मातीत मन मिसळली की गवतांना भाले फुटतात, इथल्या चिमण्यांना गरुडाचे पंख फुटतात, इथल्या दगडांचे शस्त्र होतात, गनीमांना धुळीत मिसळण्याचा आत्मविश्वास मिळतो, होय कारण की हा सह्याद्री आहे जो इथल्या मावळ्यांना अंगाखांद्यावर पोसत आलाय. हाच तो सह्याद्री ज्याला पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पावन पदस्पर्श झाला. हाच तो सह्याद्री ज्याच्यात दिल्लीचेही तख्त राखण्याचा दम आहे आणि हाच तो सह्याद्री ज्याच्यात अटकेपार झेंडे रोवण्याचे कसब आहे आणि देव देश आणि धर्म जपणारी पिढी घडवायची ताकद आहे. हाच तो सह्याद्री ज्याच्यात संतांचे संस्कार आहेत आणि महर्षी वाल्मीकी यांनी लिहिलेल्या रामायणाचे सार आहे. हाच तो अभेद्य राकट, चिवट, देखणा, आणि वरून ओबडधोबड परंतु आपल्या माणसाला मायेने अंगाखांद्यावर खेळवणारा आणि प्रेमाने जोपासणारा सह्याद्री. अनेक शतकांपासून अनेक राजवैभव बघितलेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जगविख्यात झालेला हाच तो परम आदरणीय सह्याद्री, या राष्ट्रावर संकट आले तर कसलाही विचार न करता उत्तरेत पानिपतावर रक्षण करणारा हाच तो सह्याद्री. साक्षात इंद्राच्या राजधानीला लाजवेल असे सौंदर्य असणारा, आणि हिमालयाच्या पण खांद्याला खांदा लावायची हिंमत असणारा हाच तो सह्याद्री, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकावेळी हसणारा परंतु धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या कैदेमुळे रडणारा आणि अनेक सुखदुःखाचे प्रसंग अनादी काळापासून बघणारा हाच तो सह्याद्री, महाराष्ट्राचा भूगोल बदलावणारा आणि इतिहास लिहिण्यास कारणीभूत ठरणारा हाच तो सह्याद्री, आमचे मायबाप छत्रपती शिवाजी महाराज यांना आश्रय देणारा प्रसंगी शत्रूच्या तावडीतून निसटून जाण्यास मदत करणारा हाच तो सह्याद्री. अनेक किल्ले आभूषणासारखे मिरवणारा आणि ढगांशी हितगुज करून या भूमीला सुजलाम सुफलाम करणारा हाच तो सह्याद्री, लाखो लोकांचे पालनपोषण करून अवघ्या महाराष्ट्राची तहान भागवणारा, आणि अनेक दुर्मिळ वनस्पती आणि प्राणी याना आश्रय देणारा हाच तो सह्याद्री.
देशात पश्चिमी घाट या नावाने ओळखला जाणारा परंतु महाराष्ट्रात सहयाद्री नावाने प्रसिद्ध असणारा, महाराष्ट्र पासून केरळपर्यंत किनारपट्टीशी शर्यत करणारा हाच तो सह्याद्री.
मराठी माणसाच्या रक्तात आणि नसानसात भिनलेला आणि मनगटात असलेल्या ताकदीत सामावणारा तसेच या पुण्यभूमीचा एकमेव साक्षीदार असलेला हाच तो सह्याद्री, संतांच्या अभंगात आणि शिवरायांच्या पोवाड्यात, सभासदांच्या बखरीत आणि साहित्यिकांच्या लेखनात मानाचे स्थान मिळवणारा हाच तो सह्याद्री,
श्री महादेवांचे दुसरे घर असलेला, आणि प्रभू रामचंद्राना वनवासात आश्रय देणारा हाच तो सह्याद्री,
अनेक आयुर्वेदिक वनस्पतींचा संग्रह ठेवणारा आणि दुर्मिळ प्राण्यांना हक्काचा आश्रय देणारा हाच तो सह्याद्री,
कुठे अत्यंत नम्र तर कुठे अत्यंत राकट आणि कुठे अत्यंत भीषण तर कुठे अतिशय सुंदर, माणसाला सतत भुरळ घालणारा हाच तो सह्याद्री.
साताऱ्यातील ठोसेघर चे मनमोहक सौंदर्य म्हणजे सह्याद्री तर कास पठारावरील दुर्मिळ आणि नाजूक फुले म्हणजे सह्याद्री. सांधण दरीमधील मधील भीषण खोली म्हणजे सह्याद्री तर आकाशाशी स्पर्धा करणारे कळसुबाई म्हणजे सह्याद्री, महाबळेश्वर चे सहजसुंदर picnic spot म्हणजे सह्याद्री आणि हरिश्चंद्रगडावरील कोकणकड्याचे रौद्रभीषण रूप म्हणजे सह्याद्री.
साक्षात समुद्र देव कोकणात त्याचे पाय क्षणोक्षणी धुवून काढतात तो परमपवित्र सहयाद्री आणि परदेशी लोकांना सतत भुरळ घालणारा हाच तो सह्याद्री.
लेखकाचे नाव: कु. शांभवी कुलकर्णी आणि चि. कल्पेश देशपांडे (चाळीसगाव)
मो: 7620834515
लेख आवडल्यास कमेंट करा आणि शेअर करा.
नविन ब्लॉगचे नोटिफिकेशन येण्यासाठी विश्व मराठीच्या ईमेल लिस्टला सबस्क्राइब करा.
अभिमान वाटावा असे सह्याद्रीचे वर्णन केले आहे .लेखक द्वयीचे आभार !