top of page

माझ्या गावाला भेट दिलीच पाहिजे



माझ्या गावाला भेट दिलीच पाहिजे कारण माझ्या गावात आहे एक 'कोहिनूर हिरा '! हो कोहिनूर हिराच !आश्चर्य वाटतय !संभ्रमात पडला? अहो कोहिनूर हिरा ही फिका पडेल असे अप्रतिम साक्षात 'स्वप्न महल' असणारे मूर्तिमंत शिल्पांचे सर्वांगसुंदर शिवमंदिर कोपेश्वर होय! हिरा माणिक याचा हा खजिना प्रत्यक्ष स्वनयनांनीअनुभवण्यासाठी , र्हदय संपुष्टात जपण्यासाठी ,अज्ञात शिल्पकारांच्या जादुई करांपुढे नतमस्तक होण्यासाठी, सौंदर्य सृष्टीचे अखंड प्राशन करण्यासाठी, माझ्या गावाला एकदा नव्हे अनेकदा भेट देऊनही तृप्तीचा ढेकर येणार नाही याची खात्री देते .म्हणून उचलली लेखणी मज गावासाठी, अभिमानासाठी, आणि हो व्यथा मांडण्यासाठी ही... ही पांढऱ्या कागदावरची फक्त काळी अक्षरे नाहीत तर एका छोट्याशा गावचा इतिहास ,भूगोल, धार्मिक महत्व आणि त्याच्याकडे झालेल्या अक्षम्य दुर्लक्षतेची आणि होऊ शकणाऱ्या अंमलबजावणीचा ऊहापोह म्हणजे हा लेखन-प्रपंच! पंधरा लाख शब्दांमध्ये ही न बसणारी यशोगाथा फक्त पंधराशे शब्दांच्या मर्यादा रेषेत बसविणे तारेवरची कसरत आहे. तरीही मिळालेला मणिकांचन योग मला 'बक्षिसी 'साठी नाही तर एक अमोल ठेवा जपण्यासाठी , अंतरीची व्यथा,हाक, वेदना किमान या दिग्गजांनी जे व्यासपीठ मिळवून दिले आहे त्याद्वारे तरी प्रकाशझोत टाकण्यासाठी हा माझ पामरीचा अल्पसा प्रयत्न!

महाराष्ट्राची सीमा जिथे संपते कर्नाटकची सीमा जिथे सुरू होते त्या कृष्णामाईच्या काठावरील, कोल्हापूर संस्थानातील ,शिरोळ तालुक्यातील, नरसिंह दत्ताच्या पवित्र परिसरातील पूर्वेकडील शेवटचे इवले इवले गाव !तिन्ही बाजूंनी कृष्णेने वेढलेले बेटच जणू !अवघे तीन हजार लोकसंख्येचे, साधेसुधे, अस्सल गावठीपणाच्या अद्यापि खुणा मिरवत असलेल !क्षात्रतेजाचची गंगोत्री असणारे, ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले महाराष्ट्राचे खजुराहो ..'खिद्रापूर' ..! पण प्रसिद्धीपासून कोसो दूर ...दुर्लक्षित दस्तऐवज! पवित्र आणि पुरातन तीर्थक्षेत्र! याशिवाय इथे असणारे जैन मंदिर ,येथील सृष्टीसौंदर्य आणि लोककला 'करंडोल 'वाद्य , जे शास्त्रशुद्ध पद्धतीने वाजविले जाते .तसेच येथील प्रसिद्ध असणारे ऊस ,केळी, वांगीची शेती आणि अवघ्या काही अंतरावर असणारे शौरगाथी सैनिक टाकळी, घरटी एक माणूस देशसेवेसाठी देणारे देशप्रेमी गाव! ‌‌

महाराष्ट्राची आद्य गंगा कृष्णमाईचा हा काठ कलासंस्कृतीचा मूलस्त्रोत् आहे .तिच्या जलप्रवाहाच्या दुग्धधारावर महाराष्ट्राचा पिंड परिपुष्ट झालाय .अनेक नरपुंगव , राजकारणी आणि शालिनीवाहनणासारखे शककर्ते राजे आणि राज्ये उदयास आली. कृष्णाकाठचा हा गाव निसर्गरम्य परिसर भरघोस पिकांनी, वृक्षवेली ,फुलांनी डवरलेला आहे .येथील वनश्री ला सौंदर्याचे वरदान मिळाले आहे. या लोकमतेच्या काठी अनेक आवर्तने ,प्रवर्तने घडली .काही घायाळ करणारी तर काही तिच्यावर लक्षदिप उजळवणारे... पण स्थिर राहून तिने लालनपोषणाचा वसा अखंड जपला आहे. कृष्णाकाठचे मनमोहन 'कोपेश्वर' म्हणजे कलेचा राजमहाल होय! असे मला वाटते.जो जगाच्या दृष्टीस अद्याप पडलेला नाही .यमुना काठचा ' ताजमहल 'आज जागतिक आकर्षण आहे. पण कृष्णाकाठचा हा 'कोपेश्वर 'कला विश्वातील माणिक जागतिक पर्यटन स्त्रोतापर्यत अद्याप् पोहोचलेला नाही. हा कृष्णेचा आणि त्या काठच्या जनतेचा मूक आक्रोश आहे

चालुक्य राजांनी सातव्या शतकात बांधलेले हे हेमाडपंथी मंदिर म्हणजे सिमेंट ,वाळू ,माती यांचा वापर न करता फक्त दगडामध्ये होल सिस्टीमने लॉक करून बांधलेले मंदिर !मंदिरात प्रथम दर्शनीच अगदी सर्वजण भारावून न केले तर नवलच! एका अंगभूत दालनात शिरल्याचा भास नक्की होतो. एकदा दालनात प्रवेश केला की गूळाच्या ढेपेला मुंग्या चिटक्याव्यात तसे सर्वजण मंत्रमुग्ध होऊन जो तो त्या अजब कलाकारीला न्याहाळण्यात चिकटतो.....अनिमिष नेत्रांनी प्रत्येक कलाकृतीचे रसपान करत राहतो.. ‌...अभिजात मूर्तिकलेचे भावाविष्कार त्यांच्या अंतरंगातून चेहऱ्यावर उमटतात. मानवी कल्पना सृष्टीचा तो उत्तुंग देखावा पाहून आपण नकळत नतमस्तक होतो .र्हदयपटावर अंतरंगात नवप्रेरणा देणारी भारावून सोडणारी ती कलाशिल्पे मन:चक्षू पुढून हलता हलत नाहीत .कायमचीच मनावर कोरली जातात. जेवढी मादक, मोहक ,आकर्षक तेवढीच मांगल्य, मुग्धता आणि शालीन आहेत.

स्वर्गमंडप, सभामंडप ,अंतराळ आणि गर्भगृह असे भाग या मंदिराचे ढोबळमानाने करता येतात. स्वर्गमंडप वास्तुशिल्पाचा अवर्णीय अध्याय! वास्तुकला आणि शिल्पकला यांचा अद्वितीय समन्वय !स्वागत करणारे गजराज !संपूर्ण मंडपाची बांधणी गोलाकार . 12 खांबावर गोलाकार उभारलेला खुल्या आकाशाचे दर्शन देणारा, आणि 36 कलाकुसरीने बनविलेले खांब बलदंड आधार देणारे! असा हा स्वर्गमंडप पायथ्याशी असणाऱ्या काळ्या रंगाची गोलाकार प्रचंड रंगशिला! बारा खांबाच्या माथ्याच्या खोबणीत शिल्पाकृती चपखल बसवलेल्याआहेत..चांदण्या रात्री आकाशगंगेत असंख्य स्त्रोत या स्वर्ग मंडपाच्या आकाश गवाक्षातून साक्षात धरणीवर उतरतात, तेथेच स्वर्गमंडपाची संकल्पना सार्थ होते.

मंदिराच्या बाहेरील बाजूने देव-देवता व स्त्री-पुरुषांची जी शिल्पपट्टी मंडित आहे तिला नरपट्टा म्हणतात . येथिल शिल्पसौंदर्य अनन्य आहे!आणि त्याखालीच मंदिराला गज पट्टा आहे. हत्तीवर बसलेले देवता, आभूषणे ,पोषाख ,आयुधे ,अलंकार इत्यादींचे बारीक बारकावे येथे पाहायला मिळतात. गाभारा व सभामंडपाच्या बाहेरील बाजूने 92 हत्तींची मालिका आहे.अश्व, बोकड ,वराह, मकर, मेष, महेश अशी शिल्पे तर आंबा ,काजू ,केळी ऊस, द्राक्ष घड यांचीही शिल्पे तसेच कमळ कर्दळ व अनेक फुलांचे प्रकार आहेत. तसेच ध्यानस्थ योगी ,सरपटणारा नाग, सुस्त सर्प, अरबी प्रवासी ,हाडाचा सांगाडा ,फुगलेल्या गालाची गोलाई अशी चकित करणारी शिल्पे पाहून थक्क होतो.

चौरसाकृती बारा खांब वर्तुळाकार फेर धरून आणि बाहेरून 20 खांबाचे कोरीवकाम उत्कृष्ट दर्जाचे .तीन प्रवेशद्वारे ... आणि मध्यभागी रंगशीला . एकसंघ शिलाखंड खोदून कोरीव शिल्पे कोरलेली आहेत. शिल्पकारांनी आपले तांत्रिक ज्ञान, वास्तु -शिल्प रचना ,धार्मिक संकेत, यांचे संतुलित प्रायोगिकरण केले आहे. शिल्पकलेचा हा अजोड नमुना ज्या हाताने घडवले त्यांना शतशा प्रणाम! गर्भ कक्ष, अंतराळ कक्ष कोपेश्वराचे जणू सौंदर्य कुंभच! प्रवेशद्वारी आठ फुट उंचीचे द्वारपाल नखशिखांत नटलेले!

मंदिराचा गाभारा अंतराळ कक्षापासून ढगाळलेल्या अंबरासारखा अंधुक आणि गूढ गंभीर होत जातो. अज्ञात गुहेत शिरल्याचा भास करणारा. अमूर्ताची सगुण मूर्ती घडविणारे हस्तकौशल्य अतुलनीय! स्वर्गीय सौंदर्य शिल्पांमधून ज्ञानाची परंपरा, धार्मिक, अध्यात्मिक बैठकीची साक्ष देणारी ! गाभाऱ्यात कोपेश्वराची एक शाळुंकेसह विशाल शिवपिंडी त्या पिंडीच्या समोरच धुपेश्वराची विष्णू स्वरूपातील पिंडी ..ज्याची नित्य पूजा होते ,भक्तांचे श्रद्धास्थान!

मंदिराची काही ठळक वैशिष्ट्ये

१) नंदी नसणारे एकमेव शिव मंदिर!

२) सर्वत्र अभिषेक जल गोमूखातून बाहेर पडते इथे मगर मुखातून बाहेर पडते

३) सर्वत्र कुंड पंचकोनी आढळतो तर इथे तो अष्टकोणी आहे.

४) चिनी, अरब ,फारसी लोकांची शिल्पे त्या काळच्या अंतरराष्ट्रीय व्यवहार दर्शवणारे

५) संक्रमित प्राणी, वेली त्याकाळीही क्लोनिंगचे ज्ञान असावे का?हा प्रश्न उपस्थित करणारे!

६) ५,६,७ मे रोजी सूर्याची किरणे थेट पिंडीवर अभिषेक घालतात ...स्थापत्यशास्त्राचा अजोड नमुना

७) गवाक्षावर जलबेरा डिझाईन

८) AC room.. मंदिराच्या बाह्य भागात थंडीत उबदार व उन्हाळ्यात थंड असणारी देवकोष्टके!

प्रत्येक भागावर अखंड एक-एक पुस्तक होईल इतके असंख्य शिल्पांनी युक्त ते दालन म्हणजे शिल्प विश्वच आहे. शब्दमर्यादेमुळे प्रत्येक कक्षाची थोडक्यात ओळख करून दिलीय क्षमस्व. प्रत्यक्ष दर्शनानेच त्याची प्रचिती घेणे उचित ..मदनमस्ताना नतमस्तक व्हायला लावणारी, सुसंस्कारित शितल शिल्पे आहेत ,तशीच प्रखर सौंदर्य रेखाटणारी पण विषयसक्त मनाला लगाम घालणारी !या मंदिराच्या प्रांगणात विखरुन बसलेली देवदेवता, देवांगणा अप्सरा, यक्ष, गंधर्व ,किन्नर, क्षेत्रपाल ,वेताळ शंखिनी , ,राजस्त्रिया, विषकन्या, नागकन्या यांच्या कला शिल्पातून प्रकट झालेली शिल्पकला प्रत्यक्ष स्वर्गात आल्याचा भास निर्माण करणारी आहे. शिल्पकारांच्या कौशल्याने तर तन मन भारावून न गेले तर नवलच !अभ्रविहरित आकाशातील नक्षत्र रत्नांची कांतीआभा प्रत्येक मूर्तीतून प्रकट होणारी! नयनसुख देऊन देह तृप्ती करणारी !कातळ विकारी मनाचा पूट गळून पाडणारी, एक आगळे वेगळे समाधान, अनुभूती मनाला देऊन जाणारी. ते घडविणाऱ्या हातांना लाख लाख प्रणाम! स्वतःला विसरायला लावणारे, दिव्यत्वाची प्रचिती देणारे हे कलाविश्व! तेथील 36 लक्षणे बत्तीस पुतळ्या म्हणजे पाण्याच्या डोहातून नुकतेच उमललेले कोवळ्या सुवर्ण किरणांनी कलीकांच्या पाकळ्या उघडुन फुलवाव्यात असा भास देणारे !त्यांच्या भावगर्भ नृत्यमुद्रा ,यौवनांचे रसगंध उधळतात. त्याकाळीची ही वैभवाची प्रसादचिन्हे अंगाखांद्यावर धारण करून हे मंदिर शिल्पकलेचा सुवर्ण कलश घेऊन उभे आहे असे वाटते .हे मंदिर एक भारतीय गौरव गाथा ,शौर्य गाथा आणि शक्तीचे द्योतक आहे. नवरस प्रतिमेमध्ये साकारून असामान्य काम कलाकारांनी केलेआहे नाट्य,गायन, वादन ,संगीत हे भाव मूर्तीतून अभिव्यक्त तर होतातच परंतु नेत्रमुद्रा, शरीर मुद्राही यातून प्रकट होणाऱ्या नेत्रपल्लवी ,कटपल्लवी काय वर्णाव्यात!

निर्जीव पाषाणातून काव्यमय शैलीने प्रत्येक कला प्रकट करणे सोपी गोष्ट नाही. मंदिरातील शिल्पे तनामनावर चंदनाची शीतलता आणि हळुवार सुगंध देणारी आहेत.कला शिल्पे मिथुनाकृती आहेत पण मैथुनाकृती नाहीत हे वैशिष्ट्य !प्रांगणात शिवपार्वती ,गणपती, शारदा ,ब्रम्हा, महेश देवतांची शिल्पे आहेत .त्याचबरोबर येणारी लीलावती, महासरस्वती अशी असंख्य शिल्पे आहेत . आकाशातील अनेक चांदण्या फुलाव्यात ,बागेत अनेक फुले उमलावे तसे या मंदिराच्या कला शिल्पांना अनेक संदर्भ संकेत आहेत ,त्याचा उलगडा जसा होतो तसे आपण बांधील होत जातो .कला विश्वातील निखळ आनंदाचे यात्रेकरू बनतो .

खिदरखान या नावाच्या ऐतिहासिक पुरुषाने हे गाव वसविले, त्यामुळे खिद्रापूर हे नाव पडले. कोपेश्वराचे भुवन मोहन कोणी बांधले हे निश्चित करणे अवघड आहे .पण गंडरादित्य ,विजयादित्य, दुसरा भोज या शिलाहार राजांच्या राजवटीत झाले असावे 1920 ते १२००मध्ये .या मंदिराची रचना भूमीजा पद्धतीची आणि द्रविडी शैलीची आहे. या भूमीवर एकूण 3 युद्धे लढली गेली. विजापूरच्या आदिलशाहाच्या राजवटीत मंदिराची अपरिणित अशी मोडतोड झाली . मूर्त्याची भग्नावस्था, हत्तींची तोडमोड त्याचे द्योतक आहे .जे पाहून आजही मन विदीर्ण होते. हा परिसर अष्टतीर्थ क्षेत्र म्हणून भाविका साठी श्रद्धेचे स्थान आहे .मंदिरापासून अवघ्या तीनशे किलोमीटर अंतरावर सर्वांग सुंदर असे जैनाचे पवित्र स्थान जैनमंदिर (बस्ती )आहे जिथे शिलालेख, बारा तीर्थकार ,भगवान महावीर , जैन साधू संता यांची शिल्पे आहेत .येथील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे 'करंडोल' !एक वाद्य प्रकार आहे .जो शास्त्रशुद्ध पद्धतीने नाद मधुर स्वरात शिवासमोर वाजवले जाते. नित्य कोपेश्वर देवळात शिवपिंडीची पूजा होते. प्रत्येक श्रावणी सोमवारी पूजाअर्चा सोहळा पाहण्यासारखा असतो. पौष वद्यअमावस्येला प्रतिवर्षी जत्रा भरते .

अशा या खिद्रापूर मंदिराचे सौंदर्य वाचताना सहाजिकच खजुराहोच्या यशोगाथेशी तुलना होतेच. 'खजुराहो' प्रसिद्धीच्या प्रकाशात जगासमोर झगमगते आहे तर 'खिद्रापूर 'अंधारात चाचपडत आहे .खजुराहोचा कीर्तीसूर जगभर पोचला आहे आणि खिद्रापूरचा सूर अजून घशातच अडकला आहे ,बेसूर होऊन .त्याचेही सोन्याचे दिवस येतील ,त्याचा किर्तीसुगंध कलाविश्व व्यापेल, ही वेडी आशा पूर्ण होईल का ?एक सौंदर्याचा नंदादीप तर दुसरा योनविद्यापीठ! जीवनातील मौलिक भारतीय संस्कृतीचा मानदंड, संस्कृतीची कीर्ती पताका उंचावून जगाला कलानंद देणारे! एकाला विश्व गौरव आणि दुसरा त्यापासून वंचित हा नियतीचा विचित्र न्याय आहे. नियतीला दोष देण्यापेक्षा आपण सर्वजण काय करतोय? काय करायला हवे ?हेही तितकेच महत्त्वाचे ना. एक लेखिका म्हणून किमान शब्दांच्या शस्त्राने तरी साहित्यप्रेमपेरणी करून हे सृष्टीसौंदर्य उभारणाऱ्या कलाकारांना न्याय देण्यासाठी लढावे असे वाटले. विश्व पर्यटनाच्या नकाशावर खिद्रापूर कोहिनूर हिरा म्हणून झळकने गरजेचे आहे. महाराष्ट्र शासनाने हे शिवधनुष्य पेलण्याची मानसिकता दाखवावी. यासाठी प्रचंड आर्थिक बळ लागेल. इथला पर्यटन विकास पावला तर प्रचंड आर्थिक स्रोत सूरू होऊ शकतो .त्यासाठी खिद्रापूरचे जगाशी संपर्क साधणारी यंत्रणा मृतवत आहे ती प्रथम राष्ट्रीय मार्गाला जोडावी लागेल. मिरज, जयसिंगपूर कोल्हापूर रेल्वे जंक्शन पासून पर्यटक सहज येऊ शकतील असे मार्ग हवेत. कृष्णा नदीवरील पुलाची उभारणी, राष्ट्रीय महामार्ग, जागतिक संपर्क यंत्रणा , हॉटेल्स ,विश्रामगृह ,मनोरंजन ,नौकाविहार करण्यासाठी सुविधा उपलब्ध होणे गरजेचे. खिद्रापूर नृत्य महोत्सव साजरा व्हावा .प्रख्यात नर्तिकाचे नृत्याविष्कार प्रांगणात सादर व्हावेत. हे मंदिर अखिल भारतीय नृत्याच्या विविध प्रकारांचे व्यासपीठ बनावे. या परीकल्पनेतील गोष्टी वास्तवात उतरायला प्रचंड आर्थिक आणि मानसिक शक्तीची गरज आहे. खिद्रापूर -बादामी -विजापूर हा पर्यटकांचा 'सुवर्ण- त्रिकोण'( गोल्डन ट्रँगल )निर्माण करण्याची अत्यंत गरज आहे .हा प्रकल्प महाराष्ट्र शासन आणि कर्नाटक यांच्या प्रयत्नांवर, सहकार्यावर येत्या काही दशकात मनात घेतले तर सहज साध्य उभा राहू शकतो .आणि साऱ्या जगाला या कलाप्रसादाचे दर्शन घडू शकते . या शिल्पाचा सुहासिक सुहास सर्वदूर पसरावा... मंदिराची मोहर जागतिक नकाशावर उमटावी....तूर्तास या लिखाणाने महाराष्ट्रभर हिचा सुंगध दरवळला तरी धन्य मानेन... शेवटी इतकेच वाटते कोपेश्वराचे शब्द पुष्पांनी केलेले अर्णव, भोळा भंडारी ,बिल्वदलांनी, गिरिजापती कोपेश्वर प्रसन्न होवो आणि शासनाला सुबुद्धी देऊन इथला पर्यटन विकास होऊन सर्व जगाच्या पालनकर्त्याने सर्व जगाचे लक्ष वेधावे !

आणि हो ...जाता जाता इतके सांगते माझ्या गावाला भेट देणार ना? स्वागत करण्यास सज्जआहोत,..



लेखिका: डॉ. राजश्री पाटील️ (शिरोळ, कोल्हापूर)

मो: 80 88 211 252, 8884006009          


लेख आवडल्यास कमेंट करा आणि शेअर करा.

 

नविन ब्लॉगचे नोटिफिकेशन येण्यासाठी विश्व मराठीच्या ईमेल लिस्टला सबस्क्राइब करा.

581 views1 comment
टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page