तारांबळ

 

साहित्याच्या प्रांतात विनोदी साहित्याला एक आगळेवेगळे स्थान आहे. अनेक विनोदी साहित्यिकांनी हे प्रांगण सजवले आहे. प्रत्येक साहित्यिकाचा नामोल्लेख जागेअभावी शक्य नाही. परंतु या क्षेत्रात स्थिरावलेले एक नाव म्हणजे श्री उद्धव भयावळ! त्यांचा पहिला विनोदी संग्रह जरी थोडासा उशिराने येत असला तरी गेली अनेक वर्षे ते सातत्याने त्यातही विनोदी लेखन करीत आहेत. भयवाळ यांंच्या  पहिल्या विनोदी कथासंग्रहाचे नाव 'तारांबळ' असले तरीही हा कथासंग्रह वाचकांसमोर सादर करताना लेखकाची कुठलीही तारांबळ उडालेली नाही. अगदी सावकाश, अनुभवाची शिदोरी साठवत, त्या अनुुभवांना विनोदाची फोडणी देत, विविध दिवाळी अंकांंच्या  माध्यमातून वाचक दरबारी हजर होऊन आपल्या साहित्यावर वाचक पसंतीची मोहोर उठल्यानंतरच मग पुस्तकरुपाने वाचकांंसमोर जाण्याचा लेखकाचा निर्णय प्रशंसनीय तसाच नवोदित लेेेखकांंसाठी अनुुुकरणीय असाच आहे.

असे म्हणतात की, साहित्याची बीजे ही आसपासच असतात. फक्त ती बीजे हेरता आली पाहिजेत. अवतीभवती असणाऱ्या या बीजांचे रुपांतर कुणी काव्यात करते, कुणाला त्यात कथांश सापडतात तर कुणी त्याचे नाट्यरूपांतर करते. काही लेखक या बीजांमधून कादंबरीचे निर्माण करतात तर काही लेखक या बीजांमधून हास्याचे मळे फुलवतात. श्री उद्धव भयवाळ यांनी त्यांच्यासोबत बागडणारा, खेळणारा विनोद अलगद टिपला आणि त्या विनोदाची कथारुपांमध्ये आकर्षक अशी गुंफण केली. उद्धव भयवाळ हे विनोदाचे अमाप पिक दरवर्षी वाचकांना पुरवित असतात. असे म्हणतात की, जो विनोद कारुण्याची झालर लेवून येतो किंवा विनोद ऐकून, वाचून हसणाऱ्या वाचकांच्या नयनात अश्रू येतात तो विनोद श्रेष्ठ समजावा. विनोद निर्मितीसाठी स्थळ, काळ, वेळ अशी कशाचीही गरज भासत नाही. विनोद हा जन्मतः, निसर्गतः एखाद्या व्यक्तीला लाभलेला असतो. साहित्य हे जसे ह्रदयापासून निर्माण होते तसेच विनोदाचेही आहे. यामुळेच अगदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार चालू असतानाही एखादी व्यक्ती सहज, हळूवार एखादा विनोद करते आणि मग अंत्यसंस्कार होत असलेल्या ठिकाणापासून अंंतर राखून उभ्या असलेल्या गटामध्ये हास्य फुलते.  श्री भयवाळ यांनी निवडलेले विषय हे त्यांच्या समृद्ध अनुभव विश्वाची खात्री देतात. चोरी, एप्रिल फूल, क्रिकेट, ज्योतिष, तारांबळ, पहिला नंबर,  निद्रा, प्रेमभंग, प्रवास, योगासन या क्षेत्रातील विनोद त्यांनी टिपून ते चितारले आहेत. सोबतच एखाद्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून गेल्यावर जी तारांबळ उडते ती गंमतजमत मोठ्या गमतीने रेखाटली आहे. यासोबतच विनोदी लेखकांचा आवडता विषय म्हणजे पत्नीसंदर्भातील विनोदी किस्से. श्री भयवाळ यांनी बायकोसोबत खरेदीला गेल्यावर उडणारी धमाल, तारांबळ सारे काही कथन केले आहे. साधारणपणे विनोदी लेखकाची लेखणी ही राजकारण आणि महिला याकडे जास्त आकर्षित झालेली असते. एका मोठ्या विनोदी लेखकाकडे एक नवोदित लेखक गेला आणि म्हणाला की, मला विनोदी लेखक व्हायचे आहे त्यासाठी मी काय करू? या प्रश्नावर त्या लेखकांनी त्या पोरसवदा लेखकाकडे पाहिले आणि त्यांनी विचारले की, तुझे लग्न झाले आहे का? उत्तरादाखल त्या नवोदिताची मान नकारात्मक हलत असल्याची पाहून लेखकमहोदय पुढे म्हणाले की, जा. अगोदर लग्न कर. तुला विनोद आणि विषय आपोआप सापडतील. म्हटले तर हा विनोद आहे पण यातील आशयाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही कारण विनोदी कथा आणि महिला यांचा तसा जवळचा संबंध आहे. उद्धव भयवाळ यांनाही तो मोह आवरता आला नाही. बायकोसोबत साडी खरेदीला जाणे म्हणजे काय दिव्य असते हे मध्यमवर्गीय नवऱ्यांच्या चांगलेच अडवळणी पडले आहे. तारांबळ कथासंग्रहातील भयवाळांची 'बायको, शॉपिंग आणि मी ' ही कथाही तमाम नवरे मंडळीच्या अनुभवाचे प्रतिनिधीत्व करणारी अशीच आहे. ही कथा वाचताना 'अरे, हा तर माझाच अनुभव आहे.' असे अनेक पतींंना वाटेल. वाचकांची ही प्रतिक्रिया लेखकासाठी फार मोठी पावती असते, जणू एक पुरस्कार असतो.

    कथासंग्रहातील वेगवेगळ्या चार कथांच्या नायकाचे नाव बाबू आहे. या अष्टपैलू व्यक्तीमत्त्वाच्या माध्यमातून लेखकांनी बाबूची रागदारी, बाबूच्या घटस्फोटाची गोष्ट, बाबूच्या भन्नाट कल्पना आणि बाबूरावांच्या झोपेची चित्तरकथा या कथांमधून वेगवेगळे विनोद साकारले आहेत. असे वाटते की, जणू अनेक कथांमधून भेटणारा बाबू हा नायक लेखकाचा मानसपुत्र तर नव्हे? 

         लेखक भयवाळ हे ज्योतिष्यशास्त्राचे सखोल अभ्यासक आहेत त्यामुळे या शाखेतील काही विनोदी घटना त्यांच्या लेखनात येणे क्रमप्राप्तच आहे. 'खंडू गुरूंचे ज्योतिषशास्त्र' या कथेतही त्यांचा विनोद आणि त्यांचा अभ्यास डोकावतो. 'तारांबळ' ही या कथासंग्रहातील शीर्ष कथा आहे. 'ध' चा 'मा' होणे हे आपल्याकडे नवीन नाही. याच आशयाला धरून गुंफलेली तारांबळ ही कथा वाचकांच्या मुखकमलावर हास्य फुलवल्याशिवाय राहत नाही. पहिला नंबर म्हटले की, साधारणपणे आपल्या डोक्यात शैक्षणिक क्षेत्र येते परंतु सामाजिक क्षेत्रातही हा नंबर मिळविण्यासाठी चाललेली धडपड लेखकाच्या लेखणीने अचूक टिपून धमाल उडवून दिली आहे.

        आज क्रिकेटयुग आहे असे म्हटले तर ते वावगे ठरु नये. क्रिकेटची अनेक रुपे आहेत. विविधतेतील एकता या दृष्टीने आपण 'आयपीएल' या सामन्यांकडे पाहतो कारण अनेक देशातील खेळाडू एकाच संघाकडून खेळताना दिसतात. आयपीएलच्या सामन्यांमध्ये एक 'पात्र' रसिकांचे लक्ष वेधून घेते. चौकार, षटकार आणि गडी बाद झाल्यानंतर पडद्यावर येणाऱ्या चिअर गर्ल्स आपले लक्ष वेधून घेतात. प्रसंगी क्षण-दोन क्षणासाठी होणारे त्यांचे दर्शन प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडल्यागत्!  अनेक रसिक त्यांच्या दर्शनाने ताजेतवाने होतात परंतु लेखकाची नजर, लेखणी या मुलींकडे एका वेगळ्याच दृष्टीने पाहते. लेखकाला त्या बालेचे शरीर आकर्षित करत नाही तर तिला पडणारे कष्ट, तिची होणारी तारांबळ पाहवत नाही. त्या मुलींसाठी लेखकाचा जीव तीळतीळ तुटतो आणि आपण तिची काही मदत करु शकत नाहीत हे पाहून लेखकाला अपराध्यासारखे वाटते. लेखकाचे मन, त्याच्या भावना जिवंत असल्याचे हे लक्षण आहे. का होत असेल लेखकाच्या मनाची ही अवस्था त्यासाठी त्यांची 'क्रिकेट आणि मी' ही कथा वाचायला हवी. विशेषतः लेखक जेव्हा मला क्रिकेटचे काही कळत नाही असे म्हणतात पण या कथेमध्ये लेखकांनी टिपलेले काही क्षण ते क्रिकेटकडे बारकाईने पाहतात हे जाणवते.

         एकंदरीत श्री उद्धव भयवाळ यांचा स्वभावच मुळी विनोदी! ते कविता,लावणी, प्रवासवर्णनात्मक लेख लिहित असले तरीही ते विनोदी लिखाणात जास्त रमतात. सहज, सोपी, खुसखुशीत भाषा असल्यामुळे त्यांचा विनोद लोकप्रिय होतो आहे. श्री उद्धव भयवाळ हे 'तारांबळ' या शीर्षकाचा त्यांचा पहिला विनोदी कथासंग्रह घेऊन वाचक दरबारी येत आहेत. कथासंग्रह वाचताना एक आगळीवेगळी मजा येते, कुठेही कंटाळवाणे होत नाही. तारांबळ कथासंग्रहातील कथा आणि त्यातला विनोद दर्जेदार, उत्तम प्रकारचा आहे. कथासंग्रह पहिलाच असला तरीही कुठेही तसे जाणवत नाही. कुठेही ओढूनताणून आणलेला आणि अवाजवी विनोद आहे असे वाटत नाही. यापूर्वी त्यांच्या 'इंद्रधनू' आणि 'हसरी फुले' या दोन कवितासंग्रहावर वाचकांच्या पसंतीची छाप उमटली आहे. त्यांच्या तारांबळ हा कथासंग्रहही वाचकप्रिय होईल यात तिळमात्र शंका नाही. कोणत्याही पुस्तकाचे आणि त्यातल्या त्यात विनोदी कथासंग्रहाचे मुखपृष्ठ हे त्या संग्रहाचा आत्मा असतो. योगेश प्रभुदेसाई यांनी सजवलेले मुखपृष्ठ अत्यंत रेखीव, आकर्षक असेच आहे. कथासंग्रहाचा आशय स्पष्ट करणारे हे मुखपृष्ठ वाचकांची जिज्ञासा जागृत करणारे आहे. कोल्हापूर येथील श्री नवदुर्गा प्रकाशनाचे मिलींद राजाज्ञा यांनी हा कथासंग्रह प्रकाशित केला असून कागद, छपाई आणि अक्षर या सर्वांचा दर्जा उत्कृष्ट आहे. लेखक उद्धव भयवाळ यांच्या कथासंग्रहाला आणि त्यांच्या पुढील साहित्यिक प्रवासाला अनंत शुभेच्छा !


लेखक: नागेश सू. शेवाळकर (पुणे)

मो: ९४२३१३९०७१

ईमेल: nageshspande@gmail.com


259 views1 comment