top of page

"वैभवसंपन्न आमचे कोकण"


कोकणचे नाव निघाले की, माझे मनपाखरू

स्वप्नांच्या हिंदोळ्यावर स्वार होऊन, कोकणच्या आठवणींमध्ये कसे रमून जाते हे कळतही नाही.

निसर्गाच्या सौंदर्याचा वरदहस्त लाभलेले, असे हे आमचे कोकण, एकदा भेट देऊन गेलेल्या पर्यटकाला परत परत येण्यासाठी खुणावत असते. इतकी अफाट नैसर्गिक संपत्ती कोकणला मिळाली आहे. हिरवेगार डोंगर-दर्या, समुद्र, नद्या तसेच शेतीसाठी सुपीक जमिन, माड-पोफळी, आंबा-काजू-फणस, रानमेवा, सागरी-मत्स्य उत्पादन अशा उपजतच मिळणाऱ्या स्रोतामुळे कोकणचे वैभव खुलून दिसते.

जेथे नजर जाईल तेथे पावलागणीक, प्रत्येक गावाच्या वेशीवर विस्तीर्ण अशा पटांगणाच्या आवारात, अवाढव्य अशी देखण्या व आखीव बांधणीची मंदिरे आपले लक्ष वेधून घेतात व नकळत आपली पाऊले मंदिरात देवाचे दर्शन घेण्यासाठी वळतात.कोकणच्या मातीशी माझी व माझ्या यजमानांची नाळ अगदी घट्ट विणली गेली आहे. गेल्या वीस वर्षांपासून वर्षातून दोनदा न चुकता आम्ही कोकणात दहा दिवसांच्या मुक्कामाला जात असतो. मुख्यतः ह्यामागे "देवदर्शन" हा एक व पूर्णतः रुटीन कामातून बदल व्हावा हा दुसरा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही कोकणात जात असतो. आमचे सगळ्यात आवडते ठिकाण म्हटले तरी चालेल.


ऑक्टोबर व एप्रिलमध्ये यजमानांच्या क्लासला रजा असल्याने, त्यासुमारास आम्ही योग्य नियोजन करून, पहिल्याच दिवशी जाताना-येतानाची टू-टायरची तिकिटे बूक करून ठेवतो. नाशिकसाठी ठराविकच कोटा उपलब्ध असल्याने, त्याची खबरदारी घ्यावी लागते, म्हणजे आपला प्रवास सुरवातीपासून शेवटपर्यंत सुखकर होतो. तेव्हा कुठलीही सहल किंवा प्रवासासाठी योग्य नियोजन असणे खूप आवश्यक आहे, नाहीतर सहलीची किंवा प्रवासाची मजा किडकिडी होऊन, त्याचा मनस्तापच जास्त होतो. तसेच पैसेही वाया जातात.

आम्ही नाशिक ते मुंबईला टॅक्सीने तडक सी.एस.टीला (शिवाजी टर्मिनस) जातो. तेथून रात्री अकरा वाजता "कोकणकन्या" निघते. टू-टायरचा प्रवास असल्याने अतिशय सुखकर होतो. सकाळी दहापर्यंत "सावंतवाडी रोड" स्टेशनला गाडी बहुदा येते. सकाळी आमचे गंतव्यस्थान येण्याआधी गाडीतच नाश्ता वगैरे आटपून घेतो. सावंतवाडीरोड स्टेशनच्या बाहेर पडले की रिक्षातून डायरेक्ट "साईश" हाॅटेलवर उतरतो. वारंवार आमच्या फेऱ्या होत असल्याने, आता जवळ-जवळ तेथील सगळेच आमच्या चांगल्या परिचयाचे झाले आहेत. त्यामुळे नेहमीची आमची रूमही आधीच बुक केलेली असते.स्टेशनवरून हाॅटेलवर येतानाचा प्रवासच मनाला इतका ताजातवाना करून जातो की, तेव्हाच मनाशी पक्का विचार केलेला असतो, आता दहा दिवस आपण सगळे काही विसरून केवळ कोकणच्या मातीशी एकरूप व्हायचे.

आंघोळ वगैरे उरकून, फ्रेश झाल्यावर, पोटपूजा करण्यासाठी आम्ही "नार्वेकर" ची घरगुती खानावळ, जी हाॅटेलपासून जेमतेम शंभर मीटरवर आहे, तिथे मांसाहारी जेवण अतिशय उत्तम मिळते तिथे मस्तपैकी भरपेट जेवण करतो.

मुख्य सांगायचे म्हणजे कोकणातील सगळी ठिकाणे आमची ठरलेली आहेत, त्यामुळे आपलेपणाची वागणूक मिळते. "साईश" हाॅटेल रहाण्याचे ठिकाण, नाश्त्यासाठी "गणपुले", मांसाहारी जेवण "नार्वेकर", शाकाहारी जेवण "साधले मेस" आणि मंदिरात जाण्यासाठी किंवा फिरण्यासाठी "बांदेकर" रिक्षावाले अशी सगळी मंडळी बांधून ठेवलेली असल्याने सोयीचे पडते.आम्ही दहा दिवस, कोकणात असेपर्यंत, सकाळी नाश्ता केला की फिरायला बाहेर पडून, हाॅटेलच्या जवळच एस्टी स्टॅन्ड आहे, तेथे जाऊन रोज वेगवेगळ्या बसमध्ये बसून जवळपासच्या गावांत फेरफटका मारून, जेवायच्या वेळी नार्वेकरच्या खानावळीत येऊन, पोटपूजा करून हाॅटेलवर येऊन आराम करत असू. संध्याकाळी परत सावंतवाडी शहराची शान असलेल्या "मोती तलाव" वर पायी फिरायला जात असू. हाॅटेलवर येताना आमचा "नेवगी कोल्डड्रींक" कडचा थांबा ठरलेला असे. तेथे वेगवेगळ्या प्रकारच्या आईस्क्रिमची चव तर कधी माझा आवडता "फालुदा विथ आईसक्रीम" तर कधी "सोडालिंबू सरबत " अशा जंगी पेयाची मजा रोज न चुकता लुटत असू. तसेच "तारा" हाॅटेलच्या शेजारीच छोटेसे हाॅटेल आहे, तेथील समोश्याची चव तर अप्रतिम असते. आतापर्यंत माझ्यातरी खाण्यात असे समोसे आलेले नाही. रोज हाॅटेलवर येताना आम्ही पार्सल घेऊन येत असू व रूमवर त्याचा आस्वाद घेत असू.

मोती तलावाकाठी बसून, तलावातील मोठमोठ्या माशांची पोहण्याची मजा बघत टाईमपास करत असू. तलावात मगरींचेही वास्तव्य आहे."सावंत" राजघराण्याचा राजवाडा हा सावंतवाडी शहराच्या वैभवाची साक्ष देत आजही मोठ्या दिमाखात उभा आहे. आजही "सावंत" राजघराण्याचे वंशज तेथे वास करीत आहेत, त्यामुळे तेथील परिसर आणि राजवाडा व्यवस्थितरित्या जतन केलेला आहे. पर्यटकांना ठराविक वेळी राजवाडा पहाण्यासाठी खुला केला जातो. शहराची दुसरी शान असलेले ठिकाण म्हणजे " नरेन्द्र डोंगर" होय. डोंगराच्या पायथ्याशी सावंतवाडी शहर वसलेले आहे. डोंगरावरून संपूर्ण "सावंतवाडी" शहराचा सुंदर नजारा दिसतो. तेथे दगडात असलेले मारूतीचे सुंदर मंदिर आहे. डोंगरातून पाण्याचा नैसर्गिक झरा वाहतो. तेथील वातावरण अतिशय आल्हाददायक असते.

सावंतवाडीमध्ये ऐन मोक्याच्या ठिकाणी, कळसूलकर हायस्कूल शेजारी व मासळी मार्केटच्या समोरच "सालईवाड्यात" माझ्या आजोबांचे घर होते. आमच्या लहानपणी कोकणात आई-बाबांबरोबर जात असू, तेव्हा आम्ही सगळी भावंडे खूप मजा करत होतो. आता सगळेच मुंबईला स्थाईक असल्याने, फारसे कोणाचे जाणे होत नाही. सावंतवाडीचा नवीन "मासळी मार्केट" मुंबईसारख्या मोठ्या शहराला सुध्दा मागे टाकेल, इतका सुंदर रचना करून बांधलेला आहे. सावंतवाडी हे शहर तर लाकडी खेळणी आणि लाकडी वस्तूंसाठी जगप्रसिद्ध आहे. कोकणचे वैभव हे कोकणी लोकांमुळे टिकून राहीले आहे. मुळातच काटक व स्वाभिमानी, अशी ह्यांची ख्याती आहे. वरून फणसासारखे कडक पण आतून गर्यासारखे मऊ व गोड, हे कोकणी माणसाच्या स्वभावाचे वैशिष्ट्य आहे.एक दिवस आमचे ठरलेले रिक्षावाले "बांदेकर" ह्यांच्या बरोबर आमच्या मूळपुरूषाच्या दर्शनाला "परूळे" गावी जातो. प्रथम माझा सासरचा देव "आदिनारायण" च्या मंदिरात जाऊन त्याचे दर्शन घेतो. सावंतवाडी शहरापासून साधारण 30 कि.मी. अंतरावर सासर-माहेरची देवळे आहेत. नारळ सुपारीच्या उंचच उंच बागांनी "परूळे" गाव संपूर्ण वेढलेले आहे. शिवाय आंबा, काजू, फणसांची झाडे सहज रस्त्याच्या दुतर्फा पहायला मिळतात. सूर्यनारायणाचे दर्शन होणे दुरापास्त होते, इतक्या गर्द झाडांनी "परूळे" ह्या गावाला वेढलेले आहे. पावसाळ्यात तर सगळीकडे वहाळाला ओसंडून पाणी वहात असते, त्यावेळी ये-जा करण्यासाठी "साकव"चा पूलासारखा उपयोग करतात. पाण्यात उतरल्यानंतर, पायांना जेव्हा माशांचा वेढा पडून, पायांना गुदगुदल्या होतात, व खऱ्या मसाजची अनुभूती येते, तो क्षण अवर्णनीय असतो. पाण्यातून निघूच नये, असे वाटायला लागते.

कोकणातील देवळे तर अगदी पहाण्यासारखी असतात. अतिशय विस्तीर्ण, सुंदर नक्षीकाम केलेले देवळातील खांब, रेखीव मूर्ती. मूर्तीसमोर क्षणभर हात जोडून, डोळे मिटून उभे राहिले, तरी तुमचे सारे मानसिक ताण गळून पडतात, आणि आपसूकच डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागतात. एवढी प्रचंड सकारात्मक उर्जा क्षणांत तुम्हाला तिथे मिळते. तिथून उठावेसे वाटत नाही. त्या क्षणाला दर्शक त्या मूर्तीशी समरस होऊन जातो.

आदिनारायणाचे दर्शन घेऊन आम्ही पुढे माझ्या माहेरच्या वालावलचा " देव लक्ष्मीनारायण" व चेंदवणची देवी "सड्यावरची माऊली" हिच्या दर्शनासाठी आगेकूच करतो. वाटेतच आम्हाला "पाट" ह्या गावची "पाटाची माऊली" देवीचे मंदिर लागते. रस्त्याच्या वळणावरच देऊळ आहे, मंदिरासमोरच खूप विशाल असा लाल-शुभ्र रंगांच्या कमलपुष्पाने भरलेला तलाव आहे, ते सुंदर दृश्य मनातून काही केल्या जात नाही. तेथे बरेचवेळा मी फोटोसेशन केले आहे. माझ्या आईच्या माहेरची ही देवी असल्यामुळे, आईच्या नावाने ओटी भरण्यासाठी देवळात जाऊन ओटी भरून किंवा दानपेटीत पैसे टाकून आम्ही पुढे चेंदवणच्या माऊलीचे दर्शन घेतो. ह्या देवळातील पुजारी गाऱ्हाणे सांगतात, ते खरोखरच ऐकण्यासारखे असते. अगदी मनापासून देवीची सेवा करतात. देवीचे रूपही साजरे दिसते.माऊलीनंतरचा पुढचा पडाव देव "लक्ष्मीनारायण" होय. देवळाचे आवार मोठे असून परिसरात विस्तीर्ण सरोवर आहे. तेथील माशांना पाव टाकून, झुंडीने मासे खायला येतात तेव्हा, त्यांची गंमत बघायला छान वाटते. प्रथम तलावात पाय धुवून मगच देवाचे दर्शन केले जाते, त्या प्रथेनुसार आम्ही तलावात पाय धुवून लक्ष्मीनारायणाचे दर्शन घेऊन, थोडावेळ मंदिर परिसराचा आनंद उपभोगून दुपारच्या जेवणाला हाॅटेलवर येतो.

मळगांव हे माझ्या बाबांचे आजोळ. तेथील "समाधीपुरूष" हे गोसावी घराण्यातील मूळ संतपुरूष होऊन गेले आहेत. त्यांनी जिवंत समाधी घेतली आहे, त्याठिकाणीच त्यांचे मंदिर बांधण्यात आले आहे. " गोपाळबोध स्वामी" ह्या नावानेही ते परिसरात प्रसिद्ध आहेत, आमची सगळ्यांची त्यावर श्रध्दा आहे, त्यामुळे त्यांच्या समाधीचे दर्शन घेऊनच आमची कोकणची ट्रीप पूर्ण होते.परतीच्या प्रवासात आम्ही एक दिवस चिपळूणला हाॅटेलवर मुक्काम करतो. तेथून नाशिकला यायला सोयीचे पडते. सकाळी "मंगला एक्सप्रेस" चिपळूणला येते, ती संध्याकाळी नाशिकरोडला पोहचते.

अशा तर्‍हेने दहा दिवसांचा कोकणचा आरामदायी मुक्काम, पुढील काम करण्यासाठी ताजी ऊर्जा देऊन जाते.

ह्यावर्षीमात्र "कोरोना" संकटामुळेआमच्याकोकणदौर्यामध्येखंडपडला. परंतुलवकरचह्यातूनमार्गनिघेलवपुन्हाएकदा "आमचेकोकण"च्यासफरीलानिघायलाआम्हीताज्यादमानेतयारराहू.पुष्पा सामंत.

नाशिक 26-10-2020.

Email.: Samant1951@hotmail.com


528 views1 comment

1 Comment


Deepak Bhalerao
Deepak Bhalerao
Mar 13, 2021

लेखिकेने इतके सुंदर आणि सर्व बारकावे देऊन वर्णन केले आहे की आपण नकळत सावंतवाडी मधे जाऊन पोहचतो.अनेक छोट्या छोट्या गोष्टी मधून माणूस आनंद घेऊ शकतो. तो आनंद घेण्यासाठी आवश्यक असलेली मनोवृत्ती लेखिका आणि तीचे पती यांच्याकडे आहे हे स्पष्ट आहे. एकदा ही मनोवृत्ती झाली की जगातल्या अनेक लहान सहान गोष्टींमधून आणि निसर्गामधून आनंद घेता येऊ शकतो. एकप्रकारे हा आध्यात्मिक आहे. त्यातून लेखिकेच्या हातून यापुढेही असे अनेक कलाविष्कार तयार होऊ शकतील अशी अपेक्षा आहे. मी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देत आहे.

Like
टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page