|॥ पांडुरंगाचा साक्षात्कार ॥|


माझ्या पांडुरंगावर माझी नितांत श्रद्धा . पांडुरंगाची प्रचिती मला या दोन वर्षात पदोपदी यायला लागलीय .हे तितकेच सत्य .पांडुरंगा शिवाय माझे पान ही हालत नाही .राहून -राहून माझ्या मनाला एक सारखे वाटते की पांडुरंगाचे आणि माझे पूर्वं जन्मीचे काही तरी नाते असले पाहिजे .मी पूर्व जन्मी त्यांचा छोटासा भक्त ,सेवेकरी तरी असेन .त्यांच्या चरणाशी बसून मी त्यांची सेवा करीत असेन .म्हणूनच की काय या जन्मी त्यांचा मला लळा लागला . लळा इतका की काय सांगू .

पांडुरंगा चरणी एकच मागणे मागावेसे वाटते की , ते म्हणजे ,

तुझे वेड लागू दे मला ,

आणिक काय मागू मी तुला ,रे विठ्ठला I

नको सोने -चांदी ,नको नाम -वैभव

मुखी माझ्या असू दे ,सदा तुझे नाव ,

तुझ्या नावाचे वेड लागू दे मला ,

आणिक काय मागू मी तुला, रे विठ्ठला II

कित्येकदा मला माझ्या विठू माऊलीने अप्रत्यक्षपणे विविध रूपात दर्शन दिले आहे.अशाच एका अनुभवाच्या प्रचितीचा प्रसंग .या वर्षीचा मला 'साहित्य रत्न पुरस्कार मिळाला होता .तशा आशयाचे पञ मला 'साप्ताहिक कोल्हापूर ' विशेषचे संपादक , पत्रकार मा .श्री. सुरेश शिंत्रेंनी पाठवले होते. कोल्हापूर 'गोकूळ ' दूध संघाचे अध्यक्ष मा . रविंद्र आपटे व मराठी सिनेतारका .मा.अंशुमाला पाटील यांच्या हस्ते १९ मे ला मला पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार होते .साहित्य क्षेत्रात मी घेतलेल्या कष्टाचे चीज झाले होते. सुरेश भाऊंना मी येतो म्हणून तसे सांगितले होते .सत्कारा निमित्त मी पाहिल्यांदाच कोल्हापूरला चाललो होतो . मला आनंद झाला होता .आनंद आणखी यासाठी झाला होता की , मला कोल्हापूरच्या अंबामातेचे दर्शन घेऊन परत येताना पंढरपूरला माझ्या पांडुरंगाचे दर्शन मला घ्यायला मिळणार होते . मोह मला पुरस्कारा पेक्षा पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीचा जास्त होता .१८ मे ला मी सायंकाळी ५:३० वाजता घरातून बाहेर पडलो .सुरेश शिंत्रे भाऊंनी मला त्यांच्या करी रोडच्या बी.डी .डी. चाळीत असलेल्या कोल्हापूर विशेषच्या कार्यालयात संध्याकाळी साडे सहा वाजे पर्यंत हजर राहायला सांगितले होते . बरोबर साडेसहा वाजता त्यांच्या कार्यालयात मी पोहोचलो . तेथून 7:३०च्या चांगभलं ट्रॅव्हल्सने दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता उत्तुरला पोहोचलो .साहित्यरत्न पुरस्कार माझ्यासह श्री.दिवाकर म्हात्रे, वसंत सकपाळ , श्री. शरद महाजन , एच .डी .पाटील , राधिका आचरेकर या आणि अशा अनेक मान्यवरांना मिळाला होता .उतरून आम्ही उत्तुर, कोल्हापूरचे प्रतिष्ठित व्यक्ती ,समाजसेवक ,उद्योजक मा . श्री.दादासो पाटील यांच्या बंगल्यात उतरलो .माझ्या सोबत साहित्यिका श्रीम .राधिका आचरेकर, तसेच पाटील मॅडम अशी साहित्यिक मंडळी सुद्धा होती .दादासो पाटील यांनी आमचा त्यांच्या बंगल्यात चांगलाच पाहुणचार केला . ते आम्हाला आमच्यातलेच एक वाटले.त्यांच्याशी बोलून भेटून मनस्वी मला खूप आनंद झाला . त्यांचं कुटुंब मनस्वी खूप प्रेमळ .सायंकाळी कार्यक्रम संपल्यावर उत्तुरहून कोल्हापूरला जाण्यासाठी म्हणून मी गडहिंग्लज कोल्हापूर ही एस .टी पकडली .निपाणी मार्गे साधारण पणे रात्री नऊ वाजता मी कोल्हापूर एस .टी (सी.बी.एस )स्टॅण्डला उतरलो .उत्तुर ते कोल्हापूर या दोन तासाच्या प्रवासा दरम्यान एस .टी .कंडक्टरशी माझी चांगलीच गट्टी जमली होती .या दोन तासात मी त्यांच्याशी केवळ आणि केवळ पांडुरंगा विषयीच बोलत होतो.कोल्हापूरला उतरण्या आधी त्यांनीच मला सांगितले होते की उतरल्यावर स्टॅण्डच्या बाहेर लागूनच तुम्हाला सीटी बस मिळेल .कोणत्याही बसने जा . अंबामाता मंदिर सांगा .एरव्ही रात्रीची वेळ आहे .रिक्षावाले तुमच्या कडून ७०-८० रूपये उकळतील .तुम्ही इथून सीटी बसने जर गेला तर तुम्हाला ८-१० रूपये भाडे लागेल . तेवढेच तुमचे पैसे वाचतील . वाचलेले पैसे तुम्हाला प्रवासात कामी येतील . "मला ते माझ्या मोठया भावा प्रमाणे समजावून सांगत होते .मी त्यांना हो म्हणालो .रात्री नऊ वाजता मी कोल्हापूर सीबीएस ला उतरून बाहेर बसस्टॉप जवळ येऊन थांबतो- न -थांबतो तोच माझ्या साठी बस हजर .बसला जास्त काही नाही आठ रुपये तिकीट होते .बस रिकामी होती .जणू काही पांडुरंगानेच ती माझ्या साठी पाठवली होती .१५-२० मिनीटात करवीर निवासिनी अंबामातेच्या मंदिरा जवळ येऊन मी पोहोचलो .मंदिर थोडे लांब होते . विचारत -विचारत मी थोडयाच वेळात मंदिरा जवळ आलो.. मंदिरात दर्शन लाईनीत तोबा गर्दी होती .मी मनात म्हणालो , " बहुतेक करून आज आपल्याला दर्शन न घेता विन्मुख परतावे लागते की काय ?माझ्याकडे बॅग होती .मंदिर संस्थांनचे लॉकर ऑफीस बंद झाले होते .मी मोठया पेचात

‌ पडलो . मनाला माझ्या हुरहुर लागून राहिली . हार वाल्याच्या दुकानात जाऊन त्याच्या कडून ओटीचे सामान घेतले . बॅग त्याच्याच कडे ठेवून मी निघालोच होतो. तेवढ्यात पाठीमागून त्याने मला हाक मारली . मी म्हणालो , " काय भाऊ ? "


" काही नाही , जरा लवकर या . "

मी म्हणालो , " का रे बाबा ! '

दुकान बंद व्हायची वेळ झालीय . १५-२० मिनीटात या . १०पर्यंत या म्हणजे झाले . "

" सर्वच दुकाने दहा वाजता बंद होतात की काय ? "

" हो ,जावा लवकर ,मुख दर्शनाच्या लाईनीतून दर्शन घेऊन या . "

मी न राहवून त्याला म्हणालो, " अहो पण ,मला देवीची ओटी भरायची आहे . "

" भरा ना , तुम्हाला कोण नाही म्हणतय .

अहो तेथे सेक्युरीटी वाले आहेत ना .त्यांच्या हातात ओटीच सामान दया.बाकी सर्व देवीवर सोपवून निर्धास्त रहा. आणि हो - - -"

"आणि काय " मी म्हणालो .

" दहा पर्यंत या नाही आला तर तुमची बॅग मी इथेच बाहेर ठेवून जाईन . तेव्हा तुम्ही जरा लवकरच या . "मी म्हणालो , "

तुमचे पैसे नाही घेणार का ,की तसेच जाणार "

" हो या तुम्ही . "

" मी ही त्याच्याशी जास्त हुज्जत न घालता मुख दर्शनाच्या लाईनीत जाऊन उभा राहिलो .दर्शन लाईन ही भली मोठी होती .अर्धा-एक तास मला सहज लागला असता .मी देवीच्या ओटीचे सामान सिक्युरिटी गार्डच्या हवाले सुर्पूद करून , " भाऊ ,देवी पर्यंत जाऊ दया . " एवढे बोलून दर्शन घेऊन मी करवीर निवासीनी च्या भव्य - दिव्य ,तेजस्वी मूर्तीचे रूप डोळयात साठवून बाहेर पडलो . हारवाला दुकान बंद करून माझी येण्याची वाट पहात उभा होता .ओटीचे पैसे देऊन बॅग घेऊन मी रस्त्याला लागलो .दोन -चार दुकानात सहजच म्हणून मी फेरफटका मारला .एक-एक वस्तु मी न्याहाळत होतो .खरं म्हणाल तर मंदिराच्या आवारातून माझा पाय निघत नव्हता .देवीची कृपा म्हणावी की काय .मी पहिल्यांदाच कोल्हापूरला आलो होतो ,आणि मी पहिल्यांदाच देवीचे दर्शन घेऊन मी कृत-कृत झालो होतो .एका दुकानात ५० रुपयाचा प्रसाद घेऊन मंदिराच्या बाहेर येऊन रिक्षाने छत्रपती शाहू महाराज टर्मिनसला उतरलो .तिकीट काढून मी निर्धास्त झालो . गाडी विषयी चौकशी केली असता मला कळले की , 'सोलापूर एक्सप्रेस 'रात्री बारा वाजता सुटणार आहे . साडेदहा