top of page

समुद्र घोडा

(शुभांगी पासेबंद)


या समुद्र किनारी, राहणे, जगणे मला, जमले अथवा जमले नाही, मी आज पंचवीस वर्षांची झाले. हा किनारा ते तो किनारा चा दोन किनार्‍यांमध्ये पोहणे मला छानसे कधी जमले तर, कधी जमलेच नाही. पण आज मी जो अनुभव सांगणार आहे, तो ज्ञात अज्ञाताच्या उंबरठ्यावरचा आहे. आज या जंगलात माझा वाढदिवस साजरा करायला कुणीच नाही. मी येथे साधारण दहा वर्षांपूर्वी आले. समुद्र किनार्‍याचा इंचन् इंच मी ओळखते. टोटेना गार्डनमध्ये मी या पुतळ्या मागच्या, डोंगरावरील एका गुहेत राहते. पुढे एक तलाव आहे तेथील एका झाडावर सुगरण पक्ष्यांची अनेक घरटी असलेली झाडे होती, आहेत. एका काळ्या कुळ्या, दगडाचा एका चौथऱ्यावर बसवलेला, निग्रो राजाचा पुतळा होता. या ठिकाणी, पक्षी निरीक्षणासाठी, सहलीला यायचो. तंबु ठोकून राहायचो. त्या झाडाला आम्ही मैत्रिणी, पूर्वी पिशव्या टांगायचो. फिरायला जावून परत, यायचो तेव्हा सुगरण पक्ष्यांच्या किलबिलाटाने गजबजलेल्या त्या झाडाला घरट्याचे झाड असे म्हणायचो. त्यापुढे दोन अंतर समुद्र होता. (पश्‍चिमेला) समुद्र किनारी, या टेकडीवर गोड्या पाण्याचा तलाव होता. ‘हो गोंधळू नका!’ नीट सांगते. येथून पन्नास किमी. वरील शहरातील चहा कंपनीच्या कर्मचारी वसाहती मध्ये मी आई वडिल भावासोबत राहायचे. एका इंग्रजी माध्यमांच्या भारी शाळेत जायचे. सर्व काही तसे ठीकच होते. आई, माझ्या भावाचे अधिक लाड करीत असे. माझा राग-राग करीत असे. पण बाकी सर्व ठीकच होते. ही चहाची वसाहत अंधश्रद्धांनी भरली होती. टोटेन गार्डन भुताटकीची मानली गेली होती. मी टीनएजर झाले. आमचा शाळेतील,स्वप्नाळु सरऴ मैत्रिणीचा एक मोठा ग्रुप होता. कधी कधी तर आम्ही शाळा बुडवून सहलीला, सिनेमाला जात असू. रेलवेगाडीत चढून मन मानेल तिथे जात असू. निर्भया, दिशा घटना तेव्हा देखील घडत, पण बेधडक होतो. किशोर वय होते. खोटे बोलून एके दिवशी, आम्ही, नेहमी, सहलीला यायचो, तसेच टोटेन गार्डन मध्ये आलो. इथे सहलीला आल्यावर दिवसभर मजा केली. संध्याकाळी शाळा सुटायची वेळ होताच सर्वजण ,रस्त्याचे दिशेने पळत सुटले. मी निग्रोच्या पुतळ्यापर्यंत गेले. पण मला पुढे काट्यांमधून पळता येईना. मैत्रिणी भराभर पळत होत्या. पळत दूरवरून जाणारी रेल्वे गाडी, पॅसेंजर त्यांनी पकडली असावी.


इथे अंधारात, आता माझे कसे होणार? झपाटलेल्या या टोटेन बागेत आम्ही का आलो? इथून मी घरी कधी जाणार? घरच्यांना तर या सहलीचे माहीत नव्हते. गळा काढून मी जोरात रडायला सुरुवात केली. रडून मी त्या निग्रोच्या टोटेमच्या पुतळ्याच्या जवळच्या, गोल दगडी पायर्‍यांवर झोपी गेले, सकाळी झोपेतून उठल्यावर मला वाटले, माझ्या घरचे, निदान आई, बाबा मला शोधायला येतील. कारण मित्र त्यांना, मी मागे राह्यल्याचे सांगतील .वाट बघितली, वडिल कारने मला घरी नेतील. पण 3/4 दिवस उलटून गेले. तरीही कुणीही इथे टोटेन गार्डनमध्ये येवून मला नेण्याचे लक्षण दिसेना. मी जवळपासची फळे खावून, कसेबसे राहत होते. शाळा बुडत होती. कशीतरी दिवस काढत होते. घरी, मित्र कंपुत, मी नकोशी होते का? या मैत्रिणी तरी लबाड बघा, येईनात. काय हे!


समुद्रावरची खारी हवा . भुताटकीने भरलेले टोटेन गार्डन, भिती, डास, ताण मी चार दिवसांनी, खूप आजारी पडले. शब्द तोंडातून येईना. ग्लानी येई , पळून चपलेतून माझ्या पायात काटे बोचल्याने, मी पुतळ्याच्या जवळपास वावरत होते. 8-10 दिवसांनी एके दिवशी पुन्हा माझ्या मैत्रिणींचा कंपू गाडीने इथे आला. त्यांनी मला हाका मारल्या , मला बरेच शोधले, पण निग्रोच्या पुतळ्यामागे मी आहे हे त्यांना काही केल्या कळलेच नाही. संध्याकाळ पर्यंत जवळ पास शोध घेवून, "कुठे हरवली ही अशी ?"म्हणत भिरभिरल्या. मी सापडत नाही बघून मित्र मैत्रिणींचा कंपु, आतून किंचित नाराज, पण खिदळत, ‘भूताने खाल्ले मला’ म्हणून शोधायचे थांबवून घरी निघाला. मी पाय दुखत असूनही पावले रक्ताळलेली, असूनही जीवापाड पळून, त्यांना गाठायचे ठरवले. या समुद्रकिनारी, जंगलात, पुन्हा शहरात, घरी, कुटुंबाजवळ जाण्याचा हा शेवटचा मार्ग, शेवटचा दुवा होता. मनुष्यवस्तीत जायची संधी होती. पण निग्रोच्या पुतळ्याने हात वर, करून मला घट्ट धरून ठेवले. मी ओरडून मैत्रिणींना हाका मारल्या पण त्या कुण्याच्याच कानी पडल्या नाहीत. निग्रोचा पुतळा जोरात हसला. मी पुन्हा ग्लानीत गेले, पार घाबरून जोरात विव्हळू लागले. आवाज विचित्र काढून रडू लागलो, पक्षी ओरडू लागले. हा आवाजाचा कल्ला ऐकून, घाबरून माझ्या एका मैत्रिणीने वळून मागे बघितले पण कुणीच दिसेना. निग्रोचा दूरवरचा पितळा पाहून ती घाबरली. हातातली बॅग, खाऊ, कपडे टाकून ती पळून गेली. यावेळी येताना ,त्या कंपूने मारुती व्हॅन सामान भरून गाडी आणली होती. मी थोडीशी चालून गेले. असते तर गाडीतून मी चहा वस्तीतील घरी, समाजात, नेहमीचे आयुष्यात, घरी सहज जावू शकत होते. मी जोरजोरात सर्व मैत्रिणींच्या मित्रांच्या नावाने हाका मारल्या. भूत भूत ओरडत किंचाळत ती मुले, पुढे,पुढे पळू लागली. सोबत आणलेली गाडी तिथेच सोडून, तो कंपू दूरवर पळून गेला. मागच्यावेळी, मी प्रथम ईथे मागे उरले होते, तेव्हा, जी रेल गाडी, जी पॅसेंजर ट्रेन, त्या कंपूनी पकडली होती. ती पकडून तो कंपू चहा वस्तीवर परत गेला. माझ्या परत घरी जाण्याचा मार्ग खुंटला.


या जंगलात मी आता एकटीच उपाशी मरणार होते. मी हताश झाले. निग्रोच्या पुतळ्याने आपला हात धरला, खांदा पकडला आहे, हे लक्षात येताच गारठले किंचाळी मारून बेशुद्ध पडले.

पुन्हा जाग आली तेव्हा पुतळ्यातला टोटेन निग्रो मला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न करीत होता. टोटेनने मला दूध ब्रेड दिले. मी शुद्धीवर आले होते. पण बेशुद्धीचे नाटक करून मी ते खाल्ले मला हळुहळु नंतर जाग येतेय, मी शुद्धीवर येतेय असे दाखवले. टोटेन निग्रो परत पुतळ्याची अ‍ॅक्शन घेवून उभा राहिला.


मी आळोखे पिळोखे देत उठले. समुद्राच्या लाटांच्या आवाज ऐकू येत होता. भरतीची वेळ, संध्याकाळ ची होती. मी निपचित पडले. चहा कंपनी जोरात होती, तेव्हा पूर्वी इथे चांगली इमारत कार्यालय होते. आता ते खंडहर झाले होते. चहा कंपनीचे कार्यालय जेव्हा या टोटेन गार्डनमध्ये होते तेव्हा टोटेनच्या पुतळ्यामागे एक खोली होती पण अस्वच्छ होती. मित्रांनी सोडलेल्या जुन्या गाडीत एक मोठी गोणी होती.


मी गाडीत जावून, झोपले.सकाळी मी गाडीतले सामान बघितले जे मिळाले ते खाल्ले. माझ्या अंगाला खावून पिवून शक्ती आली मी मनाने घट्ट झाले. मी गाडीतच झोपू लागले. या गोणीत खूप पुस्तके होती. ती वाचू लागले. विचित्र, धर्म अन्याय, शेती विकली, आता पुढे चालू नाटक, धनगरी गाथा, गर्भ हवायं !, आशा, पाचपावले, शपथपत्र, कर्म, सत्यपथदर्शक, मी भेकड अशी पुस्तके मागील हॅाल मध्ये सापडली. माणूस मेला विचार मेले नाही, नाळ कापलेले मूल, परत घेतलेला शाप, जन्मभूमी, पंखहिन पक्षी अशी हस्तलिखिते होती.


गाडीत मिळालेल्या या गोणीत खाली मीठ, तांदूळ, गव्हाचे पीठ, साखर, जॅम, ब्रेड, परोठे असा खाऊ होता.चहा, बिस्किटे, दूध पावडर, प्लेट, टॉवेल्स, गाऊन्स असे सामान होते. बहुतेक सर्व मित्र मैत्रिणी 3-4 दिवस रहायाच्या निमित्ताने आली असावी. काही भांडी देखील होती. थर्मास होता. काड्यापेट्या, सिगारेट, लायटर होता. मित्रकंपु भेटला नाही पण त्या गाडीमुळे बरेझाले. गोणीतील वाण सामानामुळे, माझे खाण्यापिण्याचे हाल संपले. ओढणीने गाळून मी तलावाचे पाणी आणले, पातेल्यात ते तापवले. कॉफी पावडर साखर टाकली, बिस्किटांसोबत खाल्ली पोट भरल्यावर मला तरतरी वाटली.


“निग्रो दादा तुला खायचे का?” मी विचारले.

“नको” तो पुतळा बोलला. मी दचकले. पण आतामला धक्के पचवायला हवे होते. स्वतःला मी सावरले. आता मला पुतळ्याचे बोलणे सवयीचे झाले होते. पुतळ्याचा स्पर्श,जरी मला झाला होता. पुतळ्याचे वावरणे, बोलणे यात भुताटकी नसून काहीतरी रहस्य आहे. हे मला कळले होते. एवढी स्मार्ट तर मी होतेच. मित्रमंडळी, घर, आई-बाबा, भाऊ, चांगले खाणे, सहली, गप्पा सगळ्या आठवणी फेर घालून अस्वस्थ करीत असत. मी गायब झाल्याचे लोकांना घरच्या माणसांना काहीच वाटले नसावे? वाई, जि. सातारा मधील 12 महिलांना कथित रित्या गायब करणार्‍या, एखाद्या गुन्हेगाराने समजायच्या अशा, मुलींकडे दुर्लक्ष करण्याचा जर फायदा घेतला तर नवल नाही. चहा वसाहतीत पोलीसात मी हरवल्याची तक्रार तरी नोंदवली की नाही? अब्रु जाते, म्हणून लोक ते पण करीत नाहीत.

निग्रो दादाला मी टोटेन अंकल म्हणू लागले, हा पुतळा जो भूत नाही हे मी जाणले. मी टोटेनला विचारले, “टोटेन तू या टोटेन गार्डनमध्ये माझ्यासारखाच मागे राहिल्याने ,वस्तीला राहतोस”

“नाही, मी आपण होवून इथे आलो.” टोटेन


समोरच्या व्यक्तींच्या शारीरिक शक्तीला मर्यादा आहेत. वडिल आला वृद्ध झाली आहे. ह्याची जाणीव फारच थोड्या लोकांना असते. कणसासारखे भरलेले रूप घेऊन आलेली ही तरुण मुले, वृद्धांची आगतिकता जाणू शकत नाहीत. दूरवर मृत्यूची फांदी गातेय, गावू दे, पण तरुणांनी माझी फांदी तोडणे? मलानामॆजुर आहे. एकाने निर्णय दुसर्‍यावर टाकला की जबाबदारी दुसर्‍याची येते. पण त्यात नुकसान एकाचेच होते. दोन पिढ्या दुसऱ्यावर जबाबदारी ढकलूही शकतात, ते समाजाला चालूही शकते. तो कौटुंबिक प्रश्न होता. त्यामुळे मुलांनी, मला वृद्धाश्रमात टाकले. खरेतर तेव्हा मला वाईट वाटले. वृद्धाश्रमातून पळूनो, मी चहा कंपनीच्या वसाहतीत राहणार्‍या मुलाकडे परत आलो.” टोटोनने सांगितले.

“तुम्ही डिसोझा अंकलचे आजोबा आहात?” मी विचारले.

“हो बेटा! तू कसे ओळखलेस? मी मुलांनी मला ठोकरल्यापासून इथेच राहतो.” टोटेन म्हणाला.

"मी बागकाम करी,माझ्या मातीचा गंध आभाळभर पसरतो हे कुणाला कळते? मी माझे विश्‍व बनवले आहे. प्रश्‍नचिन्हांचे !" टोटेन.

" एक कथा लिहिणे म्हणजे एक लिटर रक्त आटवणे असे म्हणून मी लिहित राहिले. पत्र, कथा, चरित्रे, मी कधी कविता लिहू लागले,

“टोटेन तुम्हाला कुणी शोधले नाही” मी.

“तुला तरी कोण शोधते.” टोटेन

“हा वेष पुतळ्यासारखा का केला?” मी

“टोटेन सांसारख्या त्या काळचे वेष या बंद पडलेल्या एका कार्यालयाच्या पेटील सापडले. बोस्टन टी पार्टीच्या काळातील त्या इंग्रजी अधिकार्‍याचे सामान मी वापरून दिवस काढले आता सहा महिन्यातून एकदा शहरात जावून मी ब्रेड, तांदूळ, मसाले, दारू आटा आणतो” टोटेन

“मला पोहायला येत नाही, नाही तर समुद्रापलिकडचे बेटावर छान फळे आहेत” मी

“चल तुला पोहायला शिकवतो. समुद्र घोड्यासारखे मान वर करून पोहायचे. पकडली गेलीस तर समुद्र घोडा समजून तुला पकडणारी व्यक्ती तुला समुद्री जीव समजून सोडून जाईल.”

“टोटेन मला पोहाला शिकवी एकदा मी पोहताना बुडत होते. टोटेन ने मला वाचवायचा प्रयत्न केला नाही. मी कष्टपूर्वक बाहेर आले. टोटेनशी भांडू लागले. ‘तू समुद्र घोडा दुष्ट आहेस “मी पाण्यात बुडून मरावे अशी तुझी इच्छा होती ना!” मी

“तसे असते तर मी तुला शिकवले नसते. पोहतांना तुला पहिला भोपळा लावला नसता. तू गैरसमज करू नको” टोटेन


मी टोटेनशी बोलता माझ्या गाडीतली बिछान्यावर येवून झोपले मला टोटेनचा खूप राग आला होता. मी गाडीच्या काचेतून बाहेर बघितले म्हतारा टोटेन हातात दारूची बाटली घेवून दारू पीत होता, पिवून तो तिथेच लवंडला.

रात्री एकदम थंडीच्या लहरीने जाग आली. बर्फ पडत होता. मी बाहेर बघितले. टोटेन दारूच्या नशेत त्या पुतळ्याजवळ पडून होता. त्याच्या अंगावर बर्फाचा थर साचत होता. गाडीत रेनकोट नव्हता. अन्यथा मी टोटेनला उचलून त्या पडक्या खोलीत नेवू शकत होते. ती खोली चांगली होती. तिला एक अटेच्ड टॉयलेट होते. मी अंगावर एक फाटकीशी गाडी झाकण्याच्या कव्हरची पिशवी पांघरली टोटेनपर्यंत पोहचली टोटेनला खेचत मी त्या खोलीत नेले. त्यांच्या अंगावरचा बर्फ झटकला त्याच्या अंगावर ब्लँकेट टाकले मीही एक ब्लँकेट पांघरून तिथेच झोपले.


जाग आली तेव्हा टोटेनने चहा बनवला होता. तो ठिक होता. निःशब्दपणे आम्ही एकमेकांची आगतिकता जाणली त्या खोलीत राहू लागलो. उगीच हिंदी सिनेमासारखे चाचाजी पिताजी असे काहीही मैत्रीचे नाते नव्हते. बस एकाच खोलीत राहात होतो.


एकाकी वाटले की मी समुद्रावर जावून बसत असे परत यायला उशीर झाला की टोटेन मला शोधायला येत असे. लाटा वाढलेल्या असताना एकदा टोटेन म्हणाला, “दूरवर एक जहास दिसतेय, आपण त्या जहाजापर्यंत जाऊन त्या जहाजावर चढू या. त्या जहाजाने परदेशी जावू या” दुर्बिणीतून बघत टोटेन म्हणाला.

“त्या जहाजापर्यंत कसे जायचे?” मी त्याला वेड्यात काढत म्हणाले.

“चल, आजपासून तुझे पोहण्याचे प्रशिक्षण” टोटेन म्हणाला.

“समुद्र घोड्यासारखे उभे पोहायचे!” मी

“हो, चल सुरू करू या.” टोटेन

“उद्यापासून करू या” मी


दुसर्‍या दिवसापासून मी पोहणे शिकू लागले. आता मी छानपैकी समुद्र घोड्यासारखी उभी पोहायला शिकले. अधिकाधिक गती वाढवण्याचा सराव करू लागले. टोटेन मला समुद्र घोडा म्हणू लागला. त्यानंतर मात्र जहाज दिसले नाही. जाणारा दिवस उदास जावू लागला. सहा महिने झाले होते. टोटेन शहरात गेला नव्हता. टोटेन म्हणाला, “उद्या मी धान्य वगैरे आणतो, शहरात जावून येतो.”

“मी पण येते” मी म्हणाले. मला सोबत नेण्याची टोटेनची इच्छा नव्हती. कुठूनसा त्याने एक बुरखा शोधून काढला बुरखा घालून मी शहरात गेले.


दहा वर्षात शहरांनी खूप प्रगती केली होती. उंच उंच इमारती चकचकीत दिवे, उत्तम कपडे, मॉल्स, सुंदर केशरचना असलेले तरुण, तरुणी, फॅशन्स, सिनेमागृहे!’ सर्व खरेदी झाल्यावर मी आणि टोटेनने एक सिनेमा बघितला. सिनेमागृहात माझ्या मित्र माझ्या खास मैत्रिणींबरोबर होता. सिनेमागृहात आई-बाबा, भाऊ माझ्या मित्रांचा कंपू आला होता. हसत खिदळत होते. आईस्क्रिम खात होते. मी बुरख्यातून सर्व निरखत होते. रात्री रेल्वेगाडीने आम्ही चहा वसाहत रस्त्यावर उतरलो. पुढे खूप अंतर चालायचे होते. मी म्हणाले, “टोटेन, सर्व जग मजेत आहे. आपणच या अज्ञातवासात कुठलाही गुन्हा करता काळ्या पाण्याची सजा भोगतो आहोत.”

“पळून जावेसे वाटायला लागले की काय?” टोटेन

“नाही” मी नाही असे उत्तर दिले, पण मला शहर बोलावू लागले.

“शहरापेक्षा बोटीने ज्या ठिकाणी जाता येते, ते शहर मोठे आहे. टोटेन मला स्वप्न दाखवत म्हणाला. या समुद्र किनारी समुद्रघोड्यासारखे आयुष्य जगून मी काळी, कुरुप, विचित्र दिसू लागले होते धड कपडेसुद्धा नव्हते. केसांच्या बटा झाल्या होत्या.


सहा महिने अशाच चलबिचलीत गेले. एकही बोट या दरम्यान आली नाही.

सहा महिन्यांनी टोटेन पुन्हा शहरात निघाला. मी आनंदले पण काही विचार करून “तुम्ही एकटेच जा’ असे म्हणाले. टोटेन एकटाच गेला होता.

समुद्रकिनारी मी एकटीच बसले होते. कुणीतरी निरखून पाहतेय असे जाणवले. माणसांचे आवाज आले. दहा-बारा माणसे माझ्याकडे धावत येत होती. मी धावत समुद्रात उतरले. समुद्र घोड्यासारखी उभी पोहू लागले. ते लोक जायेच नाव घेईना. एक तास समुद्रात पोहून माझी शक्ती संपली.


“तो विचित्र प्राणी आहे” एक मित्र म्हणाला.

“ती आपली मैत्रिणच आहे.” एक मैत्रिण म्हणाली.

“नीट शोधा हो माझ्या लेकीला.” आई म्हणत होती.


पण मला आता घरी जायचे नव्हते. टोटेन असतात तर बरे झाले असते. टोटेनचे वय नव्वदीचे आहे. नंतर मी एकटी कुठे राहणार काय करणार? जाऊया या लोकांबरोबर असे मी ठरवले. जहाजाची वाट कुठवर पहायची?

“घरी जावे का?समुद्रात विचित्र जनावरे आहेत.” बाबा म्हणाले. माझे हातापायातील शक्ती गळाली. नाका-तोंडात पाणी जावू लागले, मी बुडू लागले माझी शुद्ध हरपली.


एका मोठ्या लाटेने मला किनार्‍याकडे फेकले. मी त्यांची मुलगी नाही म्हणून कुटुंबीय निघून गेले होते. टोटेन परत आला नव्हता. रात्र झाली मी टोटेनचे कपडे, टोटेनची हॅट घातली टोटेनच्या पुतळ्या जवळ जावून उभी राहीली. टोटेनची जागा मी घेतली.


शुभांगी पासेबंद, ठाणे

मो: 9869004712

ईमेल: scpaseband@gmail.com

297 views0 comments

Recent Posts

See All
टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page