top of page

मनातले गूज सांगायला    तर एक होती सई, बोलघेवडी, माणसांत रमणारी, जगण्याचा आनंद घेणारी.  तिला आवडायचे स्वयंपाकघरातले वेगवेगळे प्रयोग, करणं, खाणं, खायला घालणं तिला प्रिय, स्वयंपाकघरात गाणी ऐकत कामं करायची, कधी तिच्या डायरीत कविता पण लिहायची, एखादा मनातला उतारा पानावर उतरायचा, कितीतरी छोट्यामोठ्या गोष्टी लीलया पार पडायची सई.  घरातली, बाहेरची कुठलीच गोष्ट जमत नाही असं नव्हतं.  अशी होती हरहुन्नरी सई.

      एक दिवस तिला भेटला तिचा साजणा, ती आणखीनच खुलली, त्याच्यावर, त्याच्या आप्तस्वकीयांवर तिनं आपलं जगणं अगदी हसत हसत उधळून दिलं, टापटीप रहाणारी सई दुपार झाली तरी आरशात बघत नसे, स्वयंपाक करताना गाणी ऐकणारी सई, आता इतरांच्या बोलांनी हैराण होत असे, वेगवेगळे प्रयोग कधीच मागे पडले, रोज पोळी भाजी डबे यातच शरीर अन मन दमून गेले.  देणं घेणं रुसवे फुगवे,  टीका टोमणे सगळं सोसताना तिच्या मनात फुलणारे शब्द वैभव हरवून गेले, डायरी अडगळीत पडली, उतारे, कविता हरवल्या.  सजणा आणि ती आधी किती गप्पा मारायचे, खळखळून हसायचे, आता ते दोघे असले की फक्त धुसफूस आणि चिडचिड होत होती. 

      एकदा सईला तिच्या जुन्या मैत्रिणीचा फोन आला, अचानकच, खूप दिवसांनी खूप गप्पा रंगल्या, रामरगाडा विसरून सई पण रमली भूतकाळात, आठवले तिला तिचे शब्द, तिची डायरी, त्यादिवशी भरपूर मन रित करत तिने शब्दांची उधळण केली, आणि एक वेगळीच सई तिला पुन्हा सापडली.


मनातले गूज सांगायला

एक धागा हवा सुखाचा,

साथ मिळता शब्दांची

डोंगर सरे सारा दुःखाचा.

      मनातलं गूज आता कागदावर उतरायला लागलं होतं, लेखणीशी तिचे बंध छान विणले जात होते, ती आणि तिची लेखणी आता सगळी आव्हानं झेलायला तयार झालेल्या.  

     आजूबाजूला सगळं तेच होतं, पण आतलं तुफान आता तिला गप्प बसू देत नव्हतं, शब्द फिरून गवसलेली सखी आत्मविश्वासाने पुन्हा उभी राहिली, आणि तिची तिच्याशीच पुन्हा गट्टी जमली, आता बाहेरचे सगळे त्रास बोथट झालेले, मन एक निरंतर आनंदाने फुलून गेलेले, अशी सई आज स्वयंपाकघरात रमली, 𝒇𝒎 वरची गाणी ऐकत नवीन काहीतरी करू लागली, सजणाला पुन्हा जुनी सई सापडली, आणि स्वप्नांची नवी पहाट पुन्हा उगवली.


लेखिका: सौ. वैदेही विनायक कुलकर्णी (कराड)


लेख आवडल्यास कमेंट करा आणि शेअर करा.

 

विश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअ‍ॅप लिस्टला सामील होण्यासाठी आमचा 7066251262 हा क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMParishad असा मेसेज पाठवा.

218 views0 comments

Recent Posts

See All

Comments


टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page