top of page

ज्वाला आणि फुले



ज्वाला आणि फुले हे काव्यपुस्तक मला खूप आवडत.या पुस्तकात महान सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांच्या अनुभूतीतून उतरलेल्या अतिशय हृदयस्पर्शी कविता आहेत.

या पुस्तकाविषयी माझ्या माझे हृदगत सांगते.


ज्वाला आणि फुले हे काव्यपुस्तक मला खूप आवडत.या पुस्तकात महान सामाजिक कार्यकर्ते ,आनंदवनचे निर्माते बाबा आमटे यांच्या अनुभूतीतून उतरलेल्या अतिशय हृदयस्पर्शी कविता आहेत.

या पुस्तकाविषयी माझ्या माझे हृदगत लिहिते.

बाबा आमटेंनी कुष्ठमुक्त सात जोडप्यांचा विवाह आणि एक आंतरजातीय विवाह आनंदवनात करून दिला .त्या लग्न समारंभात प्रथम मी या महान व्यक्तीला बघितले . माझ्या मनात बाबांविषयी आदर दुणावत गेला.हळूहळू बाबांविषयीचा गौरव, त्यांच्या व्यक्तीमत्वाची उंची ,माझ्या मनात गगनाला गवसणी घालणारी ठसली.


आनंदवनात गेले असतांना मी त्यांचे "ज्वाला आणि फुले " हे त्यांच्या कवितांचे पुस्तक विकत घेतले.आणि बाबांचे विचार, तत्वज्ञान आपल्या हाती आले असे भासले.


बाबा एक असामान्य अवलिया व्यक्ती ,तशाच त्यांच्या कविता वेगळ्याच ,व्यक्ति वेल्हाळ ,

मुक्त शैलीतल्या, वेदना प्यायलेल्या अनुभूतीतून सर्जित झालेल्या आहे .

सकारात्मक वृत्तीतून वेदनेची फुले झाली.

दृढ आत्मविश्वासातून घामाची फुले झाली."


ज्वाला आणि फुले "... प्रचितीतून उमललेले हे गंध काव्य आहे! ज्वाला आणि फुले हे बाबांचे मुक्त चिंतनकाव्य आहे !


हे पुस्तक चाळता चाळता अनेक काव्यरत्न ,सुविचारांचे मोती हाती लागतात.


ज्वाला आणि फुले या कविता संग्रहात एकूण 23 कविता असून बहुतेक दीर्घ कविता आहेत..या प्रचितीतून आलेल्या चिंतनातील कविता आहेत.गर्भवतीचा मृत्यु,एकलव्य,या सीमांना मरण नाही,श्रम सरितेच्या तीरावर,

क्रांतीची पावले ,विश्वामित्र पंखांना क्षितिज नसते,क्रांतीची पावले ,माझे कलियुग ...या सार्‍या प्रदीर्घ वैचारिक कविता आहेत.

सांगाड्याचे शहर हे औद्योगिक क्रांती,गरीबी यातील विषमतेवर आहे.गांधी एक हिमनग..कविता गांधीजींच्या महानतेवर आहे.'अतिमानवाचे,परत फिरणे,' हे अनेक दृष्टींनी चिंतनिय आहे.


एक एक कविता आपल्या मनात विचार पेरणारी आहे.मनाला हेलावणारी आहे.या चिंतनीय मानवाला जाग आणणार्‍या आहेत.

एकेक ओळ जणू सुंदर सुविचार आहे.


त्यांच्या कविता तत्वज्ञानांनी भरलेल्या असून सामान्य माणसाच्या सुप्त आत्मशक्ती जागृत होण्याच्या दृष्टीने आहेत.


या सार्‍या कवितांमध्येमी मी गतीचे गीत गाई,लक्ष लक्ष रक्तामधल्या पेटल्या मशाली,माणूस माझे नाव याविशेष गाजलेल्या आहेत.


"गुलाब देणार्‍या हातांना सुगंध चिकटल्याशिवाय रहात नाही.बागेत शेकडो फुले फुलू द्या".. असं कवी म्हणतात


"ज्याला गर्दीचा गहिवर असतो

तोच करतो गोपालकाला!

उचलतो गोवर्धन आणि उष्ट्या पत्रावळी!...."


एका तत्ववेत्त्याने विश्वाच्या तत्ववेत्त्याचे सार्थ वर्णन केले आहे


"लक्ष लक्ष रक्ता मधल्या ,पेटल्या मशाली!


या कवितेत अतूट जिद्द आणि आत्मविश्वास शब्दात भरला आहे आणि मनात ठसवला आहे.


"दुःख या धुळीचे येथे धुंद घाम गाळी

लक्ष लक्ष रक्तामधल्या ,पेटल्या मशाली!


" येथे ज्ञानाचीही उजाडे पहाट

नव्या माणसाची इथूनी निघे पायवाट!"


फुले आज होळीमधूनी दिवाळी दिवाळी

वेदनाजीवाची येथे साधनाच झाली.!"


एकेक ओळ मनाला स्पर्शून जाते


दयेवर जगणे बाबांना मान्य नाही श्रमावर अभिमाने जगणे हे खरे जीवन आहे. त्यांनी आनंदवनातील प्रत्येकाला श्रम आत्मनिर्भरता शिकली.

बाबांच्या स्वप्नाचे वर्णन बाबा करतात.


येथे नांदतात श्रमर्षी ,या भूमीला क्षरण नाही.

येथे ज्ञान गाळते घाम,विज्ञान दानव शरण नाही.

येथे कला जीवनमय ,अर्थाला अपहरण नाही.

येथे भविष्य जन्मत आहे, या सीमांना मरण नाही.


' या सीमांना मरण नाही ' या कवितेतील स्वप्न बाबांनी प्रत्यक्ष आनंदवनातील मानवाच्या मनात पेरली. आणि आनंदवन फुलले.


समाजाकडून बहिष्कारीत कुष्ठरोग्यांना स्वावलंबी जीवन देणारे, त्यांच्यामधे आत्मसन्मान जागवणारे, त्यांच्यामध्ये जगण्याची उमेद जागवणारे महामानव बाबा आमटे. या महान समाज कार्यकर्त्याच्या दुर्दम्य आशावादाच्या हृदयाला भिडणार्‍या कवितांमधिल ही एक कविता....गतीचे गीत

बाबा आमटेची कविता


गतीचे गीत


शृंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई

दुःख उधळायास आता, आसवांना वेळ नाही


ओस आडोशात केले, पापण्यांचे रिक्त प्याले

मीच या वेडावणार्‍या माझिया छायेस भ्याले

भोवती होते घृणेचे ते थवे घोंघावणारे

संपले होते निवारे बंद होती सर्व दारे

वाडगे घेऊन हाती, जिद्द प्राणांची निघाली

घाबरी करुणा जगाची, लांबुनी चतकोर घाली

माझिया रक्तासवे अन चालली माझी लढाई

दुःख उधळायास आता, आसवांना वेळ नाही


त्या तिथे वळणावरी पण वेगळा क्षण एक आला

एकटे एकत्र आले आणि हा जत्था निघाला


घोर रात्री श्वापदांच्या, माजलेले रान होते

पांगळ्यांना पत्थरांचे ते खडे आव्हान होते

टाकलेली माणसे अन् त्यक्त ती लाचार माती


"शृखंला पायीअसूदे !मी गतीचे गीत गाईन

दुख उधळावयास आता ,आसवांना वेळ नाही.


पेटती प्रत्येक पेशी मी असाअंगार झाले

आसवे अन् घाम यांचा आगळा शृंगार चाले!

वेदनेच्या गर्दरात्री गर्जली आनंद द्वाही!

दुःख उधळावयास आता वादळांना वेळ नाही...


केवढा दुर्दम्य आशावाद..स्वप्नात नव्हे त्यांनी तो तुटक्या अपूर्ण बोटात उतरवला


माणूस माझे नाव


माणूस माझे नाव, माणूस माझे नाव

दहा दिशांच्या रिंगणात या पुढेमाझी धाव..


ही अतिशय गाजलेली कविता म्हणजे जणू बाबांचे व्यक्तिमत्व , बाबांचे जीवन! सत्यात उमललेली त्यांची स्वप्ने!


"मी दैन्याच्या विरूद्ध करतो ,क्षणाक्षणाला नवा उठाव"...


हे त्यांचे जीवन आहे .एक नवा माणूस घडतो अतिमानव अवतरतो.


दुःख जाणणे,वेदना हृदयातून समजून घेणे, मानवाला जगण्याचा अधिकार देणे ..श्रमाचे महत्व जाणणे.या सार्‍या अनुभूतीतून बाबांच्या कवितांनी जन्म घेतला !


बाबांची स्वप्ने प्रखर दुर्दम्य आत्मविश्वासाची होती. म्हणून आनंदवन फुलले!


माणूस "मी आणि माझा संसार " एवढच जगतो.संसारात गुरफटलेला असतो. आपल्या भोवती असलेले दुःख वेदना त्याला दिसत नाहीत. हया स्वार्थी माणसाला समाजभान नाही .यातून कधी अंगार फुलतो. यातूनच आत्मविश्वासाच्या बळावर वेदनेवर घातलेल्या फुंकरेने फुले फुलतात.

बाबांच्या कविता आनंदयात्री, प्रकाशयात्री

आहेत.

पु.ल.म्हणतात" ज्वाला आणि फुले " एकदा वाचून हातावेगळे करायचे पुस्तक नाही.ते पुनः पुनः वाचायचे आहे.

धन्यवाद


मीना खोंड.

7799564212

Email.: meenakhond@gmail.com



विश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअ‍ॅप लिस्टमध्ये सामील व्हा - 7066251262 हा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMP असा मेसेज पाठवा


373 views0 comments

Комментарии


टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page