२०२० वर्ष लवकरच निरोप घेणार आहे.सहनशीलता आणि संयम याची परीक्षा सुरु असलेले हे वर्ष होते.३१ तारखेला मावळणारा सूर्य या वर्षाला निरोप देणार आणि नवीन वर्षात उगवणारा सूर्य सगळ्यांसाठी आशेची किरण घेऊन येणार.मावळत्या दिनकराला निरोप देऊन उगवणाऱ्या सूर्याचे स्वागत करून नमस्कार करावा. समृद्ध जीवन जगण्यासाठी वाईट गोष्टी,प्रसंग यांना निरोप द्यावा. चांगल्या विचारांचे स्वागत करावे. निरोप आणि स्वागत या विषयी हिंदोळे सुरु असतांना मित्राचा फोन आला आणि त्याने फोनवरून सांगितले काल बाबांचा नोकरीचा कालावधी संपला. सेवानिवृत्त झाले.ऑफिसमध्ये सगळ्या सहकार्यानी केलेला निरोप समारंभ अगदी स्नेह आणि भावना व्यक्त करणारा होता.निरोप देण्याघेण्यातून मायेचा ओलावा जाणवत असतो म्हणून या कार्यक्रमाला निरोप समारंभ असे संबोधले जात असावे असा विचार सुरु असतांना घराच्या खिडकीतून बाहेर बघितले तर समोरच्या केबल वायरवर एक नाजूक चिमणी सारखा पक्षी दिसला. माझ्यातील पक्षीमित्र जागा झाला. नीट बघितले तर तो मुनिया हा चिमणी सारखा नाजूक आणि सुंदर पक्षी आहे हे ओळखले. साधारणपणे या कालावधीत हा पक्षी घरटे तयार करून अंडी घालतो हे माहिती होते, तेव्हाच मुनिया गवताचे पाते घेऊन जाताना दिसली. आमच्या घराच्या खालच्या खिडकीत सुरक्षित जागा बघून घरटे आकार घेत होते. यापूर्वीसुद्धा आमच्या घराच्या आजूबाजूला मुनियाने घरटे तयार केलेले होते. गवताचे एक एक पाते घरट्याला आकार देत होते. आजूबाजूला असलेल्या रहिवासी मंडळींना पण मुनियाचे घरटे, अंडी आणि नंतर तिची चिमुकली पिल्ले यांना आपल्या बाजूने काही त्रास होणार नाही अशी काळजी घेऊ असे सांगितले. आता त्या मुनियाच्या कलाकुसरीचे आणि मेहनतीचे कौतुक वाटत होते. मनोमन निसर्गाच्या त्या चिमुकल्या जीवाला वंदन केले.. हे सगळे सुरु असतांना मात्र माझे लक्ष मागील वेळेस ज्या कुंडीत मुनियाने घरटे केले होते त्या कुंडीकडे गेले तर त्या कुंडीत फक्त काही वाळलेल्या काड्या आणि घरट्याचा आकार एवढ्याच भूतकाळातील अस्तित्वाच्या आठवणी शिल्लक होत्या. निसर्ग नियमानुसार मुनियाने आपल्या बाळासह पुढील वळणावर झेपावण्यासाठी उड्डाण केलेले होते. मागील वेळेच्या घरट्याला मुनियाने निरोप दिलेला होता. मुनियाच्या या प्रक्रियेत अनमोल संदेश दडलेला होता असे लक्ष्यात आले आणि या घटनाक्रमाचा ठाव घेण्यासाठी निरोप या विषयावर चिंतन सुरु झाले.
निरोप मग तो आपण दिलेला असतो किंवा कोणाकडून आपण घेतलेला असतो - अस्तित्वाच्या खुणा म्हणजे आठवणीच्या वाटा असतात. संवेदनशील भावना निर्माण करून भूतकाळातील क्षणांना जागे करणाऱ्या या वाटा असतात. निसर्ग प्रक्रिया माणसाला असेच तर घडवत असते.बाललीला संपल्यावर प्राथमिक शाळेतील निरोप समारंभ मग माध्यमिक, उच्चमाध्यमिक नंतर महाविद्यालय अश्या प्रत्येक वळणावर निरोप घेऊन पुढील वळणावर वळत जावे. जीवनचक्रात निरोपाच्या क्षणांना त्या त्या प्रसंगी सामोरे जावेच लागते. मुनियाने घरट्याचा घेतलेला निरोप या प्रसंगाशी दैनंदिनीतील अनेक पैलू उलगडायला लागले.अनेक प्रसंगाशी अनुरूप असे धागे जुळायला लागले .
आमच्या पाटणकर काकू अल्पशा आजाराने देवाघरी गेल्या. पाटणकर काकू उत्तम पेटी वाजवत होत्या, नियमितपणे त्यांची संगीतसाधना सुरु असायची. आता त्या नाहीत त्यामुळे त्यांच्या अस्तित्वाची आठवण असलेल्या त्यांच्या पेटीचे सूर कानावर पडणे बंद झाल्यावर संगीत साधनेने त्या पेटीला आणि कलाकाराने स्वराला दिलेला निरोपच तर होता ना, बहारदार मैफील असेल, एखादा छानसा सिनेमा किंवा नाटक असेल, स्नेहमेळावा असेल, निसर्गातील भटकंती असेल, प्रत्येक घटना आणि प्रसंग यांची कालमर्यादा ठरलेली असते.कालमर्यादा संपली की निरोप द्यावाच लागतो. रोज सूर्य संध्याकाळी मावळून आपल्या अस्तित्वाची रंगचित्रे क्षितिजावर ठेऊन दिवसाला निरोप देतो एका आशादायक पहाटेला उजाडण्यसाठी, निरोप शब्दातच रोप शब्द दडलेला आहे,हाच समन्वय साधून आपण सुध्दा आशेचे रोप मनात रुजवावे. विश्वशांती आणि मानवी कल्याण या भावनेतून अस्तित्वाच्या खुणा निर्माण करत जगावे कारण श्वास तर शरीराचा आणि आत्मा तर जगाचा निरोप घेऊन अनंताच्या प्रवासाला जाणार आहेच. जीवन सुदंर आहे ते अधिक सुंदर करण्यासाठी अंधाराला निरोप द्यावा म्हणजे प्रकाशाचा जन्म होतो.खोटेपणाला निरोप द्यावा म्हणजे मोठेपणाचा जन्म होतो.वादाला निरोप द्यावा म्हणजे संवादाचा जन्म होतो. भूतकाळातील त्रासदायक गोष्टींना निरोप द्यावा म्हणजे वर्तमानकाळातील चांगल्या गोष्टीचा जन्म होतो..वर्तमानकाळाचा संपर्क नेहमीच चैतन्याशी असतो.एकदा चैतन्य निर्माण झाले की चिंताना निरोप मिळतो आणि मना बरोबर आत्मा सुद्धा शुद्ध होत जातो हेच खरे.
धनंजय उपासनी
पुणे.
Email: dsupasani65@gmail.com
ब्लॉगवर नवीन आहात ? नवीन ब्लॉगपोस्टच्या सुचना ईमेलवर येण्यासाठी सबस्क्राईब करा
सुंदर लिहिले आहे तुम्ही !