top of page

मेव्यात मेवा 'रानमेवा'



अवघ्या सृष्टीला नवचैतन्याचा बहर येतो तो वसंत ऋतुत. या वसंत ऋतूचे एकदा का दिमाखदार आगमन झाले की सारी सृष्टी त्याच्या स्वागताप्रीत्यर्थ आनंदोत्सव साजरा करते. पळस, पांगारा, सावर यांसारख्या फुलझाडांचे अप्रतिम बहर, वाऱ्याबरोबर आसमंतात सर्वदूर पसरणारा आंब्याच्या मोहोराचा सुगंध, पिंपळासारख्या पानगळ होणाऱ्या वृक्षांवर उगवणारी कोवळी नवपालवी, कोकीळ पक्ष्याचे वैशिष्टयपूर्ण कूजन व इतर अनेक छोट्या-मोठ्या पक्ष्यांची शीळेवरची मधुर प्रेमगाणी, मधमाश्यांची फुलांवर मधुरस पिण्यासाठी उडालेली झुंबड, मोराचे पिसारा फुलवीत होणारे लयबद्ध नर्तन आणि जंगलात उगवलेली असंख्य सुंदरशी रानफुले अशा गोष्टींमधून निसर्गात हा वसंतोत्सव साजरा होताना दिसतो. या वसंत ऋतूत मधमाश्या, फुलपाखरं, पतंगं, इत्यादी कीटक तसेच पक्षी, वटवाघळे आणि वारा यांच्यामार्फत वनस्पतींमध्ये जेव्हा परागीकरणाची क्रिया घडते त्यानंतर झाडांवर उगवलेल्या फुलांमधून हळूहळू फळं धरायला सुरुवात होते. ऋतुचक्रानुसार वसंत सरून ग्रीष्माचे आगमन होताच सर्वत्र तापमानाचा पारा वाढल्याचे जाणवते. या ग्रीष्मातच बहुसंख्य फुलांचे रूपांतर पूर्णपणे पक्व फळांत होते. जांभळासारखे काही वृक्ष मात्र ग्रीष्मात बहरताना दिसतात व त्यांवर फळे ग्रीष्म सरतानाच्या काळात किंवा वर्षा ऋतूच्या आरंभापासून तयार होताना दिसतात. तर सर्वसाधारणपणे या ग्रीष्म ऋतुमध्ये भारतातल्या बहुतांश जंगलात झाडांवर रानफळे तयार होतात आणि ऐन मे महिन्यात उन्हाळी सुट्टीमध्ये सर्वांना रानफळांचा लाभ घेता येतो. या रानटी फळांनाच आपण सर्वजण 'रानमेवा' म्हणून ओळखतो.

रानमेवा! अहाहा! नुसते नाव घेतले तरी डोळ्यांसमोर डोंगरी आवळा, आंबुळकी, बोरं, करवंदे, जांभूळ, रातांबा, तोरणं, चारोळी, जांभळं, करवंद, ताडगोळे, आटकन, चिरबोटी, रायवळ आंबे, बकुळ, अळू, अंबाडा, खिरणी, भोकर, गोंदण, वराह कंद, कोनफळं, अमोनी, मेकीं, अटक, धामोडया अशी असंख्य आवडती रानफळं फेर धरू लागतात आणि त्यांची भन्नाट चव जीभेवर तरळून तोंडाला अगदी पाणी सुटते. रानमेव्याच्या स्वर्गीय चवीचे चपखल शब्दांत काटेकोरपणे वर्णन करणे केवळ अशक्यच आहे म्हणून मी येथे लय भारी! या अर्थी 'भन्नाट' या एकाच शब्दात त्या चवीचे वर्णन करत आहे जे मला वाटते त्याच्या अस्सल गावरान स्वादास आणि रांगड्या रुपास अगदी शोभणारे आहे.

रानमेवा म्हणजे रानात, जंगल व गाव यांच्या सीमेवरील मोकळ्या जागेमध्ये आणि जंगलांजवळील वस्त्यांत वा शेतमळ्यात कोणतीही लागवड, मशागत किंवा खास देखभाल न करता नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या व वाढणाऱ्या वनस्पतींवर पिकणारी फळे. रानमेव्याला 'माकडमेवा' असे पण म्हणतात. याचे माकडमेवा हे नाव अधिक योग्य वाटते कारण ही फळे माणसांपर्यंत पोहोचायच्या आधी ती लाल तोंडाच्या माकडांनी किंवा काळ्या तोंडाच्या हनुमान वानरांच्या टोळीने फळांनी लगडलेल्या झाडांवर उडया मारत तिथेच फांद्यांवर मुक्काम ठोकून मजेदार झोके घेत गट्टम केलेली असतात. अर्थातच माकडांबरोबर खारी, पक्षी, वटवाघळे, मुंग्या, उंदीर, रानससे यांनीदेखील या रानफळांच्या मेजवानीवर अगदी भरभरून ताव मारलेला असतो. याशिवाय जंगलाचाच एक अविभाज्य भाग असणारे व जंगलातच आदिम काळापासून वास्तव्यास असणारे आदिवासी आणि जंगलांजवळील गावांमधील गावकरी हे देखील हा रानमेवा झाडावरून तोडून तसाच नुसता आवडीने खातात इतकेच नाही तर त्याचे कोशिंबीर, भाजी, खीर, लोणची, सरबते, चटणी असे असंख्य पौष्टिक पदार्थ ते स्वतःच्या कुटुंबासाठी तयार करतात. ही रानफळं म्हणजे या आदिवासींचे व वर वर्णन केलेल्या जंगली पशु-पक्ष्यांचे मुख्य खाद्य असते आणि खरं तर त्या फळांवर त्यांचाच प्रथम अधिकार असतो. या रानफळांमधून या आदिवासींना व जंगलातल्या प्राण्यांना शरीरास आवश्यक असणारी जीवनसत्वे, प्रथिने, लोह व कॅल्शियम मिळत असते.

तसेच हा आदिवासी समाज उदरनिर्वाहाचे साधन म्हणून झाडांवरून उतरवलेला रानमेवा पाट्यांमध्ये ओतून त्या टोपल्या घेऊन तो माल स्वतः गावाच्या बाजारात गाळ्यावर बसून किंवा गावातील जत्रा, प्रसिद्ध पर्यटन स्थळे, बस स्टँड, रेल्वे स्टेशन यांसारख्या गर्दीच्या ठिकाणी जाऊन तिथे विकताना दिसतो. परंतु अशा थेट विक्रीकरिता त्यांना खूप वेळ द्यावा लागतो व अधिक कष्ट करावे लागतात. तसेच रानमेवा एकदम पिकून खराब झाल्यास त्याची विक्री न होण्याची भीती असते. अशा कारणांमुळे बरेचसे आदिवासी झाडांवरून रानमेवा काढल्यावर लगेच तो सर्व मेवा मोठ्या फळ विक्रेत्यांना विकण्यास प्राधान्य देताना दिसतात. अशा प्रकारे रानमेव्याचा प्राथमिक विक्रेता हा जंगलातील आदिवासी असून त्यांच्या मार्फत शहरवासीयांना रानमेव्याचा लाभ घेता येतो. कोकणातील रहिवाश्यांसारखे थेट झाडावरून रानमेवा तोडून खाण्याचे भाग्य आम्हा शहरवासीयांना मिळत नसले तरी आम्ही सर्व नातवंडे लहानपणी आजी-आजोबांबरोबर तळेगाव, कामशेत, बनेश्वर, महाबळेश्वर, भीमाशंकर, पाचगणी, लोणावळा व खंडाळा अशा ठिकाणी गेलेलो असताना तेथील रानमेवा थेट झाडांवरुन काढून खाण्याचे सुख पुरेपूर उपभोगलेले आहे.

सुमारे वीस एक वर्षांपूर्वी वर नमूद केलेला अगदी सर्वच्या सर्व रानमेवा जरी नाही तरी त्यातील बराचसा रानमेवा शहरांमधील भाजी मंडईत, बस स्टँड, रेल्वे स्टेशन, शाळा-महाविद्यालयांबाहेर किंवा अगदी दारावर देखील सहज मिळायचा. परंतु आजकालच्या पोशाखी व चकचकीत शहरी जीवनात रानमेवा आपली ओळख हरवून बसलाय. इथे शहरात रानमेव्याची जागा काही देशावरच्या व बहुसंख्य विदेशी फळांनी कधी घेतली हे लवकर समजले पण नाही. मागणी तसा पुरवठा हा न्याय लक्षात घेता याला आपण शहरवासीयच कारणीभूत आहोत. आपणच जर बाजारात विक्रीस ठेवलेला रानमेवा विकत घेतला नाही, बाजारात दरवर्षी ठराविक काळात मिळणारा रानमेवा जर एखाद्या वर्षी उपलब्ध नसेल तर तो रानमेवा हवा अशी फळविक्रेत्यांकडे मागणी केली नाही तर हा अस्सल रानवट रुपडं ल्यालेला रानमेवा नक्कीच दुर्लक्षित होऊन हळूहळू विस्मृतीत जाण्याचा धोका निर्माण होईल. खरं तर आता असा धोका निर्माण झालेलाच आहे. अलीकडे शहरातील मुलांना रानमेवा म्हणजे काय हे मुळी ठाऊकच नाही. तरी अलीकडे आरोग्याबाबत बरीच सजगता निर्माण झाली आहे व अनेक डॉक्टर्स, आहारतज्ञ हे आपल्या भूभागात पिकणारा रानमेवा आहारात जरुर अंतर्भूत करावा असे सांगत आहेत.


थोडक्यात, रानमेवा का महत्त्वाचा आहे? तर

(१) रानमेवा हा रानातील पशु-पक्षी व आदिवासींना अन्न पुरवतो.

(२) रानमेव्यामध्ये अनेक औषधी गुण आहेत त्यामुळे सर्व प्राण्यांकरिता रानमेवा हा आरोग्यदायी आहे.

(३) रानमेवा हा भारतात ज्या प्रदेशात उगवतो त्या प्रदेशातील जैवविविधतेचे प्रतिनिधित्व करतो.

(४) प्रत्येक रानफळ उर्फ रानमेवा हा 'या सम हाच!' अशा विशिष्ट रूपाचा व चवीचा आहे.


रानमेव्याच्या संवर्धनासाठी काय करणे आवश्यक आहे?

(१) सर्वप्रथम जंगलांचे संरक्षण व संवर्धन करणे आवश्यक आहे. जंगल वाचवले तर साहजिकच त्यामधील रानमेवा वाचवला जाईल.

(२) रानमेव्याचे औषधी गुण समाजापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. याकरिता शहरांमध्ये रानमेव्याबाबत मोठ्या प्रमाणात माहिती प्रसारित झाली पाहिजे. कारण रानमेव्यासंबंधित जनजागृतीच झाली नाही तर त्यांची नावे देखील आजच्या पिढीला कळणार नाहीत.

(३) वृक्षलागवड करते वेळी प्रदेशनिष्ठ रानमेव्याचा विचार करून त्या झाडांच्या लागवडीस प्राधान्य दिले पाहिजे.


तर मग आपण आपला लाडका रानमेवा वाचवण्यासाठी आपल्यास जमेल तसे प्रयत्न नक्कीच करू शकतो. होय ना?



लेखिका: प्रिया फुलंब्रीकर

मो: 9766623409



1,839 views1 comment

1 Comment


Deepak Bhalerao
Deepak Bhalerao
Oct 21, 2020

लेखिकेने सुंदर वर्णन करून रानमेवा डोळ्यासमोर आणला तसेच त्याचे महत्व आणि त्याचे संवर्धन करण्याचे उपाय सुद्धा विशद केले आहेत.

Like
टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page