top of page

बालपणीची शाळा



लहानपण दे गा देवा | मुंगी साखरेचा रवा ||

ऐरावत रत्न थोर | त्यासी अंकुशाचा मार ||


संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील या ओळी आठवताच बालपण डोळ्यासमोर उभे राहते. अत्यंत निरागस, हासरं, खोडकर, निस्वार्थी,दगड, माती, झाड यांच्या सोबत रमणारं. सकाळच्या सूर्याच्या प्रकाशाने उठणारं व दिवसभर सैरावैरा धावून संध्याकाळच्या मावळत्या सूर्याबरोबर शांत होऊन आईच्या कुशीत झोपणारं. आईच्या प्रेमाने, वात्सल्याने दिवसागणिक फुलणारं बालपण कधीच संपू नये असं वाटायचं. हळूहळू काळाबरोबर शरीर बदललं आणि वयही वाढत गेल. वयाची सहा वर्षे पूर्ण झाल्याचा अंदाज आईने बांधला. माझा बाळ शाळेत जाण्या योग्य झाला. असा निश्चय तिने करून टाकला. वडिलांच्या मागे तगादा लावला. याला गुरुजीकडे घेऊन जा व शाळेत नाव दाखल करा. शाळा म्हणजे काय? हे कधी माहीतच नव्हतं. कारण वयाच्या सहा वर्षापर्यंतच आयुष्य चार भिंतीच्या बाहेरच्या मोकळ्या जगात मुक्तपणे संचार करणार होतं.


एके दिवशी वडील सकाळीच आईला म्हणाले, याला स्वच्छ आंघोळ घालून चांगले कपडे घालून दे. याला शाळेत घेऊन जातो. याचे नाव शाळेत टाकूनच येतो. मी म्हणालो बाबा मी नाही शाळेत जाणार. मी आईसोबत शेतात जाणार आहे. बाबा म्हणाले तू शाळेत गेला तर, तुला नवीन पाटी व लेखणी घेऊन देईल. नवीन पाटी अरे वा...! मी उड्या मारतच उठलो. आईने अंघोळ करून तयारी करून दिली. वडिलांचे बोट धरून शाळेत पोहोचलो. धोतर, टोपी घातलेले गुरुजी शाळेत होते. वडिलांनी त्यांच्याकडे बोट करुन लांबूनच दाखवले.ते बघ गुरुजी...! तुला रोज शाळेत लिहायला, वाचायला शिकवतील. गुरुजी म्हणजे शाळेचे मुख्य असतात. सगळे गुरुजीला घाबरतात. या गोष्टीची जाणीव त्यावेळेस नव्हती. वडिलांबरोबर गुरुजीच्या कार्यालयात शिरलो. वडिलांनी गुरुजीला सांगितलं गुरुजी याचे नाव शाळेत टाकायचे आहे. किती वर्षाचा मुलगा झाला गुरुजी ने विचारले. सहा वर्ष पूर्ण झाले असेल याला. जन्मतारीख नाही आठवत. गुरुजी म्हणाले कानाला हात लाऊन दाखव पुरतो का? ते बघुदे. मी माझा उजवा हात डोक्यावरून घेतला व जोऱ्यात ओढून कसाबसा डाव्या कानाला लावला. गुरुजीने ते बघितले ठीक आहे म्हणून शाळेत नाव दाखल करून घेतले. त्या दिवसापासून शाळेला सुरुवात झाली. अनेक मुलांशी ओळख झाली. दैनंदिन जीवनच बदलून गेले.


सकाळी एकदा शाळेत गेलो की सायंकाळी परत घरी यायला मिळायचे. दिवसभर शाळेतच राहावे लागायचे. अ आ इ म्हणत शिक्षणाला सुरुवात झाली. उजळणी, गाणी, गोष्टी यात मन रमून गेले. हळूहळू शाळा, गुरुजी याविषयी स्नेह वाढत गेला. आजही आठवते ती पाटीवरची मक्याची सुगडी व थंडीच्या दिवसात सकाळी मिळणारे गरम गरम दूध. त्या दुधात टाकण्यासाठी घरून चुपचाप साखर न्यायची मज्जा काही वेगळीच होती. कारण गोड खाऊ नये म्हणून आई नेहमी ओरडायची. शाळेत असतांना अनेक खोडकर गोष्टी केल्या पण त्यामागे वाईट हेतू कधीच नव्हता. 1993 ला किल्लारीचा भूकंप झाला होता. त्यावेळी प्रथमच भुकंप म्हणजे काय? ते कळाले. त्यात अनेक लोक मरण पावले. त्यांना मदत द्यायला आपण गावातून प्रभातफेरी काढुया असे गुरुजींनी सांगितले. त्यावेळी मी कागदी बॉक्समध्ये पैसे मागत मागत गावभर फिरलो होतो. आजही आठवतो आयुष्यातील सर्वात समजुतदारपणाचा तो दिवस. माझ्या शाळेच्या जवळच नदी वाहत असे.


एके दिवशी सकाळी खूप पाऊस पडला. व नदीला खूप पूर आला. दुपारच्या सुट्टीत मुले एकमेकांना म्हणू लागली नदीला खूप पूर आला आहे. मी काही मित्रांनसोबत नदीच्या काठावर जाऊन पूर पाहत बसलो. खूप वेळाने एक मुलगा आला आणि म्हणाला तुम्हाला गुरुजींनी लवकर बोलावले. ते शब्द ऐकताच एकदम ध्यानावर येऊन शाळेकडे पळत सुटलो. शाळेत येताच सरांनी फटके दिले. आज ते फटकेआठवले की हसायला येते. इयत्ता चौथीची वार्षिक परीक्षा जवळ आली होती. मी आईकडे परीक्षेसाठी पॅड घेऊन देना म्हणून तगादा लावला होता. घरची परिस्थिती बेताचीच. त्यात आम्ही चौघे भावडं होतो. त्यामुळे पॅड घेऊन देणे शक्य नव्हते. जोपर्यंत पॅड घेऊन देणार नाही. तोपर्यंत शाळेत जाणार नाही. अशी प्रतिज्ञा मी करून टाकली. त्यादिवशी आईच्या मागे शेतात फिरत राहिलो. शाळेत गेलोच नाही. दुसऱ्या दिवशी मात्र पॅड तर मिळालाच नाही. पण आईने बेदम मारले व शाळेत नेऊन घातले. त्यादिवशी वडिलांनी दुकानातून एक रुपयाचा चिमटा विकत आणला. दुकानदाराकडून कागदी पुठ्ठा मागून घेतला. त्याला व्यवस्थित पॅडच्या मापाचे कापून त्याला चिमटा लावला. तो पॅड मला दिला. त्यावर मी चौथीची परीक्षा दिली.


पुढे आयुष्यात अनेक पॅड मिळाले व अनेक परीक्षा दिल्या. पण त्या पॅडची आठवण आजही मनात तशीच घर करून आहे. शेवटी काही दिवसांनी निकाल लागला. मी पास झालो. गावातील माध्यमिक शाळेत पाचवीत प्रवेश घेतला. बालपणीची शाळा सोडावी लागली. या शाळेने लिहायला, वाचायला शिकविले. याच शाळेने आदर, प्रामाणिकपणा शिकविला. याच शाळेने मेहनत, कष्ट करण्याची जिद्द मनावर कोरली. जीवनात उंच भरारी घेण्याचे बळ पंखात या शाळेने भरले. पुढे आयुष्यात जी काही उंच भरारी घेतली. त्या भरारी मागे प्रेरणा बनून होती ती बालपणीची शाळा. आयुष्यात जेव्हा केव्हा शिक्षण व परिस्थिती ची आठवण येते. तेव्हा मला आठवत राहते ती माझ्या बालपणीची शाळा.



राजेंद्र प्रल्हाद शेळके

मु पो किनगाव राजा ता सिंदखेड राजा

जि बुलढाणा

9823425852



ही ब्लॉग पोस्ट कशी वाटली ? लाईक करा, कमेंट करा आणि व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर शेअर करा.


352 views0 comments

Σχόλια


टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page