top of page

निर्णय



रात्रीचा तीन वाजले होते.एकदाचे पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशन पूर्ण करून अजयने लॅपटॉप बंद केला . आज गणपती विसर्जन , बाहेर रस्त्यावर सकाळपासून गणपती विसर्जनाच्या मिरवणूकीची धामधूम चालू होती .ढोल ,ताशा आणि डीजे वरील गाण्यांचा कर्णकर्कश आवाज, आणि त्यावर बेधुंद होऊन नाचणारी तरुणाई, प्रचंड कोलाहल चालला होता. उत्तररात्र झाली तरी अजून मिरवणुका चालूच होत्या.डोके बधीर झाले होते नुसते. त्याला मात्र प्रोजेक्टच्या या डेड लाईन मुळे बाहेर डोकावायलासुद्धा वेळ मिळाला नव्हता . उद्या त्याच्या पहिल्या प्रोजेक्टचे प्रेझेंटेशन होते. कंपनीत जॉईन झाल्यापासून चार महिने रात्रंदिवस काम करत होता तो या प्रोजेक्टवर. उद्याचे प्रेझेंटेशन कसे होते याचे खरे तर खूप टेन्शन आलं होतं.



गादीवर आडवे होऊन त्याने दमून डोळे मिटले, तशी घरची मखरातील साजिरी गणपतीची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहिली . दरवर्षी तो किती मनापासून मखर आणि सजावट करत असे‌ . दहा दिवस पाहुण्यारावळयांनी घर कसे गजबजून जाई. नवीन धोतर सदरा व जरीची टोपी घातलेले प्रसन्न बाबा,काका, आजोबा , भरजरी साडीतल्या आई , काकू,आत्या,आजी आणि सर्व भावंडांनी मिळून म्हटलेल्या झांज,टाळांच्या गजरातील आरत्यांचे सूर कानात घुमत राहिले.



रत्नागिरी जिल्ह्यातलं, संगमेश्वरमधलं परचुरी , हे निसर्गाच्या कुशीत पहुडलेले अजयचे गाव. आजोबा गावाचे खोत होते .तालेवार, श्रीमंत बागायतदार घराणे , चौसोपी घरामागचा संपूर्ण डोंगर त्यांच्याच मालकीचा . आंबे,नारळीपोफळी, काजू , फणस , साग, रातांबे,ऐनाच्या झाडांनी हिरवागार झालेला. भाताची खाचरं, गाईगुरांनी गोठा भरलेला , राबायला गडीमाणसे , नदीपल्याड जायला स्वतःची होडी असे समृद्ध , सुखसंपन्न असे आयुष्य.



अशा सुखात नाहतच अजयचे बालपण सरले. अभ्यासात अतिशय हुशार होता तो.रत्नागिरी कॉलेजमधून उत्तम मार्कांनी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ची पदवी घेतली . कॅम्पस युनिव्हर्सिटीमधून त्याला लगेच जॉब मिळाला.कॉग्निसन्स कंपनी , विरारमधील एक नावाजलेली कंपनी होती ती. खूप खुश होता तो . त्याच्या या यशामुळे घरातले सर्वजणही आनंदात होते. पण घरापासून इतक्या लांब चाललाय म्हणून काळजी आणि थोडीशी नाराजी होती .पण मुलाच्या उज्वल भवितव्यासाठी त्यांनीही त्याला परवानगी दिली. डोळ्यात खूप सारी स्वप्न घेऊन तो मुंबईला आला . स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर उत्कृष्ट करिअर घडवायचे होते त्याला .



कंपनीत जॉईन झाल्यावर तो उत्साहाने काम शिकून घेऊ लागला. असेच चार महिने गेले.पण मायेच्या उबदार घरट्यात वाढलेले अजयचे संवेदनशील मन ,मुंबईच्या कोरड्या ,आत्मकेंद्रित जगात काही केल्या रमेना. कोकणातल्या सुखसंपन्न घरातील सुरक्षित कोशात वाढला होता तो .बाहेरच्या जगातील टक्केटोणपे,छक्केपंजे यापासून अनभिज्ञ असा तो कोवळा तरुण .त्याचे बाकीचे सहकारी आयटी कल्चरमध्ये पुरते मुरलेले होते. तसा अजय खूप बुद्धिमान होता खरा ,पण इतरांसारखे बॉस च्या पुढे पुढे करणे ,पोटात एक ओठावर एक असं वागणे हे मात्र त्याला काही जमत नव्हता.त्याच्या गावी राजपुत्रासारखा थाटात वाढला होता तो. त्यामुळे हुजरेगिरी करण्याचा पिंडच नव्हता त्याचा. वेगवेगळ्या राज्यातून आलेले बहुभाषिक सहकारी होते तिथे. गटबाजीच्या राजकारणात त्याला जाणून-बुजून एकटे पाडले जात होते. त्यात कामाचे प्रेशर पण खूप होते. त्याने जीव तोडून मेहनत करून केलेल्या प्रोजेक्टचे सगळे श्रेय त्याच्याबरोबरच्या दुसऱ्याच सहका सहकाऱ्याने लाटले होते. याचा प्रचंड मानसिक धक्का बसला त्याला. प्रयत्न करूनही कंपनीतील गलिच्छ राजकारणाशी आणि मुंबईच्या वेगवान रुटीनशी त्याला सांधा जोडून घेता येईना.या मायानगरीतील माणसांच्या प्रचंड कोलाहलात राहूनही आतून अगदी एकटा-एकटा पडला होता तो .घरातील मायेच्या माणसांच्या आठवणींनी कासावीस झाला होता. हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत वाढलेल्या अजयचा लोकलमधील गर्दीत उग्र घामाच्या दुर्गंधीत जीव गुदमरत होता. . हापूस आंब्याचा घमघमाट , पिकलेल्या काजूबोंडांचा उग्रमधुर गंध, रानजाईचा गंध मनात दरवळत होता.स्वतःच्या मातीची, आणि मायेच्या माणसांची ओढ लागून कासावीस झाला तो. शेवटी रजेचा अर्ज टाकून तो गावी पोचला.



शास्त्री नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर त्याचं घर. परसूला हाकारा घालताच तो होडी घेऊन आला ."बरं हाय ना धन्यानू" असं मायेने विचारत त्याने होडी वल्हवायला सुरुवात केली. किनाऱ्यावरच्या नारळी-पोफळीची प्रतिबिंबे पाण्यावर हेलकावत होती .वल्ह्याचा डुबुक डुबुक आवाज ,थंडगार पाणी आणि पिकलेल्या भात खाचरांचा वास छातीत भरून घेत तो ताजातवाना झाला.



नारळी-पोफळीच्या गर्द छायेत विसावलेले चौसोपी छान मोठे घरकुल, ओसरीवर चकचकित काळ्याभोर रंगाचा, सागवानी लाकडाचा प्रशस्त झोपाळा झुलत होता. त्यावर आजोबा अडकित्त्याने सुपारी कातरत बाबांशी गप्पा मारण्यात रंगले होते.दारासमोर गोमयाने सारवलेले प्रशस्त अंगण होते. लाल कौलांनी शाकारलेला गायी वासरांनी भरलेला गोठा होता . संध्याकाळची वेळ ,गोठ्यात गाईंच्या धारा काढण्यात गडीमाणसे गुंतली होती. परसूचे चिमुकले बाळ अंगणभर लडिवाळपणे रांगत ह़ोते.बाळकृष्णच जणू. घराचे नांदते गोकुळ झालेले.



आज नव्याची पूनव होती . घराच्या चौकटीला आई नव्या भाताच्या लोंब्यांचे आणि आंब्याच्या पानांचे तोरण बांधत होती. आज तो जवळजवळ सहा महिन्यांनी मायेच्या घरकुलात परत आला होता .पाणावल्या डोळ्यांनी आजीने त्याच्यावरून भाकर तुकडा ओवाळून टाकला.धाकटे शुभम आणि मंजू त्याला लाडाने बिलगले. झोपाळ्यावरच्या आजोबांना त्याने वाकून नमस्कार केला .तशी त्याला पोटाशी धरताना शीतल अश्रूंचे दोन थेंब त्याच्या केसात पडले. तगमगणारा त्याचा जीव शांत झाला . मग सगळ्यांनी मिळून नव्या धान्याची पूजा केली. एकत्र पंगत बसली.केळीच्या पानावर आईच्या हातचा गरमागरम भात ,वालाचं बिरडं पोटभर खाऊन तो तृप्त झाला. चुलीवर मंद आचेवर आटवलेले दूध पिऊन तो अंगणात आजीच्या मांडीवर विसावला. पोटभर गप्पा रंगल्या. आजीचा सुरकुतलेला मायाळू हात केसातून फिरत राहिला.मग आभाळातला कोजागिरीचा चांदवा त्याच्या डोळ्यात कधी उतरला ते कळलंच नाही त्याला.



पहाटे घंटेच्या किणकिणत्या आवाजाने त्याला जाग आली .आई भक्तीभावाने तुळशीवृंदावनातल्या तुळशीमाईची पूजा करत होती. झाली का रे झोप असं विचारणाऱ्या तिला हसून होकार देत तो उठला. आणि आडावर आंघोळीसाठी गेला ‌. तिथं वाडीतल्या बायकांची डोईवर हंडेकळशा घेऊन लगबग चालली होती. तयार होऊन तो गोठ्याकडे वळला. गाईच्या धारा काढणाऱ्या गडी माणसांशी ख्यालीखुशालीच्या गप्पा मारल्या. परसूने पुढे केलेला त्याच्या आवडत्या कपिला गाईच्या निरशा दुधाचा पेला ओठाशी लावत रिकामा केला.आणि तो निघाला.



उंच नारळाची झाडे झावळ्यांचे हात हलवून त्याला बोलावत होती . स्वागतासाठी भगवी अबोली , पिवळी कोरांटी. तांबूसकेशरी कर्दळी फुलली होती. कमानीवर गुलाबी मधुमालतीचे झेले सजले होते .तिचा मंद मधुर सुवास मनाला मोहवत होता. आणि त्याची सगळ्यात जास्त आवडती फुलराणी जास्वंदी .पांढऱ्या, पिवळ्या ,लालचुटूक रंगांच्या, जास्वंदीच्या फुलांचे जणू रंग संमेलनच भरले होते. त्यात पंचवीस पाकळ्यांची भरगच्च जास्वंदी खुलून दिसत होती . त्याने मुद्दाम बांधलेल्या छोट्याश्या दगडी तळ्यामध्ये जांभळी कमळे फुलली होती .



जणू ही सगळी फुले भरजरी शालू , पैठणी नेसून सजली होती. त्यातून चांदणफुलांनी बहरलेली तगर लक्ष वेधून घेत होती. सुस्नात होऊन पांढरेशुभ्र पातळ नेसून सोमवारी महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करायला निघालेल्या त्याच्या आजीसारखीच ती पांढरीशुभ्र साधीसुधी तगर. पाहूनच अजयचे मन प्रसन्न झाले



दगडी पायवाटेने सागाच्या पानांची जाळी तुडवत अजय निघाला..केळीच्या बागेत लालचुटूक केळीचे लोंगर लगडले होते . पह्र्याचे पाणी बागेतून झुळझुळत होते. एक हवाहवासा गारवा तनामनाला वेढत होता. स्वच्छ मोकळी हवा , पानांची सळसळ, पाखरांचा किलबिलाट , झाडावरचा निळाभोर खंड्या ,उगवतीची चमचमती किरणे यांनी त्याच्या मनाचा कोपरान् कोपरा उजळून टाकला . त्याला वाटले, आपल्या आयुष्याची एवढी वर्ष इथल्या हिरवाईच्या अंगाखांद्यावर खेळण्यात गेली. तरीही ही कसली भूल पडते मनाला या हिरवाईची. अन या मायेच्या माणसांची देखील.



मुंबईचा गजबजाट ,गर्दी , कोलाहल , जगण्याची शर्यत , कामाच्या डेडलाईन्स, एकलेपणाची ,तुटलेपणाची वेदना यावर शीतल चंदनलेप लावल्यासारखं वाटतंय. मग आपणही हाच मनाचा विसावा , शांतवा शहरी धावपळीत अडकून दमलेल्या लोकांना का देऊ नये?



ठरलं तर , ही नोकरी सोडून देऊयात. आयुष्य मुंबईच्या कोलाहलात काढणे शक्यच नाही , अन ऑफिस मध्ये कुणाची हुजरेगिरी करण्याचा आपला स्वभाव नाही. घुसमटून मरून जाऊ आपण. त्यापेक्षा इथं आपल्या शेतीवाडीत कृषी पर्यटन केंद्र सुरू करूयात. ताठ मानेने जगुयात.आपण अनुभवलेला मामाचा गाव पुण्या-मुंबईच्या मुलांना देऊयात . नारळी पौर्णिमेला सागरदादाला वाहिलेला नारळ ,नागपंचमीच्या झिम्मा फुगड्या , घरगुती गणपतीचा प्रसन्न सण, वाफाळलेले उकडीचे मोदक, गौरीची सजावट , गोडा तिखटाचा नैवेद्य, दिवाळीचा झुलता आकाशकंदील, उखळात कांडलेला घरच्या पोह्यांचा चिवडा, होळी, शिंपणं, शंखासूर, दशावतारी खेळ यांची माहिती होईल .संस्कृतीची ओळख होईल. आणि ही ऊर्जा घेऊन त्यांचे रोजचं धकाधकीचं जगणं पण सुसह्य होईल.



गडग्यावर फुललेल्या रानजाईच्या सुगंधाने वाडी नुसती घमघमली होती . चालत्या पावलांसोबतच त्याचे विचारचक्र जोरात फिरत होते. परत त्याला वाटले , आपल्या या निर्णयामुळे आई-बाबा काय म्हणतील? नातेवाईक, गावातील लोकं काय म्हणतील ?एवढा शिकून परत शेतीच करत आहे म्हणून हसतील का ? हसले तर हसू देत. आपण खंबीर राहूयात.ही सर्व शेतीवाडी सांभाळल्यामुळे आई-बाबांचा पण भार हलका होईल .दोघे थकलेत आता .



त्याच्या विचारांचा वारू आता भरधाव सुटला होता. आधुनिक पद्धतीने शेती उत्पादन पण वाढेल. वाडीतील चार पोरांना रोजगार पण मिळेल. ऑनलाईन मार्केटिंग सुरू करू.आपल्या कॉम्प्युटर मधील ज्ञानाचा इथे उपयोग करू. आपल्या आंबे , काजू, फणस आणि नारळी-पोफळींना हक्काची बाजारपेठ मिळवून देऊ. मॅंगो पल्प,आंबा पोळी ,फणसपोळी, फणसाचे वेफर्स, कोकम सरबत कितीतरी गोष्टी आहेत आपल्याकडे. वाडीतल्या बायकांसाठी लघुउद्योग चालू करू.त्यांचे ऑनलाइन मार्केटिंग करून गावाचा आर्थिक विकास होईल. कदाचित गावातल्या जुन्या-जाणत्या खोडांचा थोडा विरोध होईल आपल्या आधुनिकीकरणाला. एकदा का यातून सगळ्यांचाच आर्थिक विकास होतोय हे लक्षात आलं की हळूहळू मावळेल तो. गावातली आपल्यासारखीच पोटापाण्यासाठी शहरात धावणारी तरुणाई गावातच थांबेल मग. आपल्या वाडीतल्या भकास डोळ्यांच्या एकुटवाण्या वृद्ध माणसांच्या घरात आनंदाचे गोकुळ फुलेल‌. मुळात आपल्या स्वतः लाही मातीत आपल्या मायेच्या माणसांसोबत आयुष्यभर राहता येईल. सर्व बाजूंनी विचार करून तो आता एका ठाम निर्णयावर आला.



लगबगीने घरी जाऊन त्याने उत्साहाने घरातल्या सर्वांना त्याचा निर्णय सांगितला. त्याच्या ह्या निर्णयाने त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.पण एवढी चांगली पगारपाण्याची नोकरी सोडून इथे गावात त्याला काय भविष्य आहे या त्यांच्या मनातील शंकेचे त्याने व्यवस्थित निरसन केले.मग मात्र त्यांचे आनंदाने फुललेले चेहरे बघूनच त्याला त्यांचा होकार समजला ‌. उत्साहाने लॅपटॉप उघडून त्याने आपल्या कृषी पर्यटन केंद्राची वेबसाइट बनवायला घेतली .तिचं नाव होतं "यावा कोकण आपलाच आसा " "



कथालेखन -सौ. माधुरी शिवाजी विधाटे, पुणे संपर्क क्रमांक_७५८८३२८४६९

Email.: vidhate.madhuri@gmail.com



ही ब्लॉग पोस्ट कशी वाटली ? लाईक करा, कमेंट करा आणि व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर शेअर करा.

280 views0 comments

Recent Posts

See All
टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page