को मु ललॉकडावून संपल्यानंतर देखील आमच्या ग्रुपमधील मंडळींच्या भेटीगाठी होत नव्हत्या. फक्त् दर रविवारी एकदा एकमेकांना भेटायचे ठरले होते, त्याप्रमाणे भेटी होत होत्या. मनात साचलेले मळभ दूर होत होते आणि टारगट सुप्त् गुण हळू हळू उफाळून येत होते.

संपूर्ण भारतात लॉकडावून झाले व ते संपले काही ठिकाणी अंशत: आहे.

1 मार्च 2021 पासून संपूर्ण भारतात लसीकरण सुरु झाले आणि भारतभर जास्ती करुन वरिष्ठ् मंडळीमध्ये एकच विषय. घेतली ? कुठली घेतली, कशी घेतली, कुठे घेतली, काही त्रास वगैरे वगैरे,

आमच्यापण मुखी एकच विषय, कुठली घ्यायची, कुठे घ्यायची, चॉईस आहे काय, नंतर कळले, नो चॉईस, सेंटरवर जी असेल तीच घ्यावी लागेल. मंडळी हे सर्व लसी बाबतच आहे बरं कां. उगाच मनात संशय नको म्हणून खुलासा, तर पहिल्या सप्ताहात काहीनी घेतली, काहींनी दुस-या तर काही अजून घेत आहेत.

लस घेतल्यानंतर whatts app वर तर फोटोचीच स्पर्धा सुरु झाली. जो तो आपले डावे दंड दाखवत होता. महिला देखील यात आघाडीवर होत्या. (इतर वेळी दंड दाखवा म्ह्टलं तर मारच खायची पाळी, तर असो ) अजूनही मोबाईलवर त्या फोटोची चढाओढ सुरु आहेच आणि ती आणखी वर्षभर तरी राहणार. तरुणांना लसीकरण सुरु झाल्यावर तर मला वाटते, मोबाईलची मेमरीच संपून जाईल एवढे फोटो येतील, असो.

तर आम्ही देखील लस घेतली आणि रविवारी मास्क् लावून, ठराविक अंतर ठेवून सकाळी भेटलो, लस घेतल्यामुळे बहुतेक जण आत्मनिर्भर झाल्यासारखे फ्रेश दिसत होते. मग काय मिरासदार, श्ंकर पाटील, माडगूळकर यांच्या कथाकथनाचे कार्यक्रम पूर्वी होत असत. ( बावन्न्कशी सोन्याप्रमाणे त्यांनी निर्माण केलेली पात्रे, नाना चेंगट,गणा मास्तर, बाबू पैलवान, ज्ञानू वाघमोड, जी आजही जिवंत आहेत असेच वाटते.) त्या कथेतील अस्सल, इब्लीस, बेरकी, टारगट आणि प्रेमळ भोळसट, पात्रे जी आमच्या ब्रम्हाळा ग्रूप मध्ये अजूनही काही प्रमाणात आहेत त्यांना रंग चढला.

भेटल्या भेटल्या एका इरसाल अर्काने, कोमुल घेतली ? कोमुल घेतली ? असाच प्रश्नाचा घोषा लावला, बाकीच्यांना काही कळेना, काहींना वाटले आज बहुतेक आपल्याला टारगेट करणार. थोडे उशीरा जे आले त्यांचे कोमुल घेतली काय ? असे म्हणूनच स्वागत केले. दर्दीना वाटले काहीतरी नवीन बाजारात आले असावे जे आपल्याला माहीत नाही. सरळ शरणागत होवून नाही सांगितले.

एकमेकांची खेचून झाल्यावर एकाने जरा भीत भीतच विचारले बाबारे रे हे कोमुल काय आहे जरा थोडक्यात सांगाल काय. कोरस मध्येच उत्तर मिळाले. अरे भारतातच तयार झालेली कोमुल म्हणजे *कोरोना मुक्त् लस*.

एका अर्काने सांगितले, लोक गुणवंत, किर्तीवंत, भाग्यवंत, होतात, आम्ही कोमुलवंत झालो.

तर सर्व ज्येष्ठ् मंडळींना विनंती तुम्ही सुध्दा कोमुलवंत व्हा आणि लवकरात लवकर को मु ल टोचून घ्या.

कटयावरील त्यातल्यात्यात जरा सभ्य् आणि थोडे अध्यात्मिक अशा एक दोन जणांनी ताबडतोब तेथेच कोरसमध्ये *सेतू बांधारे,* *सेतू बांधारे सागरी* च्या चालीवर कविताच गुणगुणली,

*कोमुल आली रे, कोमुल आली रे,*

*कोमुल आली रे, कोमुल आली रे*

*कोमुल आली रे भूवरी,*

*कोमुल आली रे अंगणी*

*कोमुली आली रे अंतरी,*

*सितावर रामचंद्र की जय..*

*अथक अथक ते कष्ट् करुनी*

*विज्ञानाची कास धरोनी*

*मानवतेला पणास लावूनी*

*शोध लाविला भूवनी*

*कोमुल आली रे, कोमुल आली रे*

*सितावर रामचंद्र की जय….*

*दंडावरती घ्यारे टोचूनी*

*तनामनात जावू दे शिरुनी*

**महामारीला बाहेर फेकूनी*

*सार्थक करु रे जीवनी*

*कोमुल आली रे कोमुल आली रे*

*कोमुल आली रे कोमुल आली रे*

*सितावर रामचंद्र की जय*


किरण बेन्नुरवार,

ठाणे

9820360656

Email.: kiranbennurwar@gmail.comविश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअ‍ॅप लिस्टमध्ये सामील व्हा - 7066251262 हा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMP असा मेसेज पाठवा


310 views1 comment