आशाताई कानिटकर मला भेटल्या ते फक्त फोनवरच! त्या करीत असलेलं काम मी ऐकून होते, पण फोन मुळे सगळं नीट कळलं. डोंगराएवढी संकटं कोसळून सुद्धा त्या त्यातून धीराने सावरल्या व कणखर बनल्या. आयुष्यात काहीतरी करून दाखविण्याची त्यांची धडपड मला खूप भावली. त्यांचे हे धडपडणे नुसते पैसा मिळवण्यासाठी नव्हते तर समाजासाठी काही तरी करावं या जाणीवेतून होते.
लहान वयात विवाह होऊन त्या सासरी कोल्हापूरला आल्या. माहेरच्या पुढारलेल्या वातावरणातून एकदम जुनाट बुरसटलेल्या मतांच्या सासरच्या वातावरणात! नवीन आलेल्या सुनेने सहन तरी किती करायचं? जोडीदाराचे जरी भरभरून प्रेम मिळत असेल तर इतर अनेक त्रास बाई सहन करते, पण तेही नाही!
अकरावी झालेल्या आशाताईंना पुढे शिकण्याची जबरदस्त ओढ. मुलगा कॉलेजमध्ये जायला लागल्यावर त्या ही त्याचेबरोबर कॉलेजचा अभ्यास करू लागल्या. मुक्त विद्यापीठाद्वारे मराठी साहित्य हा विषय घेउन एम ए झाल्या. पीएचडी होण्याचा योग नसल्यामुळे सामाजिक भान असलेल्या आशाताईंनी स्वतःसाठी एक वेगळाच कोर्स निवडला. वडील अर्धांगवायूने आजारी असताना त्यांना जाणवले होते की मसाज, स्पर्श चिकित्सा व ॲक्युप्रेशर याने माणसाच्या वेदना कमी होऊ शकतात. आणि मग त्यांनी एका गुरूच्या मार्गदर्शनाखाली ह्याचा अभ्यास सुरू केला व उत्तमरितीने त्यांनी हा कोर्स पूर्णही केला. जोडीदाराचे आकस्मिक निधन झाले आणि प्रपंचाची आर्थिक बाजूही त्यांना सावरायला लागली. शिकत असताना सुद्धा घरची आर्थिक परिस्थिती ओढाताणीचीच. कुठलंच काम त्यांना हलक्या दर्जाचं वाटायचं नाही. त्या गरजूंच्या कडे स्वयंपाकालाही जायच्या. पुढे हा कोर्स पूर्ण झाल्यावर त्या बाहेर पडल्या.काही महिन्यातच अर्धांग झालेल्या आजीना उपचार करण्याची विचारणा झाली. त्यांच्या गुरूंची शिकवण होती की रुग्णाचा मसाज करताना किळस हा शब्द बाजूला ठेवा कारण अशा लोकांचा त्यांच्या हालचालीवर व अवयवावर ताबा नसतो.
अर्धांग झालेल्या आजींचा त्यांनी जेव्हा मसाज सुरू केला तेव्हा त्यांनी आपल्या स्वतःच्या आजीला या आजींमध्ये पाहिले आणि त्यात त्यांना यश आले. आजी बर्या झाल्या, आता त्या त्यांच्याबरोबर नाती सारख्या वागतात!
हळूहळू या कामात आशाताई स्थिर झाल्या. रुग्णाची मानसिकता त्यांना समजू लागली. निरीक्षण, हावभाव, नजर, स्पर्श, अशा देहबोलीच्या माध्यमातून त्या रुग्णाच्या मनापर्यंत पोहोचू लागल्या व रुग्णही त्यांना साथ देऊ लागले.
याच कारणाने एका मतिमंद मुलाला उपचार करण्यासाठी विचारणा झाली. अशा मुलाला उपचार करण्याचा हा त्यांचा पहिलाच अनुभव होता, पण दुसऱ्याच्या दुःखाबद्दल कळकळ असल्यामुळे आशाताईंनी हे काम स्वीकारले. नॉर्मल रुग्ण व मतिमंद रुग्ण यामध्ये खूपच फरक असल्याचे त्यांना जाणवले. त्यांनी तीन दिवस वेळ घेतला, अनेक संदर्भ—ग्रंथ, गुरु, इंटरनेट या सगळ्या माध्यमातून अभ्यास केला. मग मनाची तयारी करून त्या मुलाचे उपचार त्यांनी सुरू केले. तो मुलगा त्यांच्याकडे बघतहि नव्हता.तो त्यांना हात लावू द्यायचा नाही. दोन दिवस लागले त्याला जवळ यायला. मग मात्र त्याने त्यांच्याकडून उपचार करून घेतले. त्यांचा मायेचा स्पर्श त्याने ओळखला. तो मुलगा एक महिन्यात बरा झाला, नीट चालू लागला. पडल्यामुळे त्याचे पायाला फ्रॅक्चर झाले होते. पुढे त्या मुलाला अंक शिकविणे, चित्र काढणे, चित्र ओळखणे हे त्यांनी शिकविले. याला चार महिने लागले. नऊ मतिमंद मुलांना मसाज,अॅक्युप्रेशरचा उपयोग करून त्यांच्या हालचाली सुधारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. मतिमंद मुलांच्या बाबतीत असे प्रेम दाखविणे हे खूपच कठीण! मातृहृदयी स्त्री-पुरुषच असे करू शकतात.
मतिमंद मुलांवर उपचार करत असताना त्यांना असा अनुभव आला की त्यांचे पालक मुलांशी नीट संवाद साधत नाहीत. दोन भावंडात दुजाभाव केला जातो. तर काही पालक अशा मतिमंद मुलाला काहीच करू देत नाहीत. आणखी एक दुर्दैवी गोष्ट या सर्व पालकांचे दुःख एकच असून सुद्धा ते एकत्र जमत नाहीत व आपल्या मुलाचे अनुभव दुसऱ्या पालकांशी शेअर करत नाहीत. असे का व्हावे बरे ?
तरुण मतिमंद मुलांचे मसाज चे काम त्या करीत नाहीत. कारण शरीराने ही मुले वाढलेली असतात. त्यांच्या भावना एकदम कधी उफाळून येतील कळत नाही.
आतापर्यंत जवळजवळ पाचशे व्यक्तींना त्यांनी मसाज, ॲक्युप्रेशर ही सेवा दिली आहे. प्रसिद्ध मसाजिस्ट माननीय राम भोसले यांच्यापासून त्यांनी प्रेरणा घेतली. सामान्य लोकांच्या बाबतीत वय वर्षे चार पासून 96 वर्षाच्या आजींपर्यंत त्यांनी हे काम केले आहे. अशी ही सेवाभावी माणसं आहेत म्हणून समाज संकटातून तरून जातो. त्यांचे हे काम पाहून मला वाटतं
जे का रंजले गांजले। त्यासी म्हणे जो आपुले।
तोचि साधू ओळखावा। देव तेथेची जाणावा।।
जयश्री पटवर्धन विनायक बंगला बसव नगर रोड, कागवाड. जिल्हा-बेळगाव, कर्नाटक. PIN-591223
Ph- 7406983273
Email.: jayashreep1941@gmail.com
विश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअॅप लिस्टमध्ये सामील व्हा - 7066251262 हा व्हॉट्सअॅप क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMP असा मेसेज पाठवा
खुप छान👏✊👍