top of page

फसलेल्या सुटीची कहाणी


चला बाई, काही तासांसाठी तरी किकुताईच्या (किडे कुळकर्णीचे लघुरूप ) किचनमधून माझी सुटका झाली म्हणायची. मी किती प्रयत्न करून बघितले किचनमधून बाहेर पडायला पण भट्टी काही जमतच नव्हती.तुम्हाला सांगते,या उन्हाळ्यात नां कोविड १९, कोरोना विषाणु, लॉकडाऊन, क्वारंटाईन, सोशल डिस्टंसिंग असे नवनवीन शब्द कानावर  अक्षरशः आदळत  होते.  विनासायास मी ते  आत्मसात केले किकुताई आणि , साहेबांच्या बोलण्यातून आणि टी व्ही वरच्या बातम्यातून. थोडं कान देवून ऐकलं तर समजलं की कोरोना नावाचा विषाणु आलाय आणि त्यामुळे लोक मरत आहेत. लोकांना घरीच बसायला सांगितले आहे. हं ,आत्ता मला कळलं की परीक्षेचे दिवस असूनही आपले साहेब कॉलेजाला का जात नाहीत. साहेब घरी की वर्षाताई किचन मधे . साहेबांना चार वेळा थोडंथोडं खायची सवय . त्यामुळे ताईची ड्युटी लागली.तिचं  रोज काहीतरी नवीन पदार्थ बनवणं सुरू झालं. तिला आराम नाही की मलाही आराम नाही. जराही उसंत नाही. दिवसभर ढाबा चालूच. शलाका दिदीने ताईला 'मम्मीदा ढाबा 24/7 ' असं वॉलपीस दिलेलं होतं ते थोडं दूर  माझ्या बाजुलाच टांगलंय. एरवी वर्षाताईला जास्त वेळ किचनमध्ये राहायची आवड नाही पण  ते २४/७  खरं होतंय  आता. ताईची मेस चालूच चालू.

बिचारीला लिहायलाही वेळ मिळत नाही आहे सध्या. बायकांच्या सुट्या. सर्व कामं करून करून थकून जातेय. तिकडे तिला आराम नाही अन इकडे मला. एरवी साहेब जेवून, डबा घेवून गेले की ताई मोकळी .संध्याकाळ पर्यंत किचनमध्ये फिरकत नाही. साहेब आल्यावरच किचनमध्ये यायची त्यामुळे मलाही विश्रांती मिळायची ७,८ तास. पण आता साहेब ३ महिने झाले घरी असल्यापासून मी ही कंटाळले. लॉकडाऊन संपायचं नावच घेत नाही. वाढतोच वाढतो आहे. बाकी बायकांप्रमाणे मीही ठरवलं की आता आपणही लॉकडाऊन मधे सुटीवर  जायचं. सक्तीची विश्रांती घ्यायची. दुसऱ्या दोन शेगड्या आहेत ताईकडे. काढेल ती माळ्यावरून. तिचं काम काही अडणार नाही. हा विचार करून मी असहकार आंदोलन सुरू केलं. माझा एक डोळा म्हणजे एक बर्नर लहान केलं ज्याच्यावर किकु कुकर लावते. पोळ्या लाटताना ओट्यावर पडलेली कणीक मी मुद्दाम  माझ्या बर्नरवर टाकायला लागले.

व्हॅक्युम क्लिनर लावून ताईने साफसफाई केली असली तरी तिच्या नजरेतून आणि यंत्राच्या तावडीतून सुटलेल्या अमरत्व प्राप्त झालेल्या झुरळ पिल्लांना,त्यांच्या माता पित्यांना आग्रहाने बोलावून घेतलं आणि त्यांना सर्व बर्नरमधे दडून बसायला सांगितलं. आमची ताई फारच टापटीपीची आणि स्वच्छता प्रेमी असल्याने ती दर दीड दोन महिन्यानी  किचन लख्ख करतेच. त्यामुळे माझाही नंबर लागतो. मागून पुढून, खालून ,वरून माझीही त्या यंत्रानी साफसफाई होते. कणीक, पाणी, कचरा आणि झुरळं त्या मशीन मधे ओढल्या जातात आणि बर्नर स्वच्छ होतात. तर काय सांगत होते ,मी विनंती केल्यावर आलेल्या थोड्याफार लहान मोठ्या झुरळांनी प्रत्येक बर्नरमधे आपापली पोझिशन घेतली आणि एक एक करून चारही बर्नर बंद पाडले. आता तर ताई दुसरी शेगडी काढून तिला लावणार आणि मला विश्रांती मिळणार म्हणून मी अत्यंत खुश झाले.  संकटाला घाबरेल ती ताई कसली? झालं, तिने धडाधड फोन फिरवले. मी मनापासून प्रार्थना करत होते की आज दुरूस्तीचे दुकान बंद राहू देत.  कारण सध्या लॉकडाऊन मुळे  दुकानं उघडायला लागलीत पण त्यांना ठरवून दिलेल्या दिवशीच. धरमपेठ, गोपालनगर मधील दोन दुकानं उघडी होती. शेगड्या घेवून या म्हणाले ते दादा. त्यांनी मागे नीट दुरूस्त  न केल्याने मला तिकडे पाठवायचा विचार तिने बदलला. मागील दोन वर्षांपर्यंत तर  'आत्मनिर्भर' ताई घरी स्वतः च दुरूस्त करायची मला. सर्व बर्नर, नट बोल्ट काढून २ तास मेहनत घेवून साफ करायची पण हल्ली ताई जरा कंटाळा करतेय. बाहेर देते मला दुरूस्तीसाठी. काय करणार बिचारी ती तरी. घरची, बाहेरची कामं तिलाच बघावी लागतात. कंटाळणारच नां. प्रसंगी अष्टभूजा व अष्टावधानी होवून कामं करावी लागतात गृहीणीला. तर काय सांगत होते, ताईने चांगलं काम करणाऱ्या हिंगणा नाक्या जवळच्या मेकॅनिकला फोन केला. तिच्या सुदैवाने व माझ्या दुर्दैवाने तोही दुकानात आलेला होता. शेगड्या घेऊन या म्हणाला लगेचच. झालं, कमी झालेल्या चारही बर्नर वर ताईने कसातरी स्वयंपाक आटोपला आणि मला स्वच्छ करून साहेबांच्या  हातात सोपवलं.

ताईच्या कारमध्ये बसण्याचा असा योग  जुळून आला. ''दुकान दूर असेल तर छान लॉंग ड्राईव्ह होईल साहेबांसोबत ...'साहेब आणि मी मज्जा येईल' असं कल्पनाचित्र रंगवतानाच गाडी दुकानासमोर थांबलीही. ताईने घोकून घेतल्या प्रमाणे साहेबांनी मेकॅनिक ला धडाधड सर्व प्राॅब्लेम्स सांगितले  आणि कधी परत देतोस म्हणून विचारले. मला वाटलं ,त्याने म्हणावं की ,"साब ,बहोत काम है। टाईम लगेगा। दो दिन लगेंगे। बाद मे ले जाना। ''पण   इथेही माझा भ्रमनिरास झाला. "शाम को  ले जाना साब। तब तक  हो जायेगी। तयार रखुंगा।'' हे मेकॅनिकचे शब्द माझ्या कानात तापलेल्या सळईसारखे घुसले. आधीच नवतपाचा ताप सुरू . अंग भाजून काढणारी उष्णता. त्यात मेकॅनिकचं  उत्तर ऐकून रागाने अंगाची लाही लाही झाली. कां नाही येणार मला राग ? मी सुटीवर जाण्यासाठी किती प्रयत्न केले होते. ताई सर्वांना सुटी देते. आतातर काम न करताही तिघींना पूर्ण पगार देतेय. मज्जा आहे बा त्यांची राव. दर एक तारखेला येतात आणि मस्त पगार घेवून जातात. इथे मला एकपण सुटी देत नाही ताई. काय तर म्हणे मी अत्यावश्यक सेवेत मोडते ! हं ! यांच्या पोटापाण्याचा ,भुकेचा प्रश्न नाही कां ? 

''अच्छे से करना काम. मै शामको आता हूँ। कितना लोगे। "साहेबांनी मेकॅनिकला विचारलं. "२०० रूपये  हो गये साब। हर बर्नर का ५० रूपया । पैसा शामको देना साबजी।" 'ठीक है।"म्हणून साहेब मला त्याच्याकडे टाकून निघून गेले.    मेकॅनिकने हातचं काम पुर्ण करून मला ताब्यात घेतलं. ठोकपीट करून मी घुसवलेली कणीक, झुरळं काढली. ऑइलिंग, ग्रिसींग केलं, स्वच्छ करून तयार केलं. खरं सांगु का , मला नं बाई ,त्याचा स्पर्श नकोसा वाटत होता. ओरडून ओरडून सांगावं वाटत होतं की "अरे बाबा, थांबव ही ठोकपीट. मी स्वतः हून काढून देते तुला हा कचरा.  नको मला बडवूस. मला काहीही झालेलं नाहीये. मी हे मुद्दाम केलंय सुटीवर जाण्यासाठी." पण तोंडातून शब्दच फुटला नाही माझ्या. मेकॅनिकने  माझी बोलती बंद केली होती. साहेब सायंकाळी ठीक ६ वाजता मला घ्यायला आले. मी पुन्हा घरच्या 'क्रीजवर' म्हणजे ओट्यावर विराजमान झाले. ताईने लायटर पेटवून लगेचच सर्व बर्नर चेक केले.  काम छान केल्यामुळे तिने आनंदाने, समाधानाने मान डोलवली. नवीन बटनं लावलेले पाहून तिला बरं वाटलं. मुख्य म्हणजे रात्रीच्या स्वयंपाकाच्या आत मला दुरुस्त करून आणण्यात दोघं पतीपत्नी यशस्वी झाले होते. माळ्यावरची दुसरी जुनी शेगडी काढायचं त्यांचं काम वाचलं होतं. थोड्या वेळात माझी 'बॅटिंग' सुरू झाली म्हणजे ताईच्या स्वयंपाकाला सुरवात झाली. 

माझा सुटीवर जाण्याचा डाव सपशेल फसला होता. मीच माझ्या पायावर धोंडा पाडून घेतला होता. दोन चार दिवसांची सुटी मिळणं तर दूरच राहिलं  उलट मीच त्या मेकॅनिकच्या कचाट्यात सापडले होते.  मी स्वतः हून डोकं उखळात घातलं होतं. ठेचल्या तर जाणारच नां हो... हां पण एकीकडे कारण नसताना ताईला २०० रूपयांचा चुना लावल्याचा आसुरी आनंद  झाला  तर दुसरीकडे साहेबांसोबत कारमध्ये बसायचा  रोमँटिक अनुभव घेतला होता. त्यामुळे माझ्या 'फसलेल्या सुटीची  ही कहाणी' माझ्यासाठी अशी  संस्मरणीय ठरली.


लेखिका: वर्षा किडे-कुळकर्णी (नागपूर)


323 views2 comments

Recent Posts

See All

2 Comments


chan mandani

Like

Deepak Bhalerao
Deepak Bhalerao
Oct 19, 2020

विषय गंमतशीर आहे .छान मांडणी केली आहे .

Like
टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page