top of page

पर्यावरण संवर्धन

(लेखक: सौ.भारती सावंत)

वंदे मातरम वंदे मातरम
सुजलाम सुफलाम् मलयजशीतलाम्

बंकीमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेल्या या गीताचा जयघोष करत अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान केले. या गीतात भारतातील निसर्ग आणि पर्यावरण यांचे रसभरीत वर्णन आले आहे. खरेच! भारत देश हा 'गरिबांचा श्रीमंत देश आहे'. निसर्गाने भारताला बरेच काही बहाल केले आहे. या 'आसेतूहिमाचल' भूमीला विविध प्रकारची झाडे, फुले, प्राणी, पक्षी,खनिजे आणि फळांचे वरदान मिळाले आहे. त्यामुळेच भारतभूमी सुजलाम् सुफलाम् झाली आहे. महासागर, नद्या, पर्वत रांगा, बर्फाच्छादित डोंगर कडा यामुळे भारतातील सर्व भाग नयनरम्य वाटतो. या निसर्गशोभेमुळे कवी त्यांची प्रतिभाशक्ती फुलवित कवितेतून निसर्गाचे वर्णन करतात.

हिरवे हिरवे गार गालिचे

हरित तृणांच्या मखमालीचे


या काव्यपंक्तीत बालकवींनी निसर्गाचे, वसुंधरेचे अप्रतिम वर्णन केले आहे. या वसुंधरेच्या कुशीत वाढून मानवाने आपला उत्कर्ष साधला आहे. त्याला या निसर्गाचा लळाच लागला आहे. सातशे पन्नास वर्षापूर्वी तुकारामांनी वृक्षवल्लींना साद घातली होती आणि निसर्गाशी नातेच जोडले होते.

' वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे' विसाव्या शतकात विनोबांनी 'निसर्गाकडे वळण्यास' सांगितले. महात्मा गांधींनी 'खेड्याकडे चला' म्हणजेच निसर्गाशी नाते साधण्याचा संदेश दिला.

'दिधले असे जग तया, आम्हांस खेळावया' 'आम्ही कोण म्हणोनि काय पुसता?' असे म्हणत या विद्रुप मानवाने सर्वांगसुंदर वसुंधरेला विद्रूप करण्याचा विडाच जणू काही उचलला आहे. आणि हे मानवाच्या प्रत्येक कृतीतून प्रतीत होत आहे.


मानवाचे अस्तित्व पूर्णतः पर्यावरणावर अवलंबून आहे हे कळत असूनही मानवाने स्वतःच्या डोळ्यावर झापडे लावली आहेत. आज वातावरणाचे तापमान भयानक वाढलेले आहे. ओझोन वायूचे संरक्षण कवच विरळ होत आहे. पूर्वी वीस-पंचवीस फुटावर विहिरीला लागणारे पाणी आता दोनशे ते अडीचशे फुटांवर लागते. भूकंप, दुष्काळ, अतिवृष्टी, उष्माघात, हिमालयातील बर्फाचे विरघळवून पाण्याची पातळी वाढणे या सार्‍या गोष्टींचा मानवी जीवनावर विपरित परिणाम होत आहे. पर्यावरण संवर्धन करणे आपली जबाबदारी आहे हे मानव विसरला आहे. पर्यावरण प्रदूषण व पर्यावरणाचा होणारा त्रास ही आज जागतिक समस्या बनली आहे. त्यासाठी मानवाच्या इच्छा आकांक्षा कारणीभूत आहेत. मानव विसरला म्हणून सजीव सृष्टीवर पर्यावरण प्रदूषणाचा महाराक्षस झेप घेऊ लागला आहे. पृथ्वीला प्रदूषणापासून वाचविण्यासाठी पावले उचलायला हवीत. वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन प्रकल्प हाती घेऊन राबविले पाहिजेत. प्रदूषणविरहित वाहने वापरून सहकार्य करायला हवे.


निसर्गाचा उपयोग करून मानवाने जन्मदर वाढवला आहे. त्यामुळे मृत्यूदर कमी झाला आहे. लोकसंख्यावाढीचा भस्मासूर इतका फोफावलाय की निसर्गाला गिळंकृत करण्यासाठी पुढे सरसावला आहे. माणूस स्वतःचा विकास साधण्यासाठी निराळे उद्योगधंदे सुरू करतो. त्यातून निघणारे कार्बनकण, विषारी वायू,मळी यामुळे प्रदूषण वाढत आहे. अनेक जडीबुटी,झाडपाला दुर्धर रोगांवर उपचार म्हणून वापरतात. शिवाजी महाराजांनी आपल्या आज्ञापत्रात झाडांचे महत्त्व विषद करून 'एक मूल एक झाड' संकल्पना मांडली  होती. रविंद्रनाथ टागोर म्हणत," झाड लावल्यावर त्याला पाणी घालणे ते जतन करणे व त्याचे संरक्षण करणे हे प्रत्येकाला त्याचे स्वतःचे धार्मिक व राष्ट्रीय कर्तव्य वाटले पाहिजे".


निसर्गाचा समतोल राखायचा तर वनीकरण मोहिम उघडायला हवी व प्रत्येकाने संकल्प करायला हवा.

झाडे लावू झाडे जगवू |

हिरवळ करूया अवनिवरी |

प्रकृतीचे संरक्षण करूनी |

विकृती पळवू दूरवरी || 

सृष्टीचा हा नियम पाळला नाही तर

हा नाश थांबवा तनमन        

भुमातेचे जळते आहे

ही वसुंधरा जनसंख्येच्या

भाराने रडते आहे


असे चित्र सगळीकडे पाहायला मिळेल. महात्मा गांधींनी म्हटलेच आहे आपल्या गरजा भागवण्यासाठी निसर्ग पुरेसे देतो, परंतु आपल्या अमर्याद लालसांची पूर्तता करण्यास मात्र तो असमर्थ आहे. कर्मधर्मसंयोगाने निसर्गावर ही वेळ येऊ नये. देताना निसर्गाने मानवासाठी इतके द्यावे की मानवाने त्याचे अस्तित्वच पुसून टाकावे. परंतु युवापिढीने हिरिरीने भाग घेऊन जनजागृती केली तर निसर्गातही  चमत्कार होतील. प्रदूषणमुक्त निसर्ग पाहताना आम्हीही म्हणू,


नेहमीच येतो मग पावसाळा

हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा

आणि आपली मुलेबाळे देखील पावसात चिंब भिजत आनंदाने पावसाचे गाणे म्हणतील,

येरे येरे पावसा तुला देतो पैसा

पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा


👍 लेख आवडल्यास कमेंट करा आणि शेअर करा.


सौ.भारती दिलीप सावंत, मुंबई 

मो: 9653445835

 

नविन ब्लॉगचे नोटिफिकेशन येण्यासाठी विश्व मराठीच्या ईमेल लिस्टला सबस्क्राइब करा.

300 views1 comment

1 commentaire


खरचं छान 👌पर्यावरण संवर्धन काळाची गरज आहे. सृष्टी चे कौतुक करायला. सुष्टी तर हवीच.

J'aime
टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page