उत्सव म्हणजे आनंद, आल्हाद आणि उत्साह, मग तो आनंदाचा दिवस असेल, एखादा समारंभ असेल किंवा मग सण. भारतीय संस्कृतीत येणारा प्रत्येक सण, उत्सव हा आपल्या शरीरासोबतच मनाचे सुद्धा आरोग्य जपत असतो. भारत देश हा प्राचीन काळापासून कृषीप्रधान असल्याने सर्व सण उत्सवांची रचना ही बदलत्या ऋतूप्रमाणे केली आहे. सतत बदलणा-या ऋतूप्रमाणेच जर आपण आपल्या आहारात सुद्धा बदल केला तर आपले आरोग्य हे अर्थातच चांगले राहते त्यामुळे त्याच पद्धतीने भारतीय सणांची रचना केली आहे. आपले सण उत्सव हे चंद्रावर अवलंबून असतात तर ऋतू हे सूर्यावर अवलंबून असतात. त्यामुळे पंचांगात सुद्धा योग, तिथी, वार, नक्षत्र आणि करण याला अनुसरूनच वर्षातील सर्व दिवस सुनिश्चित केले जातात. आपल्या मराठी महिन्यात एकूण पंधरा तिथी असतात पैकी पंधरा या शुक्ल म्हणजेच शुद्ध पक्षातील तर उर्वरित पंधरा या कृष्ण म्हणजेच वद्य पक्षातील असतात. पण प्रत्येक तिथी पुण्यप्रगतिथी म्हणजेच प्रत्येक तिथीचे स्वतःचे असे एक महत्व आहे. उदाहरणार्थ वर्षप्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा, यमद्वितीया म्हणजे भाऊबीज, अक्षय्यतृतीया,गणेश चतुर्थी, नागपंचमी, चंपाषष्ठी, रथसप्तमी, गोकुळाष्टमी, श्री रामनवमी, विजयादशमी, आषाढी-कार्तिकी एकादशी, गोवत्स द्वादशी, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, नारळी पौर्णिमा, दीप अमावस्या अशा अनेक तिथ्या आहेत.
चैत्र महिन्यात भर दुपारी सूर्य डोक्यावर येऊन पृथ्वीच्या तापमानात वाढ होते त्यामुळे शरीरातील ग्लुकोज आणि पाण्यात घट होते, अंगावर घामोळे, पुरळ उठते. गुढीपाडव्याला आपण जी गुढी उभारतो त्यात कलशासोबत साखरेच्या गाठी आणि कडुनिंबाची पाने वस्त्राला माळतो. साखरेच्या गाठी शरीरातील ग्लुकोजची कमतरता भरून काढतात आणि कडुनिंब हे सुद्धा शरीरावर जे घामोळं उठत त्यावरचा उपायच आहे. खूप वर्षांपूर्वी मी लहान असताना माझी आई पाण्यात कडुनिंबाची पाने घालून ते पाणी उन्हात तापवत ठेवायची आणि नंतर त्या पाण्याने मला अंघोळ घालायची. त्या पाण्याला 'झळवणी' असे संबोधले जायचे. घामोळं, कांजिण्या यावरचा तो सर्वोत्तम उपाय होता. Nycil, Demicool यासारख्या कंपन्या उगम पावण्याअगोदर सर्वत्र हेच उपाय होते. अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर बियाणे पेरण्यास सुरवात केल्यास विपुल प्रमाणात धान्य पिकते आणि बियाणाला कधी तोटा पडत नाही तसेच या दिवशी केलेले दान अक्षय्य म्हणजेच अबाधित राहते अशी एक धारणा आहे. बदलत्या ऋतूनुसार त्याकाळात सतत घरात राबणाऱ्या स्त्रियांना ऑक्सिजनची सर्वांत जास्त आवश्यकता होती. वडाच्या सान्निध्यात जर वेळ व्यतीत केला तर भरपूर ऑक्सिजन मिळतो. वडाच्या पारंब्या, पाने, फुले यांचा स्त्रियांच्या पोटाच्या आरोग्याशी घनिष्ठ संबंध आहे आणि वटपौर्णिमेचे व्रत केल्याने नव-याचे आयुष्य वाढते व आपले सौभाग्य अबाधित राहते या धारणेमुळे तरी स्त्रिया हे व्रत नित्यनेमाने करतील अशी तत्कालीन आयुर्वेदाचार्यांना खात्री असल्याने ही परंपरा सुरू झाली असावी.
पावसाळ्यात विशेषतः श्रावण मासात अग्निमांद्य असल्याने आपली पचनसंस्था ही मंदावलेली असते. मांसाहार तर नाहीच पण या कालावधीत शाकाहार सुद्धा नीट पचत नाही. तसेच हा प्राण्यांच्या प्रजोत्पादनाचा सुद्धा काळ असल्याने मांसाहार करू नका म्हणून मांसाहार करणारे बरेच जण हे आषाढ अमावस्येपासून मांसाहार वर्ज्य करतात. हल्लीच्या काळात ही अमावस्या गटारी म्हणून ओळखली जाते पण खरं तर गटारी हा अपभ्रंश आहे, मूळ शब्द आहे "गत-आहार" म्हणजेच पचनाची गती कमी झालेली असल्याने यापुढे पचण्यास हलका जाईल असा "गत-आहार" घेणे. तसेच कांदा, लसूण या पदार्थांच्या सेवनाने अपचन, गॅसेस होण्याची शक्यता असते. कारण अग्निमांद्य असल्याने जठराग्नी म्हणजेच वैश्वानर हा प्रदीप्त नसल्याने भूक लागत नाही. चर्व्य, चोष्य, लेह्य आणि पेय अशा चार प्रकारच्या अन्नास पचवण्याचे काम जठराग्नी करीत असतो. पण या काळात तो तितका कार्यरत नसल्याने तसेच हलका आहार किंवा लंघन करून शरीरास विश्रांती देण्याकरीता या कालावधीत जास्तीत जास्त प्रकारची व्रत-वैकल्य, उपवास आणि सण-उत्सवाची भरभराट असते. पण तरीही उपवास असून सुद्धा उपवासाच्या दिवशी पातेलभर खिचडी, साबुदाण्याची लापशी, दाण्याचा कुटाचा लाडू, रताळ्याच्या गोड फोडी, बटाट्याचा कीस, उपवासाचा चिवडा, वेफर्स त्यावर ताक किंवा फळे असा जास्तीचा आहार घेत पचनसंस्थेला अतिरिक्त व्याप देतो ती गोष्ट वेगळीच
कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच साधारण ऑक्टोबर महिन्याचा काळ, या काळात वातावरणात पुन्हा बदल झाल्याने व उष्णता अधिक वाढल्याने पित्त प्रकोप होण्याची शक्यता असते म्हणूनच कोजागिरीच्या रात्री जागरण करून आटीव दूध हे चंद्र किरणांच्या प्रकाशात ठेवावे, अशा दुधात पित्त शमविण्याची ताकद असते. नुसतेच दूध नव्हे तर आपण स्वतःही चंद्र किरणांच्या प्रकाशात बसल्याने फायदा होतो कारण मगाशी सांगितल्याप्रमाणे आपले सर्व सण हे चंद्रावर अवलंबून असतात. दिवाळी ही थंडीत येत असल्याने आपल्याला भूक भरपूर लागते तसेच शरीराला तेल मर्दन व अभ्यंगाची नितांत गरज असल्याने अभ्यंगस्नान व दिवाळी फराळाची आवश्यकता भासते. त्यानंतर सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करण्यापर्यंतचा काळ हा धनुर्मास अथवा धुंधुरमास म्हणून ओळखला जातो. ह्या काळात पुन्हा वातावरणातील थंडीचा त्रास होऊ नये म्हणून गुळाच्या पोळ्या, मुगाची खिचडी, मुगाचा लाडू, तीळ लावलेली बाजरीची भाकरी, वांग्याचे भरीत, लोणी या उष्णतावर्धक पदार्थांचा नैवेद्य दाखवून सूर्योदय समयी या पदार्थांवर ताव मारण्याचा हा उत्सव असतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे आपले सर्व ऋतू हे सूर्यावर अवलंबून असल्याने आपली दिनचर्या आणि आहार हे आयुर्वेदाप्रमाणे सूर्योदय व सूर्यास्त यालाच धरून आहेत. या काळात थंडीत सातत्याने वाढ होत असल्याने शरीराला तिळाच्या पदार्थांची आवश्यकता असते त्यामुळे मकरसंक्रांतीच्या सणाचे महत्व आहे. होळीच्या सणाला झाडे फांद्या तोडून त्यांचे दहन का केलं जातं? कारण शरद ऋतूत सर्व अनावश्यक झुडपे, रोपटी ही सुकलेली असतात आणि ती तोडून त्यांचे दहन केल्याने संपूर्ण परिसर स्वच्छ होतो. फाल्गुनमासानंतर पुन्हा उन्हाळ्याचा प्रकोप व्हायला सुरवात होतो ज्यामुळे त्वचासंसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे ही माती म्हणजेच धुळवडीचा लेप चेहरा व शरीराला लावून अंघोळ केल्याने मातीतील पोषक द्रव्य त्वचासंसर्गापासून आपले रक्षण करतात.
भारतीय सण उत्सवांची रचना ही सर्व समाजाला एकत्र आणण्यासाठी केली आहे. त्यामुळे हे सर्व सण-उत्सव, व्रत-वैकल्य,पूजा-अर्चा,परंपरा ही देवाच्या भीतीमुळे नव्हे तर आपल्यात चांगले बदल होण्यासाठी साजरे करायचे असतात. अंधश्रद्धेपोटी नव्हे तर संपूर्ण श्रद्धेने करायचे असतात. प्रत्येक सण-उत्सव यामागचा उद्देश मग तो तात्विक असेल किंवा वैज्ञानिक, आपण समजून घेतला पाहिजे. आमच्या पूर्वजांनी आम्हाला हे सांगितलं, त्यांना प्रश्न विचारायची किंवा दुरुत्तर करण्याची हिंमत आमच्यात नव्हती त्यांनी सांगितलं ते आम्ही केलं या तथाकथित परंपरागत वृत्तीतून बाहेर पडत, काही पाळू नका किंवा करू नका असे नाही पण जे कराल ते करण्यामागच लॉजिक समजून घेतलं तरच आजच्या धावत्या युगात ते आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत पोहचवता येईल. पुढची पिढी ही चमत्कार बघून नमस्कार करणारी नव्हे तर निसर्गदत्त नियमांनाच आधार ठेऊन चालणारी आहे याचं भान जाणीव मनात ठेऊनच आपण सर्व सण उत्सव साजरे केले पाहिजेत..
©® - आनंद लेले...
Email.: anandlele52@gmail.com
विश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअॅप लिस्टमध्ये सामील व्हा - 7066251262 हा व्हॉट्सअॅप क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMP असा मेसेज पाठवा
Comments