डॉ. श्री. सुरेंद्र पारसनीस यांनी वयाच्या 75 व्या वर्षी पारसनीस इतिहास लेखनाचा संकल्प केला ही कौतुकाची व आनंदाच गोष्ट आहे. पारसनीसांच्या तिसऱ्या पिढीने केलेला हा संकल्प प्रत्यक्ष उतरवणे ह्यावर पुस्तक निर्मिती होणे हा पण एक इतिहासच आहे.
मला पारसनीस घराण्याबद्दल प्रचंड अभिमान आहे. तो शब्दात व्यक्त होणे शक्य नाही. माझे आजोबा पा.द. पारसनीस व आजी (वत्सला) व माझे वडील ब.पा. पारसनीस व आई सुमती यांच्या अखंड सहवासामुळे, श्री. दत्तात्रेयांच्या अखंड वरदहस्तामुळे आमच्यात हा भाव निर्माण झाला.
श्री. पारसनीसांच्या इतिहास संशोधनाची ऐतिहासिक साहित्यिक मुल्ये या लेखातून मांडत आहे. त्याचे स्वागत करतील असा विश्वास आहे.
श्री राव बहादूर पारसनीस यांची संशोधनाची भाषा :
अज्ञात इतिहासाचे संशोधन, लेखन व त्यातील आत्मभाव जागृत ठेवून लेखणीतून वाचक, समाजासमोर ठेवणे हा त्यांच्या संशोधनाचा पिंड आहे. शब्दसंपत्तीचा भाषाप्रभू सम्राट हाच त्यांचा संशोधनाचा महत्वाचा निष्कर्ष आहे. श्री. रावबहादूर पारसनीसांच्या भाषेतून विचारांची तटस्थता, स्पष्टोक्ती, संदर्भाचा प्रचंड खजिना ही त्यांच्याजवळ आहे. हे लक्षात येते व त्यांची संशोधनाची फार मोठी समृध्दी आहे. भारतीय व परदेशीय इतिहासकारांचा अभ्यास त्यांच्या संशोधनाचा व इतिहास लेखनाचा गाभा आहे. योग्य ठिकाणी हजरजबाबीपणे त्यांचा संदर्भ देऊन लेखन, संशोधनास प्रमाणिकपणे पुष्टी देतात. इतिहास लेखन सत्यतेच्या पातळीवर जाताना पुरावे व मनाला घडवणाऱ्या तात्कालीक घटनांशी प्रामाणिक राहतात. इतिहासकारांवरील प्रेम, आदर, कृतज्ञता व्यक्त होते. मनातील खेद, खंत व्यक्त करत असतानाही कोणाचाही अनादर केला नाही हे भाषेचे वेगळे वैशिष्टय. भाषेवर मराठी, संस्कृत, पाली, प्राकृत भाषेचा प्रचंड प्रभाव आहे. श्री रावबहादुर पारसनीस यांची इंग्रजी, मराठी, संस्कृत, पाली, प्राकृत भाषेचा प्रचंड अभ्यास होता. भाषेबरोबर त्या भाषेतील ग्रंथाचा व ग्रंथलेखकाचाही त्यांनी विशेष अभ्यास केला. इतिहास, मराठ विषयाचे संशोधक, साहित्यिक यांचा अभ्यास त्यांनी केला.
भाषा प्रभू पारसनीसाचा इतिहास संशोधनाच्या अभ्यासाच्या दिशा :
इतिहास व भाषांच्या विविध नियतकालिके व मासिके यांचा अभ्यास केला. इंग्रजी सत्तेचा त्या कालखंडाचा व इंग्रजांच्या मानसिकतेचा व त्या वातावरणाचा अभ्यास त्यांनी केला. इंग्रजांचे वर्चस्व व त्यातून देशाची मानसिकता, याचे अवलोकन करून त्यांच्या विचारसरणीतून त्यांनी इतिहासाकडे अतिशय तथस्थ दृष्टीकोनातून बघितले. ऐतिहासिक लेखनाची जमवा-जमव करणे हा संशोधनाचा महत्वाचा टप्पा व प्रवास असतो. तो प्रवास श्री. पारसनीस यांनी सहजपणे केला. त्यांचा हातखंड होता किंबहुना त्यांच्यावरील इतिहासकारांचा तो आत्मा होता व तो त्यांच्या भाषेतून सतत प्रतिबिंबित होतो. स्वदेश इतिहास प्रेम हा श्री रावबहादुर पारसनीसांचा भाषा लेखनाचा श्वास होता. इतिहास लेखन करताना अनेकांनी त्यांना अनेक प्रकारे मदत केली. त्याची कृतज्ञता पदोपदी व्यक्त केली आहे. त्यांच्या मनोवृत्तीचे व उच्चकोटीचे दर्शन, भारतीय संस्कृतीच्या मुल्यांचे जतन त्यांच्या मन:घडणीत व चित्तवृत्तीत होते हे त्यांच्या शब्दाशब्दातून व्यक्त होते. मराठी भाषेतील इतिहास लेखन मराठी साहित्यातील साहित्याचा इतिहास घडवणारे अमोल रत्न आहे. त्यांची अविश्रांत मेहनत, संशोधन इतिहास व मराठी या दोघांनाही अजरामर मुल्य प्राप्त करून देणे. श्री. पारसनीस यांचे लिखाण राजनिष्ठपणे दोन्ही पक्षांविषयी समबुध्दी बाळगून मराठी व इंग्रजी भाषेच्या मार्गातून प्रवास करणारे आहे. इतिहास लेखन करताना संस्कृत सुभाषितांचा चपखलपणे वापर केला आहे. राजघराणे, प्रदेश, त्यातील भौगोलिक संदर्भ, लेखनास आवश्यक प्राचीन इतिहास याचे संदर्भ त्यांच्या लेखनातून पदोपद जाणवतात. चरित्रलेखन करताना ‘दोहरा’चा उपयोग करण्यासाठी त्यांनी प्रंचड मेहनत घेतली. मराठ साहित्यातील कवी मोरोपंत, कवी श्रीधर यांच्या ओव्या आर्या यांचा अभ्यास चांगला होता त्याचा उपभोग त्यांनी इतिहासाच्या संदर्भाच्या, पुराव्यांच्या स्पष्टीकरणासाठी वापरला. ऐतिहासिक शब्द, संज्ञा, तळटिपा, ऐतिहासिक कालखंडानुसार भाषा, संशोधनाची भाषा, शब्दसंपत्तीने जणू श्री रावबहादूर पारसनीसांवर शारदेने अभिषेक केला होता. इतिहासाच्या कागदपत्रांचा, दस्तऐवजाचा, हस्तलिखितांचा, बखरींचा अभ्यास करताना व संदर्भ देतानाचे ग्रंथलयीन आकडे ही पृष्ठसंख्याही त्यांच्या स्मरणात असायची व त्याचाही वापर भाषालेखनात उत्कृष्ट रितीने केला आहे. ऐतिहासिक पत्रलेखनाचे संदर्भ देतानाही ऐतिहासिक पत्रलेखनाची शैली, भाषा, आशय, पत्रलेखनातील व्यक्तींचा मानसिकता, विचार, आदान-प्रदानातील गांभीर्य व त्यातील इतिहासाचे धागे-दोरे शोधण्याचे पारसनीसांचे कसब अतुलनीय होते. शासकीय कामकाजाविषयीची माहिती भौगोलिक अभ्यास आणि परराष्ट्र व्यवहार अशी विविध माहिती त्यांना अद्यावत असायची त्यामुळे इतिहासांचे लेखन बहुआयामी होत असे.
श्री रावबहादूर पारसनीस यांचा लोकसंग्रह खूप मोठा होता. अनेक संस्थानांचा, राजांचा त्यांचा अभ्यास चांगला होता. त्यामुळे विविध क्षेत्रातील दिग्गज लोकांबरोबर असणारा सलोख्याच्या संबंधामुळे इतिहास संशोधनात त्यांना चांगला पाठिंबा मिळाला. राष्ट्रप्रेम व राष्ट्रीय नेत्यांचा, त्या काळातील संत, साहित्यिक, नाटककार, राष्ट्रनेते अशा थोर व्यक्तींचा सहवास त्यांना लाभला. अभ्यासातील सातत्य, निष्काम कर्मयोग्याची भूमिका या वृत्तीतून त्यांचा संशोधनातून व्यक्त झालेला संवाद त्यांच्या भाषेला तटस्थतेच शैली प्राप्त करून दिली. भाषेत कुठेही वादग्रस्त शब्द नसून संशोधनाच्या दिशा प्राप्त करून देणारे असंख्य विषय त्यांच्या संशोधनातून निर्माण होतात व पुढील पिढीला प्रेरणेचे स्त्रोत प्राप्त होतात. पारसनीसांच्या ग्रंथ संपदेतून किती तरी अज्ञात इतिहासकारांचे चरित्र लिहिले गेले आहे. त्याचे सुक्ष्मवाचन, लेखन, चिंतन, मनन यांचा परिपोष जाणवतो व तोच त्यांच्या साहित्य व लेखनशैली परिपक्वता आहे. ‘वर्णनशैली’ हा महत्वाचा गुण त्यांच्या लेखनाचा आहे. त्यांची वर्णनशैली डोळयासमोर चित्र निर्माण करणारी आहे. त्यांचे लेखन वाचत असताना ते हातातून खाली ठेवूच नये असे वाटते. वाचकांच्या मनाची पकड घेणारी त्यांचा भाषा उच्च दर्जाची आहे. लालित्यपूर्ण सौदर्यांची साज त्यास आहे. सौंदर्यस्थळे हा श्री राव बहादूर पारसनीसांचा भाषाशैलीचा अंतस्थ भाग आहे. साहित्यिकांना पुरून उरणारे त्यांचे लेखन, लेखनाची सौंदर्यस्थळे हा मराठी भाषेच्या अभ्यासकांचा संशोधनाचा विषय ठरेल. त्यावर मराठी साहित्यात व विद्याथ्र्यांनी संशोधन करणे आवश्यक आहे. ‘तळटिपा’ देतानाचे त्यांचा अभ्यास हाही संशोधनाचा अभ्यास आहे. महाभारत व रामायणाचा सखोल अभ्यास व मनन, चिंतन व कृष्ण अर्जुनाचा संवादाचा मनोविश्लेषणात्मक अभ्यासातून ऐतिहासिक लेखनातील ऊर्जा भाषेला अनुपम असे सौंदर्य प्राप्त करून देते. पारसनीसांच्या अंगच्या मुलभूत पराक्रमी संशोधक वृत्तीमुळे असे इतिहासकार या भारत देशाला लाभले.
‘क्रियासिध्दी : सत्वे भवति महता नोपकरणे’ हेच सिध्द होते.
संस्कृत भाषेचा अखंड झरा शब्दप्रभु पारसनीसांना शब्दांच्या पांडित्यातून तात्विक संशोधनात्मक लेखनास लालित्यमय बनवले. ही फार मोठी लेखनशैलीची ग्रंथ कामगिरी आहे. इतिहास लिहितांना, इतिहास लेखन करतांना, त्या विषयाच्या संदर्भातील अनेकांचे लिखाचे परिच्छेद मासलें दिले. इतिहास लेखनाला खऱ्या अर्थाने सूर्याच्या प्रकाशासारखे चमकत ठेवले. इतिहास लेखन करताना पारसनीसांनी अनेक बाजू मांडल्या - 1) काय चूक आहे, 2) काय बरोबर आहे 3) परिस्थितीजन्य काय आहे ? 4) अनेकांच्या मतांचे, विचारांचे खंडन-मंडनही केले 5) इतिहासाची ऐतिहासिक बाजू, भौगोलिक बाजू, वैचारिक बाजू व मानसिक बाजू. पराक्रमी स्त्रिया - याबद्दल प्रचंड आदर, प्रेम होते त्यांच्या शौर्याची गाथा ही त्यांच्या पराक्रमाच होतीच पण त्याचबरोबर त्या स्त्रिया परिपूर्ण सर्वांग दृष्टीने अभ्यास करून इतिहास निर्माण झाला तो लेखातून चिरंतन ठेवण्याचे स्त्री सन्मान वृत्ती त्यांच्या सुसंस्कृत संस्कारमय अशा विचारातून दिसते. श्री राबबहादूर पारसनीस यांच्या लेखनाची प्रस्तावना, उपसंहार व परिशिष्टे, संदर्भ हा इतिहास साहित्यिक संशोधनाचा महत्वाचा भाग ठरावा व त्यावरही संशोधन व्हावे, असे वाटते. श्री रावबहादूर पारसनीस यांचे लेखन संशोधन भविष्य काळातील संशोधकांना, अभ्यासकांना, मुमूक्षकांना एक फार मोठा दिपस्तंभ आहे. अशा दिपस्तंभाचे प्रतिकात्मक रूप प्रत्येक विद्यापीठाने इतिहास विभागात निर्माण करावे असे वाटते.
माझ्या पी.एच.डी.च्या प्रबंधास ‘सर्वोत्कृष्ठ प्रबंध’ असे परिक्षकांनी गौरवले तेव्हा ‘श्री रावबहादूर पारसनीसांवर व पारसनीस घराण्यावर श्री दत्तात्रयांचा प्रचंड वरदहस्त आहे. तुमच्यावर नाथसंप्रदायी सद्गुरूंचा वरदहस्त आहे व तुमची मेहनत आहे यामुळेच हे यश प्राप्त झाले आहे’ असे नाथसंप्रदायी संशोधक डॉ. म.रा. जोशी यांनी मला आवर्जून सांगितले. हा रावबहादुर पारसनीसांचा कर्तृत्वाचा सन्मान आहे.
मी त्यांची पणती विद्यावाचस्पती राधिका पारसनीस (गुप्ते) पुणे विद्यापीठातून नाथसंप्रदायावर (ज्ञानेश्वर योग प्रणित शिवदीन केसरी) यांच्यावर पी.एच.डी.प्राप्त केली आहे. मार्गदर्शक डॉ. कल्याण काळे, पुणे.
पूर्व जन्माचे सुकृत म्हणून मी या घराण्यात जन्माला आले हे माझे परमभाग्य आहे असा माझ्या पूर्वजांना माझे शतकोट वंदन !
प्रो. (विद्यावाचस्पती) राधिका पारसनीस-गुप्ते
M.A., Ph.D. B.Ed.
7506550492
आंतरराष्ट्रीय पातळीवरील नाथसंप्रदायी, संत वाड़मय,
मराठी विषयाची संशोधक, व्याख्याती,
लेखक प्रवचनकार
Email.: drradhikagupteaa@gmail.com
विश्व मराठी परिषदेचे टेलीग्राम चॅनेल सबस्क्राईब करा
Comments