top of page

समृद्ध भाषा समृद्ध मूल... कार्यशाळा अनुभवराज्य मराठी विकास संस्था ,महाराष्ट्र शासन व लोकमान्य धर्मादाय न्यास चिखलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दि.२० ऑगस्ट २०१९ ते २२ ऑगस्ट २०१९ या तीन दिवसीय कार्यशाळेत समृद्ध अनुभव घेताना कार्यशाळेतील वैशिष्ट्य पूर्ण बाबी ह्या शिक्षक म्हणून समृद्ध वाटल्या.तितक्याच वर्गातील मुलास भाषा समृद्धीकडे नेणारी ही कार्यशाळा महत्वपूर्ण वाटते त्याचा घेतलेला वेध.


रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग ह्या तीन जिल्ह्यातील निवडक शिक्षकांची ही राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करताना निवडलेले प्रशिक्षणार्थी हे निकषपात्र होते. उदा. ४० वयापर्यंतचे, भाषेची वाचनाची आवड व भाषादूत असणारे ही माफक अट. प्रशिक्षणाचे ठिकाण हे रेणूताई दांडेकर ह्या तपस्वी शिक्षणतज्ञाच्या परिश्रमाने उभ्या राहिलेल्या “लोकसाधना”ह्या निसर्गरम्य चिरेबंदी वास्तूमध्ये!तसे म्हटले तर कॉर्पोरेट एसीच्या ऑडीटोरियम पेक्षा ह्या सभागृहातील कार्यशाळा निसर्गाचा आस्वाद असणारी व मोबाईलच्या नेटवर्क कक्षेच्या बाहेर असल्याने कार्यशाळा समृद्ध होण्यास फायदेशीरच...


कार्यशाळेसाठी कोणतेही घटकसंच, मार्गदर्शन पुस्तिका नसताना ही कार्यशाळा नियोजनबद्ध व क्रमबद्ध वाटली, ही वैशिष्ट्यपूर्ण बाब!


पहिल्या दिवसाचे पहिले सत्र- हे आमच्यासाठीच संगीतावर आधारीत मेडीटेशन व त्यातून रंगीबेरंगी फुगे निवडीतून गटनिर्मिती विशेष नाविन्यपूर्ण वाटली.ह्याच फुग्यापासून पुढील कृती टेबलावर ठेवलेल्या साहित्यातून गटाने आवडते साहित्य घेऊन त्यापासून वेगळी कलाकृती साकारणे व त्याचे सादरीकरण...साहित्य हेच का निवडले? निवड प्रक्रिया काय होती? निवडलेले साहित्य वापरले का?अन केलेल्या कलाकृतीतून संदेश कोणता दिला? म्हणजेच साहित्य,कलाकृतीतून भाषा समृद्धतेकडे जाता आले हा धागा “भाषा समृद्धीचा”.


’भाषासमृद्धी आपल्या दृष्टीने’- ह्या गट कार्यातून प्रत्येक गटाने आपले मूल समृद्ध होऊन त्याची भाषा समृद्ध कशी असेल, कशी होईल हे कोणी टॅगलाईन, हॅशटॅग, कुणी लोगो, कुणी काव्यात्मक विचार,चित्र इत्यादी माध्यमातून चित्रात्मक साकारली व भाषा समृद्धतेची त्याची वैविध्यपूर्ण कंगोरे सादरीकरणातून व्यक्त झाली.


बालकांची अभिव्यक्ती- सत्र सुरुवातच प्रत्येकास अभिव्यक्त होण्यासाठी!मी:माझा छंद,इयत्ता पहिली ते आठवीचा विद्यार्थी म्हणून माझे लेखन अन ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक म्हणून माझे चारोळी लेखन कसे असेल ही कृती सर्वच प्रशिक्षणार्थ्यांना अभिव्यक्त करायला लावणारी,महत्त्वाचा भाग की, मुलांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मान्यता द्या. कारण माझं घर चिखलगाव असेल तर माझ्या विद्यार्थ्यांचे घर भविष्यात कुठेही असेल जसे मुंबईत,अमेरिका अगदी दुबई ही अभिव्यक्ती.


विविध उपक्रम प्रयोग- यातून भाषा समृद्ध होण्यासाठी कोणते उपक्रम हाती घेता येतील याचे कृतीयुक्त सादरीकरण वैशिष्ट्यपूर्ण.


क्वेस्ट फाउंडेशन जि पालघर जिल्ह्यात आदिवासी भागात काम करते.त्यांच्या ह्या सत्रात ‘वाचन म्हणजे काय?’ ह्यामध्ये भाषा नसती तर भाषा- चिन्हप्रणाली नियमव्यवस्था तर भाषिक समूहाची मनमानी म्हणजे भाषा, ती मान्य हवी.भाषेत फक्त लेखन कसं हे पाहतो काय, हे नेमके विसरतो म्हणजेच जे वर्ण,स्वर आपण ऐकतो, श्रवण करतो ते लिहितो,जे कधी ऐकलेच नाही ते लिहिताना गडबड होते.कारण लेखन करताना विचारांची जोड असते.बोलण्याची भाषा आपण मुलाची स्वीकारतो, पण लेखनाची स्विकारता येत नाही. यामध्ये माझं मात्र बरोबर तुझं चूक हे सोडविणे भाषा समृद्धीच्या दृष्टीने

आवश्यक ठरते.


अध्ययन निष्पत्ती व अध्यापनातील बदलाची दिशा- या सत्रात शिक्षक म्हणून सक्षमीकरण, मुलाची भाषा समृद्ध कशी करता येईल, भाषा समृद्ध करायची म्हणजे काय, भाषेचा व्यवहारात उपयोग करताना ती Negosiable व convience करणारी असावी येथपासून ते घटकनिहाय,विषय निहाय, अध्ययन निष्पत्ती कशी काढता येईल भाषा घटक पाठ संच कसा करावा, त्याचे बकलींग करावे लागेल ह्यासाठी व ओघतक्त्यानुसार सूक्ष्मविवेचन व संशोधनात्मक मार्गदर्शन पूरक ठरते.

शैक्षणिक सहल- हे कृतीयुक्त सत्र म्हणजे लोक साधना शाळा येथील कौशल्य व्यवसायाभिमुख कोर्सेस याची प्रत्यक्ष माहिती तेथील माजी विद्यार्थी रचनावादी प्राथमिक शाळा मुलासाठी भाषा,गणित जत्राच वाटली ते पावसाच्या सोबत वाट काढीत टिळकवाडी येथील लोकमान्य टिळक मंदिर म्हणजेच टिळकांचे जन्मगाव पाहण्याचा आनंद अभ्यासपूर्ण.


मेंदू आणि भाषा- हे सत्र म्हणजे मेजवानीच... बाळ जन्माला आल्यावर पहिल्या पाच मिनिटांमध्ये कोणते अनुभव घेतो.कारण अनुभव हेच शिक्षण.परिसरात भाषेची संधी देणे हेअब्सोर्ब होणे. कारण अनुकरणातून शिक्षण, मेंदूला काम पाहिजे, मोबाईल मुळे मेंदू पॅसिव होतो, येत नाही म्हणून मुलास मार देणे म्हणजे छोट्या जीवावर केलेला हल्ला. शिक्षेतून मुल कोणती भाषा कोणते अनुभव घेईल ह्याकडे लक्ष हवे. मूल घरात, परिसरातून काय घेऊन येतो, काही मुलं अशी वेगळी का वागतात, अध्ययन अक्षम ठरवू नका वेळ द्या!


ऐकणे- ह्या सदरात मूल शाळेत येताना काय घेऊन येतं, मूल काय ऐकतात मुलाच्या ऐकण्यावर काय काय करता येईल. मुलं आनंदी ताजीतवानी रहावी यासाठी परिपाठाचे सूक्ष्म नियोजन, इयत्तानिहाय सहभाग.इयत्ता पहिलीसाठी एक महिना ऐकण्यावर काम कसे करता येईल. मूल पाहण्यातून ऐकत त्यासाठी पूरक वातावरण, श्रवण पूर्वक वातावरण,संवाद गटचर्चा कशी घेता येईल.


क्वेस्ट फाउंडेशन मधील तरुणांनी कार्यशाळेनंतरचे सत्र मनोरंजक केले.पुस्तकातील गोष्ट जिवंत कशी करावी, शिक्षकांमधील अभिनय, ऊर्जा कशी नियंत्रित करता येईल यासाठी श्वासाची तंत्रे, आवाजातील बारकावे इत्यादी बाबत काही ट्रिक्स दिल्या.’कपिलेचा झोका’ मराठी अनुवादित कथा त्यांच्या अभिनयाने वैशिष्ट्यपूर्ण ठरली.


कोकण विभागातील हे तीन जिल्हे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमात महाराष्ट्रात भाषा विषयांमध्ये पहिल्या क्रमांकामध्ये अग्रेसर आहेतच. परंतु ह्यापुढे जाऊन गुणवत्तापूर्ण समृद्ध भाषा हा टप्पा करून हे जिल्हे अभिव्यक्त होतील या मध्यवर्ती कल्पना उद्दिष्टांवर कार्य करीत राज्य मराठी विकास संस्था व लोक साधना यांनी घेतलेला ‘समृद्ध भाषेचा ध्यास समृद्ध भाषेसोबत मूल समृद्ध होण्यासाठी’ नक्कीच महत्त्वपूर्ण ठरेल ही आशा...!


श्री.राजेंद्र दत्तात्रय अंबिके (पाली, रायगड)

मो.८९८३५७८२०५

ईमेल: ambike.raj1@gmail.com


198 views1 comment

1 Comment


Deepak Bhalerao
Deepak Bhalerao
Oct 19, 2020

राज्य मराठी विकास संस्था ,महाराष्ट्र शासन व लोकमान्य धर्मादाय न्यास चिखलगाव यांचा कार्यक्रम चांगला आणि उपयुक्त आहे.

Like
टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page