top of page

१२ जुलै, १९६१ : पानशेत धरणफुटीच्या पार्श्वभूमीवरची काल्पनिक कादंबरी

" १२ जुलै, १९६१ "

पानशेत धरणफुटीच्या पार्श्वभूमीवरची काल्पनिक कादंबरी


१२ जुलै, १९६१ रोजी पानशेत धरण व नंतर खडकवासला धरण फुटले आणि पुण्यात मुठा नदीकाठच्या पेठांमध्ये हाहाकार माजला. १२ जुलै, २०२१ रोजी ह्या दुर्घटनेला ६० वर्षे होत आहेत.

या पुरामुळे पुण्यातली अनेक घरे, इमारती, माणसे, जनावरे, आसपासची शेती, सार्वजनिक मालमत्ता, मंदिरं, शनिवार वाडा यांचे अतोनात नुकसान झाले. हीआपत्ती होती की इष्टापत्ती? कारण ह्या पुरानंतर पुण्याचा चेहरामोहराच बदलला. नदीच्या आसपासच्या पेठा विस्थापित होत विखुरल्या. आधुनिक पुणे विस्तारत गेले. आजचे पुणे तर अनेक गावठाणांना कवेत घेत अधिकच विस्तारत, फुगत आहे.

कादंबरीचा गोषवारा -

आजच्या काळातील तरुणी शैली ही आर्किटेक्ट आणि भरतनाट्यम् नृत्यांगना असते. ती एक जुन्या पद्धतीचा वाडा बांधत असते. वाड्याच्या सजावटीसाठी तिला जुन्या, अ‍ॅंटिक वस्तू हव्या असतात. पुण्यातल्या जुन्या बाजारात तिला काही खास वस्तू मिळतात. तिचा प्रियकर-मित्र चित्ततोष हा भाषाविद असून त्याचा लॅंगवेज ब्यूरो असतो. जुन्या बाजारातली खास गोष्ट पाहून चित्ततोषच्या बालपणीच्या स्मृती जागृत होतात. त्यातून सुरू होतो आठवणींचा पाठलाग. त्यात यांना पानशेत पुरासंबंधीचे काही धागेदोरे सापडतात. शैलीची आई प्रतिभा ही ख्यातनाम लेखिका असते. प्रतिभाचा मित्र सुदर्शन हा पुरातत्त्व अभ्यासक असतो. प्रतिभाने पानशेत दुर्घटनेविषयी लेखन केलेले असते. त्यातून व अन्य स्रोतांतून ह्या तरुणांना बरीच माहिती मिळते. चित्ततोषचा भाऊ ऋतुपर्ण हा पर्यावरण अभ्यासक, कवी-लेखक असतो. त्याच्या जलस्रोतांच्या, धरणांच्या अभ्यासातून काही संदर्भ मिळतात. तीन पिढ्यांमधील घटना-पटातून, नव्या-जुन्या पात्रांच्या माध्यमातून कथा-उपकथांची वीण १९६०च्या व त्याच्याही आधीच्या दशकांपर्यंत पोहोचते. तो ह्या तरुणांच्या आजी-आजोबांच्या तारुण्याचा काळ असतो. ५०-६० वर्षांपूर्वीच्या पुण्यातला काळ असतो.

अनेक घटनांचे अन्वय जोडताना पानशेत दुर्घटनेच्या पोटात लपलेल्या अनेक कथा, उपकथा, व्यथा, मनोविश्लेषण, पुराचे चित्रदर्शी वर्णन, पेठांमधील वाताहात, तुटलेली/जुळलेली कुटुंबे/माणसे, माणसाचे विपत्तीतील भले-बुरे वर्तन ओघाने येते. तत्कालीन कौटुंबिक, नैतिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय जीवनाची झलक व पुरानंतरचे आधुनिक पुणे…हे समांतरपणे गोवले आहे. चित्ततोषच्याआजोबांच्या विफल प्रेमकहाणीसह छोट्या मोठ्या घटनांतून कथानक फुलते. कादंबरीच्या सांगतेला शैलीने बांधलेल्या प्रशस्त वाड्यामध्ये सर्व संबंधितांचा स्नेहमेळा जमतो व आजोबांच्या प्रेमकहाणीचे रहस्य उलगडते.

तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, आचार्य अत्रे, न्यायमूर्ती बावडेकर, आयुक्त स. गो. बर्वे, विदुषी सुलभा ब्रह्मे, कविवर्य ग. दि. माडगूळकर, जयंतराव टिळक, शंतनुराव किर्लोस्कर, मेजर ग. स. ठोसर, इंजिनिअर भालेराव, इंस्पेक्टर हेबळे इत्यादी वास्तवातल्या पात्रांचे संदर्भ कादंबरीत असले तरी ही कादंबरी ऐतिहासिक नाही. कथानक काल्पनिक आहे.

१९६० मध्ये संयुक्त महाराष्ट्र लढा झाला. त्यानंतर १९६१ मध्ये वर्षभरात उद्भवलीपानशेत दुर्घटना. ‘हिंदी-चिनी भाई-भाई’ हा घोष चालू असतानाच १९६२ ला चीनने आक्रमण करूनभारताच्या पाठीत खंजीर खुपसले. एक घटना प्रांतीय, दुसरी स्थानिकतर तिसरीद्विराष्ट्रीय! प्रांतिय व द्विराष्ट्रीय घटनांच्या मध्ये घडली ही स्थानिक पानशेत दुर्घटना! त्यानंतर यशवंतराव चव्हाणांना पंडित नेहरूंनी देशाचे संरक्षणमंत्री केले आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आले मारोतराव कन्नमवार. सगळेच अस्थिर.

हे धरण का, कसे फुटले? पुण्याचे पाऊसमान, धरण-क्षेत्राचे मातीपरीक्षण यांचा नीट अभ्यास करूनच “मातीचे धरण” बांधले ना? धरण अपेक्षित वेळेपूर्वी घाईने पूर्ण का करण्यात आले? या आपत्तीची पूर्वकल्पना तज्ज्ञांना व अभियंत्यांना आली नव्हती का? त्यात भ्रष्टाचार व राजकारण होते का? याचा तपास लावायला जी ‘बावडेकर समिती’ नेमण्यात आली, त्या निवृत्त न्यायमूर्ती बावडेकरांनीच आत्महत्या का केली? पुणे पोलिसांची काय भूमिका होती? अनेक प्रश्न. काहींची उत्तरे सापडतात, काहींची नाही.


अंदाजे २८५ पानांच्या ह्या कादंबरीला ज्येष्ठ लेखक डॉ. सदानंद मोरे यांनी ब्लर्ब लिहिले आहे. पानशेत दुर्घटनेच्या ६०व्या स्मरणवर्षी- १२ जुलै, २०२१ रोजी ती प्रकाशित होत आहे. इंकिंग इनोव्हेशन्स, वडाळा (मुंबई) ही संस्था कादंबरी प्रकाशित करत आहे. लक्षवेधी मुखपृष्ठ साकारले आहे अजय प्रभाकर यांनी तर आतील चित्रे डॉ. मयुरी वाघ यांनी रेखाटली आहेत.




प्रकाशन : 12 जुलै, 2021 रोजी

मूळ किंमत : रु. 450/-

प्रकाशनपूर्व सवलतीत: रु. 350/-

संपर्क :

प्रकाशक : INKING INNOVATIONS प्रकाशन

मोबाईल : 9820082755


लेखिका : आश्लेषा महाजन - ashlesha27mahajan@gmail.com



Comments


टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
Vishv Marathi Parishad logo transperent.

विश्व मराठी परिषद

कार्यालय  : ६२२, जानकी रघुनाथ, पुलाची वाडी, झेड ब्रिज जवळ, डेक्कन जिमखाना, पुणे, महाराष्ट्र - ४११००४
भ्रमणध्वनी : ७०३०४११५०६  | व्हॉटसअप : ७०६६२५१२६२ |  ईमेल : sampark@vmparishad.org
वेळ: सकाळी ११ ते सायं. ७ 
  • व्हॉटसअप
  • फेसबुक
  • इंस्टाग्राम
  • टेलिग्राम
  • युट्यूब चॅनेल
WhatsApp.png

© Vishwa Marathi Parishad

bottom of page