top of page

दीपस्तंभ



प्रकाश उर्फ रामदास गोरे माझा शाळेतला मित्र. १३ फेब्रुवारी त्याचा वाढदिवस. त्याला शुभेच्छा देण्यासाठी मी फोन केला.म्हणालो “पक्या,तुझ्या आयुष्यावर मला एक कथा लिहायची आहे.”तो हसला आणि म्हणाला “लिहीना! डेड बॅाडी, लिव्हिंग इन स्टाईल! ”पक्याची पण कमाल आहे. गेली ३२ वर्षे हा गडी पॅालीमायोसायटीस या स्नायूंच्या आजाराने त्रस्त आहे.या आजारात स्नायूंना सूज येते आणि त्यानंतर स्नायूंमधली ताकद कमी होते आणि त्यामुळे एरव्ही सहज वाटणाऱ्या हालचालींवर सुद्धा कमालीची मर्यादा येते, जवळजवळ प्रत्येक दैनंदिन गोष्टीत मदतीची गरज भासते. उदा.ताटातला घास उचलता येत नाही, पेला उचलुन पाणी पिता येत नाही.अशी व्यक्ती डोळ्यासमोर आणा आणि विचार करा.अगदी एखादी केविलवाणी आजारी व्यक्ती तुमच्या डोळ्यासमोर येईल.पण पक्या याच्या अगदी विरुद्ध आहे.कधीही फोन करा, पक्या फोन घेईल. हसेल, मस्त गप्पा मारेल, हजरजबाबी उत्तरे देईल, आपलीच मापे काढेल वर कोट्या ही करेल आणि वर परत मला असं म्हणायचंच नव्हतं असं म्हणेल. त्याला पुण्यातल्या त्याच्या घरी भेटायला गेल्यानंतर हालचालींची गरज पडेपर्यंत पक्या आजारी आहे याचा नवीन माणसाला पत्ताही लागत नाही.



शाळेमध्ये प्रकाश खरे तर अतिशय हुशार विद्यार्थी होता. (हा आजतागायत दूर न झालेला गैरसमज असे या विषयीचे त्याचे मत) सगळ्या तुकड्यांमधून पहिला किंवा दुसरा नंबर याचाच असायचा.तो एक उत्कृष्ट चित्रकार, वक्ता, गिटारवादक आणि निष्णात खोखो-पटू होता. नववीत असताना शंकर्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स कॉम्पिटिशनमध्ये त्याला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे हस्ते बक्षीसही मिळाले होते. बारावीनंतर पुण्यातल्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमधून तो डिप्लोमा इंजिनिअर झाला आणि पुण्यातच कल्याणी शार्पमधे नोकरीसही लागला.पण डिग्री मिळवून इंजिनिअर होण्याची इच्छा स्वस्थ बसू देईना, नोकरी चालू ठेवून कुसरो वाडिया कॉलेजमध्ये पार्ट टाइम बी.ई. करायला सुरुवातही केली.पण नियतीने काही वेगळेच ताट वाढून ठेवलेले होते.कॉलेजला जात असताना एकदा उतारावर दुचाकी अचानक थांबविण्याचा प्रसंग आला आणि प्रकाशला ते जमले नाही.खूप जोर लावून त्याने ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला आणि कशीबशी दुचाकी थांबली.ब्रेक दाबण्यासाठी आपल्या पायाची ताकद कमी पडते आहे हे चाणाक्ष प्रकाशला पटकन लक्षात आले.


डॅा. राजेंद्र काळे, जे सध्या कॅनडात असतात, त्यांनी प्रकाशला तपासून काही तपासण्या करून पॅालीमायोसायटीसचे निदान केले. काही दिवसांतच प्रकाशला भरभर चालता येईनासे झाले आणि त्याला त्याची नोकरीही सोडावी लागली.साधारणपणे दीड वर्षे त्यानंतर प्रकाश उपचार घेत होता. स्टिरॉइड्सचा भरपूर खुराक घेतल्यानंतर त्याच्या तब्येतीत सुधारणा झाली. या अशा परिस्थितीतही त्याने त्याचे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमधील बीईचे शिक्षण पूर्ण केले. डॉ च्या सल्ल्यानुसार प्रत्यक्ष औद्योगिक क्षेत्रातले काम सोडून त्याने १९९२ साली इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि डिग्रीचे क्लासेस सुरु केले. काही महिन्यांतच त्याने यांत चांगलाच जम बसविला. २०१० साली प्रकाशाच्या इंजिनीअरिंग कॉलेजमधल्या मित्रांच्या रौप्य महोत्सवी स्नेहमेळाव्याने त्याचे आयुष्यच बदलून टाकले. तिथे भेटला प्रकाशला कॉलेजचा जुना मित्र, मार्क्स टेक्नो सिस्टम्स या कंपनीचा मालक, धीरेन गुप्ते. त्याने बरोबर प्रकाशच्या कुशाग्र बुद्धिमत्तेला वाव देऊन त्याच्या कंपनीसाठी लागणाऱ्या संगणकप्रणाली विकसित करण्याची संधी दिली. आज प्रकाश स्वतःच्या घरातूनच,बेडवरुन,व्हर्च्युअल की बोर्डचा वापर करून, माऊसने टायपिंग करून, मार्क्स कंपनीद्वारा वाहन आणि इतर क्षेत्रातल्या मोठ्या कंपन्यांसाठी सॉफ्टवेअर विकसित करतो आहे. मित्राने दिलेल्या संधीच्या आधारावर आज तो शारीरिक दृष्टया नव्हे परंतु आर्थिक दृष्ट्या स्वतःच्या पायावर उभा आहे. हळूहळू ढासळत जाणाऱ्या प्रकाशच्या तब्येतीची काळजी घेणारा जिवलग मित्र डॅा. अतुल मुळे गेली तीस वर्षे त्याच्या पाठीशी उभा आहे. सामाजिक ऋणांचे आणि कर्तव्याचे भान ठेऊन या परिस्थीतीतही माझा हा मित्र काही सेवाभावी संस्थांना आर्थिक मदत करतो आहे.



या सर्व वाटचालीमध्ये आई वडिलांच्या खंबीर पाठिंब्याबरोबरच वेळोवेळी मदत करणारे मित्र, नातेवाईक विशेषतःराधेशाम चरडे आणि दैनंदिन मदतनीस बाळासाहेब बोर्डे यांच्या योगदानाविषयी कृतज्ञता त्याच्या बोलण्यातून नेहमी डोकावते.परीक्षेतले अपयश किंवा प्रेमभंग अशा क्षुल्लक कारणानी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱया तरुणांना प्रकाशचे आयुष्य हे दीपस्तंभ ठरू शकेल.”ब्राव्हो माय फ्रेंड ! वेल डन!”



डॉ.सचिन जम्मा लॅपरोस्कोपिक व जनरल सर्जन जम्मा हॉस्पिटल व लॅपरोस्कोपिक सर्जरी सेंटर कुंभार वेस, भवानी पेठ, सोलापूर - ४१३००२ फोन: ०२१७ २७३२४७५ भ्रमणध्वनी : ९८५०८४७१७५ E MAIL ID : drsachinjamma@gmail.com ब्लॉगवर नवीन आहात ? नवीन ब्लॉगपोस्टच्या सुचना ईमेलवर येण्यासाठी सबस्क्राईब करा

405 views0 comments

Comments


टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page