चिखलातले कमळ

उषा रावणंग ही विश्रामबाग-सांगली येथे मला भेटली. कोकणातून आलेली, कुणबी जातीची, शिक्षण फक्त दुसरी इयत्ता झालेली. लग्नानंतर सासरी सांगलीला राहायला आली. नवरा, दीर, सासू-सासरे असे तिचे कुटुंब आहे. उषा सहित सगळेच बाहेर कामाला जायचे. उषा कपडे धुणे व भांडी घासण्याचे काम बऱ्याच घरी करायची. हातावरचे पोट. उषा अगदी स्वच्छ व नीटनेटके राहायची. तिला दोन मुलगे झाले. आपण शिकली नाही पण मुलांना शाळेत घातले.


विश्रामबाग येथील गव्हर्मेंट कॉलनीत राहणाऱ्या श्री. अनिल रुईकर सर गीता पाठांतर वर्ग घेतात. त्यांच्या वर्गाला उषाचा मुलगाही जाऊ लागला. पण झाले असे की रुईकर सर म्हणाले, अरे तू येथे सांगितलेले घरी पाठ केले पाहिजे व पाठ केलेले घरी कुणीतरी म्हणून घेतले पाहिजे. घरी तर सगळेच अशिक्षित,उषा फक्त दुसरी इयत्ता झालेली. मुलगा म्हणतो ते बरोबर आहे कि नाही हे तिला कसे कळणार? सुशिक्षित सुद्धा करू शकतील की नाही असे काम उषाने केले. ती पण रुईकर सरांच्या क्लासला जाऊ लागली. आश्चर्य आणि कौतुकाची गोष्ट अशी की, उषाला पण गीतेचे अध्याय पाठ होऊ लागले. आई व मुलगा घरी एकमेकांचे पाठांतर घेऊ लागली. दोघांनीही अठरा अध्याय पाठ केले. शृंगेरीला आदरणीय शंकराचार्यांच्या मठात गीता पाठांतर स्पर्धा असते. या माय लेकांनी शृंगेरी ला जाऊन त्या स्पर्धेत भाग घेतला व सांगायला आनंद होतो की दोघांनीही गीता अध्याय अचूक म्हटल्याबद्दल शंकराचार्यांच्या हस्ते प्रत्येकी 21 हजार रुपयांचे रोख पारितोषिक मिळविले. माय लेकांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. उषाचा ऊर आनंदाने भरून आला.


आमची पांढरपेशा समाजातील मुलेसुद्धा गीता पाठांतराकडे वळतील असे नाही. पण उषाने व तिच्या मुलाने हे करून दाखविले. त्यांच्या पाठीवर माझी कौतुकाची थाप व त्या दोघांना मानाचा मुजरा सुद्धा! तिला मुलाला इंजिनियर करावयाचे आहे, त्यामुळे ती आपल्या कामातील थोडी रक्कम दर महिना आर.डी त भरते. स्वाभिमानी तर इतकी आहे की कुणाकडेही आर्थिक मदतीसाठी हात पसरत नाही.


उषा चा नवरा ऐन तारूण्यात व्यसनापायी मरण पावला. तिच्यावर आणखी एक संकट कोसळले, पण उषाने ते धीराने सहन केले. खरोखर एखाद्या चॅनेलने तिची मुलाखत घ्यावी व समाजासमोर ही गोष्ट आणावी.

जयश्री पटवर्धन कागवाड महिला 79 वर्षे Ph: 7406983273 jayashreep1941@gmail.com ही ब्लॉग पोस्ट कशी वाटली ? लाईक करा, कमेंट करा आणि व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर शेअर करा.

660 views0 comments