सांगली माझे माहेर. विवाहानंतर मी कागवाड सारख्या खेडेगावात आले. सांगलीत मी एम.एस.ई.बी मध्ये नोकरी करत होते. लग्नानंतर नोकरी सोडावी लागली कारण माझी नोकरी महाराष्ट्र राज्यात होती. कागवाड हे कर्नाटकातील गाव. खेडेगाव स्वीकारलं व नोकरी सोडली म्हणून मला काही परिचित हसले. मनात असेल व जिद्द असेल तर आपण जाऊ तेथे नक्कीच काहीतरी चांगले करू शकतो, यावर माझा प्रचंड विश्वास! मला कागवाड ला येऊन पन्नास वर्षे झाली. म्हणजे पन्नास वर्षांपूर्वीचे खेडेगाव किती खेडे असेल कल्पना करा. पण उलट मला हे एक आव्हानच वाटले.
कागवाड ला मराठी प्राथमिक शाळा होती सरकारने काढलेली, पण स्वतःची इमारत शाळेला नसल्यामुळे वर्ग भाड्याच्या चार-पाच ठिकाणी भरायचे. मी व माझ्या एका समविचारी मैत्रिणीने गावातल्या पुढाऱ्यांची एक मीटिंग बोलावली. शाळेला स्वतःची इमारत व्हावी यासाठी काय करावे लागेल याची आखणी केली. आम्ही दोघींनी बाहेर गावच्या लोकांशी आर्थिक मदतीसाठी पत्रव्यवहार सुरू केला. पहिला पाच हजार रुपये चा चेक माझ्या पत्राला उत्तर म्हणून बारामतीच्या डॉ. मोकाशी यांनी पाठविला. खूप आनंद झाला. हा आनंद शब्दात सांगता येत नाही! आम्ही झपाटल्यासारखे काम करत होतो. 1984 साली शाळेला स्वतःच्या चार खोल्या आम्ही बांधून पूर्ण करू शकलो. उर्वरित आवश्यक खोल्या सरकारने पुढे बांधून दिल्या. यासाठी झालेला विरोधही आम्ही सहन केला. परमेश्वर शक्ती देतो! पुढे मग गावात महिला मंडळाची स्थापना झाली. गावातल्या वृद्धांचा सर्वे केला आणि तहसिलदाराकडून त्यांना वृद्ध पेन्शन मिळवून दिली.
समाजाला उपयोगी अशी अनेक शिबिरे घेतली. त्यातील रक्तदान, नेत्रदान, महिला शिबिर ही चांगलीच यशस्वी झाली. विद्यार्थ्यांच्या साठी शैक्षणिक शिबिर घेतले, या शिबिरासाठी पुण्याहून "जाणीव" संघटनेचे कार्यकर्ते आले. त्यावेळी कानडी लोक आमच्यावर थोडे नाराज झाले. अपंगांना त्यांना उपयोगी असे कॅलिपर्स बूट, तीन चाकी सायकल शिबिरा द्वारे मिळवून दिली. कितीतरी लेखकांची व्याख्याने आयोजित केली. अशी अनेक सामाजिक कामे करत करत आयुष्याची संध्याकाळ झाली, पण तरीही स्वस्थ बसवत नाही म्हणून मतिमंद मुलांना अर्थार्जन व्हावे म्हणून प्रयत्न करते आहे.
या सर्व सामाजिक कामांमध्ये नवऱ्याची पूर्णपणे साथ मिळाली. जीवन समाधानाने भरून गेले. ज्या शरीरातले मन आनंदी समाधानी असते ते शरीर निरोगी असते. खेड्यात आले म्हणून कधीच दुःख झाले नाही, तर तेथे आवडणारे काम करता आले. आणि म्हणूनच लग्न हा माझ्या जीवनातील एक मोठा टर्निंग पॉइंट ठरला, ज्याने मला आज 52 वर्षे आनंदात ठेवले. जयश्री सतीश पटवर्धन कागवाड कर्नाटक 7406983273 jayashreep1941@gmail.com
विश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअॅप लिस्टला सामील होण्यासाठी आमचा 7066251262 हा क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMParishad असा मेसेज पाठवा.
जयश्री पटवर्धन ,
एक छान विधायक कार्य सुंदर शब्दादित केले आहे..
या अशा सकारात्कमक कार्यामुळे वाचताना सुद्धा एक छानशी ऊर्जा मिळते.
सलाम तुम्हाला व तुमच्या सहकार्यांना तुम्ही करत असलेल्या विधायक कार्याला.
आपला,
प्रवीण देशपांडे.