top of page

आवरा आवरीचा पसाराकधी नव्हे ते 'काटा रुते कुणाला' हे गाणं साग्रसंगीत, छबुराव आपल्या अर्धांगिनीपुढे गात आहेत्.. ही उलटी एन्ट्री कधी नव्हे ती झालेली पहाटेच्या साखरझोपेत... अन तेव्हढ्यात ती आरवते, "अहो, झोप आवरा आता."


अर्थातच आजचा रविवारही असातसा (वाया) जाऊ शकेल अशी सुतराम शक्यता उरत नाही.

"आज मेला तो मायाबाजार काढा नं आवरायला. आळस काय मेला जन्माचाच आहे." बायकोचा सात्विक स्वर.

'महामाये, या साय्रा आवरा आवरीत तुझ्या तोंडाचाही समावेश करायला विसरू नकोस.' असं एखादं दीर्घ वाक्य टाकण्याचा बेत छबुराव मनातल्या मनात आवरता घेतात. कारण त्याचवेळी त्यांच्या डोक्यात आरवणे आणि आवरणे यांच्यापैकी अपभ्रष्ट रुप कुठलं याविषयी गोंधळ उडालेला असतो."मायाबाजार' हा 'मायेने जतन करून ठेवलेला बाजार' असा मध्यमपदलोपी समास आहे आणि हा बाजार इन मीन दोन खोल्यांच्या जंगम संसारातल्या भल्यामोठ्या जुन्या शिसवीच्या कपाटात भरलेला असतो भिंत चालवणाय्रा ज्ञानेश्वरांनाही या कपाटाला हात घालण्याचं धाडस होणार नाही असा रास्त अभिमान छबुरावांना असतो. हो.. कारण आईबाबांकडून मिळालेली तव्ह्ढीच काय ती स्थावर मालमत्ता. त्यात उदबत्तीच्या घरापासून कदाचित लोखंडाच्या चुलीपर्यंत साय्रा पंचधातुंकीत अन सहस्त्रनामांकीत अशा अनेक पूज्य गोष्टींची रेलचेल असते. छबुरावांच्या नव्या संसारातल्या स्टीलच्या भांड्यांचा स्वैंपाकघरातील सुळसुळाट त्या भांड्यांना 'आ' वासून कपाटात बसायला लावतो. आता उदबत्तीच्या घराखालीही झुरळांची अंडी विखुरलेली असतात् तीच गत छबुरावांच्या काळी वापरल्या जाणाय्रा भरमसाट दुपट्यांपासून कोटाच्या गुंड्यांपर्यंत साय्रा जुन्यापुराण्या कपड्यांची. ते बेटे एक्मेकांच्या कॉलरमध्ये एक्मेकांच्या बाह्या अडकवून पडलेले असतात. त्यामानानं साड्या चोळ्या कमी प्रमाणात असतात. त्यावरून त्याकाळची बायकांची सांस्क्रुतिक स्थिती खालावलेली होती असं दिसतं असं छबुरावांच्या बायकोचं म्हणणं......आणि छबुरावांच्या मते खरी संस्क्रुति एका पलंगाखाली वास करत असते. ती म्हणजे मोठमोठे ग्रंथराज.एका मोठ्या पोत्यात सारे ग्रंथ कोंबुन ठेवलेले अन त्यातून सुद्धा बह्मांडज्ञान ओसंडायला लागलं म्हणून ते एका मोठ्या लोखंडी ट्रंकेत साठवून ठेवलेले असते. जेव्हा ती वाळवी लागलेली, कोरी करकरीत संस्क्रुति गोळा करायला आणि रद्दीत घालायला मिसेस छबुराव सांगतात तेव्हा छबुरावांना गलबलून येतं. त्यांचा सात्विक संताप त्यांच्या चष्म्याच्या काचा घामट करतो अन त्यांच्या थरथरत्या ओठांतून शब्द फुटतात, ""म्हणजे ही जुनी अमुल्य, अम्रुततुल्य संस्क्रुति तुझ्या डोळयांत खुपते तर! मिसेस आळस देत ओरडतात् ""पाठीत खुपसते.. पाठीत् तो एक्नाथी भागवत रात्रभर जागवत असतो."" या वाक्याचं विश्लेषण जेव्हा केलं जातं तेव्हा कळतं की मिसेस छबुरावांच्या शरीरभारामुळे झोळ आलेल्या पलंगावरच्या गादीतुनही पोत्यातल्या ग्रंथराजाचं चिलखत पाठीला खुपत असते. दुसय्रा मोठ्या ट्रंकेचं टोक शेजारच्या छबुरावांच्या झोके घेणाय्रा पायाला लागून पाय फ्य्राक्चर होण्याची वेळ येऊन गेलेली असते. जुन्या संस्क्रुतिची ही नवी उग्र स्वरुपे पाहून मिसेस छबुराव ती ब्याद तिथून हलवायला उत्सुक असतात."

पण छबुराव आपली ढाल फिरती ठेवण्याचा प्रयत्न करतातच.

आमच्या जुन्या संस्क्रुतीचा वारसा त्या कपाटात विराजमान झालेलाही तुम्हाला खपत नाही. जुनं ते सोनं बघण्याची द्रुष्टी .....

आवंढा गिळण्यासाठी थांबलेल्या छबुरावांचा फायदा मिसेस पटकन उठवतात, "आमचा काही उभ्या जन्माचा दावा नाही बरं त्या सोन्याबरोबर !"

तर मग कशाला समन्स काढताय?

मेलं किती दिवस कवटाळून ठेवणार आहात ती बिनकल्हईची भांडी अन जुनी पटकुरं? कुणी तरी म्हणून ठेवलंच आहे नं...'जुने जाऊ द्या मरणालागुनी...

"... अन नवीन आणा काही शोधुनी..नाहीतर काय् भारताच्या लोकसंख्येप्रमाणं वाढणाय्रा तुमच्या साड्यांना गोदरेजचं कपाटही अपुरं पडायला लागलं असेल आणि आमच्या आईनं मायेचे तुकडे जोडून शिवलेल्या दुपट्यांची जागा आपल्या कन्यारत्नाच्या दुपट्यांनी... आय् मीन.. मिनी स्कर्टांनी भरून काढायची असेल. वर बोहारणीचा धंदा तेजीला आणून स्टीलच्या भांड्यांची नव्यानं आरास मांडायची आहे वाटतं कपाटात!"

एवढं बोलून छबुराव दम घेतात तोपर्यंत ....

".. अन ती तुमची मोठमोठी पुस्तकं काय जाळायचीत हो? छे! बंबात जाळायलाही ती लायकीची नाहीत. नुसता धूर होईल धूर बुरसटलेल्या विचारांचा साधी रद्दीत तरी घेतील की नाही या विचारानं माझा जीव वर खाली होतोय."

हा टोमणा ऐकून घेतात की काय छबुराव!"हं.. म्हणजे चक्क हा माझा अपमान नसून त्या परमपूज्य, आदरणीय् मस्तकावरून मिरवावेत अशा ग्रंथराजांचा, त्यांच्या जन्मदात्यांचा अन धर्माचा अपमान आहे. आणि काय गं, त्यांच्या जागी रसरंग अन रहस्यकथांच्या पुस्तकांची चवड लावायचीय वाटतं"... थोडं थांबून्,.. "अन तेवढं सगळं सामान ठेवायचं कुठं पुन्हा?"

"गॅलरीत. " मिसेस छबुराव कुठल्याही प्रश्नावर जास्त खल करत बसत नाहीत.

"हं म्हणजे लोकांना जाता येता मोफत प्रदर्शन !"अशा तह्रेच्या प्रेमळ संवादांना आवरता आवरताच दोघांच्या नाकांना मिळून नव्व्याण्णव येतात.

पण यावरून आवरा आवरीची साधी सोपी व्याख्या मात्र करता येते...'जुन्याचा सोस आवरायचा अन नव्या हौसेचा त्याठिकाणी पसारा करायचा.' गोळाबेरीज एकच असली तरी नाविन्याचा प्रादुर्भाव मनाला आनंद देऊन जातोच की, अन नवय्राला बेकार राहू न देण्याचं परम कर्तव्य त्यात आलंच आणि हो, साय्राच जुन्या वस्तु तरी कुठं टाकता येतात ! छबुरावांच्या मनाला यातना होतात म्हणून दासबोध, ज्ञानेश्वरी, लौकिकात वापरले न गेलेले अलौकीक कवितासंग्रह, 'एकता'चे (एकता कपूर नाही हो... एकता मासिक) अनेक अंक हे गटागटानं विभक्त करून मांडले जातात. बाकीच्या रद्दीच्या पसाय्रात छबुरावांनी मेहनतीनं लिहिलेल्या कथांचा समावेश केला जातोच. साभार परत येण्यापेक्षा कायमच्या गेलेल्या बय्रा असं समाधान करून घेऊन ते बसतात. पुढे अस्ताव्यस्त पसरलेल्या कपड्यांतून पटकुर म्हणून लायक असलेले कपडे, ठिगळे लावलेले कपडे, बय्रापैकी धड कपडे यांचे निरनिराळे बस्ते बांधून ठेवले जातात. त्यातच नजरचुकीनं धाकट्या कन्येची लाडक़ी बाहुली तिच्या नेसूसकट घुसडली जाते तेव्हा भोवती संगीत हलकल्लोळ सुरू होतो अन त्यातून पटकुरांची संख्या वाढत जाते.अशा साय्रा सावळ्या गोंधळातही छबुरावांचा पूर्वजांबद्द्लचा आदर ओसंडून वाहत असतो. त्यांची प्रत्येक चीजवस्तु ते जपून हाताळण्याचा प्रयत्न करत असतात अन जेव्हा त्या अडगळीते एखादं मेलेलं झुरळ सापडतं तेव्हा भावनातिशयानं त्यांना ते पूर्वजांची आठवण म्हणून कपाटावर लावून ठेवण्याची नामी कल्पना सुचते. पण तेव्हढ्यात मिसेस छबुरावांच्या थयथयाटामुळं होणारा पसारा आवरण्याच्या भितीमुळं तो बेत रद्द करून ते झुरळ पुन्हा अडगळीतच ठेवावं लागतं.त्याचवेळी कपाटातल्या जुन्या भांड्यांचा खणखणाट आणि जमिनीवर आपटण्याचा दणदणाट ऐकू येतो. अतिशय क्षुल्लक कारणावरूनही भांड्यांवर राग काढण्याचा मिसेस छबुरावांचा सोज्वळपणा (जोपर्यंत आपल्या अंगावर काही शेकाटत नाही तोपर्यंत बायकोची प्रत्येक क्रुति सोज्वळ अशेी भावना छबुरावांची झालेली आहे) छबुरावांना माहित आहे. कारण यापूर्वी एक्दा आवरा आवरीच्या निमित्तानंच असा एक समरप्रसंग येऊन गेला होता. आवराआवरीसाठी बंब तापलाय तोपर्यंत आंघोळ करून शुचिर्भूत व्हावं असं मिसेस छबुरावांचं म्हणणं आणि 'आधी लगीन कोंढाण्याचं' (इति ता.मा.) याप्रमाणं आधी आवरा आवर अन मगच आंघोळ असा निश्चय छबुरावांचा, यांमुळं सध्या वापरात असलेली स्वयंपाकघरातली बरीचशी भांडी इतस्ततः विखुरली गेलेली होती अन तो पसारा आवरण्यात मुख्य आवरा आवरीचा भाग विरून गेलेला होता.पण आजची गोष्ट वेगळी; कारण प्रत्येक भांड बाहेर येण्याच्या स्थितीत असतानाच झुरळांच्या अनेक पिढ्या उजाड होत असतात आणि त्या पिलावळीच्या वाढत्या रांगांबरोबरच मिसेस छबुरावांच्या हातून भांड्यांना येणारे पोचे आपसुक वाढत असतात...त्यांचा अगदी नाईलाजच होतो. आपण निराधार झालो अशातह्येचा निषेध करणाय्रा झुरळांचआ मूकमोर्चा आहे, हे लक्षात येणं दुरापास्त असतं... आणि काही वेळानं कपडे, जळमटं, भांडी यांच्यात मिसेस छबुराव या 'घेरावा'त सापडलेल्या कुलगुरूंसारख्या दिसू लागतात. हा सारा चक्रव्यूह भेदून छबुरावांचे मधले चिरंजीव धावत धावत कपाटापाशी पोचतात अन त्यांना आवरायला पुढे सरकलेल्या छबुरावांचा पाय मिसेसच्या हाताच्या तळव्यावर पडतो अन त्यामुळे त्या "मेल्यांनो" असं मोठ्यांदा ओरडून चिरंजिवांवर राग काढतात. हातात जळमटांनी माखलेला चेंडू गवसलेल्या चिरंजिवांची अवस्था जयद्र्थाच्या हाती सापडलेल्या वीर अभिमन्युसारखी होते अन मग सुरात सूर मिसळत जातात.

ही माझी शाळेतली प्रगतिपुस्तकं सापडली बघ बराच वेळानं छबुरावांच्या सुराला उजाळा मिळतो अन मांजरानं आपलीच पाठ चाटावी तसं ते हर्षानं उद्गारतात." काही सांगू नका, शुंभांनी तुमचाच कित्ता गिरवलाय अभ्यासात" अंगावर लाटणं आल्यासारखं वाटतं अन पुस्तकांची मुकाट्यानं उचकापाचकी सुरू होऊन हरिदासाची कथा मूळपदावर येऊन ठेपते. कुठल्या गोष्टी ठेवायच्या अन कुठल्या वस्तुंना बाहेरची वाट दाखवायची यावर वादविवाद स्पर्धेला ऊत येतो आणि आता कुठली बाजू हार खाते याकडं पोरं लक्ष ठेवून बसतात.

छबुरावांच्या मते गंजलेलं जुनं ब्लेडही जपून ठेवायचं असतं, कारण ते त्यांच्या पणजोबांनी वापरलेलं असेल तर. त्यांचा चेहरा पाहिला नाही तर निदान त्यांच्या चेहय्रावरून फिरलेलं हे ब्लेड ठेवलंच पाहिजे असा त्यांचा अट्टाहास असतो. तसंच ज्या लोट्यानं छबुरावांना जीवन म्हणजे पाणी दिलं, ज्या पितळेच्या थाळ्यातून त्यांनी लहानपणी चार-दोन घास गिळले त्यांचा ऋणानुबंध कसा सुटावा!

"ही सारी भांडी पाहिली की आमच्या मातोश्रींच्या हातच्या लज्जतदार स्वैंपाकाची आठवण होते." छबुराव गहिवरून म्हणतात."म्हणूनच म्हणते, ती सगळी मी मोडीत घालून टाकणार आहे." मिसेस छबुरावांचा स्वाभिमान नकळत दुखावला गेलेला असतो.

"बरं, ते राहू दे.. आईची नऊवारी साडी, नानांची धोतरजोडी हे जिन्नस तरी राहिलेच पाहिजेत. बोहारणीच्या पायापाशी टाकून देण्यापेक्षा रात्रीचं पांघरुण होईल आपल्याला. त्यांच्या मायेचा उबारा आपल्याला त्यातूनही अनुभवायला मिळेल." छबुरावांचा गळा आता दाटून आलेला असतो.

"छान त्यातून डास, ढेकूण यांची रहदारी सुरू झाली म्हणजे झोपणं मुश्कील होईल." मिसेस छ्बुराव त्या पूज्य वस्त्रांची लक्तरंच काढतात..."अन काय हो, ती मोठमोठी पुस्तकं केव्हा वाचणार आहात तुम्ही? जुनी कुठली तरी भारुडभरती डोक्याशी घेऊन बसायची अन आजकालचा पेपरसुद्धा वाचायला फुरसत नाही अशा काळात मोठमोठ्यानं तत्वज्ञान घोकून आपल्या अज्ञानात भर घालून घ्यायची! सांगितली कुणी नस्ती उठाठेव!"

छबुरावांचा हा सरळसरळ उपमर्दच."मी सांगून ठेवतो, त्या पुस्तकांच्या पानांवर पाणी तापवणार असशील तर मी गार पाण्यानं आंघोळ करीन अन रद्दीत घातलीस तर छापील किंमतीला परत आणीन." छबुरावांचा अभिमान ओतू चाललाय..."सगळयाच जुन्या वस्तुंची विल्हेवाट लावून असा कोणता आनंद मिळवणार आहेस तू? आता तू जुनी झालीस म्हणून काय मी तुला अडगळ ठरवायची?" सुसंस्क्रुतपणाचं अगदी जवळचं उदाहरण देण्याच्या भरात छबुराव बोलून गेलेले असतात, पण..."हं.. तुम्हाला तेच पाहिजे. कधी एकदा ससेमिरा सुटतो बायकोचा! उपाशी बसा कवटाळून ही सगळी दळभद्री लक्षणं. मी जाते माझ्या आईकडे आत्ताच्या आत्ता. मेलं.. आप गेलं अन जग बुडालं!" भांडी कपड्यांचा चक्रव्यूह इतस्ततः पुन्हा एकदा गडाबडा लोळतो. खोली दुमदुमुन जाते. मातीच्या रस्त्यावरून बैलगाडी खडखडाट करत गेल्यावर धूळ उडावी तसं मिसेस छबुरावांच्या प्रस्थानाबरोबर तीनही पोरं इकडंतिकडं उधळतात.

अशातह्येनं प्रेमळ संवादांच्या स्वागतगीतानं सुरू झालेला हा सांस्क्रुतिक कार्यक्रम प्रचंड गदारोळात बरखास्त होतो अन तोपर्यंत त्या खोलीला गोडाऊनचं स्वरूप प्राप्त झालेलं असतं....

...आणि अशा वेळी पाहुणे म्हणून आपल्यासारखं कोणी तिथं गेलंच तर पसरलेल्या सामानातून यजमानांना हुडकून काढणं हे आपलं प्रथम कर्तव्य असतं.

हं.. घरोघरी गॅसच्याच शेगड्य़ा!
श्रीपाद पु. कुलकर्णी

पुरुष

सी २१, सुयोग आदित्य रेसिडेन्सी नं.२,

बिबवेवाडी, पुणे ४११०३७

भ्रमणध्वनी/व्हॉट्साप क्रमांक ९४२२५१५६४०

Email.: shripadkster@gmail.comविश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअ‍ॅप लिस्टमध्ये सामील व्हा - 7066251262 हा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMP असा मेसेज पाठवा

245 views0 comments

Comments


टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page