मला आवडलेले पुस्तक
'आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने...' संत तुकाराम महाराज यांच्या या अभंगाप्रमाणे शब्दांना सर्वस्व मानून आजीवन शब्दांची पूजा करणारे, जुन्या पिढीतील एक ज्येष्ठ नि श्रेष्ठ असे आणि 'या मातीच्या पुण्याईचा टिळा कपाळी लावू, जोवर वाहे गोदामाई तोवर गाणे गाऊ.' या मराठवाडा गीताच्या माध्यमातून सर्वदूर परिचित असलेले लेखक, कविवर्य लक्ष्मीकांत तांबोळी यांचा 'तळ नितळ' हा लेख संग्रह वाचण्याचे सौभाग्य प्राप्त झाले. श्री दत्ता डांगे प्रकाशक, इसाप प्रकाशन, नांदेड यांनी प्रकाशित केलेला हा संग्रह आत्यंतिक सुबक, आकर्षक असा आहे. शीर्षकाला साजेसे असे उत्कृष्ट मुखपृष्ठ नयन बाराहाते यांनी चितारले आहे. कागद, छपाई, बांधणी, अक्षरांचा आकार या सर्व बाबींमध्ये स्वतःचे असे वैशिष्ट्यपूर्ण स्थान हे इसापचे वैशिष्ट्य आणि ध्येय या पुस्तकातही डोकावते.
अंतरंगात लेखक लक्ष्मीकांत तांबोळी यांच्या सिद्धहस्त लेखणीने पानोपानी जणू 'शब्दांचा' जयघोष मांडलेला दिसून येतो. लेखकाचे शब्दांवर अतिशय प्रेम आहे नव्हे ते त्यांच्या जीवनाचे अविभाज्य अंग आहे. प्रत्येक ठिकाणी ते शब्दांचा गजर करतात, जागर करतात, शब्दांचा यज्ञ करताना आहुतीही शब्दांचीच देतात, शब्दांना आवाहन करून शब्दांची आराधना करतात कारण लेखक शब्दांचे उपासक आहेत. लिहिणारे अगणित आहेत परंतु शब्दांवर निर्मळ, नितळ मनाने प्रेम करणारांपैकी एक म्हणजे लक्ष्मीकांत तांबोळी! प्रार्थना हा आपल्या समाज जीवनातील एक महत्त्वाचा भाग! लेखकही प्रार्थना करतात पण ते आरोग्य मागत नाहीत, पैसा-अडका, धनधान्य, ऐश्वर्य मागत नाहीत तर ते चक्क असा एक शब्द मागतात की, त्या शब्दाचा नाद ऐकून समुद्र भरती, ओहोटी सोडून स्तब्ध व्हावा. कारण लेखकाने एकच धर्म आजीवन पाळला आहे तो म्हणजे वाचन आणि लेखन! धर्म म्हटला की, कर्मकांड आलेच. लेखकासाठी त्यांनी स्वीकारलेल्या धर्मातील दैवत म्हणजे शब्द! शब्ददैवतेची पूजा लेखकाने अखंडपणे, अविरत केली आहे. ही शब्दसाधना म्हणजे एक प्रकारची तपस्या आहे आणि हे खडतर तपाचरण मी प्रत्येक शब्दांत अनुभवले असल्याचे लेखक मोठ्या अभिमानाने लिहितात. माणसाला कशाचा ना कशाचा ध्यास असतो, असायलाच पाहिजे कारण असा एखादा ध्यास असला म्हणजे जीवन रसरशीत होते, जिवंत होते, स्फूर्तिदायी होते. तांबोळी यांनाही शब्दांचा ध्यास लागलेला आहे. सारे काही विसरून लेखक शब्दांच्या मागे लागतात. आणि पाहता पाहता ते शब्दवेडे होऊन जातात. भेटलेल्या प्रत्येक शब्दाचे बारकाईने निरीक्षण करतात. शब्द तर ठायी ठायी भेटतात, ते शब्दकोशातही सापडतात परंतु लेखकाला शब्द हवे ते 'स्वतःचे' असे! अशा शब्दप्रेमातून ते आनंदाने लिहितात, 'माझे मला शब्द। सापडले आज। आता नाही लाज। सांगावया।।' अशा या शब्दाराधनेतच त्यांना अभंग सापडतो, दोहा निर्माण होतो, गजल त्यांच्या लेखनीला गवसते, कलमेला 'कलाम' साकडे घालते, प्रसंगी 'संतापदोहे' लिहून त्यांनी स्वतःचा राग व्यक्त केला, अभंग, ओवी, श्लोक, कविता, कादंबरी, कथा, गीते इतकेच काय पण त्यांच्या लेखणीतून लावणीही प्रसवली. आपल्याकडे कुठल्याही क्षेत्रात मुशाफिरी केली तर एका सार्वत्रिक आजाराची लागण मोठ्या प्रमाणावर झालेली आढळून येते ती म्हणजे भ्रष्टाचार आणि घोटाळे. हे सारे प्रकार लेखक मुकपणे नाही पाहू शकत. त्यांचा राग अनावर होतो. त्या संतापाच्या भरात ते एक दोहा लिहितात त्या दोह्याला ते 'संतापदोहा' असेही संबोधतात. लेखक लिहितात,
'घोटाळ्यावर घोटाळे, पुन्हा त्यात की घोळ
कुणाकुणाच्या नावाने, सांग करु अंघोळ.'
साहित्यिकांवर एक आरोप कायम होत असतो की, साहित्यिक महत्त्वाच्या वेळी ठाम भूमिका घेत नाहीत. अलिप्तपणे, आपण त्या गावचेच नाहीत या दृष्टीने घडणाऱ्या प्रसंगाकडे बघत असतात. या लेखकीवृत्तीचा तांबोळी यांना कुठेतरी राग आहे म्हणून ज्यावेळी पुण्याच्या संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा उखडून मुठा नदीत टाकण्यात आला आणि तोही केंव्हा तर चक्क मराठी भाषा पंधरवडा चालू असताना! ही घटना लेखक तांबोळी यांच्या जिव्हारी लागते, साहित्यिकांनी आणि साहित्य संस्थांनी अशावेळी नुसती चर्चा, ठराव, परिसंवाद अशा गोष्टी न करता ठोस कृती करावी. मराठीविषयी उगीचच गहिवरून (रड) गाणे गाऊ नये. हे सांगताना तांबोळी एक जळजळीत वाक्य लिहितात, 'लोकशाही ठोकशाही सहन करत असेल तर मराठीतील प्रत्येक साहित्यिकाने 'साहित्यसंन्यास' घ्यावा. (की काय?)' जिथे लेखकाची उद्विग्नता येथे जाणवते तिथे लेखकाचा प्रश्न अंतर्मुख व्हायला भाग पडतो. का असा प्रश्न लेखकाला पडला असावा? खरेच ही परिस्थिती बदलता येणार नाही का? राजकीय व्यक्तींचा अर्थात सारे नसतील पण काही राजकीय कार्यकर्त्यांच्या भावनांचा एवढा उद्रेक का व्हावा की एखाद्या सन्माननीय व्यक्तीच्या पुतळ्याची विटंबना व्हावी, तोडफोड व्हावी आणि पुतळा काढून टाकला जावा एवढा प्रचंड क्षोभ का व्हावा? असाही प्रश्न साहजिकच पडतो.
लेखकाचा व्यासंग, अभ्यासू, जिज्ञासू वृत्तीचे दर्शन पुस्तक वाचताना अनेकदा होते. लेखकाने केवळ मराठी आणि संस्कृत भाषेतील साहित्याचा अभ्यास केलेला नाही तर महात्मा कबीर यांचे दोहे, आसामी भाषेतील म्हणी, उर्दू कविता (कसिदा, नात, नज्म, गजल), कन्नड आणि तेलुगू भाषेतील वचन, इंग्रजी साहित्य (व्हर्स, पोएम, लिरिक, साँग, सॉनेट, एपिक, फ्रिव्हर्स), रुबाई (अरबी) अशा साहित्याचाही भरपूर अभ्यास केलेला आहे यावरून लेखक तांबोळी यांची ज्ञानसंपादनाची भूक आणि त्यांची विद्वत्ता लक्षात येते. नितळ मनाने एखाद्या गोष्टीचा ध्यास घेणे, तिला जवळ करणे आणि उत्सुकतेपोटी त्या बाबीचा तळ गाठणे ही लेखकाची प्रामाणिक भूमिका समजून येते.
लेखकाचे घराणे हे संत घराणे! नित्यभजन, नामसप्ताह, पंचपदी, प्रवचनं यासोबतच हरदास, बुवा, महाराज यांचे आदरातिथ्य त्यामुळे घर सदा गजबजलेले आणि त्यामुळे लेखकावर तसे संस्कार होणे स्वाभाविकच पण बदलत्या काळात हे सारे दुरावले असल्याची, हरवल्याची आणि गमावले असल्याची बोचणी लेखकांस निश्चितपणे आहे. पात्रता असूनही लेखक 'संत' पद प्राप्त करु शकले नाहीत परंतु संतांनी समाजात वावरताना जे सोसलंय ते मी अनुभवले आहे असेही ते सांगतात. 'संत जेणे व्हावे, तेणे जग बोलणे सोसावे' असे खूप सारे मी सोसले असल्याचे सांगून तांबोळी संत तुकाराम महाराजांची एक ओळ प्रस्तुत करतात, 'तुका म्हणे तोचि संत, सोसी जगाचे आघात.' संतांइतके आघात सोसले नाहीत आणि म्हणून मी तिथपर्यंत पोहोचू शकलो नाही कारण मी शब्द, स्पर्श, रुप, रस, गंध यांची गोडी लागलेला माणूस आहे. खरेतर या एका ओळीतून लेखकाने फार मोठा संदेश दिला आहे. संत कसा असावा याचेही सुस्पष्ट वर्णन त्यांनी थोडक्यात पण ठामपणे केले आहे. ज्यांना विविध स्पर्शाचा हव्यास आहे, ज्यांना कुणीतरी स्वतःच्या रुपाने आकर्षित करते, ज्यांना विविध पदार्थांचा रस आणि गंध वेडावतो तो संतपदापर्यंत पोहोचू शकत नाही.
सद्यस्थितीत मराठी भाषेची झालेली दूरावस्था पाहून तांबोळी यांचे कवी मन कुठेतरी आतल्या आत दुखावले असल्याचे तांबोळी यांच्या लेखनातून जाणवते. शब्दांमध्ये असलेले निरागसपण हरवले असल्याचे नमूद करून ते म्हणतात, 'अपशब्दांचे प्रदूषण वाढल्यामुळे साहित्यसृष्टी दूषित होते आहे. अलीकडे शब्दांची साधना, तपश्चर्या, स्वाध्याय, अभ्यास यांना महत्त्व राहिले नाही. उठतो तो लिहितो. काहीही लिहून मानसन्मान, पद प्रतिष्ठा उपभोगतो आणि स्वतःला सर्वज्ञ मानू लागतो.' सद्यस्थितीच्या वर्मावर नेमकेपणाने बोट ठेवताना, झणझणीत अंजन घालताना लेखक खरेतर एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करतात. साहित्य क्षेत्रातील प्रत्येकाने ही बाब गांभीर्याने घ्यायला हवी. कवींना दर्जेदार काव्यनिर्मितीसाठी अनेकांनी ज्येष्ठत्वाचा आधार घेऊन चार गोष्टी सांगितल्या आहेत. संत रामदास स्वामी यांनी 'कविता गवताऐसी उदंड' यासोबतच 'नसता कवींचा व्यापार तर कैचा जगदुद्धार' असे म्हटले आहे. विंदा करंदीकर तर 'कवी थोडे कवडे फार' असे सांगतात. जुन्या काळातील विडंबनकार जयकृष्ण उपाध्ये हे म्हणतात,
'अरे आले कवी आले,
धावा किंवा पळा लपा,
नाही तरी घरी आपल्या,
'रामरक्षा' तरी जपा!'
हा सल्ला ऐकून कवी तांबोळी काहीसे अंतर्मुख होऊन विचार करतात की, कवी एवढा बाधक आहे? कविबाधा होणे ही आपत्ती आहे की संकट आहे? असे का घडले? असे का व्हावे?'
खुद्द आचार्य अत्रे यांनीही 'झेंडूची फुले' मधून कवींना चांगलेच सुनावले आहे. हे सारे पाहून, कवींची आजची निर्मिती पाहून लेखकाला भीती वाटते की, 'ट' ला 'ट' आणि 'री' ला 'री' जोडणाऱ्या या कवी जमातीची टिंगल तर होईलच पण जशी नोटबंदी झाली तशी एखादे वेळी कविताबंदी झाली तर? सध्याची परिस्थिती बदलावी, कवींना भविष्यात चांगले आदराचे स्थान प्राप्त व्हावे यासाठी काही काळासाठी काव्यबंदी व्हावी असेही लेखक सुचवतात. यामागे त्यांची भूमिका स्पष्ट आहे. सध्या जे वातावरण आहे ते बदलले पाहिजे असे त्यांना वाटते. कवी असणं आणि कवी म्हणून मिरवणं यातला फरक समजून घेणे आवश्यक आहे हेही ते सुचवतात. जिथे लेखकाला कवितेची काळजी आहे, कविंबद्दलची व्यथा आहे तिथेच आजची पत्रकारिता पाहून तांबोळी यांना बाळशास्त्री जांभेकर यांची आठवण येते. आज या क्षेत्रात स्वयंभू, स्वायत्त, स्वतंत्र बाणा असलेला पत्रकार दुर्मीळच असे सांगून लेखक आपली व्यथा मांडताना म्हणतात,
'आता पत्रकार म्हणजे मालकाची जणू बटीक...'!
नरसिंह हे लेखकाचे कुलदैवत! 'जय देवा नरहरी' या कथेत ते नरसिंह अवताराबद्दल विवेचन करताना त्याची सांगड थेट पोलिस खात्याच्या एका बोधवाक्याशी घालतात. 'सद् रक्षणाय, खलनिग्रहणाय!' हेच ते बोधवाक्य! सज्जनांचे रक्षण आणि दुष्टांचे निर्दालन हाच प्रण करून पोलीस खात्याची वाटचाल सुरू आहे. हे लक्षात घेऊन तांबोळी म्हणतात, नेमक्या याच कार्यासाठी नरसिंहाने अवतार घेतला होता.
ऋषीचे कूळ आणि नदीचे मूळ हा एक अत्यंत महत्त्वाचा असा वाचनीय आणि विचारप्रवर्तक लेख या संग्रहात समाविष्ट आहे. समाजातील जात व्यवस्था नष्ट व्हावी, जातीभेद संपुष्टात यावा असे सारेच बोलतात त्यांना लेखक तांबोळी एक प्रश्न विचारतात,'खरे तर शासकीय दप्तरातून 'जात' हा रकानाच नष्ट झाला पाहिजे. पण हे करणार कोण? शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र हा याचा ढळढळीत पुरावा. कशासाठी जात आवश्यक, याचे उत्तर कोण देणार? कायद्याने जोवर जात आवश्यक तोवर 'निर्मूलन' कसे होणार?' तांबोळी यांचा हा प्रश्न वाचताना वाचक निरुत्तर होतो, अंतर्मुख होतो.
'गंगाजळ ह्रदय करा' हा लेखही वाचनीय आहे. मुक्ताबाईंनी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यासाठी, त्यांना चार गोष्टी समजावून सांगताना 'ताटी उघडा ज्ञानेश्वरा' केलेल्या या अभंगाचे निरूपण तांबोळी यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण अशा विवेचनातून केलेले आहे. या लेखातच नाही तर संपूर्ण पुस्तकात लेखकाची भाषा अत्यंत रसाळ, अभ्यासपूर्ण निवेदनाची जोड असलेली, मुद्द्यांचे योग्य स्पष्टीकरण केलेली, सर्वांना समजेल अशी आहे. शिवाय संत-महात्मे, विविध कवी-साहित्यिक यांच्या रचनांचा स्वतःचा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी घेतलेला आधार हे त्यांच्या 'नितळ मनाने तळ' गाठण्याच्या आणि संशोधक- चिकित्सक वृत्तीचे द्योतक आहे. महत्त्वाचे म्हणजे 'माझे ते खरे याऐवजी खरे ते माझे' हेही त्यांच्या लेखनीतून जाणवते. लेखक मधूनच वास्तव विनोदाची फोडणीही देतात. लेखकाला एका मोठ्या व्यासपीठावर कविता सादर करण्याची प्रथमच संधी मिळते. त्याचे वर्णन करताना लेखक लिहितात,
'आम्ही कविमंडळी एकदाचे व्यासपीठावर स्थानापन्न झालो. वय आणि मानपरत्वे माझे स्थान अर्थातच मागे कुठेतरी एका बाजूस पार कोपऱ्यात होते. प्रकृती किरकोळ, उंची पाच फूट साडेतीन इंच असल्यामुळे यशवंत, काणेकर, बापट इत्यादी आघाडीवरील कविपुंगवांनी आम्ही दिसू नये म्हणून व आमच्यावर हल्ला झालाच तर इजा होऊ नये म्हणून आधीच भक्कम अशी संरक्षण भिंत उभी केली होती...'
लक्ष्मीकांत तांबोळी यांनी शालेय जीवनात स्वतः संपादक असलेल्या 'अरूण' हस्तलिखित मासिकात एक लेख लिहिला होता. त्या गावात एक 'क्षुधाशांति भवन' या नावाचे हॉटेल होते. त्या हॉटेलमध्ये लेखकाचे एक शिक्षक भजे खायला जात. नवलेखक असलेल्या तांबोळी यांनी या हॉटेलचा आणि भजी खाणाऱ्या शिक्षकाचा उल्लेख कथेत केला. आपण काही तरी वेगळं लिहिले आहे. आपले कौतुक होईल अशी नवनिर्मितीकाराची जी भावना असते तीच भावना तांबोळी यांचीही होती. पण झाले उलटे. शिक्षकाला तो स्वतःचा अपमान वाटला कारण ते शिक्षक ज्या समाजाचे प्रतिनिधीत्व करत होते त्या समाजात हॉटेलमध्ये खाणे वर्ज्य होते. त्यामुळे शिक्षकाचा राग अनावर झाला. कल्पना करा, त्या काळातील शिक्षक आणि संताप यामुळे लेखकाच्या पाठीची काय दशा झाली असेल? पण लेखकाचा सकारात्मक दृष्टिकोन बघा, लेखक म्हणतात, 'माझ्या लेखनाचे मला मिळालेले हे पहिले पारितोषिक!'
लेखक कालचा असेल, आजचा असेल किंवा उद्याचा असेल, नवोदित असेल किंवा ज्येष्ठ असेल प्रत्येकालाच आपले साहित्य कुणी वाचावे, त्यावर मत व्यक्त करावे अशी इच्छा असते. त्यात एखाद्या ज्येष्ठाने पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिली तर लेखकाला (विशेषतः नवोदित) आकाश ठेंगणे होते. असेच काहीसे लक्ष्मीकांत तांबोळी यांचे झाले. १९६८ साली तांबोळी यांचा 'तवंग' हा कथासंग्रह प्रकाशित झाला. गंगाधर गाडगीळ यांची या कथासंग्रहाला प्रस्तावना आहे. याबाबतीत तांबोळी लिहितात, 'ही प्रस्तावना म्हणजे 'विकतचं श्राद्ध' असा प्रकार झाला. ₹ १०० (शंभर) घेऊन गाडगीळांनी माझ्या कथा लेखनातील वैगुण्य दाखविली. खूप वाईट वाटलं पण मी निराश झालो नाही. याच कथासंग्रहातील 'सैनिकी रक्त' नावाची कथा १९७४ पासून आठव्या आणि पाचव्या इयत्तेसाठी महाराष्ट्रभर शिकवली जाते.'
इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, कदाचित गाडगीळांनी तांबोळी यांच्या कथांवर सह्रदयतेपोटीही टीका केली असेल. भलेही तांबोळी नवोदित असतील पण गाडगीळांना अभिप्रेत असलेले तांबोळी पूर्णपणे व्यक्त होऊ शकले नसतील. पुढे चालून तांबोळी अजून सशक्तपणे व्यक्त व्हावेत, त्यांनी स्वतःच्या गुणवत्तेला पूर्ण न्याय द्यावा या सद्हेतूनेही गाडगीळांनी वैगुण्य दाखवले असावे. असो ज्याचे त्याचे विचार असतात.
कविवर्य लक्ष्मीकांत तांबोळी यांना अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. विविध विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात त्यांचे साहित्य आहे. पण सर्वात मोठा पुरस्कार म्हणजे त्यांचे 'मराठवाडा गीत!' मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षी म्हणजे १७ सप्टेंबर १९९८ यादिवशी वृत्तपत्रांनी हे गीत ठळकपणे छापले. पं. नाथराव नेरलकर, पं. रमेश कानोले यांनी हे गीत संगीतबद्ध केले. त्याच्या दोन लाख कॅसेट्स निघाल्या आणि गौरवाची, अभिमानाची बाब म्हणजे हे गीत मराठवाड्यातील जिल्ह्याच्या ठिकाणी स्तंभावर कोरण्यात आले. धन्य ते लक्ष्मीकांत! धन्य त्यांची लेखणी !
पुस्तकाचे नाव :- तळ नितळ
लेखक :- लक्ष्मीकांत तांबोळी.
प्रकाशक :- दत्ता डांगे, इसाप प्रकाशन, नांदेड.(९८९००९९५४१)
परिचयकर्ता :- नागेश सू. शेवाळकर, पुणे. (९४२३१३९०७१)
Comentarios