top of page

विहिणीची पंगतसगळीकडे नुसती धामधूम दिसत होती. काय झगमगाट होता सर्वत्र.काय थाट होता त्या लग्नाचा.भव्य कार्यालय, सुंदर सजावट, भरजरी कपडे, दागदागिने सार्यातूनच कशी श्रीमंती(?) दिसत होती.एका अतिशय जवळच्या लग्नाला गेले होते मी.


लग्नातील जवळपास सगळेच विधी आटोपले व विहिणीची पंगत बसण्याची वेळ झाली. वधू पक्षाकडील एक जण तर फार थाटात म्हणाले की, आपण विहिणीच्या पंगतीचा वेगळा काँट्रॅक्ट दिलाय.बसायला सुंदर सोफे,सोन्याची ताटे वाट्या पेले इतरांना चांदीची ताटे.त्यात कितीतरी पदार्थ वाढलेले होते.साधारण वीस-पंचवीस पदार्थ मी मोजले व त्यानंतर ते मोजायचा पण मला कंटाळा आला. मोठ्या आदराने आम्हाला जेवायला बसविण्यात आले. जेवायला बसलेल्या प्रत्येकाच्या चेहर्याकडे मी बघितले व लक्षात आले की, एकही व्यक्ती हे सारं वाढलेलं पचवायला समर्थ नाहीये.केवळ आणि केवळ ताटाला शोभा व श्रीमंतीचा थाट म्हणून हे सारं केलं गेलं होतं.प्रत्येक जण नाटकात अभिनय करावा तसा त्या पंगतीला प्रतिसाद देत होता. परंतु माझं मन मात्र प्रत्येक घासाबरोबर व्यथित होत होतं.एकही घास माझ्या घशाखाली उतरत नव्हता. व मन असंख्य विचारांनी भरुन गेलं.वाटलं हिच विहिणीची पंगत जर भुकेलेल्यांना दिली तर साक्षात परमेश्वराला जेवू घातल्याचं पुण्य मिळेल. आज आमच्या देशात कित्येक लोक धड दोनवेळचं अन्न मिळवू शकत नाही.कित्येक तर अन्नावाचून मरतात.कुपोषणाचे प्रमाण आमच्या देशात जास्त आहे.कित्येक बालके रोज कुपोषणाने मरत आहेत.कित्येक गर्भवती महिलांचं पोषण नीट होत नाही.त्यांना कष्ट केल्याशिवाय दोनवेळचं अन्न सुद्धा मिळत नाही. कित्येक सरकारी योजना या गरजवंतांसाठी राबविल्या जातात पण त्या पूर्णपणे त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. समाजाची पण या बाबतीत उदासीनताच बघायला मिळते.आज लग्न, वाढदिवस यासारख्या मोठ्या कार्यक्रमात बुफे असतात.त्यामध्ये तर कितीतरी अन्न वाया जातांना आपण बघतो.गरज नसताना ताटात वाढून घेतलं जातं.त्यावेळी एक क्षण तरी आपल्या मनात विचार येतो का? माझ्या या ताटातील वाया जाणार्या अन्नात एक गरजवंत जेवू शकतो.एकदा प्रवासाला गेले असतांना एका हाॅटेलमध्ये सूचनाफलकावर लिहिलं होतं, "ताटात ऊष्टे टाकल्यास वीस रु. दंड आकारला जाईल". मी व माझ्या सहप्रवाश्यांनी हे वाचलं व त्या हाॅटेल मालकाला या अजब सूचनेविषयी विचारलं. तेव्हा ते म्हणाले विकत घेतलेलं अन्न लोक सहज टाकून देतात त्याची त्यांना थोडीही खंत वाटत नाही पण दंड आकारला तर ते त्यांना अपमानास्पद वाटतं.करणार काय लोक आजकाल सरळ सांगितलेल्या सूचना तितक्याशा गांभीर्याने घेत नाहीत.म्हणून मी "ताटात ऊष्टे टाकू नये" ही पाटी काढून ही दंडाची पाटी लिहिली.व त्याचा चांगला परिणामही मला दिसतो आहे.यामुळे आमच्याकडे अन्न तर वाया जातच नाही पण बरेच गरजवंत देखिल येथून निःशुल्क भूक भागवून जातात.मलाही यांत समाधान मिळते.हाॅटेल मालकाचे बोलणे ऐकून आम्ही चकितच झालो. आम्ही पण आम्हाला नको असलेले थालीतील पदार्थ ऊष्टे करण्यापूर्वीच वेटरला परत केले.कुणी कुणी तर एक भाजी दोघांनी वाटून खाल्ली. खरंच हाॅटेल मालकाची कल्पना सुंदरच म्हणावी लागेल कारण हाॅटेलमध्ये येणार्यांचं पोटभर जेवण तर होतंच पण अन्नही वाया जात नाही.अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे.संत गाडगेबाबा नेहमी सांगायचे भुकेलेल्यांना अन्न द्या. गाडगेबाबा गरीब, बेघर, अंध, पंगू,रोगी,बेकार,दुःखी,नैराश्य आलेले या सार्यांसाठी आयुष्यभर झटले. त्यांच्याकरिता त्यांनी धर्मशाळा,सदावर्ते,पाणपोई यांची व्यवस्था केली.गाडगेबाबांनी अनेक संदेश दिले.त्यापैकी एक म्हणजे बाबा म्हणायचे - पैशांची उधळपट्टी करू नका.आज समाजात एकीकडे मुबलकता दिसते तर दुसरीकडे प्राथमिक गरजा देखिल काहींच्या भागू शकत नाहीये.ही विषमता जर दूर करायची असेल तर आम्हालाच जागे व्हावे लागेल.या देशाचा संवेदनशील नागरिक म्हणून मलाच यावर काहीतरी करावे लागेल.देशात कित्येक सरकारे येतील-जातील, कित्येक नवनवीन सरकारी योजना गरीबांसाठी येतील - जातील , परंतु जोपर्यंत माणसातील माणूसकी जागृत होत नाही तोपर्यंत हे सारेच व्यर्थ आहे.समाजात जर आर्थिक समानता प्रस्थापित करायची असेल तर तारतम्याने वागण्याची गरज आहे.माझी आजी लहानपणी आम्हाला नेहमी म्हणायची श्रीमंतांना खूप देण्यापेक्षा गरीबाला द्यावं. व बोलण्याप्रमाणे ती तशी वागायची देखिल. श्रीमंतांकडे कार्यक्रमास जाताना ती छोटी भेटवस्तू व गरीबाकडे जाताना मोठी व त्यांना जीवनोपयोगी ठरेल अशी वस्तू भेट म्हणून देत असे.तिची ही गोष्ट आमच्या बालवयात इतकी मनावर बिंबली की, आम्ही देखिल तिची ही सवय तेवढीच जपली.आज आम्ही मोठेपणाच्या खूप गोष्टी करतो.आज सर्वात जास्त प्रचलित असलेल्या माध्यमातून म्हणजेच फेसबुक व वाॅटस्अॅपवर तर असे कितीतरी माणूसकीचे मॅसेजेस पाठविले जातात की जे वाचल्यावर मन भरून येतं पण अशा हजारो मॅसेजेस पेक्षा एखादी चांगली कृती वा एखादी चांगली प्रथा जर आपण पाडू शकत असू तर ते सर्वोत्तमच म्हणावे लागेल. आमचे थोर संतजन आम्हास सांगून गेलेच आहेत - क्रियेवीण वाचाळता व्यर्थ......

सौ.अपर्णा सोवळे

यवतमाळ

मो. नं. 8308892122

Email.: sowaleaparna@gmail.com


ही ब्लॉग पोस्ट कशी वाटली ? लाईक करा, कमेंट करा आणि व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर शेअर करा.

49 views0 comments
टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page