top of page

माझा पहिला परदेश प्रवास !


पुलंची ‘अपूर्वाई’ वाचल्यापासुनच परदेशप्रवासाची मनात एक सुप्त इच्छा होती. पाचदहा वर्षांपूर्वी परदेश प्रवासाची खुप अपुर्वाईवाटत होती. अनेक प्रवासी कंपन्यांनी परदेशी टुर्सच्या बऱ्याच स्वस्त आणि मस्त ॲाफर्स दिल्या होत्या, ते वाचून मन भराऱ्या मारायलालागले होते. बॅंकेतली जमा पुंजी आणि कुटुंबाच्या कमी होत आलेल्या जबाबदाऱ्या परदेश प्रवासाच्या स्वप्नाला हिरवा कंदिल दाखवत होत्या. मनातआशेचे कारंजे थुईथुई उडायला लागले होते. वेगवेगळ्या प्रवासकंपन्यांची ब्रोशर्स घरात येऊन पडली आणि घरात चर्चा रंगायला लागल्या! शेवटी सर्वानुमते केसरीने युरोपसाठीदिलेल्या ॲाफरचा आम्ही स्वीकार केला आणि पैसे भरून आमच्या दोघांच्या सीट्स बुक केल्या . मन थोड साशंक होतं कारण आम्हा दोघांनाही परदेश प्रवासाचा योग नसल्याच बऱ्याच ज्योतिषी मित्रांनी सांगितलं होतं!! थंडीच्या कपड्यांची व इतर आवश्यक सामानाची खरेदी करताना मनात धाकधुक होतीच त्यामुळे जर टुर कॅन्सल झालीच तर इथेही नंतरउपयोगी येतील अश्या बेताने खरेदी झाली.व्हिसा, तिकीटे वगैरे कागदपत्रेही हातात येऊन पडली, आणि २३ मेची आम्ही खुपच उत्सुकतेने वाट पाहू लागलो! रोज आम्ही दोघांच्या घरच्या वयोवृद्धांचे क्षेम विचारत होतो( कशा साठी ते कळलच असेल)स्कुटर अगदी काळजीपुर्वक आणिआवश्यक तिथेच चालवत होतो, साथीच्या रोगांची औषधे घेत होतो आणि योगासने वगैरे करून स्वत:ला फ़ीट ठेवण्याचा प्रयत्न करतहोतो.ज्यायोगे टुर कॅन्सल होण्याचे चान्सेस कमी होतील!! शेवटी तो दिवस उजाडला, हुरहुरत्या मनाने आम्ही एअरपोर्टला पोचलो आणि फ्लाईट रद्द वगैरे नाहीना ह्याची खात्री केली, मग भव्यआणि सुंदर असे मुंबईचे एअरपोर्ट डोळे भरून पाहून घेतले!! ईमिग्रेशन वगैरे करून विमानात पाय ठेवला. मित्रांच्या भविष्याला खोटं ठरवत जेंव्हा दुसऱ्या दिवशी पॅरीसच्या विमान तळावर सुखरूप पोहचलो, तेंव्हा डोळ्यातून पाणीच येऊलागले!! एअरपोर्ट मधून बाहेर पडल्यावर बर्फांच्या लाद्यांतून चालतोय की काय असं वाटत होतं! आम्हाला न्यायला जी आलिशान, चकचकीत बस आली होती त्यात आमची सीट शेवटची होती त्यामुळे वाटलं आता हाॅटेलमधे पोचेपर्यंत कमरेचे टाके ढिले होणार! पणपॅरिसच्या मृदुमुलायम खड्डेविरहीत रस्त्यांवरून आमची बस अगदी एकही धक्का न मारता तरंगल्यासारखी चालली होती.कमरेचे टाकेचकाय पोटातले पाणीही हलले नाही! एका उत्कृष्ट हाॅटेलात आमचे दोन दिवस वास्तव्य असणार होते. दुपारी फ्रेश होऊन चहापान झाल्यावर आम्ही जगप्रसिद्ध ( सात आश्चर्यांपैकी एक) आयफेल टाॅवर बघण्यासाठी बाहेर पडलो. टाॅवरच्यासगळ्यात शेवटच्या टोकावर जाण्यासाठी वेगवान लिफ्ट्स आहेत. वर पोचल्यावर डोळ्याचे पारणे फिटले! अतिशय विहंगम दृश्य दिसतहोते. सुंदर आखीवरेखीव रस्त्यांवरून फिरणाऱ्या चिमुकल्या गाड्या, दुतर्फा असणाऱ्या बागा, क्रिडांगणे आणि परीकथेतल्यासारखेनदीवरचे कमानदार छोटे छोटे पूल!! नंतर रात्रीच्या प्रकाशातला दिव्यांच्या रोषणाईत न्हायलेला आयफेल टाॅवर!! दुसऱ्या दिवशी सकाळी फ्रेश होऊन खाली ब्रेकफास्टसाठी खाली आलो, डायनिंगरूममधला नाश्त्याचा थाट बघितल्यावर थक्कच झालो, तऱ्हेतऱ्हेचे बेकरी प्राॅडक्ट्स, पॅनकेक्स, फळे, फळांचे ताजे ज्युस, चहा,काॅफी, हाॅट चाॅकलेट्स आकर्षक रितीने मांडले होते, कोणताहीपदार्थ कितीही आणि कितीही वेळा घेऊ शकतो हे ऐकल्यावर आमच्या भारतीय मनाला पोट खुपच छोटं असल्याचे दु:ख झालं!!! नंतर सुंदर कलात्मक म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या पॅरीस शहराच्या दर्शनास गेलो. लांबरूंद रस्ते,त्यांच्या दुतर्फा लावलेली सुंदर फुलझाडे, स्वच्छ हिरवेगार बगिचे, क्रिडांगणे आणि चालणाऱ्या लोकांसाठी फेरीवाल्यांचा अडथळा नसलेले प्रशस्त फुटपाथ बघुन डोळ्यात अश्रूचदाटले!! तिसऱ्या दिवशी होते आमचे ड्रीम डेस्टिनेशन स्वित्झर्लंड!!!अत्यंत मनोरम, निसर्गरम्य, सुबक देखणे ही सगळी विषेशणे कमीच पडतीलत्याचे वर्णन करायला! उगीच यश चोप्रा आणि मंडळींनी त्याला अनेक पिक्चरचे लोकेशन नाही बनवलं ! नंतरचे स्थान होते माऊंट टिटलीसचे ऊंच बर्फ शिखर! वरपर्यंत पोचायला गंडोलातून (रोपवे) जाव लागत, तीथे मनसोक्त बर्फात खेळायला मिळाले, पण ही हिमाच्छादित पर्वतशिखर पाहूनअस वाटल की आपल्या काश्मीरच सौंदर्य ह्याहुन तसुभरही कमी नाही पण हे समजायला दोन अडिच लाख खर्च करावे लागले. स्वित्झर्लंडमधील ट्रेन बद्दल खुप ऐकले होते,खरोखरच खुपच फास्ट आणि अतिशय नयनरम्य परिसरातून जाते ही रेल्वे! इंटरलाकेनचा यश चोप्रांचा पुतळा असलेली बाग म्हणजे त्यांच्या पिक्चरना दिलेला मानाची सलामीच आहे. आमचा पुढचा मुक्काम होता इटलीतील फ्लोरेंन्स सिटी! तिथले फाऊंटन म्हणजे माझा आवडता सिनेमा रोमनहाॅलिडेज् मधले सुप्रसिद्ध कारंजे! जिथे नाणे टाकले असतां म्हणे आपली इच्छा पुर्णहोते( बघा तिथेही अंधश्रद्धा आहेतच)! जिथे ग्रेगरी पॅक वा ॲाड्र्रीची इच्छापूर्ती झाली नाही तिथे आपली काय कथा!! असो! रोम हे ऐतिहासिक दृष्ट्या खुप प्रसिद्ध !! त्याचा ऐतिहासिकपणा चांगला जपलाय त्या लोकांनी. आपल्या हिंदू संस्कृती प्रमाणे रोमन संस्कृती पण अत्यंत प्राचीन आहे. रोमन देवता,लढवय्ये ह्यांचे अनेक प्रमाणबद्ध पुतळे जागोजागी बघायला मिळतात.ग्लॅडिएटर मुळे प्रसिद्धिस आलेले प्राचीन कोलोझियमबघताना तिथे होणाऱ्या गुलामांच्या प्राणांतिक लढतींबद्दल वाचलेले आठवल्यामुळे अंगावर काटा उभा राहिला!! दुसऱ्यादिवशी जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक पिसाचा झुलता मनोरा बघायला जायचे होते. खुपच एक्साईट झालो होतो आम्हीसगळे! दोनच दिवसांपूर्वीच एक आश्चर्य बघुन झाले होतेच! एका अभियंत्याच्या चुकीमुळे कललेला हा मनोरा, नंतर कितीही प्रयत्न केले तरी सरळ झाला नाही, तेंव्हापासुन तो तसाच कितीवर्षांपासून आहे म्हणे!! मानवाच्या कर्तृत्वाला पण खरच सलाम करावा वाटला! ख्रिश्चन धर्मगुरूंची सत्ताच फक्त जिथे चालते अश्या ख्रिस्त बांधवांच्या पवित्र व्हॅटिकन सिटीमधे ट्रीप संपन्न होणार होती. ह्या सिटीला जगातील सर्वात छोट्या राष्ट्राचा मान दिला गेलाय! सुंदर कलाकुसर आणि ख्रिस्ताच्या जीवनातल्या प्रसंगांचे चित्रिकरण ( the last supper हे सगळ्यात गाजलेल चित्र ) सगळ्या भिंतीवर केलेले आहे. जागोजागी संगमरवरी शिल्पे आहेत! सगळ खुपच भव्यआहे, पण माझ्या भारतीय मनाला ह्याच्या तोडीची किंवा जास्तच सरस अशी आपल्या देशातील अनेक शिल्पे आठवली!! असो! परतीचा प्रवास फारच कंटाळवाणा वाटू लागला होता , घराचे वेध लागले होते,पंजाबी जेवण, पिझ्झा वगैरे खाऊन कंटाळलेल्याजीभेला पिठलं भाकरी ठेच्याचे डोहाळे लागले होते! मुंबई एअरपोर्टला लॅंड झालो, टॅक्सीत बसलो, डोळ्यावर पेंग होती. रस्त्यातल्या खड्डयांचा आणि सरकारचा आईबहिणीवरून टॅक्सीवाला करत असलेला उद्धार कानावर पडल्यामुळे , परदेशाच्याचकचकीत स्वच्छ वातावरणात विहरत असलेल्या मनालाही खाडकन जाग आली आणि खात्री पटली आपण स्वगृही परत आलोआहोत!!! रेवती कुलकर्णी

बंगलोर.

Email.: rewatikulkarni11@gmail.com

129 views0 comments

Comments


टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page