"फुले" शब्द उच्चारताच पहिल्या प्रथम आपल्या डोक्यात विचार येतात ते वेगवेगळा सुगंध देणाऱ्या फुलांचा. त्यात गावठी गुलाब तर आलाच शिवाय वेगवेगळ्या रंगांचे कलमी गुलाब आले. गांवठी गुलाबाचा सुवास तर मनाला प्रसन्न करून जातो. त्याची लागवड फारच कमी प्रमाणात होताना दिसते. त्यामुळे त्याचे उत्पन्नही थोड्या प्रमाणात असल्यामुळे गांवठी गुलाबाला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असते. गांवठी गुलाबाचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे तो औषधी असल्यामुळे, त्याच्या सुंदर आणि सुवासिक गुलाबी रंगांच्या पाकळ्यांपासून अत्तर आणी गुलकंद बनविला जातो. हा गुलकंद उन्हाळ्यात शरीराला आतून थंडावा देण्याचे काम करतो. त्यामुळे उन्हाळ्यात आयुर्वेदीक गुलकंदाला मोठ्या प्रमाणात मागणी असते.
कलमी गुलाबाच्याही विविध जाती बाजारात बघायला मिळतात. नाशिक जिल्हा हा तर मोठ्या प्रमाणावर गुलाबांच्या वेगवेगळ्या रंगाच्या आणि जातीची पैदास करून, देश-विदेशातही बाजारपेठांमध्ये रवाना केले जातात. वर्षातील काही ठराविक सण तसेच व्हॅलेंटाइन डे ह्या दिवशी तर गुलांबांच्या फुलांची बाजारात प्रचंड मोठ्या प्रमाणात उलाढाल होताना दिसते. मागणी तसा पुरवठा, ह्या प्रमाणे किंमतीमध्येही नेहमीच्या दिवसांपेक्षा ह्या खास दिवसांत मोठी वाढ झालेली असते. त्यामुळे वर्षाची सारी कमाई उत्पादक, ह्या एका दिवसांत पूर्ण करताना दिसतात(व्हॅलेंटाइन डे). पैसा खुळखुळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्येही आपल्या कष्टाचे चांगले फळ मिळाल्याची भावना त्यांच्या चेहर्यावर दिसून येते.
गुलाबाला फुलांचा "राजा" किंवा "राणी" हा किताब अगदी योग्यच म्हणावा लागेल. खरंतर गुलाबाच्या झाडाला कांटे फारच असतात. परंतु कोणतीही चांगली वस्तू साध्य करण्यासाठी आपल्याला श्रम केल्याशिवाय ती प्राप्त होत नाही. गुलाबाचेही काहीसे तसेच आहे. आपण जेव्हा गुलाबांच्या बागेत जातो, तेव्हा लांबूनच अनेक रंगांचे, अनेक जातीचे व अनेक आकारांचे गुलाबाचे ताटवेच्या ताटवे आपल्याला आकर्षून घेत असतात. वार्यावर डोलतांना गुलाबांची फुले जणू आपल्या स्वागताला तयार आहेत असेच सुंदर देखणे चित्र आपल्या डोळ्यासमोर प्रत्यक्ष दिसत
असते. परंतु त्याच्या जवळ जाताच गुलाबांचे कांटे आपल्याला घायाळ करू शकतात हे ध्यानात ठेवावे लागते. परमेश्वराने जणू गुलाबांच्या सौंदर्याच्या संरक्षणासाठी, गुलाबांच्या झाडाला काट्यांनी वेढलेले दिसते. त्यामुळे सहजच कोणी एवढे सुंदर गुलाब झाडावरून खुडू शकणार नाहीत. हा त्यामागचा हेतू असावा. रचनाकाराच्या प्रत्येक रचनेमध्ये सूक्ष्म अभ्यास केला तर आपल्याला काही गोष्टींची उकल होते.
काही गुलाबाच्या जाती ह्या बिनवासाच्या असतात परंतु फुले दिसायला अतिशय आकर्षक असतात. त्यामुळे फ्लाॅवरपाॅटमध्ये सुंदर रचना करून त्यांना सजविले जाते आणि त्यांचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. लाल गुलाब हे प्रेमाचे प्रतिक मानले जाते, त्यामुळे बहुदा जेव्हा प्रियकर पहिल्यांदाच आपल्या प्रेयसीला भेटतो तेव्हा प्रेमाचे प्रतिक म्हणून लाल गुलाबाचे फूल किंवा गुच्छ भेट करून आपल्या प्रेमाची कबुली जाहीर करतो. सफेद गुलाब हे शांतीचे प्रतिक मानले जाते. ह्याव्यतिरिक्त पिवळा,गुलाबी,जांभळा, केशरी,मिस्र अशा कितीतरी रंगांचे गुलाब आपल्याला वेड लावत असतात. विशेषतः महिलावर्ग गुलाबपुष्पं बघूनच त्यांच्या प्रेमात पडतात.
सध्याचा जमाना हा बहुदा नोकरदार स्रियांचा असल्यामुळे, सोयीच्या दृष्टीने बहुतेक स्रियांचे केस विंचरण्यास सोपे जावे म्हणून बाॅयकट किंवा अगदीच छोटे केलेले दिसतात. त्यामुळे केसांत फुले माळण्याचा प्रश्नच येत नाही. परंतु आमच्या लहानपणी मला आठवतयं, शाळा-काॅलेजात जाणारी मुलगी असो किंवा गृहीणी असोत, प्रत्येकीच्या केसांत गुलाबाचे फूल किंवा फुलांचा गजरा तरी माळलेला असायचा. एवढी फुलांची आवड स्रियांना व मुलींना होती. माझे बाबा तर माझ्यासाठी रोज चार-पाच वेगवेगळ्या रंगांची कलमी गुलाब बाजारातून विकत आणत असत त्यावेळेला एका रूपयाला एक गुलाब मिळत असे.आणि मी रोज ते गुलाब आवडीने केसांत माळत असे. आजही कोणाचा वाढदिवस किंवा सत्कारसमारंभ किंवा एखादे शुभकार्य असल्यास, गुलाबाचा गुच्छ भेट म्हणून दिला जातो. गुलाबांच्या फुलांशिवाय कुठलेही कार्य हे अधुरेच समजावे.
अशा प्रकारे फुलांचा राजा "गुलाब" हा आजही आपली शान व मान टिकवून आहे.
पुष्पा सामंत.
नाशिक 24-3-2021.
Email.: Samant1951@hotmail.com
ही ब्लॉग पोस्ट कशी वाटली ? लाईक करा, कमेंट करा आणि व्हॉट्सअॅप, फेसबुकवर शेअर करा.
Comentarios