top of page

पौराणिक इतिहास


सर्गश्र्च प्रतिसर्गश्र्च वंशो मन्वन्तराणि च|
वंशानुचरितं चेति पुराणं पञ्चलक्षणम् ||

असे पुराणांबद्दल म्हटले जाते. ह्या श्लोकाचा अर्थ असा की, प्राचीन आख्यान, उपदेशप्रधान दीर्घवर्णन, नृपवंशावली, विश्वरचनेसंबंधी चर्चा आणि आणि मन्वन्तर म्हणजेच कालांतर या पाच विषयांना पुराणांची लक्षणे मानले आहे. 'पुराण' हे भारतातील प्राचीन साहित्य आहे. 'पुरा नवं भवति' अर्थात जे प्राचीन असूनही नवीन भासते, असा बोध पुराण या शब्दातून होतो. पुराण म्हणजे जुने किंवा प्राचीन व पुराण या शब्दाचा शब्दशः अर्थदेखील प्राचीन किंवा जुने असाच आहे. प्राचीन काळात आपल्या भारतात पुराणांची निर्मिती झाली. तेव्हापासून पुराणांचे ज्ञान मागील पिढ्यांकडून पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचू लागले. आजही पुराणांवर शोधकार्य करणारे, त्यांचा अभ्यास करणारे तज्ञ आहेत. हिंदू संस्कृतीत पुराणांना महत्त्व आहे आणि आणि पुराणांतील कथांचा आधार घेऊन मुलांवर चांगले संस्कारही केले जातात. पुराणांमध्ये त्याग, उत्सव, वर्ण, दान यांचेही महत्त्व दिले गेले आहे. पुराणे देवाची प्रार्थना व पूजा करणे यांची शिकवण देतात. ब्रह्मांडाची उत्पत्ती, सूर्यवंश व चंद्रवंश आणि देवांची, राजांची, असुरांची तसेच ऋषींची वंशावळ ह्या गोष्टींचादेखील पुराणांमध्ये समावेश आहे. पुराणांमध्ये देवांच्या, राक्षसांच्या, ऋषींच्या तसेच राजांच्या कथांचाही समावेश आहे. वेदांतील तत्वज्ञान सर्वसामान्य लोकांना कळावे म्हणून पुराणांची निर्मिती केली गेली असेही म्हटले जाते. पुराणांची रचना महर्षी व्यासांनी केली होती असेही म्हटले जाते. सुरुवातीला एकच पुराण वाड़मय होते, नंतर विविध प्रकारची पुराणेही अस्तित्वात आली असेदेखील म्हंटले जाते. सुरुवातीला उपलब्ध असलेले एक पुराणवाड़मय महर्षी व्यासांच्या काळाअधी अस्तित्वात होते व नंतर व्यासांनी विविध पुराणांमध्ये त्याचे विभाजन केले असेदेखील म्हटले जाते. गुप्त साम्राज्याच्या वेळी पुराणांना गोळा करण्यात आले होते. गुप्त साम्राज्याच्या काळानंतरही पुराणांमध्ये सुधारणा व विस्तारदेखील करण्यात आला. पुढे अनेक वर्षे पुराणांमध्ये विस्तार झाला. पुराणे अनेक पुजाऱ्यांनी देखील सुरक्षित ठेवली अर्थात त्यांचे जतन केले असेही म्हटले जाते. पुराणे लेखी स्वरुपात उपलब्ध होण्याआधी वाणीद्वारे त्यांचे ज्ञान दिले जात होते, अस्तित्वात होते असेदेखील म्हटले जाते.


हिंदू संस्कृतीत विविध प्रकारच्या पुराणांचा समावेश आहे. यात अठरा प्रकारची मुख्य पुराणे आहेत व ती पुढीलप्रमाणे, मत्स्यपुराण, मार्कण्डेयपुराण, भविष्यपुराण, भागवतपुराण, ब्रह्मपुराण, ब्रह्मवैवर्तपुराण, ब्रम्हाण्डपुराण, विष्णुपुराण, वराहपुराण, वामनपुराण, वायुपुराण, अग्निपुराण, नारदपुराण, पद्मपुराण, लिंगपुराण, गरुडपुराण, कूर्मपुराण, स्कंदपुराण. महर्षी व्यासांनी रोमहर्षण या त्यांच्या पट्टशिष्याला या अठरा पुराणांचे सर्व अधिकार आणि ज्ञान दिले. रोमहर्षणाने पुढे त्याच्या प्रमुख सहा शिष्यांना ते ज्ञान दिले व त्यातील संहिता शिकवली. अशाप्रकारे या अठरा पुराणांच्या संहितांचा विस्तार झाला. वाल्मिकी ऋषींनी रचलेल्या रामायण व महर्षी व्यासांनी रचलेल्या महाभारत या महाकाव्यांचा समावेशही पुराणांमध्ये होतो. ही काव्ये हिंदू संस्कृतीत प्रसिद्ध आहेत. काही तज्ञांच्या मते विविध पुराणांच्या प्रथमावृत्तीची रचना सामान्य युगाच्या तिसऱ्या शतकापासून दहाव्या शतकापर्यंतच्या काळात झाली. पुराणांनुसार सृष्टीवर सत् युग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग ही क्रमशः चार युगे आहेत. पुराणांचा आधार घेऊन पाहिले तर आजचे युग हे कलियुग आहे.


पुराणांमध्ये भक्ती, श्रद्धा, धर्माचरण, देव यांना महत्त्व दिले गेले आहे. सर्वसामान्यांना या सर्व गोष्टींचे ज्ञान पुराणांमुळेच मिळाले व या गोष्टींचे आचरण हिंदू संस्कृतीत मोठ्या प्रमाणात होते. हिंदू संस्कृतीत पुराणांना फार महत्त्व आहे.


पुराणांनुसार विष्णुदेवाच्या नाभीतून कमळ आले व त्या कमळातून ब्रह्मदेवाचा जन्म झाला. ब्रह्मदेवाने पुढे सृष्टीची रचना केली. गरुड पुराणानुसार विष्णुदेवाची उत्पत्ती सुवर्ण अंडबीजातून झाली. विष्णुपुराणात उल्लेख असल्याप्रमाणे 'पुरुष'या संकल्पनेतून, या शक्तीपासून सृष्टीची उत्पत्ती झाली व 'पुरुष' हा विष्णुदेवाचाच एक भाग होता. काही पुराणांनुसार ब्रह्मदेवापासून तर काही पुराणांनुसार विष्णु देवापासून सृष्टीची उत्पत्ती झाली.


पुराणांमध्ये गणपती देवाबद्दलच्याही गोष्टी/घटना आहेत. त्याही प्रसिद्ध आहेत. त्यांतील गणपती देवाच्या जन्माची गोष्ट अशी की, पार्वतीने अर्थात शंकराच्या पत्नीने स्नान करताना शरीरावर लावलेल्या चंदनापासून (काही गोष्टींनुसार शरीराच्या मळापासून) एक शरीर बनवले व त्याला जीवन दिले, सजीव बनवले. अशाप्रकारे गणपतीचा जन्म झाला. नंतर पार्वतीने गणपतीला स्नानगृहाचे रक्षण करण्यास सांगितले. परंतु शंकराला आतमध्ये प्रवेश करायचा होता. गणपतीने शंकराला असे करू दिले नाही म्हणून शेवटी चिडून शंकराने आपल्या त्रिशूळाने गणपतीचे मस्तक त्याच्या शरीरापासून वेगळे केले. पार्वतीला ही गोष्ट कळताच तिला राग अनावर झाला. तिने आपला राग व दुःख व्यक्त करत शंकराला गणपती देवाच्या जन्माची गोष्ट सांगितली. शंकर आणि लगेचच आपल्या गणांना जंगलात पाठवले व तेथे सापडणाऱ्या पहिल्या प्राण्याचे मस्तक घेऊन येण्याचा आदेश दिला. गणांनी आदेशानुसार हत्तीचे मस्तक आणले. शंकराने हे मस्तक गणपतीच्या मृत शरीराशी जोडले व गणपतीला जीवनदान दिले. या गोष्टीने पार्वतीला आनंद झाला. गणपती देवाला आद्यपूजेचा मानदेखील मिळाला. म्हणून आज आपल्या हिंदू संस्कृतीत गणपतीची पूजा इतर देवांच्या आधी केली जाते. गणपती हा शंकर व पार्वतीचा पुत्र व कार्तिकेयाचा भाऊ होता. गणपतीचे देवाचे वाहन उंदीर होते. त्याने अनेक असुरांचा वधदेखील केला होता.


नंतरच्या काळात आलेल्या किंवा नवीनतम पुराणांमध्ये विष्णु देवाच्या दशावतारांनाही महत्व दिले गेले आहे व त्यांचा उल्लेखही केलेला आहे. नंतर आणखी नवीनतम काळात जयदेव नावाच्या साहित्यिकाने यांस नवीनतम पुराणांचा आधार घेऊन 'गीतगोविन्दम' हे काव्य विष्णु देवाच्या दशावतारांवर केले. विष्णु देवाच्या ह्याच दशावतारांची थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे.


मत्स्यावतार: पुराणांनुसार विष्णु देवाने मत्स्यावतार धारण करून हायग्रीव नावाच्या दुष्ट राक्षसाला मारले व त्यानेे ब्रह्मदेवाकडून चोरलेलेे वेद स्वतःजवळ सुरक्षित ठेवलेे. हायग्रीवाच्या दुष्ट योजनांमुळे पृथ्वी जणू अशुद्ध झाली होती. वेदांना सृष्टीला सोपविण्यासाठी सृष्टीची शुद्धी आवश्यक होती. म्हणून विष्णु देवाने शंकराच्याा मदतीने पृथ्वीवर प्रलय आणला. मनु किंवा सत्यव्रत मनु या विष्णुदेवाच्या परमभक्ताच्या मदतीने विष्णु देवाने सृष्टीतील आवश्यक व्यक्ती, वनस्पती यांना मत्स्य अवताराच्या रूपाने नौकेद्वारे प्रलयातून तारून नेले आणि नवे जीवन दिले. विष्णु देवाने नंतर वेद मनुकडे सोपवले.


कूर्मावतार: पुराणांनुसार एकदा दुर्वासा ऋषी स्वर्गात इंद्रदेवाला भेटायला गेले. त्यांनी इंद्रदेवाला एक पुष्पमाळ भेट दिली. ती पुष्पमाळ इंद्रदेवाने ऐरावत यााा त्याच्या हत्तीला दिली. ऐरावताने ती स्वतःच्या पायाखााली चिरडली. त्यामुळे दुर्वास ऋषींनी इंद्रदेवाला स्वर्गाचे वैभव व देवांची शक्ती नष्ट होईल असा शाप दिला. त्यामुळे विष्णु देवाने सांगितल्याप्रमाणेे देवतांनी असुरांची मदत घेेऊन सागर मंथन केले. त्यासाठी त्यांनी वासुकी नाग व मंदार पर्वत यांचा उपयोग केला. मंदार पर्वताच्या पृष्ठभागाला आधार देण्यासाठी व त्या आधारामुळे सागर मंथन होण्यासाठी विष्णुने कुर्म अवतार धारण केला. यामुळे सागर मंथन व्यवस्थित होऊ शकले. सागर मंथनातून आलेले अमृत राक्षसांना न मिळता देवांना मिळावे यासाठी मोहिनी रूप घेऊन विष्णु देवाने राक्षसांना मोहित केले व देवांना सुरक्षित अमृत दिले. देवांनी अमृतपान केले व त्यांना त्यांचे वैभव आणि शक्ती पुुन्हा प्राप्त झाली.


वराह अवतार: मोहिनी रूपाचे सत्य असुरांना कळल्यामुळे त्यांनी देवांशी युद्धध केले. या युद्धात अनेक असुर मारले गेले. त्यामुळे देवांवर क्रोधित होऊन असुरांची माता दिती हिने देवांचा पराभव करण्यासाठी पुत्रप्राप्तीचा वर मागितला. या वरामुळे तिला हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपु हे दोन दोन पुत्र झाले. हिरण्याक्ष असुराला वर मिळाल्यामुळे तो तिन्ही लोकांचा स्वामी झाला. त्याच्याा अत्याचारांमुळे पृथ्वी संकटात होती. पृथ्वीला त्याच्यापासून वाचण्यासाठी व हिरण्याक्षचा वध करण्यासाठी विष्णु देवाने वराह अवतार धारण केला. देवांना त्यांचा मान परत मिळाला.


नरसिंह अवतार: हिरण्याक्षच्या वधामुळे त्याचा भाऊ हिरण्यकश्यपु क्रोधित झाला व त्याने देवांना पराभूत करण्यासाठी तप केेेेला. तापामुळे तो अनंत शक्तीचा, तिन्हीही लोकांचा स्वामी झाला. तिन्ही लोकांना त्याच्या जाचापासून वाचण्यासाठी विष्णुने नरसिंह अवतार धारण केला व हिरण्यकश्यपुचा वध केला. हिरण्यकश्यपुनेे कोणताही प्राणी, मानव, देव, राक्षस त्याला मारू शकू नये, कुठल्याही शस्त्रामुळे त्याचा वध होऊ नये, कुठल्याही वास्तूच्या आत व बाहेर त्याचा मृत्यू होऊ नये, दिवसा व रात्री त्याचा मृत्यू होऊ नये, आकाशात व जमिनीवर त्याचा मृत्यू होऊ नये असा वर मागितला होता. म्हणून विष्णु देवाने सिंहाचेे मस्तक व मानवाचेे शरीर असलेला नरसिंह अवतार धारण करून सूर्यास्ताच्याा वेळी आपल्या नखांनी उंबरठ्यावर बसून स्वतःच्या मांडीवर हिरण्यकश्यपुलााा ठेवूून त्याचा वध केला.


वामनावतार: हिरण्यकश्यपुचा वधानंतर त्याचा पुत्र विष्णूण भक्त प्रल्हाद राजा झाला. प्रल्हादानंतर त्याचा मुलगा विरोचन राजा झाला. इंद्राने विरोचनाचा वध केला. पित्ययाच्या वधामुळेे विष्णुभक्त बलीने इंद्राला पराभूत करून स्वर्गाचे राज्य मिळवले. तो तिन्ही लोकांचा स्वामी झाला. स्वर्ग आणि पृथ्वीचे राज्य बलीकडून परत मिळवण्यासाठी विष्णु देवाने वामन अवतार धारण केला.


वामन बलीला भेटण्यासाठी आला असता, बलीने त्याला 'हवे ते मागा' असे सांगितले. वामनाने तीन पदांची जागा मागितली. बलीने वामनाचे मागणे स्वीकारले. आकाराने प्रचंड होऊन वामनाने पहिल्या पदात स्वर्ग, दुसऱ्या पदात

पृथ्वी हे मिळवले. त्यावेळी 'तिसरे पद कुठे ठेवू' असे वामनाने बलीला विचारले असता, 'प्राणाशिवाय मौल्यवान माझ्याजवळ काही नाही, आपण आपले तिसरे पदक माझ्या मस्तकावर ठेवावे' असे उद्गार बलीने काढले. बलीचा नम्रपणा पाहून वामन प्रसन्न झाला वामन अवताराच्या रूपात विष्णु देवाने बलीला आशीर्वाद देत पाताळलोकावर राज्य करण्यास सांगितले. पुढे बलीने नम्रतेने या आज्ञेचे पालन केले.

परशुराम अवतार: वामनावतारानंतर पृथ्वीलोकावर क्षत्रिय राजा करत होते. अनेक क्षत्रिय प्रजेवर जुलूम व अन्याय करत, वाईट गोष्टी करत. अशााा क्षत्रियांपासून प्रजेला वाचवण्यासाठी विष्णु देवाने परशुराम अवतार धारण करून अशा सर्व दुष्ट क्षत्रियांचा पराभव आणि नाश केला. परशुरामाने असे तब्बल एकवीसवेळा केले असेदेखील म्हटलेे जाते. परशुरामाला परशु हे ब्रह्मास्त्र शंकराकडून मिळाले होते. त्याच्याकडेेे अफाट शक्ती होती. परशुराम माता रेणुका व जमदग्नी ऋषी या ब्राह्मण जोडप्याच्या घरी जन्माला आला होता. ब्राह्मण असूनही परशुराम युद्ध करायचे.


रामावतार: सदाचारी क्षत्रियांच्या मनातून परशुरामाचे भय घालवण्यासाठी विष्णु देवााने एका क्षत्रिय कुटुंबात रामावतार जन्म घेतला. रामाला वनवास भोगावा लागणार होता. वनवासात त्याच्याबरोबर त्याची पत्नी सीताा, लक्ष्मण हेसुद्धा होतेे. त्या काळा रावणाने सीतेचे अपहरण केले. रावणाचा अहंकार घालवण्यासाठी व त्याचा पराभव करून सीतेला मुक्त करण्यासाठी रामाने रावणाचा वध केला. राम धर्मज्ञ होता. राम धर्माचेच एक रूप आहे असेदेखील म्हटले जाते. राम आदर्श व्यक्ती आणि आदर्श राजा होता. वनवास भोगल्यानंतर आपल्या राज्यात अर्थात अयोध्येला येऊन रामाने आयोध्येचा राज्यकारभार सांभाळला. राम हा क्षत्रियांचा आदर्श शासक होता.


कृष्ण अवतार: कंस या दुष्ट राजाच्या जाचापासून पृथ्वीला सोडवण्यासाठी आणि धर्मस्थापना करण्यासाठी विष्णु देवाने कृष्ण अवतार धारण केला. अर्जुनाला कुरुक्षेत्र युद्धाच्यावेळी श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचे ज्ञान दिले. कृष्णाच्या बालपणीच्या घटनादेखील प्रसिद्धध आहेत व त्यांचा उल्लेख पुराणांमध्ये आहे. कृष्णाला लोणी हा पदार्थथफार आवडत होता. कृष्णाच्या बासरीचे सूर ऐकताच गवळणींचे भान हरपून जायचे. कृष्ण बालपणी गोकुळात वाढला होता. तो सर्वांचा लाडका होता. कृष्णाशी संबंधित असलेल्या पूतनावधासारख्या घटनादेखील पुराणांच्या माध्यमातून प्रसिद्ध आहेत.


गौतम बुद्ध: हिंदू लोकं गौतम बुद्धांना विष्णुचा नववा अवतार मानतात. गौतम बुद्धांच्या शिकवणी मानवी जीवनासाठी आदर्श आहेत. त्यांचा जन्म लुंबिनी नगरीत झाला होता. त्यांचे मूळ नाव सिद्धार्थ होतेेेे. गौतम बुद्धांना बोधीवृक्षाखाली ध्यानमग्न असताना निर्वाणप्राप्ती झाली होती.


कल्की अवतार: अनेक पौराणिक ग्रंथांच्या मते कल्की अवतार विष्णू देवाचा कलियुगातील शेवटचाा अवतार अर्थात दहावा अवतार असून तो वाईट गोष्टी, मनुष्यातले वाईट गुण, दुर्जन, अधर्म, दुष्टपणा अशा गोष्टींचा पराभव करणार आहे. विष्णू देवाचा हा एकमेवव अवतार अवतरीत होणे बाकी आहे.


पुराणांमध्ये या सर्व घटनांव्यतिरिक्त अशा इतरही अनेक घटना आहेत. हिंदू संस्कृतीला पुरणवाड़मय हे जणू दैवी देण म्हणूनच लाभले आहे. पुराणांचे जतन करणे व त्यांचे ज्ञान भविष्यातील पिढ्यांना देणे हे आपले कर्तव्यच आहे. पुराणे देवावर विश्वास ठेवणे, श्रद्धा ठेवणे ही शिकवण आपल्याला देतात. पुराणे आदर्श जीवनाचा मार्ग सांगतात. असा हा पौराणिक इतिहास आपल्या हिंदू संस्कृतीला लाभल्यामुळे आपण या गोष्टीचा अभिमान बाळगला पाहिजे.


नाव: सानिका अशोक पुणतांबेकर.

ई-मेल: samatap2001@gmail.com

संपर्क: ८२९१०२५०९०


हा लेख कसा वाटला. कमेंट जरुर करा. ब्लॉग पोस्ट शेअर करा.

1,481 views0 comments
टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page