top of page

सावट



नेहमीचाच एक सामाजिक ज्वलंत वास्तव विषय म्हणजे...शेतकऱ्यांच्यावरती येणारे आस्मानी संकट..आणि यामध्ये त्यांचे होणारे नुकसान.. त्यांच्या शेत मालाला कधीही हमीभाव मिळत नाही.. तरीही निमुटपणे या संकटाला समोरा जाणारा शेतकरी..निरपेक्षपणे जगत असलेल्या या पोशिंद्याच्या जीवनावरची सावट ही माझी लघुकथा आहे.

नोव्हेंबरमध्ये अचानक झालेल्या वादळी पावसात झालेले शेतकऱ्यांचे नुकसान यावर आधारीत हा वास्तव लेख.


## वादळी पाऊस येतो आणि जातो पण जाता,जाता शेतकऱ्यांचा जीव घेऊन जातो.आताच झालेल्या वादळी पावसाने सर्व शेतकऱ्यांची जी अवस्था झाली आहे.ती अवस्था मी माझ्या 'सावट' या लघुकथेत लिहण्याचा प्रयत्न केला आहे.##


उकाडा दोन दिवसापासून जरा जास्तच वाढला होता.जीवाची नुसती लाहीलाही चालू होती.घामानं अंग झिरपत होते. अंगातील कपडा अंगालाच चिटकत होता.

पाणी पिऊन,पिऊनच पोट भरतं होतं.त्यामुळे रोज सकाळी असेल ती चटणी, भाकरी पोटभर खाऊन तृप्ती मानणाऱ्या धन्याची आज भुकचं पळाली होती. कसबसं दोन घोट पाण्याचे पिऊन ते उठले आणि लगबगीनेच काही तरी विचारात गुंग होऊन मनाशीच काही तरी निर्णय घेतला. मी ही माझ्या घरकामाची आवराआवर करु लागले.सुर्य डोक्यावर तळपत होता आणि जीवाची घालमेल वाढतच होती.तोपर्यंत दुपार झाली. म्हणून परत माझी पावलं धन्याकडे वळली. जेवायला या आता तरी.. येताय ना जेवायला. खूप वेळ झालाय. खाऊन घ्या अगोदर दोन घास पोटाला.तिकडून आवाज आला. तू जेव सोने मी नंतर खातो. अगं!!



उकाडा खूप वाढलायं ,आभाळ बी तसं नाही दिसतं.एवढं पण काय सांगावे या पावसाचा काही नेम नाही बघं. माणसांची जुळणी झालीये तोपर्यंत भात काढून घेतो आम्ही.सोन्यासारखं आलेले पिक कसंतरी घरी आणतो. बघता,बघता वाऱ्याच्या वेगाने भाताचे विळे,खुरपी,तळवट,भात बडवायला लोखंडी कॉट ,पाण्याची कळशी,पोती. रानाला आणि डोलणाऱ्या पिकाला दहीभाताचा नवैद्य. अशा अनेक गोष्टी एकत्र करुन त्यांची पावले झपाझप रानाच्या दिशेकडे वळलीसुद्धा. पंधरा,वीस माणसांची जुळणी करुन भात काढणीला बघता, बघता सुरुवात ही झाली.सपासप भात कापून झाल्यावर. काहींनी पेंड्या आवळल्या तर काहींनी कोवळे उचलून नेऊन दिले. काहींनी मग तो भात कॉटवर भराभर बडवायला चालू केले. भाताची रास ही पडू लागली पण एकाएकी काळ्याकुट्ट ढगांची दाटी आकाशात झाली. वारा ,विजा चमकू लागल्या तसं मात्र पाया खालची जमीन हळूहळू सरकु लागली. अंधारलेल्या ढगापेक्षाही डोळ्यासमोर अंधारुन आले.



भावनांचा एकच गोंधळ उडाला होता. अधूनमधून देवाला हात जोडायचे चालू होते.जाऊ दे बाबा डोक्यावर लोंबकळत असलेला हा काळाकुट्ट ढग. वाऱ्याबरोबर हा ढग सरकला पुढे तर नाही पडायचा पाऊस. असा स्वतः ला समजावत तिप्पट वेगाने त्यांच्या कामचा वेग ही वाढत होता. कारण... गुडघाभर चिखलात केलेली ती भात लागण ते कष्ट ,ती वेदना आता आठवत होती.भात लागण करताना आलेल्या सलग जोरदार पावसामुळे नदीचं पाणी वाढलं होतं आणि गळ्याबरोबर आलेल्या पाण्यातून मोटरी बाहेर काढताना झालेला त्रास आजही नजरेसमोर होता.त्यानंतर भाताचं पिक जोमाला लागले.एकाद्या लहानग्या बाळाप्रमाणे. भाताचं पिक ही तसचं मोठ झाले अगदी झटपट .तसं धन्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं होतं .तो आनंद आजही आठवतोय . पिकाचे थोडे दिवस गेले जमिनीतल्या ओलाव्यावर आणि बरोबर पावसाने वढ दिली रान सुकू लागलं. रोपांची बी तरतरी जरा कमीच झाली. तरीही, पाऊस आला नाही दोन नक्षत्रं कोरडीच गेली.मग मात्र पुन्हा नदीवर मोटर जोडून पाणी पाजायला लागणार होतं पिकाला. मोटर भिजल्यामुळे पुन्हा दोन पैशे खर्च करून मिस्त्रीला बोलवून मोटर जोडावीच लागणार होती. नाही तर आलेले पिक जळेल .म्हणून पुन्हा खटाटोप करुन मोटर जोडली.आणि रात्रनंदिन दारी धरुन भाताला पाणी पाजलं. अधूनमधून औषध फवारणी ही करावी लागायची. औषधफवारणी केल्यानंतर अंगातील ठणक धन्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसायची. अंग धरणीवर आडवे करे पर्यंतच झोप लागायची.तरी पण उद्याची सकाळ त्याला नवीन ऊभारी द्यायची .उगवणाऱ्या कोवळ्या किरणांसोबत त्याची पिके आणि धनी नहाऊन निघायचा. या आनंदी दिवसा बरोबरच त्याचे भाताचे पिकही जोमाने वाढत होते. हिरवाईची जागा आता गडद हिरवीगार रंगाने घेतली होती. हळूहळू भाताला पोटरासुध्दा पडला. टच भरलेले ते पिक पाहून धनी मनोमन सुखावला .दरवर्षी पेक्षा यंदा पिक बी चांगलचं आलं होतं. पाचू,माणिकांनी भरलेल्या पिका कडे नजर टाकून तो... मुलाबाळांच्या गरजा पुर्ण करुन दिवाळी पुरते तरी चांगले पैसे येतीलच .ही स्वप्ने बघत होता.यंदा दिवाळीला घरच्या लक्ष्मीला व पोरा बाळासनी चांगली कपडे घ्यायचीच हे ठरवले होते पक्केच. कारण पिक बी तसचं होतं भारात आणि जोमात. या सुखद स्वप्नानाबरोबरच तो हुर्र,हुर्र, हुर्र ...असा आवाज करत पाखरे राखत असायचा.आनंदात दिवस चालले होते.एक दिवस पिक बघायला मला बी रानात नेले होते. डौलदार आलेला खास भात बघण्यासाठी. गेल्या, गेल्या पिकावर नजर ठरतच नव्हती खरतरं. माझ्याकडे पाहून धनी नजरेनेच बोलला कसं पिक आलयं राणीसाहेब!! मी पण हसून म्हणाले अगदी पाचू सारखंच दिसतयं बघा .सुंदर आणि हिरवंगार. त्या धनीनीच्या शब्दाने व गार वाऱ्याच्या झुळकीने तो सुखावला होता.त्याच्या सगळ्या वेदना व कष्ट तो क्षणभर विसरला होता.आता बघच तू यंदा दिवाळी कशी जोरात साजरी होईल ते... आणि हळूच गाल ओढत बोलला. तुला बी सजवतो पाचूवाणी हिरवीगार साडी घेऊन. धन्याचा हसरा चेहरा बघून मला पण जणू स्वर्गच भेटल्या सारखा वाटला. काही दिवसांनी या हिरव्या पाचूची जागा आता सोन्याने घेतली होती .सोनेरी,तांबूस रंग अंगावर लेपेटून घेतलेलं भाताचं पिक काढणीला आलं होतं. ते सोनं घरी न्यायचं तोपर्यंतच पावसाने डाव साधला .आभाळ फाटलं होतं. सलग दोन दिवस अहोरात्र कोसळणाऱ्या पावसात. हाता ,तोंडाशी आलेलं पीक वाहत होतं .थोडी भरलेली पोती घरी आणली तरी घरात पसरायला पण जागा शिल्लक नव्हती.वरुन घर गळत होतं ,खाली जमीन ओली होती. फाटक्या संसाराला किती ठिगळं जोडली तरी ती पुन्हा उसवतच होती.रानात काढलेल्या भाताच्या पेंड्या चिखलात रुतल्या होत्या,जनावरांचा चारा वाया गेला होता. राहिलेले अर्धे पिक मुळ्या घट्ट पकडून मालकाला साथ द्येण्याचा प्रयत्न करीत होते.पण दिवसरात्र कोसळणाऱ्या वादळी पावसापुढे ते ही जमीन दोस्त झाले होते.धन्याच्या भावना गारठून गेल्या होत्या.डोळ्यातले पाणी पावसाबरोबर वाहून गेले होते.तो एकटक माती मोल झालेल्या कष्टाकडे व मातीमोल झालेल्या स्वप्नानांच्याकडे आवासून पाहत होता. गुडघे जमिनीवर टेकून,डोके बडवायलाही जमीन शिल्लक नव्हती.सभोवार पाणी साचले होते. गावातील काही शहाणी,शिकलेली मंडळी पिकाचा पंचनामा करुन , सरकार ला मदत मागू या अशी चर्चा करत होते. पण माझ्या धन्याला ते काही नको होते . जो जगाचा अन्नदाता आहे.



गरीब,श्रीमंत, भिकारी,अडले, नडले साऱ्यांना शिवारातील माणिक,मोती पसा,पसा भरुन मुक्त हस्ताने दान करणारा. त्याला दुसऱ्याच्या मदतीची भिक नको होती.त्याला त्याच्या हक्काची काळ्या आईची माया हवी होती. कारण फक्त तिच त्याला पोटभर दान देवू शकते. किती साध्या,साध्या इच्छा होत्या, त्याच्या बायकां पोरांसाठी पण... त्या नेहमीच अपूर्ण राहतात. जबाबदारी सांभाळताना त्याला तारेवरची कसरत करावी लागते.मुला,बाळांच्या शिक्षणाचा खर्च, नंतर मुलीच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज ते फिटते न फिटते तोच लेक बांळतपणासाठी आणायची असते.म्हाताऱ्या आई,बाबांचे आजारपण,औषध, गोळ्या या साऱ्या गोष्टी त्याला संभाळायच्या असतातच.दिवसेंदिवस महागाई वाढतच असते फक्त वाढत नसतो तो या "शेतकऱ्याच्या मालाचा भाव". म्हणूनच त्याच्या जीवनाची नाव सतत पाण्याच्या लाटेवर हेलकावे खाताना दिसते.या बळीराजाचा बळी सारेच घेतात. आणि.. हा निसर्गसुध्दा . तोंडाजवळ आलेला घास पुन्हा नशिबाने हिसकावून नेला होता.जगाला जगवणारा पोशिंदा त्याच्या पोटाची खळगी मात्र भरतच नव्हती.पावसाने डाव साधला होता पण शेतकऱ्याच्या काळजावरचा घाव. कुणालाच दिसत नव्हता. आतल्याआत भळभळणाऱ्या जखमेची वेदना फक्त त्यालाच जाणवत होती.शहाण्या पुढारी मंडळीनी फोटो काढले पिकाचे. व ती मंडळी निघून गेली. मात्र हा दिलदार राजा समजावत होता पुन्हा एकदा स्वतः ला कि, निसर्गा पुढे कोणाचेच काही चालत नाही. मलाच काय साऱ्या शेतकऱ्यांना हे भोग नशिबात आलेत.शून्यात असलेली त्याची नजर...पुढे काय हे प्रश्नचिन्ह ?? बघत होती. एक अवंढा गिळून... अनेक प्रश्नांची उत्तरे तो समोर पसरलेल्या अंधारातच बहुधा शोधणार होता. सुर्य ही हळूहळू अस्ताला गेला. अंधार पसरला होता. आणि त्या अंधाराबरोबरच भावना आवर्तनांचाही वेग मंदावला होता.त्या पुसटश्या अंधारात धन्याची पाठमोरी आकृती दिसत होती. पुन्हा एकदा हे काळजीचे सावट त्याच्या पाठमोऱ्या आकृतीत स्पष्ट जाणवत होते....!!



सौ .क्रांती तानाजी पाटील.

मु.पो.दुशेरे.

ता.कराड.जि.सातारा.

फोन नं.९०४९२१४३४०

Email.: krantipatil008@gmail.com



विश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअ‍ॅप लिस्टमध्ये सामील व्हा - 7066251262 हा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMP असा मेसेज पाठवा


112 views0 comments

Recent Posts

See All

Comments


टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page