top of page

मैत्री


मित्र-मैत्रिणी एकमेकांना भेटणं या इतकी आनंदाची गोष्ट दुसरी कोणतीच नसेल. आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या वळणावर भेटणार्‍या व्यक्ती त्यातील काहींशी आपली मैत्री अगदी दृढ होते. पण या प्रत्येक वळणावरील मैत्रीचे contribution आपल्या जीवनात खूप मोलाचे असते. ते आपण कधीच विसरू नये. लहानपणी शाळेतील मित्र-मैत्रिणी, किती निरागस असते ही मैत्री! मुलं-मुली एकत्र आनंदाने खेळतात, रुसतात, फुगतात, पुन्हा भांडण विसरून जातात. लगेचच कट्टीची गट्टी होते.

पुढे तारुण्यातील मैत्री ही काही वेगळीच! या वयात ज्यांच्याशी आपल्या विचारांची तार जुळते त्यांच्याशी मैत्री होते. तारुण्यातल्या मैत्रीत खूप मजा असते, आपण तारुण्यात कोणाची कदर करत नसतो कारण या वयातील मैत्री तशी थोडी वरवरचीच असते. टिकली तर टिकली नाहीतर गेली उडत. आपण आपल्या विश्वात रमून जातो. आपलं विश्व त्यावेळी डबक्या सारखं असतं. विशाल सागराचा आपण त्या वेळी विचारच केलेला नसतो पण जेव्हा पन्नाशीत पोहोचतो तेव्हा कधी डबकं सोडून सागराला मिळालेले असतो हे कळतसुद्धा नाही. जेव्हा पन्नाशीच्या सागरात मित्र-मैत्रिणी भेटतात तेव्हा सगळ्या नात्यात ते मैत्रीचं नातं इतकं आपलं वाटत असतं कि ती मैत्री खूप हवीहवीशी वाटते.

नात्यापेक्षा मैत्रीचा आधार खूप हवासा वाटतो. मैत्रीत खूप मोकळेपणा असतो. आपली विचारांची तार जुळत असेल तर काहीही आडपडदा न ठेवता आपण मित्र-मैत्रिणींशी सर्वकाही शेअर करतो. जो आपल्याला समजून घेतो व आपल्या हाकेला ओ देतो तोच खरा मित्र!

आयुष्याच्या संध्याकाळी सुद्धा असे मित्र मैत्रिणी भेटतात. आपण कोणीच कोणाचे नसतो. पण आपले काहीतरी ऋणानुबंध असतात म्हणूनच आपली भेट त्या व्यक्तीशी होते. "ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी!" स्त्री-पुरुष मैत्री ही आणखी एक निराळीच गोष्ट आहे. ही समाजाला बोचते. भिन्नलिंगी मैत्री ही दूषितच असते असं समजलं जातं. एखाद्याचे तसे असेलहि. पण म्हणून सब घोडे बारा टक्के या चालीवर हे समजू नये. कितीतरी अशा व्यक्ती आहेत की ज्या निखळ सच्ची मैत्री करतात. त्यांना ही मैत्री आनंद देते. हे मैत्रीचे नाते लगेचच प्रेमसंबंधाशी जोडू नये. हा मनाचा कोतेपणा आहे.

मुद्दाम कोणी अशी मैत्री शोधायला जात नाही. काही वेळा ती सहजच घडते. काही माणसं थोड्या सहवासानेहि आपलीशी वाटतात. आपण त्यांच्या स्वभावाच्या प्रेमात पडतो, त्यांचा सहवास हवाहवासा वाटतो. ज्यांना अशा व्यक्ती भेटतील तर त्या त्यांनी अवश्य जपाव्यात. सगळ्यांनाच हे भाग्य लाभत नाही. जीवन आनंदी होण्यासाठी मैत्री कारणीभूत ठरते, अशी ही मैत्री.

मोगर्‍याच्या फुलाचा सुगंध आपल्याला हवा हवासा वाटतो. तो लपवता येत नाही. त्याचा आपण आस्वाद मनमुराद लुटतो. तसच मैत्रीचं आहे. निकोप मनाने स्वतःवर व दुसऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवून ही मैत्री जपली पाहिजे. आपल्या पेक्षा आपण दुसऱ्या व्यक्तीची जेव्हा अधिक काळजी घेतो तीच खरी मैत्री! त्यात जरासुद्धा स्वार्थीपणा नसतो, अपेक्षांचे ओझे नसते, गैरसमजाला थारा नसतो. मला वाटतं नवरा-बायको सुद्धा चांगले मित्र-मैत्रिण बनू शकतात. जेव्हा त्यांच्यातलं आकर्षण संपतं तेव्हा जर त्यांना love and affection याचा खरा अर्थ समजेल तेव्हाच, आणि त्यांच्या जीवनात तो अर्थ उतरलेला असेल तेव्हाच, नाही तर खूप वेळा ते नातं कोरडं होतं. हल्लीच्या झगमगाटी दुनियेत समईचं शांत तेवणं मनाला अधिक प्रसन्नता देतं! तसंच मैत्रीचं आहे.

स्वामी विवेकानंदांनी मैत्री साहचर्य यावर एक सुंदर भाष्य केले आहे. ते म्हणतात, "पावसाचा थेंब आकाशातून पडतो, जर तो हातावर घेतला तर ते पाणी पिण्यासाठी शुद्ध असते. पण जर तो थेंब गटारीत पडला तर तो पाय धुण्यासाठी ही उपयोगी नसतो! जर तो थेंब कमळाच्या पानावर पडला तर तो मोत्याप्रमाणे चमकतो! व तो जर शिंपल्यात पडला तर तो मोतीच बनतो! थेंब एकच पण त्याचे मूल्य त्याचं असणं कुणा बरोबर आहे यावर ठरतं! म्हणून चांगल्या माणसाची मैत्री करा जे हृदयाने चांगले आहेत. म्हणून तर आपली एखाद्याशी घट्ट मैत्री होते कारण त्याचे व आपले मन जुळते.

जयश्री सतीश पटवर्धन कागवाड ,कर्नाटक महिला वय 79वर्षे फोन नं 7406983273

jayashreep1941@gmail.com ही ब्लॉग पोस्ट कशी वाटली ? लाईक करा, कमेंट करा आणि व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर शेअर करा.



712 views0 comments

Comments


टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page