काळे गुरुजी आज सकाळ पासून एका व्यक्तीची आतुरतेने वाट बघत होते .ती व्यक्ती म्हणजेच त्यांचा पट्टशिष्य सुरेश दिघे .त्यांचे गेल्या जन्मीचे काहीतरी नाते असावे म्हणून हया जन्मी दोघांची योगायोगाने भेट झाली व त्यांचे एकमेकांवर अतिशय प्रेम बसले .
काळे गुरुजींना फक्त दोन मुली होत्या .त्यांचा पगारही बेताचाच होता .त्यामुळे त्यांच्या पत्नीची इच्छा असूनही त्यांनी मुलाची वाट न बघता दोन मुलींवर समाधान मानले .एक दिवस शाळा सुटली.सर्व मुले आपापल्या घरी गेली.तितक्यात काळे गुरुजींचे लक्ष एका मुलावर गेले .तो पायरीवर बसून रडत होता.
त्यांनी त्याला जवळ बोलावले व रडण्याचे कारण विचारले .तेव्हा त्याने सांगितले की त्याचे आई , वडील लहानपणीच अपघातात निधन पावले.तो मामाकडे रहात होता .परंतु सकाळी मामीने त्याला खूप मारले व घरातून हाकलून लावले .ते ऐकून काळे गुरुजींना खूप वाईट वाटले. त्यांनी त्याला त्याच्या मामाच्या घरी नेले व चौकशी केली तेव्हा त्यांच्या लक्षांत आले की मामाची आर्थिक परिस्तिती बेताचीच होती व आता त्यांना सुरेशची जबाबदारी घेणे जमणार नव्हते.काळे गुरुजींनी त्याचा संभाळ करण्याची तयारी दाखवताच मामा मामी यांनी लगेच परवानगी दिली.
काळे गुरुजी जेमतेम सात वर्षाच्या सुरेशला घेऊन घरी आले व त्यांनी आपल्या पत्नीला सर्व हकिगत सांगितली .त्यांनी सुध्दा सुरेशचा साम्भाळ करण्याची तयारी दाखवली .त्यांनी त्याला आईची माया देण्यास सुरवात केली .दोन्ही मुलींना भाऊ मिळाल्याचा आनंद झाला. तो त्यांना ताई , माई म्हणून हाका मारू लागला व लवकरच तो त्यांच्या कुटुंबाचा एक घटक झाला .
सुरेश मुळातच खूप हुशार होता. त्यातच आईची माया , गुरुजी आणी दोन्ही बहिणींचे मार्गदर्शन यामुळे त्याची जोरदार प्रगती होऊ लागली .
वर्षामागून वर्ष जात होती .कॉलेजबरोबर अर्धवेळ नोकरी करून गुरुजींच्या संसाराला हातभार लावू लागला. तो डोळ्यांचा डॉक्टर झाला . उच्च शिक्षणासाठी परदेशात जाऊन आला. दोन्ही बहिणींची धूम धडाक्यात लग्न लाऊन दिली. गुरुजींचा भार हलका झाला .
सुरेशने निसर्गाच्या सानिध्यात एक मोठा बंगला बांधला व त्याला गुरुकृपा नांव दिले तेथे गुरुजींची व त्यांच्या पत्नीची चांगली सोय करून दिली . कामाला नोकर चाकर ठेवले . सुरेशने शहरांत डोळ्याचे मोठे हॉस्पिटल बांधले . तेथेच राहण्याची सोय केली . गुरुजींना शहरात करमत नसल्याने ते गुरुकृपा बंगल्यात रहात असत. आठवड्यातून एकदा तो घरी येत असे. कालांतराने सुरेशचे लग्न झाले.त्याची बायको सुध्दा डोळ्याची डॉक्टर होती. ते गरीब आणी गरजू व्यक्तींना मोफत सेवा देत असत . त्यांनी नेत्रदानाचा खूप प्रचार सुरू केला.लोक चांगला प्रतिसाद देत असल्याने अनेक अंध व्यक्तींना दृष्टी प्राप्त झाली .
काळे गुरुजींचे वय वाढले तसे त्यांच्या तब्येतीच्या तक्रारी सुरू झाल्या . सुरेश व त्याची पत्नी व्यवसाय सोडून लगेच गुरुजींकडे येत असत व त्यांच्यावर उपचार करत असत. त्यामुळे गुरुजींच्या दोन्ही मुलींना वडिलांची काळजी राहिली नाही . एक दिवस अचानक गुरुजींना दिसेनासे झाले . सुरेशला बोलावण्यात आले. त्याने गुरुजींना तपासले व निर्णय घेतला की एखादा नेत्रदाता भेटला की गुरुजींच्या दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन केले की त्यांना पहिल्यासारखे दिसायला लागेल .
काही दिवसांनी तो योग आला. गुरुजींना नेत्रदाता भेटला त्यांना परत पहिल्या सारखे दिसू लागले. कधी एकदा सुरेशला भेटतो व डोळे भरून बघतो असे गुरुजींना वाटू लागले .
दहा दिवसांत एकदाही सुरेश , सुरेखा आले नाहीत अथवा त्यांचा फोन सुध्दा आला नाही .परंतु आज गुरुपौर्णिमा असल्याने तो जेथे असेल तेथून आज आल्याशिवाय राहणार नाही याची गुरुजींना खात्री होती यापूर्वी तो परदेशातूनही खास आला होता. संध्याकाळ झाली तरी सुरेश आला नाही याचे गुरुजींना नवल वाटले. गुरुजींना दुसरे नवल वाटले की आपल्यापेक्षा जास्त वाट बघणारी आपली पत्नी आज सकाळपासून देवघरात का बसून आहे ?
वाट बघून कंटाळा आल्यामुळे ते वेळ जावा म्हणून अस्ताव्यस्त पसरलेले पेपर व्यवस्तीत करू लागले. अचानक त्यांचे लक्ष एका बातमीकडे गेले. शिर्षक होते 'अनोखी गुरुदक्षिणा'. गुरुजींनी बातमी वाचली ती सुरेशबद्दलची होती. त्याच्या स्कूटरला अपघात झाला व त्यात त्याचे निधन झाले .परंतु निधनापूर्वी त्याने डोळे गुरुजींना दान केले व मित्रांना सांगून ऑपरेशन पार पडले आणी आपल्या निधनाबद्दल गुरुजींना कळू नये अशी दक्षता घेण्यास सांगितले .
तो पेपर घेऊन गुरुजी धावतच पत्नीकडे गेले व दरडावत विचारले की पेपरमध्ये आलेली बातमी खरी आहे का ? तीने रडत रडत हो म्हणताच काळे गुरुजी धाडकन खाली कोसळले व रडत बोलू लागले की ज्या डोळ्यांनी मी माझ्या सुरेशला पाहू शकत नाही त्या डोळ्यांनी दुसरे काय बघणार ?गुरुजींच्या पत्नीने डॉक्टरांना बोलावले. पण काही उपयोग झाला नाही .गुरुजींनी प्राण सोडला होता .प्रत्येक गुरुपौर्णिमेला शिष्य गुरुजींकडे येत असे. आज गुरुजी आत्मारूपाने शिष्याला भेटायला गेले .
धन्य ते गुरु आणी धन्य त्यांचा शिष्य !
लेखक: दिलीप प्रभाकर गडकरी (कर्जत-रायगड )
कथा आवडल्यास कमेंट करा आणि शेअर करा.
नविन ब्लॉगचे नोटिफिकेशन येण्यासाठी विश्व मराठीच्या ईमेल लिस्टला सबस्क्राइब करा.
मनाला भावेल असाच आहे लेख!