top of page
Writer's pictureVishwa Marathi Parishad

एका डाएटची गोष्ट....


"हाsssय विद्या!

कशी आहेस?"


(आजूबाजूच्या विद्या नाव 'नसलेल्या' यच्चयावत स्त्री आणि पुरूषांनीही..आपणच विद्या असल्यासारखं कुतूहलाने मान फिरवली. )


"हाय अग! किती दिवसांनी भेटतेस?" विद्या देखील तारसप्तकात किंचाळली.

"होssग. खरच. फारच दिवस झाले नाही. कॉलेज संपल्यानंतर आजच. बाकी तू मात्र अगदी तेव्हा होतीस तश्शीच आहेस बर का"

..............

मग बऱाच वेळ एकमेकींची 'इत्यंभूत' ख्यालीखुशाली विचारून झाल्यानंतर शेवटी एकदाची विद्याला आठवण झाली आणि ताटकळत बाजूला उभ्या नवर्याच्या जीवात जीव आला.


(काय म्हणता तुम्हाला ही बायकोचा सेम अनुभव? निव्वळ योगायोग समजा....)


"अग बघ माझा वेंधळेपणा...शी बाई.

हे किनई माझे मिस्टर! "


शेजारी पाहिलं तर 'हे' तोंडाचा मोठा चंबू करून मैत्रिणीकडेच रोखून पाहत होते.



"नमस्कार!" सायली अदबीने म्हणाली.

अतिव मार्दव शब्दात आणत 'हे' म्हणाले,

" नमस्कार!

तुम्हाला बघून वाटत नाही हो, तुम्ही वयाने इतक्या मोठ्या असाल.

अगदीच मेंटेन ठेवलाय स्वतःला.शेजारी उभ राहिलात दोघी तर दहाचा आकडा वाटेल. एका शेजारी पूज्य.. "

'ह्यांनी' कधीच दाबून ठेवलेलं मनोगत एकदाचं व्यक्त केलं.

मैत्रीण चक्क लाजली हो.

इकडच्या तिकडच्या भरपूर गप्पा झाल्या.

याची त्याची आठवण.. उणीदुणी.. सगळं काही.

" चल मी निघू का ग! अग खूप बोलायचंय पण बघ ना वेळच नाहीये. फोन नंबर घे माझा, म्हणजे बोलता येईल निवांत"

ती चवळीची शेंग लायनर लावलेले मोठे मोठे डोळे मिचमिच करत म्हणाली.


(...... इतका वेळ गप्पा मारूनसुद्धा परत काही बोलताच नाही आलं म्हणतात. काय म्हणता? अगदी मनातल ओळखलं तुमच्या? )


“पुढल्या वेळी नक्की घरी यायच हं."

बायकोची जळजळीत नजर टाळत 'हे' तिला परत परत हसून घरी येण्याचे आमंत्रण देत होते.


बायको हुप्प झालेली....


नवरोबांनी तोंडावर लगेचच बेफिकीरपणाचा भाव आणला.

(साळसूदपणा.. दुसरं काय )

खरतरं इथूनच सुरुवात झाली ........


विद्यानं ठरवलंच! वजन कमी केलंच पाहिजे. घरचेच आहेर मिळताहेत म्हटल्यावर.....


सारा दिवस बेचैनी.. ..चिडचिड.


मुलं आणि त्यांचे बाबा.. आपलं नक्की कुठं नि काय चुकलय हे न कळून उगाचच प्रत्येक गोष्ट सावरून, चाचपून करत होते.


दुसर्‍या दिवशी सकाळी मुलं शाळेत अन् हे ऑफिसला गेल्यावर विद्यानं पहिल्यांदा जाऊन जिम गाठली.


तिला वरपासून पायापर्यंत न्याहाळत ट्रेनर म्हणाला,


" हं! मेहनत घ्यावी लागेल बरीच.

चढा पाहू काट्यावर ..

म्हणजे वजन बघून डाएट प्रोग्रॅम ठरवता येईल."

लोकहो! विद्या चढता क्षणी काट्याने डावीकडून उजवीकडे जीss मान फिरवली म्हणता तो ब्याऐंशीवर(82) जाऊन स्थिर झाला.


ट्रेनरने प्रोग्राम दिला...किती वेळा, काय खायचं, सारं काही..

फी? सहा महिन्यांसाठी फक्तss अठ्ठेचाळीसहजार रुपये.


केवढ्यान दचकली विद्या.

बापरे! वजनही द्यायचं आणि वर इतकी फी ही? .....

बहुत नाइन्साफी है।


वरकरणी मात्र त्या जिमवाल्याला टाळण्यासाठी म्हणते कशी? ,

"हो !हो ! बघते. घरी सांगते, मग आपल्याला कळवते. "

(अशावेळी घरच्यांचं मत अचानक पणे अत्यंत जरुरीचं कसं काय ठरतं ब्वॉ कळायला मार्ग नाही..

इतर वेळी.. थांबा हो तुम्हाला काय कळतंय त्यातलं! )


विद्या नाराजीनंच घरी परतली.


काssही नाही, जर्रा स्वतःला शिस्त लावून घेतली पाहिजे.....

व्यायाम आणि नेटका आहार..

सर्च गुगल ......मिशन डाएट प्रोग्रॅम.

कोणता फॉलो करायचा?... दर दोन तासांनी खायचा का? दिवसातून दोनच वेळा पंचावन्न मिनीट खायचा?..

.....का दर दोन तासांनी पंचावन्न मिनिट खायचं..


..दिवेकर की दीक्षित की दिवीक्षित डाएट ?


"छे ss समजेनासं झालंय.

जाऊ दे मीच माझा ट्रेनर आजपासून" इति विद्या.


(आत्मनिर्भर.. का काय ते? जर् रा कॉन्फिडन्स आला की सगळ्यांची विमान लगेचच हवेत कशी काय उडतात कोण जाणे? )

त्याच रात्री विद्याला ती सायलीपेक्षाही बारीक झाल्याचं स्वप्न पडलं....

‘अहो’ मागेपुढे करून गाणं गातायत....

(हो ss हो अगदी बरोब्बर धावतीये तुमच्या विचारांची गाडी...

झाडही हवीतच.. .एका लाईनीत

मग झाडाच्या आजूबाजूनं फिरता येत. ..

शास्त्र असतय ते)



सकाळी उठल्यावर विद्याला एकदम हुरूप आला. पण ठरवलेल्या प्लॅनविषयी मात्र अळीमिळी गुपचिळी


सरप्राssssईज सगळ्यांसाठी


नाहीतर काय सोसायटीची ट्रीप निघाली होती गोव्याला मागल्या वर्षी...

तिच्या मिस्टरांनी बसच्या खर्चाबाबत विचारणा केली..इतका जास्त कसा काय म्हणून, तर टेंभुर्णीकर म्हणाले सुद्धा,

"दोन जणांची जागा तर एकट्या विद्या वहिनींनाच लागेल. "

सोसायटीतल्या बायकाही मेल्या काही कमी नाहीत होsss

समुद्रात गेल्या खेळायला सगळ्या जणी तर म्हणाल्या,

" नुसतं बाजूला उभं राहिलं तरीसुद्धा कारंज्या सारखं पाणी उडत हो अंगावर विद्या पाण्यात पडल्यावर.

मज्जाच येते बाई अगदी."


विद्या आपली मनावर घेत नाही म्हणून बरं ... राग आला तर घालवायला पाहिेजेच ना? रागातच मग चांगली चार वाट्या सोलकढी प्यायली तेव्हा कुठे जरा शांत..थंड वाटलं तिला.

जाऊदे मेलं...नकोच त्या वाईट्ट आठवणी


सकाळी उठून मुलं शाळेत निघाली. नवरा चार दिवस ऑफिसच्या कामासाठी बाहेर गावी जाणार होता. मुलांनाही पुढे तीन दिवस सुट्टी होती. त्यांना आईकडे पाठवण्याचे ठरवलं.


आता ती आणि तिचं डाएट.....


दुसरे दिवशी उत्साहाने उठली. मॉर्निंग वॉकला जाण्यासाठी 'ह्यांच्या' टी-शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट मध्ये स्वतःला कोंबण्याचा प्रयत्न करून पाहिला. पण सारे प्रयत्न असफल. मग हताशपणे नेहमीचा बसणारा ड्रेस घालून मॉर्निंग वॉकला गेली. आज इतकंच पुरे म्हणत चक्क एsssक किलोमीटर चालून घराकडे परत येते, तो लिफ्ट जवळ गोरे काकू.


मग चौकशी...

घरी बोलावून चहाचा आग्रह.

'गोरे काकूंचं नेहमीचच आहे. कोणाबद्दल चहाड्या करायच्या असतील तर अगदी वाट अडवून चहाचा आग्रह करतील. नाहीतर न बघितल्या सारखं करून पटकन पुढे जातील.

तंबू म्हणतात मला मागे.. .. काय माहित नाही का काय?

आणि हो चहा तर बंद आहे ना

..डाएट...

जाऊ दे उद्यापासून करू.... '

मनातल्या मनात बोलत ती काकूंच्या घरी पोहोचली सुद्धा.

नाहीतरी दमायलाच झालं होतं चालून चालून.

काकूंच्या घरी चहा आणि मारी बिस्कीटं संपवून आणि हो काकूंच बाजूच्या घाटे वहिनींबद्दलच 'मनोगत' ऐकून ती परतली. हुश्श् थकून-भागून सोफ्यावर अंग टाकले.

थोड्याच वेळात भुकेने बेजार झालेल्या पोटात फळे, चिवडा असं बारीक-सारीक काहीतरी घालून त्याची क्षुधा तृप्ती केली.

घरातच थोडाफार व्यायाम, सूर्यनमस्कार करण्याचा प्रयत्न केला.

समोर टी-शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट खुर्चीतून खुदुखुदू हसत होते.

दोन सूर्यनमस्कार झाले आणि मटकन खालीच बसली. खूप थकवा जाणवायला लागला होता. उरलेले फक्त हातानेच सूर्य नमन झाले. गरगरल्यासारखं वाटत होतं.

मग एनर्जी यावी म्हणून मँगो मिल्क शेक घेतला थोडा.

"अग आई गssss! आत्ता जरा थोडं फ्रेश वाटतय. नाहीतर कसतरीच होत होतं. "

(एकवेळ कॅन्सर वर देखील रामबाण इलाज निघेल पण कसतरीच होणं या रोगावर मात्र युगानुयुगे कोणताच वैद्यकीय इलाज निघू शकत नाही. )

बसल्या बसल्या प्राणायाम आणि अनुलोम विलोम करून पाहिले टीव्हीत सांगितलं सारखे. आता कपालभाती करायची होती. पण छ्या !

छातीच्या आणि पोटाच्या भात्यांचे आकार एकमेकांच्या प्रेमात इतके आकंठ बुडाले होते की पोट आत घेताना उगाचच छाती धपापल्यासारखी दम भरत होती.

असं नाही चालायचं. व्यायाम आणि डाएट स्ट्रिक्टली फॉलो करायला हवं....

उकडून भाज्याच खाणार होती ती जेवताना

पण...

फ्रिज उघड-बंद करताना चोरून तिच्याकडेच पाहणाऱ्या बटाटेवड्यांना नाराज करणं कठीण होतं

"चलता है। आजच्या दिवस..."

नाहीतर डाएट मोडणार्यातली ती अज्जिबात नाही....

दोन तास शांत झोप

परत संध्याकाळी अख्खा एक कि.मी. वॉक करून आली तर दारात ताई उभी.

रहायलाच आली होती.

मग गप्पाटप्पा..

रात्रीचे जेवण शक्यतो कमीच करावं म्हणून ताईने आणलेल्या भेळ आणि भजी वर भागवलं.

झोपायला गेली.. झोपच लागेना

काहीतरी राहून गेल्यासारखं वाटत होतं

कालचं आणलेलं आईस्क्रीम!.....

हो ss हो तेच खुणावत होतं कधीचं.

मग काय! ती आणि ताई लहानपणच्या आठवणी जागवत आईस्क्रीममध्ये रमून गेल्या.

.. . तीन दिवस अशाच पद्धतीने फक्त वॉक, व्यायाम आणि डाएट.

आता 'हे' आले की सरप्राईज द्यायचं.

थोडं तरी वजन घटलच असेल. सहा महिन्यात एकदम शेलाटी बांधा....

आहात कुठे ?

विद्या विचार करतच आवरत होती.

दुसऱ्या दिवशी “अहोंना” व्यायाम आणि डाएटचे रसभरीत वर्णन ऐकवले.

त्यांनीही चकित होऊन नविन आणलेल्या वजन काट्याचे आग्रहाने विद्याच्या हस्तेच उद्घाटन केले.


"हे काय! श्शीssss!"

पुन्हा काट्याची मान गर्रकन डावीकडून उजवीकडे. खळ्खट्याक्..

...ब्याऐंशीवर जाऊन फुलस्टॉप ..


आता मात्र विद्या फुल रडण्याच्या बेतात.


नवऱ्याने जवळ घेतलं.

“वेडे मी लाख इतरांचं कौतूक करेन पण प्रेम मात्र एकीवरच केलंय... तुझ्यावर..

त्यामुळे तू जशी आहेस तशीच मला खूप आवडतेस

....अग राणी तूच माझी दीपीका, कतरिना आणि प्रियांका...”

(काय म्हणता? तुमच्याकडेही अस्साच योगायोग?)

संध्याकाळीच दोघांनी प्रेमाने परत एकदा डेटवर जायचे ठरवले.

जेवणाचं काय?

अहे सध्या फक्त दोनच तर ठिकाणं गाजताहेत... तिथच जाणार

कुठे?

अभिज् किचन किंवा अन्नपूर्णा...


( या कथेतील सर्व पात्र काल्पनिक असून कोणाही व्यक्तिशी साधर्म्य आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा. कथेचे सर्व हक्क राखीव)

(शब्द संख्या-१२००)


सौ. दीपाली थेटे-राव

पुणे, महाराष्ट्र.

मोबाईल/व्हॉट्सअॅप नं- ९९२२३२५७५०

लिंग- स्त्री.

Email.: deepalirao2012@gmail.com


ब्लॉगवर नवीन आहात ? नवीन ब्लॉगपोस्टच्या सुचना ईमेलवर येण्यासाठी सबस्क्राईब करा

286 views0 comments

Recent Posts

See All

*वचन*

सावट

Comments


टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page