त्या नीरव शांततेत जंगलातील बंगल्यात गीता एकटीच बसली होती. दूरवर नजर टाकली तरी त्या घनदाट जंगलाशिवाय आणि पाखरांच्या किलबिलाटाशिवाय तिला काही दिसत नव्हते आणि ऐकूही येत नव्हते. या जंगलात आल्यापासून हिरवीगार दाट झाडे आणि विविध पाखरे हेच तिचे सोबती होते. सुरवातीला हे निसर्गरम्य वातावरण, ती शांतता, तो पक्षांचा किलबिलाट तिला फार आवडतं असे. खरे तर तिच्याच हट्टामुळे शंतनुने ही फाॅरेस्ट आॅफीसरची पोस्ट स्विकारली होती.
पाखरांचा किलबिलाट कमी झाला ,सर्वत्र शांतता पसरली तेव्हा सूर्यास्त झाल्याचे तिच्या लक्षात आले. गीता खिडकीतून उठली. देवाजवळ दिवा उदबत्ती लावून रामरक्षा म्हणता म्हणता तीने स्यंयपाकाला सुरूवात केली पण आज तिचे लक्ष काही केल्या लागेना. आॅगस्ट महिन्याची ती तारीख आली की ती अजूनही बेचैन होत असे कितीही मन रमवायचा प्रयत्न केला तरी तिची उदासीनता कमी होत नव्हती. भूतकाळ कितीही दूर लोटायचा प्रयत्न केला तरी परत परत तो वर्तमानावर कुरघोडी करत होता.
वयाच्या पंचविशीतच गीताच्या सुखी संसारात वादळ आले.लाडाकोडात वाढलेली,एकुलती एक ,शिकलेली ,देखणी गीता सुखाच्या झुल्यावर झुलत असता अचानक दूर्दैवाचा झटका बसला आणि आनंदाचा झुला तटकन तुटला. साध्या तापाचे निमित्त होऊन डेंग्यूच्या राक्षसाने अनिकेतचा बळी घेतला. एक वर्षाच्या गोंडस परीला गीताच्या पदरात टाकून दोघींना निराधार सोडून अनिकेत कायमचा निघून गेला. केवळ दोन वर्षात गीताच्या सुखस्वप्नांचा असा चक्काचूर झाला.
कुकरच्या शिट्टीमुळे गीता भानावर आली. शंतनु यायची वेळ झाली होती. तिने पटकन तोंडावर पाणी मारले, विस्कटलेले केस सारखे केले. इतक्यात गाडीचा आवाज आला. तिने चेहऱ्यावर हास्य आणायचा प्रयत्न करत दार उघडले परंतु तिचा उतरलेला चेहरा त्याने लगेच ओळखला. तिच्या हातात बॅग देऊन कमरेत हात घालून तो आत आला. " का ग काय झालं ? चेहरा असा का उतरला ? परी बरी आहे ना ? तुझं काही दुखतंय का ?" काळजीच्या स्वरात तो विचारत होता. बोलता बोलता त्याने खिशातील गजरा काढला तिच्या केसात माळून तिच्या खांद्यावर हात ठेवून डोळ्यात पहात म्हणाला "तुझ्या केसात माळला की या गज-याचा सुगंध आणि सौंदर्य वाढत, गजरा माळल्यावर तू फार छान दिसतेस " " त्याचे हात बाजूला सारत ती म्हणाली "चल लवकर जेवायला, आज डब्बा नेला नाही ,भूक लागली असेल ना ? ""हो आलोच " तो कपडे बदलून, हात धुवून तिच्या पदराला हात पुसत म्हणाला "तू पोळ्या कर मी तुलाही भरवतो आणि मीही खातो " ताट वाटी घेऊन खुर्ची ओढत टेबलसमोर बसला आणि त्याचे लक्ष समोरील कॅलेंडरकडे गेले. पंचवीस आॅगस्टला सर्कल केले होते. त्याच्या झटकन् ती तारीख लक्षात आली तो उठला आणि तिच्याजवळ येत हातातील लाटणे बाजूला ठेऊन ,गॅस बंद करत म्हणाला "गीता आय अॅम व्हेरी साॅरी ,अग आजची तारीख मी कशी विसरलो ? आॅफीसमधून कामामुळे फोन करायलाही विसरलो ,रीयली आय अॅम साॅरी " त्याने तिला हाॅलमध्ये नेले सोफ्यावर तिला बसवत तिचे हातात हात घेत तो म्हणाला,"अ ग गेली पंचवीस वर्षे मी कधी विसरलो नाही पण आज धावपळीत लक्षात नाही आलं "त्याच्या डोळ्यात बघत गीता म्हणाली "अरे किती दिवस लक्षात ठेवशील आणि किती माझ्या मनाला जपशील ? केव्हा ना केव्हा हे विसरायलाच हवंय ना ! अरे खरं तर साॅरी मी म्हणायला हवं किती मोठ्या मनाने तू माझ्याशी लग्न केलं ,परीला बाबांचे प्रेम दिलेस ,तिच्या प्रेमात दुरावा नको म्हणून दुसरे मूलही होऊ दिले नाही फुला सारखं तिला आणि मला जपत आलास आणि मी मात्र ती तारीख आली की अनिकेत शिवाय कुणाचा विचार करू शकत नाही, खरंच तू फार मोठ्या मनाचा आहेस,तू माझ्या आयुष्यात आला नसता तर काय झालं असतं ? मला आणि परीला तुझ्यासारखं कुणी सा़ंभाळून घेतलं असत ? मला माफ कर " गीता त्यांच्या छातीवर डोके ठेऊन ढसा ढसा रडू लागली.तिचे डोळे पुसून तिच्या डोळ्यात बघत तो म्हणाला. " ये वेडाबाई साॅरी म्हणायलाच हवं का ? अगं अनिकेत कूणी परका होता का ? तो तुझा नवरा होता पण माझा मामेभाऊ होता तो, तुमच्या प्रेमाचा मी साक्षीदार होतो , तुमचा संसार दोन वर्षात संपला तरी दहावीपासून तुम्ही एकमेकांच्या प्रेमात होता ,अग त्याने तुझ्याही आधी मला तुमच्या प्रेमाची कबुली दिली होती. " गीता गोड हसली, उठून तिने डोळ्यावर पाणी मारले. नॅपकीनला तोंड पूसत ग्लासात पाणी घेऊन परत शंतनु जवळ बसली अनिकेतच्या फोटोकडे बघत म्हणाली "तो तुझ्या बद्दल खूप बोलायचा. घरात एकटाच असल्यामुळे तुला तो जीवलग मित्रच म्हणायचा, लग्नातही केवढ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या तू "तिच्या खुलणारा चेहरा बघून शंतनुला बरे वाटले. "अगं मी देखील घरात एकटाच ,आम्ही दोघे बरोबरचे असल्यामुळे एकत्रच वाढलो. तुमचे लग्न झाले आणि मी अमेरिकेला गेलो ,तिकडेच सेट होणार होतो पण अनिकेतच्या जाण्याने सगळेच हादरले पण मला सर्वात धक्का बसला तो परी आणि तुझ्यामुळे ,तुमच्या विचाराने मी अस्वस्थ होत होतो. काही झालं तरी परीला बाबांचं प्रेम मिळालं पाहिजे. तुझ्या जीवनात आनंद आला पाहिजे या विचारानेच मी परत भारतात आलो. " त्याने तिला जवळ घेतले तिची हनुवटी उचलून तिच्या डोळ्यात बघत म्हणाला " गीता मला वाटतं मी तुला प्रेम द्यायला कमी पडलो की काय , म्हणून तू अनिकेतला विसरू शकत नाही ?" पटकन् त्याच्या तोंडावर हात ठेवत ती म्हणाली "असं नको ना बोलू ,अरे तू आमच्या आयुष्यात आला म्हणून मी आणि परी आनंदात राहू शकलो. परीचा तर माझ्यापेक्षा तुझ्यावर जीव जास्त. आज ती सासरी सुखात आहे पण रोज तुझी चौकशी केल्याविना तिला चैन पडत नाही. माझे आई-बाबा, तुझे आई-बाबा ,माझे सासूसासरे या सर्वांना तुझा किती आधार वाटतो. किती खंबीरतेने तू सगळे निर्णय घेतले. स्वत:चा कुठेही विचार न करता केवळ आमची काळजी घेतोस,तुला खरं सांगू ?"ती त्याच्याकडे बघत म्हणाली " मला सतत एक बोच लागलेली असते एक सल मनाला टोचत असतो की तू आम्हा सर्वांचा इतका विचार करतो केवळ आमच्यासाठीच जगतो ,मी स्वार्थी आहे का रे ? ,मी का अनिकेतचा विचार करते? मला कळतं अनिकेत हा माझा भूतकाळ होता तू माझा वर्तमान आहेस मी फक्त तुझाच विचार करायला हवा हे मला पटतं पण--" तो तिला अडवत म्हणाला "अगं आठवणी या येण्यासाठीच असतात त्याची तुला जशी आठवण येते तशी मलाही येते म्हणजे तुझे माझ्यावर प्रेम नाही का ? आठवणी या जपण्यासाठीच असतात त्या तू सदैव जपून ठेव फक्त आनंदी राहा ,चल उठ आवर ,आपण मंदिरात जाऊ आणि येतांना बाहेरच जेवायला जाऊ " त्याने तिला हात देऊन उठवले आणि तयार व्हायला गेला. गीताला आज आपल्या मनातील सल व्यक्त केल्यामुळे खूप मोकळे वाटू लागले तिनं शंतनुला आवडणारी अबोली साडी नेसली आणि तिला आवडणारा परफ्यूम मारून शंतनु बाहेर आला.गाडी जंगलातून मंदिराकडे निघाली.
साईडग्लासमध्ये शंतनुचा प्रेमळ चेहरा बघून गीताही प्रसन्नतेने हसली आणि अलगद शंतनुच्या खांद्यावर विसावली.
प्रा. पद्मा हुशिंग (ठाणे)
मो: ८७७९५४७९१७
ईमेल: padmaphushing@gmail.com
छान कथा