top of page

मला आवडलेले पुस्तक : जगज्जेतेपुस्तक: जगज्जेते : त्यांनी मन जिंकले !त्यांनी जग जिंकले !

लेखक:डॉ भूषणकुमार उपाध्याय I.P.S

अनुवाद:शकुंतला कोलारकर

विजय प्रकाशन

पृष्ठे:२६०,किंमत २५०/-रुपये


पुस्तकाचे नाव वाचून नेमके हे पुस्तक कशाबद्दल आहे याची थोडीफार कल्पना येते,पण ते कोणावर लिहिले गेले आहे याचा संभ्रम मनात निर्माण होतो.आजकाल बाजारात अशा नावाची अनेक पुस्तके उपलब्ध आहेत.यश,प्रसिद्धी मिळालेले उद्योगपती,खेळाडू,विचारवंत यांची अनेक पुस्तके हि याच प्रकारात मोडत असतात.पण हे पुस्तक अशा १० व्यक्तीवर लिहिलेले आहे ज्यांच्या विचारांचा,कार्याचा,त्यांनी समाजात घडवून आणलेल्या बदलांचा प्रचंड मोठा परिणाम संपूर्ण जगावर पडलेला आहे.यातील पहिल्या ५ व्यक्ती तर अवतार पुरुषच म्हणायला हव्यात पण इतरही ५ व्यक्तींचे जीवनकार्य हे त्याच तोडीचे आहे असे म्हणायला हरकत नाही.

   भगवान श्रीकृष्ण,भगवान बुद्ध,भगवान महावीर,जिझस ख्राईस्ट,ईश्वराचे प्रेषित-मुहम्मद पैगंबर,स्वामी विवेकानंद,अल्बर्ट आईन्स्टाईन,सिग्मन्ड  फ्रॉइड,महात्मा गांधी,डॉ.बाबासाहेब आंबेडकर या प्रत्येक महान व्यक्तींविषयी त्यांच्या कार्याची सुरुवात कशी झाली,त्यांच्यावर कुठल्या गोष्टीचा प्रभाव होता,योगसाधना,ध्यानधारणा या सर्वातून त्यांना झालेले साक्षात्कार,त्यांचे मनावर झालेले सकारात्मक परिणाम,त्यांनी स्वतःत घडवून आणलेले बदल या सर्व गोष्टींचा आढावा या पुस्तकात घेण्यात आलेला आहे.कुठल्याही गोष्टीचे उच्चतम ध्येय साधण्यासाठी मनाचे व्यवस्थापन किती महत्वाचे आहे हे या पुस्तकातून लेखकाला सुचवायचे आहे.प्रत्येक व्यक्तिमत्वाचा अभ्यास करण्यासाठी अभ्यासलेल्या संदर्भ ग्रंथांची यादी प्रत्येक प्रकरणामागे दिलेली आहे.कुठेही अवाजवी,अवास्तव मत प्रकटीकरण आढळून आलेले नाही.त्यामुळे प्रत्येक व्यक्तिमत्वावर वेगवेगळा सारांश लिहिण्याचा हा प्रयत्न.


१)भगवान श्रीकृष्ण

    श्रीकृष्णनीती म्हणजे जीवन व्यवहाराशी निगडित असलेले एक गतिशील शास्त्र आहे.त्यांनी कोणताही पंथ स्थापन केला नाही,विशिष्ट असा उपासना मार्ग सांगितलेला नाही,कि कुठलीही धार्मिक प्रणाली प्रतिपादन केली नाही.जीवनाच्या प्रवासात जे जे भले बुरे येते त्यात कोणतीही आवड निवड न ठेवता किंवा प्रिय अप्रिय भावना न बाळगता जसे आहे तसे स्वीकारणे हा त्याचा धर्म आहे.सर्व कर्म कर्तव्ये अनासक्त वृत्तीने केली पाहिजेल अशी त्यांची धारणा होती.ताण व्यवस्थापन शास्त्र या विषयावर तज्ञ आजही जी तत्वे मांडत आहेत त्याच्या मुळाशी असलेले तत्त्वविचार हजारो वर्षांपूर्वी श्रीक्रुष्णांनी गीतेतून प्रतिपादन केली आहेत.गीतेत संन्यासधर्म सुचविलेला आहे,हा सन्यास म्हणजे बाह्य वस्तूंचा वा पदार्थांचा त्याग नव्हे तर तो आंतरिक त्याग आहे असे सांगितले आहे.भूत भविष्याचा विचार न करता प्रत्येकाने प्रतीक्षण वर्तमानातच जगावे,मनःशांती किंवा मनःनिस्पंद असणे हीच माणसाच्या आत्मविकासाची गुरुकिल्ली आहे.ध्यानसाधनेचेही महत्व त्यांनी अधोरेखित केले आहे.


२)भगवान बुद्ध

    मानवतेचे एकमेव उद्दिष्ट समोर ठेवून,परमेश्वर,आत्मा,स्वर्ग,नरक या संकल्पना बाजूला ठेवून विशिष्ट धर्म विकसित करणारी एकाच व्यक्ती या पृथ्वीतलावर होऊन गेली ती म्हणजे भगवान बुद्ध.मनुष्य आपल्या दैवाचा,कर्मगतीचा,स्वतःच शिल्पकार असतो हि त्यांची शिकवण.आत्मा परमेश्वर स्वर्ग,नरक या अधिभौतिक कल्पना असून त्यांच्या चर्चा,प्रवचने सर्व अप्रस्तुत आणि निरुपयोगी आहे असे त्यांनी स्पष्ट शब्दात जाहीर केले.कुठलाही भेदभाव न ठेवता पूर्णतः लोकशाहीवर आधारित पंथ त्यांनी निर्माण केला.तृष्णा वा इच्छा हेच दुःखाचे मूळ कारण आहे,ताणतणावाचे उगम अधिकाची हाव यातच आहे हे आजचे व्यवस्थापन शिकविणारेही मान्य करतात.बौद्ध धर्मातील अष्टांगिक मार्ग सम्यक दृष्टी,सम्यक संकल्प,सम्यक कर्म इत्यादी मनाला वळण लावण्याचे निरनिराळे मार्ग आहेत.श्वासोच्छवासाची सजग जाणीव मनाला शांत करण्याचे प्रभावी साधन आहे.'मनाच्या व्यवस्थापनाचे तंत्र' या विषयाला विपश्यना हे मोठेच योगदान बौद्धधर्माने दिले आहे.    


३)भगवान महावीर

    शाश्वत सुख समाधान हे भौतिक गोष्टींच्या मालकीवर अवलंबून नाही,उलट त्याबाबतीत मनाने पूर्ण अनासक्त राहण्यातून ते आपल्याला प्राप्त होते हे सत्य महावीरांना उमगले.दुःखभोगाचे मूळ कारण लालसा होय,अध्यात्मिक उपासक या लालसेतून स्वतःला मुक्त करून घेऊ शकतो.अशा प्रकारे जैन धर्मियांची तत्त्वप्रणाली त्यांनी जगासमोर मांडली आहे.आपल्या वाटेला आलेले सुदैव-दुर्दैव ह्या दोन्ही गोष्टीसाठी आपलीच कर्मे कारणीभूत आहेत.सर्व मानवजात,प्राणी वनस्पती,पक्षी,कीटक,अचल व निर्जीव वस्तूही परस्परांना आतूनच जोडले गेलेले आहेत.आपण हात हलविण्याची साधी कृती जरी केली तरी सर्व अणुरेणू चैतन्यमय होतात,कार्यप्रवृत्त होतात.जैन धर्माने सर्वप्रथम मांडलेलं हि संकल्पना आधुनिक भौतिकशास्त्रात Quantum Theory नेही सिद्ध केलेली आहे.याच संकल्पनेवर जैन धर्मियांचे अहिंसा हे तत्व आधारलेले आहे."जेव्हा मी दुसऱ्याला दुखवितो तेव्हा खरे म्हणजे मी स्वतःलाच दुखवित असतो." महात्मा गांधींनी प्रत्यक्षात आचरणात आणलेल्या अहिंसा तत्वाची परिणामकारकता किती व्यापक आहे याला इतिहास साक्षी आहे.


४)जिझस ख्राईस्ट

   ख्रिश्चन धर्माचा पायाच परमेश्वर या संकल्पनेवर आधारलेला आहे.बायबलमध्ये प्रार्थनेचे फार सुंदर चित्रण केले आहे.प्रार्थना हि काही आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळविण्यासाठी केलेली युक्ती नव्हे,तर आपल्या अस्तित्वाचा नजरेआड असलेला गहनगूढ असा गाभा आणि त्यात असलेल्या दैवी शक्तीचा शोध घेणे हेच प्रार्थनेचे प्रयोजन होय.माणसात जेव्हा आंतरिक बदल होतो,तेव्हाच त्याच्यात खऱ्या अर्थाने परिवर्तन होते.आंतरिक बदल म्हणजे वैचारिक पातळीत होणार आमूलाग्र बदल हा अर्थ त्यांना अभिप्रेत होता.ख्रिश्चन धर्माच्या केंद्रस्थानी महत्व पावलेला एकच विषय आहे तो म्हणजे प्रेम आणि सेवाभाव.प्रेमामुळे एकात्मकतेची,एकरूपतेची भावना सूचित केली जाते.आपल्या सभोवतालची माणसे आणि समाज यांचेही आपण काही देणे लागतो आणि त्यासाठी सेवावृत्ती महत्वाची ठरते.येशू ख्रिस्तानी असे निश्चयपूर्वक सांगितले कि माणसाची पापांपासून मुक्ती करणे,त्याला पापकृत्यांपासून वाचवणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे.मानस व्यवस्थापनाची सर्व सूक्ष्म आणि अत्युत्कृष्ट तंत्रे त्यांच्या 'Sermon on The  Mount' मध्ये आढळतात.त्यांनी केलेले चमत्कार हे त्यांच्या ठिकाणी असलेल्या विशेष मानसिक शक्तीचे लोकांना घडलेले दर्शन होते.


५)ईश्वराचे प्रेषित-मुहम्मद पैगंबर

    मायकेल एच हार्ट यांनी लिहिलेल्या 'The १००' या पुस्तकात तो म्हणतो जगातील सर्वात जास्त प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून मी प्रेषित मुहम्मदाना प्रथम पसंती देतो.धार्मिक आणि ऐहिक या दोन्ही क्षेत्रात अतिशय यशस्वी ठरणारी प्रेषित मुहम्मद हि एकाच व्यक्ती होऊन गेली.प्रेषित मुहम्मद हे त्या काळी प्रचलित असलेल्या कोणत्याही धर्मकल्पनांमुळे पूर्ण समाधानी नव्हते.सर्व मानवजातीसाठी योग्य ठरेल अशा प्रकारच्या वैष्टिष्ट्यपूर्ण विचारांचा,नियमांचा ते शोध घेत राहिले.पर्वताच्या गुहेत प्रार्थना आणि ध्यानात असताना त्यांना साक्षात्काराचा अनुभव आला.त्यांचे साक्षात्कार म्हणजेच पवित्र धर्मग्रंथ 'कुराण' होय.ज्यात त्यांच्या प्रेषित झाल्यापासून ते मृत्यूपर्यंत म्हणजेच तेवीस वर्षांच्या कालावधीतल्या साक्षात्कारांचा अंतर्भाव आहे.प्रेषित मुहम्मद मूर्तीपूजेला आणि भ्रामक देवतांच्या भक्ती पूजेच्या विरुद्ध कडक टीका करत.पाच वेळा नमाज पढणे हे मनशक्ती वाढविण्याचे एक प्रभावी साधन आहे.शुक्रवारी सर्वानी एकत्र येऊन नमाज पढणे जेणेकरून बंधुभाव निर्माण होतो,श्रीमंत गरीब असा भेदभाव केला जात नाही.देह आणि मन शुद्धीसाठी उपवास हा अत्युत्तम उपाय आहे.त्यामुळे आत्मसंयमनाची ताकद वाढते.दानधर्म,हजयात्रा,जिहाद म्हणजे पवित्र युद्ध,मद्यपान,जुगार यापासून दूर राहणे अशी शिकवण त्यांनी दिली.प्रेषित बनल्यानंतरही त्यांनी ६ युद्धांमध्ये भाग घेतला.शांततेत असणारी ताकद हिंसाचारापेक्षाही जास्त असते असे त्यांचे ठाम मत होते.हिरवा रंग झाडाचे प्रतीक म्हणून इस्लाममध्ये तो महत्वाचा मनाला जातो.कुराणात म्हटले आहे "....धर्मामध्ये कधीही जोरजबरदस्ती नको.... " "...तुम्ही तुमच्या मार्गाने जा मी माझ्या मार्गाने जाईन..."


६)स्वामी विवेकानंद

    सन्यस्तवृत्ती,सेवाभाव,सर्व वस्तुजातीतील एकात्मकता आणि वैचारिक सुसंवाद ह्या सर्वांची प्रतिमा म्हणजे स्वामी विवेकानंद.श्री रामकृष्ण परमहंस आणि नरेंद्र यांची एकमेकांशी झालेली आंतरिक भेट यातूनच रामकृष्णांच्या ठायी असलेल्या अनभिज्ञ प्रचंड अध्यात्मिक ऊर्जेचा साठा जगासाठी विवेकांनदांच्या स्वरूपात अवतीर्ण झाला.त्यांच्या मार्गदर्शनाखाली ध्यानधारणेत नरेंद्रची चांगली प्रगती होत होती.पण तरीही नरेंद्रांवर बुद्धिवादी विचारसरणीचा पगडा होता. धर्मवेडेपणा,स्वधर्माचा फाजील अभिमान आणि संकुचित मनोवृत्तीची याला सर्वानी आळा घातला पाहिजेल असे त्यांनी सर्वाना बजावले होते.कोणत्याही धर्मावर त्यांनी कधी टीका केली नाही.मात्र सर्व धर्मपंथ,धर्मशाखा यांना सम बुद्धीने उचलून घेणाऱ्या हिंदू धर्माची वैशिष्ट्ये अत्यंत प्रभावीपणे सर्वांच्या नजरेत आणली.विवेकानंद निःसंशयरीत्या गूढवादी होते त्यांची भाषा मात्र शास्त्राची आणि वैज्ञानिकांची होती.भौतिक विज्ञान हे बाह्य जगातील तथ्यांचा शोध घेत आहे आणि मनाची मशागत करून सुसंकृत झालेले मन हेच एक असे साधन आहे कि ते आतील अनंत विश्वाला जाणू शकेल.मनुष्याला शारीरिक सुखाची आणि उपभोगाची अनेक साधने भौतिकशास्त्राने निर्माण केली आहेत परंतु परम शांती आणि परमसुख हे सुसंकृत मानामुळेच मिळते.


७)अल्बर्ट आईन्स्टाईन

   "शाळेत शिकलेले सर्व काही विसरून गेल्यावरही जे राहते ते खरे शिक्षण समजावे" अशी विचारसरणी असलेल्या या महान शास्त्रज्ञाचा स्वभाव हा एकांतप्रिय होता.कोणत्याही कामासाठी आवश्यक मनःशक्ती हि एकांतात,एकाग्रचित्त झाल्यावरच निर्माण होऊ शकते असे आईन्स्टाईन मानत असे.ध्यानधारणा,एकाग्रता यासाठी योगमार्गाचा तो अवलंब करत असे.आपल्याच विचारात बुडून गेलेला आईन्स्टाईन शून्यमनस्क अवस्थेत रस्त्यावरून,नदीकिनारी फिरत असे.कमालीची एकाग्रता आणि ध्यान या दोन गोष्टींमुळे अंतस्फूर्ती जागृत होते.एखाद्या विषयावर जेव्हा मन एकाग्र होते,तेव्हा त्याची शक्ती खर्च न होता वाचविली जाते,शिल्लक राहते.आइन्स्टनच्या शून्यमनस्कतेचे स्पष्टीकरण या मनाच्या एकाग्रतेत दडले आहे.कल्पनाशक्ती,इष्ट गोष्टींची प्रतिमा डोळ्यांसमोर उभी करण्याची क्षमता आणि तर्कानुमान हि त्याच्या शास्त्रशुद्ध कामाच्या शैलीची प्रमाणित वैशिष्ट्ये होती.अनुभवाचा भक्कम आधार असलेली वैज्ञानिक अंतर्दृष्टी यातूनच त्याच्या सर्व सिद्धांताचा जन्म झाला.त्याचा असा विश्वास होता कि विज्ञाननिष्ठ लोकच अतिशय धार्मिक असतात आणि साक्षात्कारांतूनच मूलभूत तथ्यांचा शोध लागतो.केवळ प्रयोगाद्वारे सिद्ध करण्यामुळे मूलभूत तत्वे सर्वमान्य होत नाहीत.सामर्थ्यशाली अधिकारी व्यक्तींच्या माध्यमातून साक्षात्कारांमधूनच ते कायमस्वरूपी सिद्ध होतात.या विश्वाच्या सुव्यवस्थित संवादातूनच ज्याचे दर्शन घडते त्या सिपनोझाच्या परमेश्वराला मी मानतो.मानवाच्या नियती आणि कर्माशी संबंध असणाऱ्या देवावर मी विश्वास ठेवत नाही.हे जग निर्माण करणारा कुणीही विधाता नाही ना परमेश्वर आपल्याला चांगल्या वाईट कर्मांची फळे देतो.


८)सिग्मन्ड फ्रॉइड

    मनाची अबोधावस्था आणि अबोध मनोव्यापार माणसाच्या आयुष्यात महत्वाची भूमिका बजावतात,तरी माणसाला साधारण याची जाणीव नसते या फ्रॉइडच्या विचारातून त्याच्या विख्यात 'मनोविश्लेषणपद्धतीचा' जन्म झाला.लैंगिकतेच्या त्याच्या सिद्धांताने कामवासनेबद्दलच्या पारंपरिक कल्पनांना धक्के दिले आणि त्याकडे पाहण्याची वेगळी दृष्टी दिली.त्याचा सर्वात क्रांतिकारी सिद्धांत म्हणजे अर्भकावस्थेतील लैंगिकता.मात्र फ्रॉईडने 'लैंगिकता'आणि 'कामुकता' यात फरक आहे असे प्रतिपादन केले.शरीरात जी जी सुखकर ठिकाणे आहेत,ज्या सुखदायक जागा आहेत त्या ठिकाणापासून सुख मिळविणे हि कामुकतेत मोडणारी प्रेरणा आहे.आईचे दूध पिताना मुलाला सुख मिळते ,अंगठा चोखण्यामुळेही तो तशाच प्रकारचे सुख उपभोगतो.त्यामुळे लहान मुलाचे मुख हे सर्वात पहिले अवयव आहे ज्यात कामुकता निर्माण होते.मुलगा असो वा मुलगी प्रत्येकात विरुद्धलिंगी वैशिष्ट्ये आढळतातच आणि त्यातूनच मुलांमध्ये 'पितृभावगंड' आणि मुलींमध्ये 'मातृभावगंड' निर्माण होतो.कामशक्तीचे नियोजन करून योग्य मार्गाने ती सर्जनशीलता क्षेत्रात वाळविणे म्हणजेच कामप्रेरणेचे उदात्तीकरण होय असे तो म्हणतो.माणसाचे मानसिक जीवन हे 'इदम','अहम' आणि 'परम अहम' या तीन गोष्टीत समाविष्ट असते हे त्याने दाखवून दिले आहे.स्वप्नांविषयी त्याने सखोल विश्लेषण केले आहे.आपले अनुभव,घटना,व्यक्ती,कल्पना,विचार यातूनच स्वप्नांना खाद्य मिळते.लहानपणीच्या अनुभवांचा मात्र खोलवर ठसा उमटलेला असतो.फ्रॉइड हा निरीश्वरवादी होता.परमेश्वराच्या अस्तित्वाची संकल्पना एक भ्रम म्हणून त्याने धुडकावून लावली.त्याचप्रमाणे त्याच्या मते धर्म हा सुद्धा एक भ्रमच आहे.


९)महात्मा गांधी

   गौतम बुद्धांनंतरची महान भारतीय व्यक्ती म्हणून महात्मा गांधी यांचेच नाव घ्यावे लागेल.विचार,उच्चार आणि आचार या तिन्हींची अतिशय परिपूर्ण एकवाक्यता त्यांच्यात दिसून येते.लंडनमध्ये असताना 'Plea  for Vegetarianism','The  Ethics  Of  Diet','The  Perfect  way in Diet' या पुस्तकांचा मोठा प्रभाव त्यांच्या आहार सवयींवर झाला.भगवद्गीतेचा अनुवाद 'The Song Celestial',;The  Light  Of  Asia', टॉल्स्टॉय यांच्या 'The Kingdom Of God Is

 Within you',रस्किनच्या 'Unto The Last ' या ग्रंथांनी त्यांच्या मनावर अतिशय सखोल ठसा उमटविला.निःशस्त्र प्रतिकाराची सुरुवात त्यांनी आफ्रिकेमधूनच वर्णद्वेषाविरुद्ध केली होती.१९१५ मध्ये अहमदाबाद येथे 'सत्याग्रह' आश्रम स्थापन केला,नंतर वर्ध्यात 'सेवाग्राम'ची सुरुवात केली.एका व्यक्तीच्या नुकसानामुळे दुसऱ्या व्यक्तीचा फायदा किंवा प्रगती होऊ शकत नाही.दुसऱ्याला दुःख किंवा त्रास देणे म्हणजे अंती स्वतःला दुःखी बनविणे होय.आपण दुसऱ्याला जे देऊ तेच आपल्याकडे परत येते असे ते मानत.माणसाच्या कृतीतून,आचरणातून मला त्याचा धर्म दिसतो त्याहून वेगळा धर्म मी मानत नाही.स्वतःला पूर्णपणे ओळखून जाणून घेणे व त्यानुसार जगणे हेच मानवी जीवनाचे अंतिम उद्दिष्ट्य असे ते मानत.परिपूर्ण सत्य हे गूढ असून फक्त अंतर्ज्ञान,ध्यान आणि प्रार्थना याद्वारेच ते अनुभवास येते.अंतर्ज्ञानासाठी त्यांनी 'श्रद्धा' हा शब्द उपयोजिला आहे.प्रार्थना,पूजा,नम्रता वगैरे अंध्द्श्रद्धा मुळीच नाहीत.या गोष्टी खाणे-पिणे,बस-उठणे यापेक्षाही जास्त वास्तव आहेत.उपोषणाशिवाय इंद्रीय नियंत्रण नाही हा त्यांचाच स्वानुभव आहे.गांधीजींची अहिंसा हि दुबळेपणातून नव्हे तर सामर्थ्यातून निर्माण झालेली अहिंसा आहे.अहिंसेच्या झालेल्या श्रेष्ठ सामर्थ्याचा आणि आंतरिक शक्तीचा त्यांना साक्षात्कार झाल्यामुळे त्यांनी अहिंसा धर्म पत्करला.गरजा मर्यादित ठेवून स्वीकारलेली समाधानी वृत्ती हीच सुखाचा मूळ स्रोत आहे असे ते म्हणत.आईन्स्टाईनने त्यांच्याविषयी व्यक्त केलेले मत "त्यांच्यासारखी रक्तामांसाची,जीती-जागती व्यक्ती या पृथ्वीतलावर एकेकाळी वावरली होती यावर भविष्यातील पिढ्यांचा विश्वास बसने कठीण होईल." गांधीजींनीही आपले मनोगत 'माझे प्रत्यक्ष आयुष्य हाच माझा संदेश आहे' अशा शब्दात व्यक्त केले आहे.


१०)डॉ. बाबासाहेब आंबेडकर

   सर्वाना आपले आयुष्य जगताना आत्मसन्मानाने,स्वतंत्रपणे,बंधुभावाने आणि समबुद्धीने वागविले जावे हा डॉ आंबेडकरांचा  संदेश आजवर पायाखाली तुडविल्या गेलेल्या लोकांच्या तोंडून गर्जून उठला.सर्व वाईट गोष्टींचे मूळ भारतातल्या जाती व्यवस्थेत आहे,'गुलामाला तो गुलाम आहे हे जाणवून द्या' तेव्हाच तो गुलामगिरीविरुद्ध बंड पुकारेल.शोषित,पीडित सुस्त-निद्रिस्त असलेल्या बहुसंख्य लोकांना त्यांच्या हक्कांची जाणीव आंबेडकरांनी करून दिली.गौतम बुद्ध,कबीर,महात्मा ज्योतिबा फुले यांचा त्यांच्या आयुष्यावर अमित ठसा उमटला होता.त्यांना वाचनाचा दांडगा नाद होता.मुंबईमधील त्यांच्या 'राजगृह' बंगल्यातील (कालच  जिथे समाजकंटकांनी तोडफोड केली) ग्रंथसंपदा पंडित मदन मोहन मालवीय यांनी २ लाख रुपयांना विकत मागितलेली,जो प्रस्ताव आंबेडकरांनी अव्हेहरला.कारण एखाद्या प्रियकराचे आपल्या प्रेयसीवर असावे असे प्रेम त्यांचे आपल्या पुस्तकांवर होते.पुनर्जन्म आणि मुक्ती हि गृहीतके दिशाभूल करणारी आहेत.आज, आत्ताचे आयुष्य हेच महत्वाचे आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.जो धर्म जातीच्या आधारे माणसांना जनावरांपेक्षाही वाईट वागवतो अशा धर्माची त्यांनी निर्भत्सना केली.त्यांच्या दृष्टीने नैतिकता हाच धर्माचा गाभा आहे,नीतिनियम नसलेला धर्म टाकाऊ आहे.प्रज्ञा,करुणा आणि समता या त्रिसूत्रीवर उभारलेला स्वतंत्रता,समता,बंधुता या त्यांच्या तीन तत्वविचारांशी सुसंगत बौद्ध धर्म त्यांनी स्वीकारला.डॉ आंबेडकर आद्योगिकीकरण आणि यांत्रिकीकरण असावे या मताचे होते तर महात्मा गांधीजींचा यांत्रिकीकरणाला विरोध होता.जेथे जेथे शक्य असेल तेथे अहिंसेच्या तत्वाचे पालन व्हावे परंतु आवश्यक असेल तेथे तेथे हिंसा स्वीकारावी असे त्यांचे मत होते.त्यांनी राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक सुधारणांना प्राधान्य दिले.राजकीय स्वातंत्र्य मिळणे म्हणजे ब्रिटिशांच्या हातातून सत्ता फक्त भारतीय उच्च्वर्णीय सवर्णांच्या हाती जाणे होईल या मताचे ते होते."मी हिंदू म्हणून जन्माला आलो परंतु मी हिंदू म्हणून मरणार नाही" असे जाहीर केलेल्या या महान क्रांतीकारकाची खणखणीत वाणी नेहमीच हा ऐतिहासिक संदेश देऊन जाईल "माणूस जन्माने नव्हे तर कर्तृत्वाने महान ठरतो".


लेखक: हर्षवर्धन जुमळे (ठाणे.)

मो:  9594160121 

ईमेल: harshjumle87@gmail.com

 

नविन ब्लॉगचे नोटिफिकेशन येण्यासाठी विश्व मराठीच्या ईमेल लिस्टला सबस्क्राइब करा.

Comments


टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page