“स्री” “क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता !” हे वाक्य मनाला स्पर्श करून जातं. विचारांनी तथा थोड्याफार फरकांनी आठवून पाहिलं तर कितीतरी मोठं सत्य या मध्ये दडलेलं आहे. हे सत्य मात्र जाणवतं ते वृद्धपणात. कारण तारुण्याची रग माणसाला असा विचार करायला सवडच देत नाही. मग प्रश्न पडतो की, “स्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता” ही भावना खरं तर कुणाच्या डोक्यात प्रथम आली असावी? हा प्रश्न मनात सारखा घोळत होता.
अशा विचारांती मला माझं बालपण आठवलं. “रम्य ते बालपण!” अर्थात प्रत्येकाचं बालपण हे रम्यचं असतं. आई-वडिलांच्या छत्राखाली, सुख-दु:खाच्या लाटांवरती तरंगत तरंगत आपण कधी मोठे होतो हे समजून सुद्धा येत नाही. मात्र हळुहळू मोठेपणाची जाणीव मात्र होत असते.
आई-वडिलांचा सहवास, त्याचं प्रेम, माया, ममता आपणच होऊन कमी करतो. अर्थात हे सारं आपल्याकडून कळत न कळतच घडत असतं. पण हे घडतं मात्र! मग तारुण्य सुलभतेनं जीवनाचा साथीदार शोधण्याकडे मन धावते. आई-वडिलांच्या म्हणा, किंवा स्वत:च्या म्हणा विचारांना होकार देत देत आपण बोहल्यावर चढतो. घरात एक अनोळखी नव्हे तर कधी कधी ओळख असलेलं ‘स्री’ व्यक्तिमत्व येतं. मग थोड्याच दिवसात आपण त्यात आकंठ बुडून जातो. तारुण्याची रग आपल्यात स्फुरण पावते. कळत न कळत आपण आपल्याच आई-वडिलांच्या पासून थोड्याफार फरकाने दुरावतो. कामाधन्द्याच्या निमित्ताने म्हणा, नोकरीच्या निमित्ताने म्हणा, कुठतरी दूर दूर जातो. सणावाराला, तर कधीमधी काही धार्मिक विधिवत कार्यक्रमांना आवर्जून हजेरीही लावतो. पण त्यात पहिल्यासारखं प्रेम, जिव्हाळा मात्र नसतो. तोंडमानल्या सारखं सारं सारं होत असतं.
स्वत:च्या करीयर बरोबरच पत्नीचंही करीयर, मुलांचं शिक्षण त्याचं भलं-बुरं हेच आपल्या डोळ्यासमोर येऊन जातं. यातच आपण आपल्या घरापासून तथा आई-वडिलांपासून खूप खूप दूर जातो. हे जरी सत्य असलं, तरी स्वत:ला हा दुरावा सहन होतोच असं नाही. ह्या दुराव्याची ‘सल’ मनात सलतच असते. पण ती मनातच विरून जाते. कधीमधी उफाळून आली, तरी आपल्याच कुटुंबाच्या आडून आपणच त्या कडे कानाडोळा करतो.
कधी कधी आपल्याच कुटुंबात म्हणजे पती-पत्नीत खटके उडतात. कारणंही अगदिच क्षुल्लक असतात. पण आपला ‘पुरुषी’ पणा जागा होत असतो. पत्नीलाही त्याची जाणीव होते. तिची माघार योग्य ठरते. आपलं मन मारून तीही रहाते. एखाद्या गुन्हेगारासारखी. तरी सुद्धा आपण मात्र आपल्याच उद्देगात धन्यता मानीत असतो. असे रुसव्या-फुगव्यात दिवस चालले जातात.
एव्हाना दोघांचेही आई-वडील मागच्या पुढच्या काळात दूरच्या प्रवासाला निघून गेलेले असतात. त्यांच्या अखेरच्या काळातही आपलं अस्तित्व कदाचित तिथं असतचं असंही नाही. आता आपल्याला पत्नीशिवाय आणि पत्नीला आपल्याशिवाय कुणीच नसल्याची जाणीव होते. मग तिच्या कुशीतच आपण आपलं मन रीतं करू लागतो. तीही भोळी-भाबडी थापटून थापटून आईच्या मायेनं आपल्याला शांत करण्याचा प्रयत्न करते. त्यातच आपणही विरघळून जातो.
आता आपल्याला आईच्या प्रेमाची तीव्रतेने जाणीव होऊ लागते. मग पत्नितच आपण आईचं प्रेम शोधतो. लहान होऊन तिच्या कुशीत आपण जेंव्हा विसावतो, तेंव्हा आपल्याला आपल्या बालपणातल्या आईच्या सुखातल्या घटना आठवतात. वयाच्या साठीनंतर पत्नीलाच आईची उपमा देऊन आपण तिचा गौरव करीत असतो. ती मात्र तिचा पत्नीबरोबरच आईचाही धर्म निभावत असते. तिच्याच कुशीत आपल्याला आईच्या प्रेमाचं सुख आठवतं.
तशाच धीरोदात्त शब्दांनी आईच्या शब्दातून तिचे हात आपल्या पाठीवरून फिरू लागतात, तेव्हा डोळेही पाणावतात. त्या शब्दाने. त्या स्पर्शात, त्या मायेत आपण आकंठ बुडतो. ते लहानपण आठवतं. पण आज आई नसते. आज पत्नी हीच आपल्याला आईच असल्याची जाणीव होते. म्हणूनच कुणीतरी म्हटले आहे की, “स्री” “क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता आहे !” धन्य ते ‘स्री’ जीवन ! धन्य ती स्री ! जी आपल्याला आईच्या रुपात भेटते.
लेखक: पुंडलिक गवंडी (अहमदनगर) मो: ९२७२१३५९११
ईमेल: pcgawandi@gmail.com
नविन ब्लॉगचे नोटिफिकेशन येण्यासाठी विश्व मराठीच्या ईमेल लिस्टला सबस्क्राइब करा.
Комментарии