top of page

वस्तू हरवली... माणुसकी सापडली!



शाळा आणि संस्कार यांचा फार जवळचा संबंध असतो. असायलाही हवा. शाळांमधून मुलांमध्ये मूल्यांची रुजवण जाणीवपूर्वक व्हायला हवी. ती मोठ्या प्रमाणात केल्या सुध्दा जाते. सरकारी शाळांमध्ये त्यासाठी मूल्य शिक्षण, परिपाठ, कथाकथन अशा काही उपक्रमांचे आयोजन केल्या जाते. त्यातून मुलांना सहज, खेळता खेळता व रंजक पध्दतीने मूल्यांचा धडा दिल्या जातो. वैज्ञानिक दृष्टीकोन, स्त्री पुरुष समानता, वक्तशीरपणा, संवेदनशीलता, सौजन्यशीलता, सर्वधर्म सहिष्णुता, राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रभक्ती, नीटनेटकेपणा, श्रमप्रतिष्ठा ही दहा मूल्य मुलांना परिपाठातून दिली पाहिजे असा शासनाचाही आग्रह आहे. तेव्हा मूल्यांवर आधारित कथा, प्रसंग, घटना सांगून तसेच अशा बाबी ठळकपणे अधोरेखित करून जाणीवपूर्वक मुलांच्या मनावर ते ठसवण्याचा प्रयत्न केला जातो. परिपाठात मुल्यांवर आधारित स्वानुभव, शाळेतील विविध मुलांचे बरे वाईट अनुभव यांची नेहमी देवाण घेवाण झाल्यास मुले खूप लवकर प्रतिसाद देतात. मूल्य कथा सांगत असतांना त्यातील पात्र मुलांच्या जवळचे, परिसरातील किंवा परिचयातील असतील तर त्यातून मुले लवकर धडा घेतात असा माझा अनुभव आहे. त्यामुळे मुल्यांवर आधारित कथा सांगतांना ते पुस्तकांपेक्षा अनुभवातील असावे. त्याचा प्रभाव आणि परिणाम मुलांवर त्वरित झालेला दिसेल.

शाळांमध्ये वस्तू हरवणे ही मोठी समस्या असते. लहान मुले आपल्याला सापडलेल्या वस्तू बिनदिक्कतपणे आपल्या बॅगेत भरुन घेतात. त्यामागे चोरी हा उद्देश नसला तरी आपली नसलेल्या वस्तूंवर ते आपला मालकी सांगू लागतात. शिवाय ती वस्तू ज्याची असेल त्याला परत करण्यास सपशेल नकार देतात. कधी कधी हा चोरीचा प्रकारही असतो. तेव्हा चोर कोण?  हे शोधणे जेवढे महत्त्वाचे तेवढेच चोरी झालेली किंवा हरवलेली वस्तू परत मिळवणे व ती ज्याची आहे त्याला परत करणे हे ही आवश्यक असते. मात्र या दोन्ही बाबी करतांना चोरी करणारा विद्यार्थी दुखावणार नाही आणि त्याची 'चोर' अशी प्रतिमा इतर विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणार नाही याची जास्त काळजी घ्यावी लागते. वर्गात दिवसभर माझी पेन हरवली, त्याची वही गेली,  माझे पुस्तक सकाळपासून दिसत नाही अशा अनेक तक्रारी मुले शिक्षकांकडे करतात. वस्तू 'हरवली' असे सांगणारी मुले जशी शिक्षकांकडे येतात तशीच वस्तू 'सापडली' असे सांगणारेही काही असतात. तेव्हा सापडलेली वस्तू जमा करून ती कोणाची आहे हे शोधावे लागते. सोबतच ती ज्याची आहे त्यालाच मिळावी यासाठी योग्य ओळख पटवून वस्तू परतीचा मार्ग मोकळा होतो. अनेक शिक्षक हे काम अतिशय छान पध्दतीने करतात. किंबहुना ते करावेच लागते. नाहीतर या बाबी पालकांपर्यंत पोचून पुढे नव्याच समस्या निर्माण होतात.

काही दिवसांपूर्वी मी कुटुंबासह पंजाब मधील बियासला गेलो होतो. त्याठिकाणी सत्संगासाठी हजारो लोक जमले होते. या ठिकाणाला डेरा असं म्हणतात. या डेऱ्यात मैदानाच्या एका कोपऱ्यात एक भला मोठा एअर बलून हवेत सोडलेला होता. या बलून विषयी मला खूपच कुतुहल वाटत होतं. माझी उत्सुकता फार न ताणता मी या बलून विषयी तेथील सेवेकऱ्याला विचारलं. त्यांनी दिलेली माहिती खूपच रोचक आणि उपयोगी वाटली. इथे लोकांची मोठी गर्दी असते. त्यात लहान मुले, म्हातारी माणसं हरवण्याच्या घटना नेहमीच घडतात. जे हरवले आहेत त्यांनी व ज्यांचे कुणी हरवले असेल त्यांनीही या बलून जवळ यावे. इथे हरवलेली मुले आणि माणसे सापडतात. सापडलेल्या वस्तूही इथे लोक आणून देतात. ज्यांची वस्तू हरवली आहे ते सुध्दा इथे येवून आपली वस्तू शोधतात. अशा प्रकारे हरवलेली माणसे असोत की वस्तू ते मिळवून देणारा हा बलून आहे.  

याच धरतीवर शाळेत हरवले ते सापडावे आणि सापडले ते जमा करता यावे म्हणून प्रयोग करण्याचे ठरविले. बलून ऐवजी एक प्लास्टिकची पारदर्शक भरणी वापरली. शाळेत हरवणाऱ्या वस्तू बसतील एवढ्या आकाराची झाकणासह ही भरणी आहे. भरणीचे झाकण सहज उघडेल व लावताही येईल असे आहे. वर्गात शिक्षकांच्या टेबलवर आणि शाळेत मुख्याध्यापकांकडे या भरण्या ठेवल्या आहेत. त्या सहज लक्षात याव्यात यासाठी त्यावर "वस्तू हरवली, माणुसकी सापडली" असे ठळक अक्षरात लिहिले आहे. ज्याची वस्तू हरवली आहे त्याने आणि ज्याला वस्तू सापडली आहे त्यानेही ही भरणी शोधायची. आपल्याला सापडलेली वस्तू या भरणीत टाकायची किंवा ज्याची वस्तू हरवली असेल त्याने ती या भरणीत शोधायची. भरणीच्या या प्रयोगाने वस्तू हरवली पण सापडली नाही याचे प्रमाण जवळपास शून्य झाले आहे. सापडलेली वस्तू परत करण्यात शिक्षकांना कोणताही वेळ खर्ची घालावा लागत नाही. सर्वात महत्वाचे 'मला मिळालेली वस्तू ही दुसऱ्याची आहे आणि म्हणून मी ती परत केली पाहिजे' हा भाव मुलांमध्ये निर्माण होतो. म्हणूनच प्रत्येक वस्तू हरवण्यासोबत कुणामध्ये तरी आम्हाला माणुसकी सापडत असते. त्यामुळे वस्तू हरवल्याचं 'दुःख' असलं तरी ते सापडत असल्याचं 'समाधान' ही आहे. शिवाय हरवलेल्या प्रत्येक वस्तू सोबत 'माणुसकी' सापडत असल्याचा मोठा आनंद अन अभिमानही!

ज्ञान आणि मूल्य यात हाचतर मोठा फरक आहे. ज्ञान मिळवता येते. ते दुसऱ्याला देता सुध्दा येते. मूल्य मात्र अंगिकारावं लागतं. ते स्वत: पुरतं मर्यादित असतं. अन तुम्ही मूल्य अंगिकारल्याचं तुमच्या वर्तनातून स्पष्ट दिसतं. मूल्य असं वर्तनातून दिसलं म्हणजे तुम्ही अंगिकारल्याचं ते द्योतक असतं. प्राथमिक शाळेतील मुलं खूप काही अनुकरणातून शिकत असतात. शिक्षक जसं वागतात, करतात तसेच ते सुध्दा वागतात. कृती करतात. तुम्ही वर्गातील किंवा मैदानातील कचरा उचलून कचराकुंडीत टाकला असेल तर मुले सुध्दा तसेच करतात. शिक्षकांची अक्षरे चांगली असतील तर वर्गातील बहुतांश मुलांची अक्षरे सुध्दा नीटनेटकी आणि चांगली असतात. तेव्हा प्रामाणिकपणाचे मूल्य मुलांमध्ये रुजवायचे असेल तर त्याची सुरवात या माणुसकीच्या भरणीपासून करायला हवी. या भरणीत आपल्याला सापडलेली वस्तू टाकायची असं एकदा मुलांच्या लक्षात आलं की ते ती वस्तू घरी नेण्याचं टाळतील आणि येथून सुरु झालेला प्रामाणिकपणाचा प्रवास आयुष्यभर विनासायास सुरु राहिल. चला, तर करुन पाहुया…!


लेखक-आमीन गुलमहमंद चौहान, (हरसूल ता. दिग्रस जि. यवतमाळ)

मो. -9423409606

ईमेल- aaminet2020@gmail.com


 

नविन ब्लॉगचे नोटिफिकेशन येण्यासाठी विश्व मराठीच्या ईमेल लिस्टला सबस्क्राइब करा.

500 views1 comment

1 Σχόλιο


Deepak Bhalerao
Deepak Bhalerao
01 Νοε 2020

हा प्रयोग आपण करून पहिला असेल तर खरोखर चांगले काम केलेले आहे .

Μου αρέσει
टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page