top of page

बोधकथा- गुरुवर विश्वास ठेवा



मध्यप्रदेशातील एका घनदाट अरण्यात एका साधु महाराजांचा आश्रम होता साधुजींसह त्यांचे दहा बारा परमशिष्य तिथं रहात असत. महाराजांचा नावलौकिक अनुभूती यामुळे तिथं भक्तांची नियमित वर्दळ असे, उत्सवाला तर जत्रा फुलायची. परिणामी आश्रमाची आर्थिक स्थिती उत्तम होती. चंदन हा महाराजांचा आवडता शिष्य. एक दिवस चंदन अगदी आनंदात साधुजींच्या चरणाजवळ बसला म्हणाला, "महाराज गावावरून निरोप आलाय की बहिणीला एक चांगलं स्थळ आलय पुढील महिन्यात लग्नाची तारीख निघालीय. मला आठ दहा दिवस सुट्टी हवीय आणि आपणही लग्नाला उपस्थित रहावं असं आम्हाला वाटतं, आणि आपल्या सहकार्याशिवाय हा सोहळा पूर्ण होणं केवळ अशक्य !"


महाराज आनंदी होऊन आशीर्वाद देत म्हणाले "चंदन बाळ तू या मठाचा एक विश्वासू सेवक आहेस त्यामुळे तुला हवी तेवढी रजा घे, सोबत आणखी दोन सेवक तुझ्या मदती साठी ने, हो... आणि जाण्यापूर्वी मला भेटून जा कारण भक्तांची सतत रीघ असल्यामुळे मी एवढ्या दूर येऊ शकत नाही मात्र तुझ्या बहिणीसाठी आशीर्वाद मात्र नक्की देईन."


चंदनचा आनंद गगनी मावणारा होता. आपली निष्ठा भक्ती फळा आली, आता मी माझ्या बहिणीला मोठ्या थाटामाटात निरोप देईन. चंदन आता बहिणीच्या लग्नाची स्वप्न पाहू लागला. त्याला गावी जायचे वेध लागले आपल्या गुरूंकडून भरघोस मदत मिळेल या आशेवर चंदन दिवस काढत होता. अखेर लग्नाच्या १५दिवस अगोदर चंदन दोन सहकारी सेवकांसह गावी जाण्यास निघाला. साधुजींच्या कक्षात निरोप घेण्यासाठी गेला. गुरूंनी जेमतेम तिघांच्या गाडी भाड्यापूरते पैसे एका गाठोड्यात पाच किलो उत्तम दर्जाचे डांळींब दिले आशीर्वाद देत म्हणाले "हे तुझ्या बहिणीसाठी भेट....! चिंता करू नको. सर्व छान होईल. आज पर्यंत तुझ्या गावात कुणाचच लग्न इतक्या दिमाखात नसेल झालं असं थाटात धूमधडाक्यात बहिणीचं लग्न कर. गुरूकृपेचं गाठोडं सोबत आहेच."


चंदन काहीही बोलता गुरूचरणाला स्पर्श करून थेट रेल्वे स्टेशनकडे निघाला. आता चंदनजवळ कधीतरी भक्तगणांंकडून बक्षीस म्हणून मिळालेल्या पैशातून जमवलेली दहाबारा हजार रक्कम होती. गुरूजी मोठी मदत करतील ही अपेक्षा फोल ठरली होती. डोक्यात विचारांचं थैमान सुरू झालं, आईवडीलांना काय उत्तर देऊ? बहिणीला कसं तोंड दाखवू? प्रचंड घालमेल...


कितीही आध्यात्मिक वृत्ती असली तरी ती पैशात रूपांतरीत होणार नाही आणि कितीही आशीर्वाद असले तरी पत्रावळीवर वाढायला जेवणच लागणार... पैशांच्या विवंचनेत असलेल्या चंदनने दिड दिवसाच्या प्रवासाअंती राजस्थान गाठलं राहून राहून त्या निरूपयोगी डाळींबाच्या ओझ्याची चीड येत होती, पुढचा प्रवास अर्धा टांग्याचा अर्धा पायी होता त्यामुळं एकदा मनात विचार आला हे ओझं इथच द्यावं फेकून. परंतू सहकारी सेवक काय म्हणतील या भीतीने ते तसच घरी नेणं क्रमप्राप्त होतं.


थकल्या शरिरानं उदास मनानं चंदन कसाबसा घरी पोहोचला. वाळवंटी परिसरात त्याचं छोटसं घर, मूळची गरीबी त्यातच यावर्षी प्रचंड दुष्काळ यामुळे कोणत्याही प्रकारचं पीक नाही भाजीपाला नाही अन्नधान्य नाही. आणि अशातच लग्नाचं नियोजन. थोडी विश्रांती झाल्यावर वडिलांनी चंदनकडे पैशाविषयी चौकशी केली. "काहीतरी करू" असं सांगून वेळ मारून नेली. ती रात्र चंदनसाठी भयंकर होती. गुरूजींनी पैसे देता फक्त सल्ला दिला तोही धामधूमीत लग्न करण्याचा. इथं तर साधा मंडप घालायची पंचाईत. राहून राहून ते डाळींबाचं गाठोडं त्याला सतावत होतं अखेर त्याने विचार केला की हे गाठोडं सकाळीच गावाबाहेर लांब कुठेतरी नदीपात्रात फेकून द्यायचं. सकाळचा चहापाणी ऊरकून चंदन आपल्या सहकाऱ्यांची नजर चुकवून गाठोड्यासह घराबाहेर पडला. गावाबाहेर वेशीजवळ चौकात गर्दी पाहून तो जरा थांबला. तिथल्या जवळच्या एका प्रांताच्या राजाचा सेवक दंवंडी देत होता की, "या दुष्काळाच्या परिस्थितीतही जो कोणी आमच्या राजाला पिकलेली डांळींब आणून देईल त्याला मागेल ते बक्षीस राजाकडून मिळेल." चंदनला हायसं वाटलं, पण राजाला डाळींबाची एवढी काय गरज पडावी?... विचारांच्या तुफानाला रोखून तो थेट दवंडीवाल्याला सोबत घेऊन राजदरबारात पोहोचला.


तिथला प्रसंग फार बिकट होता राजाची एकुलती एक तरूण कन्या एका भयंकर आजाराने मृत्यूशय्येवर शेवटच्या घटका मोजत होती, राजवैद्यांनी मोठ्या परिश्रमाने वेगवेगळ्या वनस्पतींच्या सहाय्याने एक औषध तयार केलं होतं पण ते डांळीबाच्या रसातून दिलं तरच राजकन्या वाचणार होती. चंदनने डाळींब आणलेली पाहून राजाचे डोळे भरून आले, त्याने चंदनला आपल्या सिंहासनावर बसविले. वैद्यांनी उपचार सुरू केला. तासाभरात राजकन्या हालचाल करू लागली. राजाला अत्यंत आनंद झाला त्यांने चंदनची विचारपूस केली विचारले तुला काय हवे? चंदनने सर्व परिस्थिती सांगितली म्हणाला दारात एक मंडप वऱ्हाडी मंडळीला पोटभर जेवू घाला दुसरं काही नको. राजा म्हणाला, आज तुझ्यामुळे माझं सर्वस्व वाचलं तुझी बहीण माझ्या मुलीप्रमाणे आहे, तिचं लग्न एका राजकन्येप्रमाणेच होणार. असं म्हणून राजाने ताबडतोब चंदनच्या घराच्या जागी भव्य महाल ऊभारला, चंदनला सोनं चांदी पैसा अमाप संपत्ती बहाल केली शिवाय ठरलेल्या मुहुर्तावर चंदनच्या बहिणीचा शाही विवाह सोहळा संपन्न झाला. वऱ्हाडी चांदीच्या ताटात पक्वान्न खाऊन तृप्त झाले. राजा आपल्या कन्येसह विवाहाला उपस्थित राहिलेला पाहून चंदनला गुरूचं वचन आठवलं... खरच... गावात असं लग्न कोणाचच झालं नसेल..


तात्पर्य - गुरूवर विश्वास ठेवा. गुरू वचन त्रिकाल सत्य !


संकलन – प्रा अक्षय न्यायाधिश ( ज्ञानेश्वरी गुरुकुल )

मो: 9852521152

ईमेल: nyayadhish.akshay@gmail.com


268 views0 comments

Recent Posts

See All

コメント


टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page