मॉरिशस इ. अनेक देशांमध्ये मराठी बांधवांचे काम लक्षणीय आहे. या एकूण १५ कोटीतील १२ कोटीहून अधिक बांधवांची मातृभाषा मराठी आहे.


मराठी भाषेचा गौरवशाली इतिहास आहे. अमृतातही पैजा जिंके अशी मराठी भाषेची महती ज्ञानेश्वर माऊलींनी गौरवलेली आहे. भाषा, साहित्य आणि संस्कृतीद्वारे माय मराठी तिच्या पुत्रांबरोबर एका आत्मिय बंधनाने जोडली गेली आहे. प्रत्येक मराठी बांधवाच्या अंतर्मनामध्ये मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती याबद्दल अनिवार प्रेम आणि उत्कट जिव्हाळा दडलेला आहे. मराठी भाषेसाठी सृजनशील निर्मिती करणाऱ्या महाराष्ट्रात आणि भारतात सर्वदूर पसरलेल्या हजारो लेखक, कवी, साहित्यिक, तत्त्वज्ञ, संत महंत, चित्रकार, शिल्पकार, गीतकार, संगितकार, कलाकार, यांनी अपूर्व योगदान दिलेले आहे हे आपल्याला माहीत आहे. त्याचप्रमाणे भारताबाहेरील विविध देशांमध्ये राहणाऱ्या मराठी बांधवांनीही त्या त्या देशांमध्ये मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती जपण्यासाठी अत्यंत मोलाचे असे कार्य केलेले आहे. या सर्व कार्याची आणि देश विदेशातील मराठी बांधवांमध्ये सुरू असलेल्या अनेक विधायक उपक्रमांची सर्वांना ओळख व्हावी, विचारांचे – साहित्याचे आदान प्रदान व्हावे आणि सर्व मराठी बांधवांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जोडावे अशी ही संकल्पना आहे.


आधुनिक तंत्रज्ञानाने आपणां सर्वांच्या जीवनावर किती अभूतपूर्व परिणाम केलेला आहे ते आपण सध्या पहात आहोत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाने सर्वांना एकमेकांच्या अगदी जवळ आणले आहे. आपल्यामधिल दरी दूर केली आहे. आपण आता कनेक्टेड राहू लागलो आहोत. व्हॉटस अप, फेसबुक, ईमेल, इंन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूब, लिंक्ड इन आणि अशा अनेक साधनांनी आपल्या व्यक्त होण्याच्या पद्धतीमध्ये आणि एकूणच जीवनशैलीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला आहे.

याच तंत्रज्ञानाचा उपयोग करून १२ कोटी मराठी बांधवांना एकत्र जोडायचे, त्यांच्या जिव्हाळ्याचे, त्यांच्या जीवनामध्ये निखळ आनंद निर्माण करणारे आणि त्यांना उपयुक्त ठरणारे अनेक उपक्रम राबवायचे अशी विश्व मराठी परिषदेची मुख्य संकल्पना आहे. या संकल्पनेचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व सदस्य कनेक्टेड असतील आणि १२ कोटी मराठी बांधवांचे हे व्यासपीठ प्रत्येकाला उपलब्ध असेल. आपली कला आणि निर्मिती या माध्यमातून करोडो मराठी बांधवांपर्यंत पोहोचवता येईल. याद्वारे सृजनशील आनंद, विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग आणि देशातील / देशाबाहेरील मराठी बांधवांच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक वातावरणामध्ये वैश्विक कनेक्टेड मराठी कुटुंबाचा आपण अविभाज्य भाग बनाल. यातून आपल्या क्षमता विकसित होतील, नानाविध संधी निर्माण होतील आणि आपले जीवन विलक्षण चैतन्यदायी होईल. या सर्वातून माय मराठीची सेवा आणि सशक्तीकरण होईल, असा विश्वास वाटतो.


एखाद्या मराठी लेखकाला बुकर पारितोषिक का मिळत नाही ? नोबेल सन्मानाने मराठी भाषेचा का सन्मान होत नाही ? मराठी माणसामध्ये प्रतिभा नाही का ? त्याच्यामध्ये सृजनशील क्षमता नाहित का ? अशा गोष्टींचे चिंतन आणि अभ्यास करून विश्व मराठी परिषदेने येत्या काही वर्षांमध्ये ५००० नविन मराठी लेखक तयार व्हाहेत, तसेच भारताबाहेर विविध देशांमधून किमान १००० नवीन मराठी लेखक तयार व्हावेत असा संकल्प केला आहे. न्यूजर्सी, फ्लोरिडा, पॅरिस, सिडनी, टोकियो किंवा लंडनमध्ये एखादे साहित्य संमेलन किंवा सांस्कृतिक उपक्रम होतो आणि तिथे वडगाव किंवा आटपाडी किंवा वरूड किंवा चंद्रपूर येथील युवक उपस्थित राहतो. तसेच औदुंबर किंवा बेळगाव किंवा शहादा किंवा करमाळा येथे एखादे संमेलन होते आणि तिथे मेलबर्न किंवा शिकागो किंवा शांघाय किंवा बर्लिन येथील युवक युवती सहभागी होतात असेही आमचे स्वप्न आहे.


आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार होणारे मुक्त व्यासपीठ, प्रत्येकाचा सहभाग आणि आपल्या निर्मितीचा सर्वदूर प्रसार हे विश्व मराठी परिषदेचे वैशिष्ट्य असेल. येथे देश विदेशातील प्रत्येकाला सहभागी होता येईल. विद्यार्थी, युवक, वाचक, रसिक, श्रोते, लेखक, कवी, साहित्यिक, अनुवादक, प्रकाशक, ग्रंथविक्रेता, कलाकार, गायक, संगितकार, दिग्दर्शक, छायाचित्रकार, गीतकार, चित्रकार, शिल्पकार, प्राध्यापक, शिक्षक, व्याख्याते, गृहिणी, नोकरदार, छोटे व्यापारी, विक्रेते, डॉक्टर, वकील, सीए, अधिकारी, समाजसेवक, मराठी भाषा प्रेमी या सर्वांना विश्व मराठी परिषदेचे सदस्य होता येईल. एवढेच नव्हे तर आपली वैयक्तिक किंवा भागिदारी व्यापारी संस्था, कार्पोरेट कंपनी, उद्योग, ग्रंथालये, चित्रपटगृह चालक, नाट्यगृहचालक, नाट्यसंस्था, सेवा संस्था, सहकारी किंवा विश्वस्त संस्था, शाळा, महाविद्यालये आणि प्रशिक्षण संस्था, देवस्थान, गावोगावची तरूण मंडळे, गणेशोत्सव मंडळे, व्यवस्थापन मंडळी यासर्वांना विश्व परिषदेचे सदस्य होता येईल.


आपण स्वतः विश्व मराठी परिषदेचे वैयक्तिक मानद सभासद व्हावेच त्याचबरोबर आपल्या कुटुंबातील व्यक्ती, आपले देश विदेशातील नातेवाईक, मित्र, सहकारी या सर्वांना सभासद करून घ्यावे. तसेच आपल्या परिसरातील मराठी बांधवांच्या संस्था, कंपन्या यांनाही सभासदत्व घेण्यासाठी आग्रह करावी असे आवाहन मी करीत आहे.


विश्व मराठी परिषदेचे सदस्यत्व ऑनलाईन अपलब्ध आहे. त्यासाठी www.vishwamarathiparishad.org या संकेतस्थळाला भेट द्यावी आणि विश्व मराठी परिषदेच्या विलक्षण आणि रोमांचक कार्यामध्ये सहभागी व्हावे.



विश्व मराठी परिषदेची संकल्पना, उद्दीष्टे आणि उपक्रम यांची माहिती देणारा व्हिडिओ www.bit.ly/vmp-olakh या लिंकवर क्लिक करून पहावा. हा व्हिडिओ अधिकाधिक मराठी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपले कुटुंबिय, देश विदेशातील नातेवाईक, मित्र, सहकारी यांना पुढे पाठवावा, अशी नम्र विनंती मी आपल्याला करीत आहे.


प्रा. क्षितिज पाटुकले

संस्थापक अध्यक्ष – विश्व मराठी परिषद


73 views1 comment
टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page