top of page

प्रेरणास्रोत

Writer's picture: Vishwa Marathi ParishadVishwa Marathi Parishad

माझी आई ही माझं खरं प्रेरणास्रोत आहे, तसं म्हटलं तर, आमच्या किंवा आमच्या मुलांच्या पिढीसाठी ती जीवन जगण्याचे स्रोत आहे, असं म्हटलं तर ते चुकीचे ठरू नये.

आजमितीस माझ्या आईचे वय वर्ष 87 आहे. परंतु तरूणालाही लाजविल, असा उत्साहाचा खळखळता झराच जणू ती आहे. मुंबई सारख्या महानगरातील "दहिसर" सारख्या उपनगरात आई रहाते. माझे भाऊ जवळपासच रहायला आहेत. आईकडे येऊन-जाऊन असतात.


दोन वर्षांपूर्वी माझ्या बाबांचे वार्धक्याने निधन झाले. माझा मामेभाऊ निराधार आहे, त्याला आईने आपल्या घरी ठेवून घेऊन, दहावर्षापासून आधार दिला आहे.

वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षीसुद्धा, माझी आई पूर्णपणे स्वावलंबी जीवन आनंदाने जगत आहे. अजूनही ती रोजच्या स्वयंपाकाव्यतीरिक्त, यु ट्युबवरील पदार्थांची रेसिपी पाहून, आपल्या किचनमध्ये स्वतःच्या कल्पनाशक्तीने, प्रयोग करून नवीन चविष्ट पदार्थ बनवित असते. आणि सगळ्यांना खाऊ घालत असते. मासांहारी जेवण करण्यात अतिशय तरबेज असलेली माझी आई, जेव्हा माशांचे कालवण वगैरे करते,तेव्हा दादाला, माझ्या मोठ्या भावाला फोन करून जेवायला घरी बोलावून घेते. तसेच सौरभ (भाचा) त्याच्यासाठी मुद्दाम डब्यात पाठवून देत असते. ती उत्तम गृहीणी तर आहेच, परंतु ती पाककलेतही निपुण आहे. आराम करणे हे तिच्या बहुदा रक्तातच नसावे.

पाच-सहा दिवसांवर "दिवाळी" येऊन ठेपली आहे. हीचा उत्साह काय विचारू नका. फोनवरून मला सांगत होती "माझ्या फराळाच्या तीन वस्तू बनवून पण झाल्या". मी अजून सुरुवातही केली नाही. तिचा सळसळता उत्साह पाहीला की, आम्हालाच खजिल झाल्यासारखे वाटते. दोन्ही वहिन्या व माझी आपापसात मग चर्चा चालते, "आईची कमाल आहे. ह्या वयात आम्ही काही करायचे म्हटले की कंटाळा करतो". धन्य ती आमची आई.



बरं तिच्याकडे नुसतेच पाककौशल्य नाही तर ह्या वयात ती शिवणकामही तेवढ्याच हौसेने करते. वेगवेगळ्या डिझाईनच्या कापडी पर्सेस तसेच कापडी पिशव्या, हौस म्हणून, शिवत असते. व त्या नातेवाईकांना भेट म्हणून देत असते. तिला माणसांच्या गोतावळ्यात रहायची आणि गप्पागोष्टी करायची खूप आवड आहे, त्यामुळे भावंडांचा मेळावा तिच्या अवती-भवती जमलेलाच असतो. नातलगांचा तिला भारी लळा. त्यामुळे फोनवरून खबरबात घेणे चालूच असते.



नवल म्हणजे ह्या वयात ती मोबाईलही व्यवस्थित हाताळते. कालच तिला, तिच्या नातीने दिवाळीनिमित्त नवीन मोबाईल घेऊन दिला आहे. लगेच मला विडीयो काॅल करून, आनंदाची

बातमी दिली. मलाही तिथे असलेल्या माझ्या सगळ्या माणसांशी प्रत्यक्ष बोलता आले व पहाताही आले. अशी माझी आई उत्साहाचा झराच जणू.

माझ्या आईला फिरायला किंवा हाॅटेलमध्ये जायला खूप आवडते. तसेच पत्ते खेळणे हा तिचा आवडीचा छंद आहे. अजूनही आम्ही सगळी भावंडे एकत्र जमलो की, आमचा पत्त्यांचा डाव रंगत असतो व त्यात आईचा पहिला पुढाकार असतो. कामाला येणार्‍या बाईने कधी रजा घेतली, की आईची भांडी वगैरे कधी धुवून तयार होतात, ते कळतही नाही, एवढी प्रत्येक कामात प्रचंड उर्जेने, न थकता किंवा न कंटाळता ती कामं उरकत असते. मी माहेरी गेले की अजूनही, आईच्या जीवावर काढलेले माहेरपणातील

ऐशोआरामाचे दिवस, घरी परत आल्यावर आठवण काढून काढून त्यांत रमत असते.



आईचा ह्या वयातही काम करण्याचा जोश पाहून, मला कधीतरी कामामुळे आलेली मरगळ ही, एका फटक्यात दूर होते व परत आईची प्रेरणा घेऊन, मी तितक्याच जोमाने काम करू लागते.

आमच्या कुटुंबासाठी आमची आई ही सदैव आमचे "प्रेरणास्रोत" बनली आहे. माझी परमेश्वरापाशी कायम हीच प्रार्थना राहील की "आईचे शरीर निरोगी राहो आणी शेवटपर्यंत असेच स्वावलंबी व आनंदी जीवन तिला लाभो. आम्हाला तिचे अखंड मार्गदर्शन मिळत राहो."



पुष्पा सामंत.

नाशिक 6-11-2020.

Samant1951@hotmail.com


विश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअ‍ॅप लिस्टमध्ये सामील व्हा - 7066251262 हा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMP असा मेसेज पाठवा

576 views2 comments

2 Comments


अतिशय आई विषयक प्रेरणदायी लेख लिहून आईच्या कौतुकास्पद कार्यशैलीचा चित्रण आपण लेखनात छान पैकी रेखाटले आहे 87 वर्षाची तुमची आई एक तरुण पिढीला लाजवेल असे त्यांचे कार्य खूपच अतुलनीय आहे जिव्हाळा,प्रेम,आणि आपलेपणा असलेले त्यांच्या गुणांना सलाम आपण उत्कृष्ट मर्म लेखन केले आहे.

Like

Deepak Bhalerao
Deepak Bhalerao
Mar 15, 2021

मला वाटते विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉग वर आलेला लेखिकेचा हा दुसरा लेख आहे. जीवनात येणारे प्रसंग बारकाव्या सहित साध्या भाषेत वर्णन करणे ही लेखिकेची शैली दिसते. आपल्या आईबद्दल असणारा आदर आणि प्रेम हे त्यांनी अगदी कमी शब्दात आणि थोड्या प्रसंगातून सुंदर वर्णन केले आहे. उतार वयात आनंदी आणि कार्यतत्पर राहून इतरांना आनंद देणारे त्यांच्या आईचे व्यक्तिमत्त्व हे प्रेरणादायी खरे. परंतु हे जितके छान लेखिकेने वर्णन केले आहे तसे इतरांना जमेल असे नाही. लेखिकेने आपला साहित्यिक प्रवास यापुढेही असाच चालू ठेवावा आणि वाचकांना नवनवीन काहीतरी देत रहावे यासाठी लेखिकेला खूप खूप शुभेच्छा.!

Like
टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
Vishv Marathi Parishad logo transperent.

विश्व मराठी परिषद

कार्यालय  : ६२२, जानकी रघुनाथ, पुलाची वाडी, झेड ब्रिज जवळ, डेक्कन जिमखाना, पुणे, महाराष्ट्र - ४११००४
भ्रमणध्वनी : ७०३०४११५०६  | व्हॉटसअप : ७०६६२५१२६२ |  ईमेल : sampark@vmparishad.org
वेळ: सकाळी ११ ते सायं. ७ 
  • व्हॉटसअप
  • फेसबुक
  • इंस्टाग्राम
  • टेलिग्राम
  • युट्यूब चॅनेल
WhatsApp.png

© Vishwa Marathi Parishad

bottom of page