top of page

माझे बाबाबाबांविषयी लिहीण्यासारखे बरंच काही आहे. मी त्यांच्याविषयी लिहायला घेतले तर शब्दच अपुरे पडतील, इतकं माझ्या आयुष्यात त्यांचे स्थान उच्चकोटीचे आहे. नुसतं मी म्हणते असं नाही तर आमच्या संपूर्ण वालावलकर कुटुंबासाठी (माझे माहेरचे आडनाव) माझे बाबा हे भक्कम आधारस्तंभ होते असे म्हटलं तरी चालेल.

आज बाबांची 95वी जयंती आहे. त्यानिमित्त बाबांच्या स्मृतीला कोटी कोटी प्रणाम. बाबांचा जन्म 31 मार्च 1926 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील त्यांच्या आजोळी "मळगांव" ह्या गावी झाला. आठ भावंडात माझे बाबा हे आजी-आजोबांचे दुसरे अपत्य. लहानपणापासूनच ते अतिशय शांत व भिडस्त स्वभावाचे होते. त्यांचे आपल्या कुटुंबावर विशेष प्रेम होते. बाबा अभ्यासात अतिशय हुषार होते. त्यांचे शालेय शिक्षण सावंतवाडी व काॅलेजचे शिक्षण बेळगावला झाले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीनिमित्त बाबा मुंबईला येऊन तिथेच स्थायिक झाले. आम्ही जरी मूळ कोकणातील असलो तरी आज आमच्या चार पिढ्या ह्या मुंबईला स्थायिक झाल्या आहेत. आणि ह्याचे सारे श्रेय माझ्या आई-बाबांना जाते.
त्यावेळी कोकणात उच्च शिक्षण घेण्याची सोय नसल्यामुळे, शिक्षणासाठी मोठ्या शहरातच जावे लागत असे. माझे बाबा नोकरीनिमित्त मुंबईमध्ये येऊन व्यवस्थितरित्या स्थायिक झाल्यानंतर, त्यांच्या विवाहानंतर माझ्या आईच्या साथीने, त्यांनी आपल्या सगळ्या बहिण-भावांना नोकरीच्या निमित्ताने किंवा त्यांचा विवाह जुळवण्याच्या निमिताने, मुंबई/पुण्यात स्थाईक होण्यास मोठा हातभार लावला. आपल्या आई-वडिलांवर त्यांची अतोनात श्रद्धा होती. ते सांगतील ती माझ्या बाबांसाठी पूर्वदिशा होती असेच म्हणावे लागेल. त्यांच्या शब्दाबाहेर ते कधीही गेले नाहीत उलट बरेच वेळा त्यामुळे त्यांना आत्यांची लग्न जमविताना, अपमान सहन करावे लागले होते, परंतु तेही त्यांनी आपल्या आई-वडिलांखातर आनंदाने पचविले. नंतर आपल्या सद्वर्तनामुळे, ज्यांनी त्यांचा अपमान केला होता, त्यांना आपले शब्द परत घ्यावे लागले. अशा रितीने माझे बाबा हे आपल्या कुटुंबाचा एक कायम भक्कम असा आधार बनून राहीले होते.आजी-आजोबांनी बाबांचे पाळण्यातले नाव "रामचंद्र" ठेवले. आणि त्यांना सगळे "राम" ह्या नावानेच संबोधत असत. नावाप्रमाणेच आचरण ठेवून, माझ्या बाबांनी दाखवून दिले की आजच्या घोर कलियुगातही "राम" जिवंत आहे. माझ्या आईचेही नाव "सीता" आहे. त्यामुळे दोघांनीही आपले "राम-सीता" नाव सार्थ ठरवित, संपूर्ण "वालावलकर" कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर यशस्वीपणे पेलून घेतली.आपल्या आईवर त्यांची परमभक्ती होती, त्याचा एक नमुना मला तुमच्या समोर द्यावासा वाटतो. माझ्या मोठ्या आतेचा विवाह संपन्न झाल्यानंतर, तिची सासरी पाठवणी करताना माझी आजी म्हणजेच बाबांची आई भोवळ येऊन खाली पडली, तेव्हा क्षणाचाही मागचा पुढचा विचार न करता, डाॅक्टर येईपर्यंत, आजीची दातखिळ बसू नये म्हणून, बाबांनी आपल्या हाताची बोटे आजीच्या तोंडात रक्तबंबाळ होईपर्यंत तशीच ठेवून दिली होती. आजही जेव्हा जेव्हा हि घटना मी माझ्या आत्यांकडून ऐकते, तेव्हा माझ्या अंगावर चक्क काटा येऊन, डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागतात. केवढी ती त्यागवृत्ती आणि केवढा तो आपल्या कुटुंबाविषयी आदरभाव.

दुसरे उदाहरण म्हणजे, माझ्या बाबांना सरकारी नोकरीत वरिष्ठ पदावर असल्यामुळे, ग्रॅटरोडसारख्या उच्चभ्रू वस्तीत प्रशस्त असा सरकारी फ्लॅट मिळाला होता. त्यावेळी आमचे आजोबा आमच्याकडेच रहायला होते. माझे आजोबा म्हणजे गंधर्व नाटककंपनीतील, बालगंधर्वांबरोबर नाटकात प्रमुख नटाची भूमिका करणारे प्रसिद्ध नट "महादेव बाळकृष्ण वालावलकर" होय. तसेच पं पुरूषोत्तम वालावलकर हे पेटीवादक माझे मोठे काका होय. त्यावेळेला काकांचे कुटुंब हे बेळगावला होते. काकांच्या दौर्‍यामुळे त्यांची आबाळ होऊ नये म्हणून, आपल्या वडिलांच्या शब्दाला मान देऊन बाबा काकांचे संपूर्ण कुटुंब आमच्या घरी मुंबईला घेऊन आले. त्यानंतर चौदा वर्षे काकांचे कुटुंब आमच्याबरोबर रहात होते. ह्यामध्ये बाबांच्या मनाचा केवढा मोठेपणा दिसून येतो. तसेच माझ्या आईचीही बाबांना वेळोवेळी साथ मिळत गेली. आताच्या, आम्ही दोघे आणि माझी मुलं, ह्या जमान्यात दोन दिवसांचा पाहुणासुध्दा आपल्याला नकोसा वाटतो. त्यावेळी तुटपुंज्या पगारातही आई-बाबांनी एवढे मोठे कुटुंब सांभाळून, स्वतःच्या मुलांवरही कळत-नकळतपणे चांगल्या संस्कारांचे बीज पेरले. त्यामुळे आजही जिथे दोन दिवस पाहुणे आले की आपल्या कपाळावर थोड्या आठ्या पडतात, तिथे आजही माझी भावंडे आग्रहाने, आपल्या माणसांना घरी बोलावून त्यांचा उत्तम पाहुणचार करत असतात. माझ्या बाबांना जाऊन येत्या ऑगस्टमध्ये तीन वर्षे होतील. आज माझी आई 87 वर्षाची आहे पण अजूनही ती पूर्वीच्याच उत्साहाने घरी येणाऱ्या पाहुण्यांचा आदरसत्कार आनंदाने करत असते.आम्ही चार भावंडं लहान असताना, बाबांनी आपल्या तुटपुंज्या कमाईमध्येसुध्दा, छोट्या छोट्या गोष्टीतून आम्हाला खूप आनंद मिळवून दिला. आणि आपण थोडक्यात सुद्धा आनंद कसा टिकवू शकतो हे त्यांनी आपल्या वर्तनातून आम्हाला दाखवून दिले. बाबा आम्हाला कधी सिनेमाला नेत तर कधी चौपाटी, हॅन्गिंग गार्डन,मत्स्यालय तर कधी हाॅटेलमध्ये घेऊन जात. आम्ही लहानपणी आई-बाबांबरोबर केलेली मजा आजही आठवणी ताज्या करून जाते. मला गोड बुंदी आवडायची म्हणून माझे बाबा खास दर रविवारी माझ्यासाठी गोडबुंदी घेऊन येत असत. तसेच मला फुलांची अतिशय आवड होती. मी काॅलेजमध्ये असताना, माझे बाबा रोज माझ्यासाठी बाजारातून चार-पाच वेगवेगळ्या रंगांचे, सुंदरसे कलमी गुलाब केसांत माळण्यासाठी घेऊन येत असत. चार भावंडात मी एकटीच मुलगी असल्यामुळे आणि मुळात मी समंजस असल्यामुळे, जसजशी मोठी होत गेले तसतसे बाबांचे माझ्याविषयी प्रेम आणि जिव्हाळा वाढत गेला. मी लग्न करून सासरी आल्यानंतर, त्यांना माझी उणीव जास्तच जाणवायला लागली.बाबांना अध्यात्माची अतिशय आवड होती. त्यांच्या आजोळच्या घराण्यात "संत गोपाळबोधस्वामी" (समाधी पुरूष) हे जिवंत समाधी घेतलेले संतपुरूष होऊन गेले आहेत. ते आमचे सगळ्या "वालावलकर"कुटुंबाचे श्रध्दास्थान आहे. बाबांचा अध्यात्मिक वारसा माझ्याकडे आला आहे, ह्याचे बाबांनापण खूप अप्रूप होते. मी कधीही माहेरी गेले की ते त्यांच्याजवळ असलेली अध्यात्मिक पुस्तके मला वाचायला द्यायचे आणि त्यावर आमचे चिंतन व्हायचे. तो वेळ फारच मजेत जायचा. माझापण माझ्या बाबांवर विशेष जीव होता. मला आमच्या जवळच्या नात्यातील मंडळी "बाबांचा चमचा" म्हणून संबोधत. कारण चुकून कधी कोणी बाबांच्या विरूध्द बोलले तर मी लगेच त्यांच्याबाजूने बोलत असे. माझे आणि बाबांचे प्रेम हे मी शब्दात व्यक्त नाही करू शकत. ते माझ्यासाठी माझ्या जीवनाचा दीपस्तंभ होते आणि कायमच असतील.

वयाच्या 92व्या वर्षी, बाबांनी अगदी शांतचित्ताने ह्या जगाचा निरोप घेतला. आज जरी देहरूपाने ते आमच्यात नसले तरी चैतन्यरूपाने त्यांचा वास सतत आमच्याबरोबर आहे. परत एकदा आजच्या बाबांच्या 95व्या जयंतीनिमित्त, त्यांच्या स्मृतीस माझे कोटी कोटी प्रणाम. बाबांचे आशिर्वाद असेच आमच्या कुटुंबावर सदैव राहोत, हीच प्रार्थना.
पुष्पा सामंत.

नाशिक 31-3-2021.

Email.: Samant1951@hotmail.comविश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअ‍ॅप लिस्टमध्ये सामील व्हा - 7066251262 हा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMP असा मेसेज पाठवा

891 views1 comment

1 टिप्पणी


माझे बाबा - एका मुलीने बाबांचे केलेले अचूक आणि हृद्य वर्णन. सुरेख भाषा आणि तितकीच उत्कृष्ठ मांडणी . फारच छान लेख.

लाइक
टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page