साहित्य मग ते कुठलेही असो ! ते त्या त्या तत्कालीन समाजाचा आरसा असतो. लोकसाहित्य हे सुद्धा समाजाच्या संस्कृतीचा, आचारविचारांचा , एक आदर्श असे प्रतिबिंब दाखवणारा आरसा आहे. चालीरीती, रूढी, प्रथा, परंपरा,सामाजिक बांधिलकी, नाते संबंध या सगळ्या घटकांनी जीवन समृद्ध करणाऱ्या समाजाचा आरसा म्हणजे लोकसाहित्य होय. भूतकाळात रमणे योग्य नसले तरी हा भूतकाळ मात्र आपल्या येणाऱ्या भविष्य आणि वर्तमानाला घडविणारा, आकार देणारा नक्कीच असतो . साहित्याने सामाजिक स्थित्यंतरात फार मोठी भूमिका बजावली आहे. समाजभान जागृत करण्याचे कार्य साहित्य नेहेमीच करत आले आहे. साहित्याच्या व्यापक व विशाल अश्या भांडारातील एक ओघवता प्रवाह म्हणजे लोकसाहित्य होय . लोकसाहित्याला प्राचीन अशी परंपरा लाभली आहे.
इ . स . १६व्या १७व्या शतकापर्यंत जगाच्या पश्चिम भागात मध्ययुगाची समाप्ती होऊन यंत्रप्रधान आधुनिक युगाला प्रारंभ झाला .
मुद्रणयंत्राच्या शोधामुळे लिखित साहित्याची निर्मिती आणि प्रसार यांची लाट आली आणि त्याचवेळी मुद्रणपूर्व मौखिक परंपरेतील साहित्य व संस्कृती यांचे संग्रहण व अध्ययन करण्याची गरज अभ्यासकांना वाटू लागली . या साहित्यासाठी “फोकलोअर” ही इंग्रजी संज्ञा सर्वप्रथम विल्यम जोन्स टॉमस या इंग्रजी पुरातत्वज्ञानें १८४६ मध्ये वापरली . आज मराठीत लोकसाहित्य हा शब्द इंग्रजी फोकलोअर शब्दाचा पर्यायशब्द म्हणून रुळला.
“लोकशाही” या शब्दातील “लोक” या पदाचा जवळचा आशय लोकसंहितामधील लोक पदात अंतर्भूत आहे. म्हणजे हे लोक केवळ जुने व केवळ नवे, केवळ ग्रामीण वा केवळ साक्षर व केवळ अनक्षर नाहीत. सांस्कृतिक दृष्ट्या विशिष्ट मानसिक जडण घडण असलेल्या मानवसमूहाला लोक म्हंटले आहे.
लोकसाहित्यात लोकजीवनामध्ये समूह प्रतिभेच्या आणि समूहमानसाच्या अबोध प्रेरणेतून आपोआप निर्माण झालेले व परंपरेने टिकत आलेले सर्व घटक समाविष्ट होतात. त्यात कथा, गीते, म्हणी, उखाणे, लोकप्रचलित मंत्र इ. सर्व शब्दबद्ध साहित्याबरोबरच लोकप्रचलित धर्मविधी, श्रद्धा, देवदेवता, रूढी, चालीरीती, धारणा, व्रतवैकल्ये, उपासना, सर्व कला, कारागिरी, क्रीडा, वैद्यक, अन्नवस्त्रादी, नित्योपयोगी वस्तू व त्यांच्या उपयोगाच्या रीती या सर्व शब्देतर साहित्याचा समावेश होतो. थोडक्यात म्हणजे सांस्कृतिक दृष्ट्या एकाच प्रकारची मानसिक जडणघडण असलेल्या समूहाची जीवनप्रणाली लोकसाहित्यात आविष्कृत होत असते. यामागे समुहाच्या अबोध मनाची प्रेरणा असते. त्यामुळे समूहजीवनातील सर्व साहित्य आपोआप सहज घडत असते. म्हणूनच लोकसाहित्याची निर्मिती हि आपोआप झालेली समूहाची निर्मिती असते. त्यावर विशिष्ट व्यक्तीची नाममुद्रा नसते. समूहप्रेरणेने निर्माण झालेले साहित्य परंपरेने जतन केले जाते. देशकालपरत्वे त्यात बदल समूहस्वीकृतीने होत असतात. या अर्थाने लोकसाहित्य सदैव प्रवाही असते.
लोकसाहित्य हि पर्यायी मराठी संज्ञा प्रथम सुप्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ व लोकसाहित्य विशारद दुर्गाबाई भागवत यांनी वापरली व पुढे ती रुळली. मराठीतील लोकसाहित्याचे आद्य चिकित्सक अभ्यासक वि. का. राजवाडे यांनी १९२५ मध्ये प्रथम लोककथा लोकगीते हे शब्द वापरले. पुढे त्या पारिभाषिक संज्ञा म्हणून मान्यता पावल्या.
“लोकसंस्कृतीचे शब्दरूप लोकवांड्मयात असते; तर लोकसंस्कृतीचे कृतिरूप हे लोकाचार, लोकरुढी, लोकभ्रम, इ. असते.” असा डॉ. ढेरे यांचे प्रतिपादन होय.
लोकसाहित्याभ्यास हा केवळ भूतकाळातील संस्कृतीघटकांचा अभ्यास नसून मानवी संस्कृतीच्या आरंभापासून माणसाने अबोधपणे जतन केलेल्या जिवंत सांस्कृतिक जीवनाचा तो शोध आहे . म्हणूनच मानवाचा वर्तमान हा भूतकाळाने घडविलेला असतो आणि त्याचे भविष्य हे भूत-वर्तमानाच्या आधाराने उभे राहिलेले असते.
लोकसाहित्यात लोकजीवनामध्ये समूह प्रतिभेच्या आणि समूहमानसाच्या अबोध प्रेरणेतून आपोआप निर्माण झालेले व परंपरेने टिकत आलेले सर्व घटक समाविष्ट होतात. त्यात कथा, गीते, म्हणी, उखाणे, लोकप्रचलित मंत्र इ. सर्व शब्दबद्ध साहित्याबरोबरच लोकप्रचलित धर्मविधी, श्रद्धा, देवदेवता, रूढी, चालीरीती, धारणा, व्रतवैकल्ये, उपासना, सर्व कला, कारागिरी, क्रीडा, वैद्यक, अन्नवस्त्रादी, नित्योपयोगी वस्तू व त्यांच्या उपयोगाच्या रीती या सर्व शब्देतर साहित्याचा समावेश होतो. थोडक्यात म्हणजे सांस्कृतिक दृष्ट्या एकाच प्रकारची मानसिक जडणघडण असलेल्या समूहाची जीवनप्रणाली लोकसाहित्यात आविष्कृत होत असते. यामागे समुहाच्या अबोध मनाची प्रेरणा असते. त्यामुळे समूहजीवनातील सर्व साहित्य आपोआप सहज घडत असते. म्हणूनच लोकसाहित्याची निर्मिती हि आपोआप झालेली समूहाची निर्मिती असते. त्यावर विशिष्ट व्यक्तीची नाममुद्रा नसते. समूहप्रेरणेने निर्माण झालेले साहित्य परंपरेने जतन केले जाते. देशकालपरत्वे त्यात बदल समूहस्वीकृतीने होत असतात. या अर्थाने लोकसाहित्य सदैव प्रवाही असते .
लोकसाहित्य हि पर्यायी मराठी संज्ञा प्रथम सुप्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ व लोकसाहित्य विशारद दुर्गाबाई भागवत यांनी वापरली व पुढे ती रुळली. मराठीतील लोकसाहित्याचे आद्य चिकित्सक अभ्यासक वि. का. राजवाडे यांनी १९२५ मध्ये प्रथम लोककथा लोकगीते हे शब्द वापरले. पुढे त्या पारिभाषिक संज्ञा म्हणून मान्यता पावल्या.
लोकसंस्कृतीचे शब्दरूप लोकवांड्मयात असते; तर लोकसंस्कृतीचे कृतिरूप हे लोकाचार, लोकरुढी, इ. असते. असा डॉ. ढेरे यांचे प्रतिपादन होय.
लोकसाहित्याभ्यास हा केवळ भूतकाळातील संस्कृतीघटकांचा अभ्यास नसून मानवी संस्कृतीच्या आरंभापासून माणसाने अबोधपणे जतन केलेल्या जिवंत सांस्कृतिक जीवनाचा तो शोध आहे. म्हणूनच मानवाचा वर्तमान हा भूतकाळाने घडविलेला असतो आणि त्याचे भविष्य हे भूत -वर्तमानाच्या आधाराने उभे राहिलेले असते .
भारतीय लोकसाहित्यात पारंपरिक समाजजीवनाचे प्रतिबिंब उमटलेले दिसून येते . स्त्रियांची विविध रूपे त्यातून आविष्कृत झालेली दिसून येतात. नववधू, सासू ,सून, आई, बहीण, नणंद, भावजय , जाऊ अशी स्त्रीची विविध रूपे पारंपरिक लोकसाहित्यात आढळतात. लोकसाहित्यात इतिहासाचे कणही विखुरलेले असतात. जनमानसाच्या भावनाही प्रतिबिंबित झालेल्या दिसतात. मराठी लोकसाहित्यात पंढरपूर व विठोबा यांविषयीची श्रद्धा प्रकर्षाने प्रकटलेली दिसून येते. लोकसाहित्यातून सामान्यतः नैतिकता, श्रद्धा, सदाचरण आणि जनकल्याणाची, विश्वमंगलाची कामना यांचे चित्रण आढळते.
मातृप्रेम, बंधुप्रेम, जातकुळीचा अभिमान, देवावरील भक्ती इ. भावनांचा अविष्कारही ओव्यांतून प्रभावीपणे प्रकट झाला आहे. जात्याच्या साथीवर महाराष्ट्रातील खेड्यांमधून अद्यापही ओव्या म्हंटल्या जातात. लोकगीतांमध्ये मानवी मनाचे ऋणानुबंध जिव्हाळ्याने गुंफलेले आढळतात. मराठी लोकसाहित्यात जन्म, विवाह, मृत्यू यासंबंधीची गीते आहेत. ही गीते अनेक अवस्थांचे चित्रण करतात.
मराठी लोककथांमधून राजा -राणीच्या कथा अतिशय लोकप्रिय झाल्या. कर्तबगारीतून येणारे मोठेपण अत्यावश्यक आहे, हे सांगण्याचा प्रयत्न या कथांतून आढळतो. निरनिराळ्या चांगल्या कल्पना कथेच्या निमित्याने लोकांच्या कानावर घालून लोककथांच्या द्वारा पूर्वी सामाजिक नीतिशिक्षण देण्याचा प्रयत्न केला जात असे. लोककथेचा दुसरा प्रकार म्हणजे कहाण्या . कहाण्या गोष्टीरूपाने एखादे व्रत सांगून त्याचे माहात्म्य व तात्कालिक फलनिष्पती सांगितलेली असते.
मराठी लोकसाहित्याच्या या सर्वच प्रकारांमधून समाजाचे अंतरंग, समाजाची भावना, लोकांच्या समजुती व चालीरीती, लोकांची संस्कृती वगैरे गोष्टी निश्चित करता येतात. सह्जस्फुर्तीने निर्माण झालेले हे लोकसाहित्य जीवनस्पर्शी असून जनमनाचा कानोसा घेणारे आहे. शब्दांनी साकारलेली दुनिया वाचकांच्या नजरेसमोर उभी करण्याचे सामर्थ्य या साहित्यामध्ये असून, महाराष्ट्राची
लौकिक परंपरा मराठी लोकसाहित्याच्या वैशिष्टपूर्ण मराठी भाषेतून व्यक्त झाल्याचे आढळते . दुःख सांगतानादेखील त्यावर सौंदर्याचा मुलामा चढविणारे हे साहित्य आहे. अन्वर्थक उपमा-दृष्टांतांची त्यात खैरात आढळते.
महाराष्ट्रात स्वातंत्रोयत्तर काळात लोकसाहित्य समिती स्थापन झाली. चि. ग. कर्वे हे तिचे पहिले अध्यक्ष होते. या समितीने महाराष्ट्रातील लोकसाहित्यसंकलनाचे व्यापक प्रयत्न केले आहेत. १९७९-८० मध्ये काही नवीन अभ्यासकांनी डॉ. प्रभाकर मांडे यांच्या पुढाकाराने एकत्र येऊन 'लोकसाहित्य संशोधन मंडळ' या संस्थेचा प्रारंभ केला. आधीपासूनच लोकसाहित्यामध्ये चिकित्सक अभ्यास व संशोधन करणारे डॉ. मांडे, डॉ. रा. ची. ढेरे, दुर्गा भागवत, प्रा. नरहर कुरुंदकर यांनी या मंडळाची मुहूर्तमेढ रोवली. तेव्हापासून दरवर्षी लोकसाहित्य संशोधन मंडळ महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणी अभ्यासकांची एक परिषद घेते.
इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी लोकसंस्कृतीविषयक अभ्यासाचा पाय घातला. डॉ. सरोजिनी बाबर यांनी लोकसाहित्याच्या संकलनाला आपले आयुष्य वाहिले. मराठीत दुर्गाबाई भागवत यांनी लोकसाहित्याच्या सैद्धन्तिक अभ्यासाचा पाया घातला.
गेल्या पंधरा वर्षात महाराष्ट्रातील विविध विद्यापिठातून मराठी साहित्याच्या विध्यार्थ्यांसाठी पदव्यूत्तर स्तरावर लोकसाहित्य हा विषय अभ्यासक्रमात नेमला गेला असल्यानेही अभ्यासकांचे लक्ष या विषयाकडे विशेषत्वाने वेधले आहे.
नाव - सौ. मृगा मंदार पागे
मो. नंबर - ९७६६०१८२१६
शहर - नागपूर
Email.: mrugapagey@gmail.com
ही ब्लॉग पोस्ट कशी वाटली ? लाईक करा, कमेंट करा आणि व्हॉट्सअॅप, फेसबुकवर शेअर करा.
Comments