top of page

सोलापूर नव्हे थुंकापूर


प्रत्येक गावाची, प्रत्येक शहराची वेगळी अशी ओळख असते.कोणे एकेकाळी अतिशय गलिच्छ असलेल्या सुरत शहराने आता एक अतिशय स्वच्छ शहर म्हणून नवी ओळख मिळवलेली आहे.नुकताच ईंदोर शहराने सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार तिसरयांदा पटकाविला आहे.पुर्वनियोजित शहर म्हणून चंदीगड किंवा नवी मुंबई आपणा सर्वांना परीचित आहेच.सोलापुरवर प्रेम करणारा सोलापूरचा नागरिक म्हणुन सोलापूरच्या बाबतीत असाच मी विचार करीत होतो आणि सोलापूरने आजपर्यंत आपली कुठली नवी ओळख निर्माण केलेली आहे असा विचार माझ्या मनात आला.उत्तर काही सापडेना.



असाच एकदा माझ्या कारचा ड्रायव्हर आला नाही आणि जवळच जायचं होतं म्हणून मी दुचाकीने निघालेलो होतो.तेव्हा जे काही चित्र विचित्र अनुभव आले तेव्हा मात्र सोलापूरच्या नव्या ओळखीची माहिती झाली. नव्हे, खात्री झाली.बऱ्याच दिवसांनी दुचाकीवरून निघाल्याने मला ट्राफिकचा आणी आजुबाजुने दुचाकीवरुन पुढे जात असलेल्या व्यक्तींचा अजिबात अंदाज नव्हता. मी आपला शांतपणे रस्त्याच्या डाव्या बाजूने दुचाकी चालवित निघालो होतो. माझ्या उजव्या बाजूने एक दुचाकी पुढे गेली आणि त्या दुचाकीच्या मागच्या सीटवर बसलेले सद्गृहस्थ अचानक डावीकडे काटकोनात वाकडे झाले. मला काही कळायच्या आत पटकन त्यांनी मोठ्या प्रमाणात तोंडातल्या लाल द्रव्याचा स्प्रे रस्त्यावर मारला. साधारणपणे दोनशे ते तीनशे एमएल इतका तो मोठा असावा. माझे नशीब थोर की मी त्या सदग्रुहस्थांपासून काही अंतरावर मागे होतो. अन्यथा माझ्या पांढऱ्या शर्टवर लाल रंगांचे स्प्रे पेंटिंग झालेच असते. मी थोडक्यात बालंबाल बचावलेा. आता मी सावध झालो होतो. पुढच्या दुचाकीच्या मागे काही अंतर ठेवून माझी दुचाकी मी चालवत राहिलो. काही वेळाने उजव्या बाजूला रोड डिव्हायडर आला म्हणून मी माझा वेग कमी केला. सुदैव माझे की मी माझा वेग कमी केला. कारण आता पुढच्या दुचाकीवरच्या पुढे बसुन दुचाकी चालविणारया सद्गृहस्थाने शांतपणे उजव्या बाजूच्या डिव्हायडरवर ओणवे होऊन आपल्या मुखातील पेलाभर द्रव्य रिते केले, जणु रोड डिव्हायडर म्हणजे महानगरपालिकेने खास अशा व्यक्तींची सोय व्हावी म्हणुन बांधलेले एखादे मोठे थुंकीपात्रच असावे. पुन्हा जणु काही घडलेच नाही या अर्विभावात ते सुसाट्याने पुढे निघालेही. या घटनेनंतर मला एक छंद जडला. सोलापुरातल्या अशा विविध पध्दतीने विविध ठिकाणी थुंकणारया व्यक्ती आणि वल्लींचा अभ्यास करण्याचा. मी कारमधे असु दे वा बाईकवर , मी माझा अभ्यास सुरु ठेवला. काही दिवसातच अनेक नमुने पहायला मिळाले. त्यातलेच काही नमुने आपणापुढे पेश करावेत हया ईच्छेने हा लेखनप्रपंच.



गल्लीतले पुढारी शोभावेत असा पेहेराव केलेले दोन तरूण. कर्कश्श आवाज करणारी बाईक. गर्दीच्या ठिकाणी नको ईतका स्पीड. कपाळावर मोठा टिळा. कानाला हेडफोन्स. अचानकपणे स्पीड कमी करुन पुढचे पुढारी पचकन थुंकले. रस्त्याच्या डावीकडे. मागची व्यक्ती,ती ही सोलापुरचीच. पण या प्रकाराला अनभिज्ञ असावी. दचकली आणि मोठयाने पुढच्या व्यक्तीवर खेकसली .”का बे, दिसत नाही का? ”. झालं. दोन्ही पुढारयांचा पारा लगेच चढला.कटकन साईड स्टॅंड लावत गाडी रस्त्यावर उभी करुन दोघांनी त्या पादचारयावर हल्ला बोल केला. ”का? काय झालं बे?” ”डावीकडं थुंकलो की. रस्ता काय तुझ्या बापाचा आहे काय?” रस्त्याच्या डावीकडुन चालावे हा नियम सर्वांनाच माहिती असलेला पण डावीकडे थुंकणेपण कायदेशिर आहे हे ज्ञान मात्र आजच मला प्राप्त झाले. पुढचा डायलॅाग होता ”का? अंगावर ऊडलं का? ” म्हणजे अंगावर उडलं तरच गुन्ह‍ा अन्यथा नाही. पण मस्ती एव्हढयावर थाबली तर सोलापूरकर कसले? “बोल, लॅांड्रीचे पैसे देऊ का?” अखेर प्रकरण नेहेमीप्रमाणे मुद्दयावरुन गुद्दयावर आले. तेही सोलापुरी स्टाईलने मागच्या अनेक पिढयातल्या आया बहिणींचा उध्दार करीत. रस्त्यावरच्या बघ्यांच्या डोळयाचं पारणं फिटेपर्यंत मग हाणामारी झाली. हौस फिटेपर्यत एकमेकांना बुकलुन काढल्यानंतर “पुन्ह‍ा भेट साल्या, तुला बघुन घेतो“ अशा आणाभाका घेत मंडळी मार्गस्थ झाली. माझ्या माहितीतल्या एका मुलाला दुचाकीवरुन ट्रीपलसीट जाणारया मुलांनी याच कारणावरुन मारहाण केली आणि त्याला अॅडमीट करुन उपचार करावे लागले. पोलीस तक्रार केल्यानंतर पोलिसच या मुलाला समजावुन सांगत होते की रोडवर थुंकलं म्हणुन कुणी का भांडायला जातं का?सर्वसामान्य व्यक्तींना रोडवर थुंकणे हा गुन्हा आहे हेच पटत नाही, या उलट तो त्याना त्यांचा हक्कच वाटतो.मत देण्याचा अधिकार एकवेऴ लोक बजावणार नाहीत पण हा हक्क मात्र आवर्जुन बजावतील अशी परिस्थिती सोलापुरात तरी आहे.



या थुंकापूरातली काही मंडळी थोडी मवाळ असतात. बाईकवर बसल्याबसल्या डावीकडे उजवीकडे पिचिक्पिचि क्थो डे थोडे थुंकत रहातात. मागच्या बाईकवरच्या व्यक्तीला अंदाजच येत नाही हा गडी उजवीकडे थुंकणार आहे की डावीकडे. त्याला अनुसरुन कुठली पोज घ्यावी, डावी का उजवी? हाच प्रश्न पडतो. थोडा वेळ अंदाज घेऊन एक साईड पकडली की मग बरोबर हे महाशय तुमचा अंदाज चुकवितात. या पेक्शाही मवाळ मंडळी तोंडातला तोबरा एकदा जाहिरपणे रिता केला की मग हळुच तोंडातले छोटे सुपारीचे वा पानाचे तुकडे ओठांच्या कोपरयातुन हळुच कळत न कळत रस्त्याच्या दोन्ही बाजुला, डाव्या किंवा उजव्या बाजुला, पेरत रहातात. काही जण बोटांची चिमट करुन त्याच्या मदतीने मुखमार्ग रिता करण्याचा प्रयत्न करतात. बरयाचदा हे प्रकरण आजुबाजु्च्या लोकांना घरी गेल्यावरच कळते, ते अंगावरच्या कपडयावर पडलेले डाग पाहुनच. सुशिक्शित मंडळी, टी शर्ट, जिनवर फिरणारी तरुण मुले आणि स्त्रियाही या घाणेरडया सवयीला अपवाद नाहीत. नवरयाच्या मागे टूव्हीलरवर बसुन चुळ भरल्यासारखे थुंकणारया स्त्रियाही मी अनेक वेळा पाहिल्या आहेत. तेंव्हा समोरच्या दुचाकीवर स्त्री आहे म्हणुन गाफिल रहाण्याची घोडचुक कृपया करु नकात.



मी एका मोठ्या हॅास्पिटलच्या पटांगणात थुंकीचा सडा मारणारे रुग्णाचे नातेवाईक नेहेमीच पहातो. आणि हेच नातेवाईक पुन्हा रुग्णालय स्वच्छ नसल्याचीही बोंब मारतात. आपल्याही रुग्णाला त्यातुन जंतुसंसर्ग होऊ शकतो हे समजुन उमजुनही त्याच चुका हे पुन्हपुन्हा का करीत असतात हे कोडच सुटत नाही. रस्त्यावरुन चालणारे महाभाग, कधी कधी रस्त्याबरुन चालणारे पादचारीही “हम भी कुछ कम नही ” या अट्टाहासाने परिसर घाण करण्यात व्यस्त असतात. मधोमध उभे राहुन अचानक नाक शिंकरतात. चोंदलेले नाक मोकळे करण्याची याहुन चांगली जागा त्यांना बहुधा सापडत नसावी. आजुबाजुच्या लोकांना प्रचंड किळस येत असते या प्रकाराची पण हया बाजीरावांना मात्र त्याचीफिकिरही नसते. नाक शिंकरताना त्यांची ब्रम्हानंदी टाळी लागलेली असते.

मला आठवतं, माझ्या एका डॅाक्टर मित्राने सोलापूरकरांच्या या सवयीवर मात करण्याचा प्रयत्न केला. स्वत:च्या हॉस्पिटलच्या रिसेप्शनमध्ये त्याने एक बोर्ड लावला “थुंकण्यास मनाई, थुंकताना आढळल्यास रु शंभर दंड”. पण शेराला सव्वाशेर भेटतोच. एक अतिशहाणा रुग्ण गुटखा चघळत काऊंटरवर आला. काऊंटरवरच्या रिसेप्शनिस्टने इमानदारीने बोर्डकडे बोट दाखवले. झाले, साहेबांचा पारा चढला. साहेब झपझप चालत बोर्डाकडे गेले आणि बोर्डवरच पचकन थुंकले. पुन्हा काऊंटरवर येऊन रुबाबत शंभर रुपयांची नोट रिसेप्शनिस्टकडे फेकली आणि छद्मी हसत म्हणाले “पावती फाडा.” आता कायं म्हणावे या निर्ल्लज्जपणाला?



बॅंका, सार्वजनिक ठिकाणे, सरकारी कार्यालयातले जिने म्हणजे या महाभागांसाठी थुंकण्याचे हक्काचे ठिकाण. सगळे कोपरे लालबुंद करण्याचे कॅांट्रॅक्ट जणु काही यांनाच मिळाले असावे. याच कलाकारांना कंटाळुन सरकारने कार्यालयाच्या भिंती घाणेरडया लालतांबडया रंगाने रंगवायला सुरुवात केली. अशाच एका पब्लिक बिल्डिंगमधे माझ्या एका मित्राने स्वत:चे नवे हॅास्पिटल सुरु केले. ऊत्साहाने जिनेही रंगवुन घेतले. काही दिवसातच वरच्या ऑफिसमधे जाणारया अनेक गुटखाबहाददरांनी जिन्याचे कोपरे फुकटात रंगवुन दिले. डॅाक्टर नाराज झाले.खुपच विचार करुन त्यांनी एक नामी उपाय शोधला. प्रत्येक कोपरयात मग त्यांनी काही धार्मिक / पवित्र चिन्हे असलेल्या टाईल्स वापरल्या. काही दिवस बरे गेले.पण एके दिवशी चक्क हॅास्पिटलवर मोर्चा आला. त्यात बरेच मवाली सामिल होते. आमच्या धार्मिक भावना दुखावल्या म्हणुन चक्क मोर्चा घेऊन आली होती मंडळी. डॅाक्टरांना मात्र पळता भुई थोडी झाली.टाईल्स काढुन घेऊन कशीबशी सुटका झाली त्यांची.

एस.टी.च्या बाजुने जातानाही मी बरयाचदा जीव मुठीत धरुन जात असतो. उच्चासनावर बसल्याचा फायदा कोणी कधी कसा घेइल ते सांगता येत नाही. कधी लाल फवारयाचा अभिषेक होईल, कधी मस्त खिडकीतुन कधी कोणी एस.टी.लागणारी ललना आपले दुपारचे जेवण तुमच्या मस्तकावर मोकळे करुन मस्तकाभिषेक करेल ते सांगता येत नाही. एका एस.टी.बसच्या खिडकीतुन तर चक्क एका आईने मुलाचे प्रार्तविधी उरकतानाही मी स्वत: पाहिले आहे. धन्य ती मा ता आणि गरीब बिचारे पादचारी.



"थुंकणेहामाझाजन्मसिध्दहक्कआहेआणितोमीबजावणारच"याअवि्र्भावातवावरणारयासोलापूरकरानासिंगापूरातजसा१०००डॅालर्सचाप्रचंडफाइनआहेतसातोसोलापूरातलावलापाहिजे.किंवाचक्कफटकेदयायलाहवेत. त्याशिवायथुंकलेलीजागास्वत: त्वरितस्वच्छकरण्याचीशिक्षाहीदिलीपाहिजेतरचहीसोकॅाल्डस्मार्टसिटीस्वच्छवसुंदरहोईल.आणिसोलापूरचीथुंकापूरहीप्रतिमापुसलीजाईल.



डॉ.सचिन जम्मा

लॅपरोस्कोपिक व जनरल सर्जन

जम्मा हॉस्पिटल व लॅपरोस्कोपिक सर्जरी सेंटर कुंभार वेस, भवानी पेठ,

सोलापूर - ४१३००२

फोन: ०२१७ २७३२४७५

भ्रमणध्वनी : ९८५०८४७१७५ E MAIL ID : drsachinjamma@gmail.com



विश्व मराठी परिषदेचे टेलीग्राम चॅनेल सबस्क्राईब करा

30 views1 comment

1 comentario


SHIVAJI KSHIRSAGAR
SHIVAJI KSHIRSAGAR
14 sept 2022

RESPECTED SIR AND MADAM

PINCHING OF SOLAPUR AND PINCHING OF INDIA ARE SAME.


Me gusta
टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page