सकाळची गडबड आताशा केव्हांच संपली होती. आई-बाबा,भाऊ-भावजय, भावांची मुलं आणि आम्ही पत्नी-मुलगी-मुलगा एवढंच जग कुलुपबंद काळात झालं आहे.परंतू आमचं हे गोकुळ मात्र शांत नव्हतं...आम्हांस कधीच एकांतवासाचा त्रास किंवा रटाळपण आलं नाही. प्रत्येकजण आपापली जबाबदारी निश्चित पार पाडत होता.
आई-बा म्हणजे पहाटेचा पाचचा गजर... लगेचच देवपूजेसह अगदी आठ वाजता यांची फराळाची तयारी झालेली. भावांचे व आमचे सगळेच दिवटे म्हणजे एकविसाव्या शतकातील यंत्रमानव...साडेसात दरम्यान यांची पहाट की सुरू चहा...बिस्कीट... फराळ... लगेचच लॅपीवर उरलेल्या अभ्यासाची जोरदार मुसंडी मारणार. हरेकजण घराचा एक-एक कोपरा घेऊन शारीरीक सुरक्षित अंतर बाळगत... कानात आधुनिक ऐकण्याची कुडंलं, हातात पेन व वही घेऊनच सकाळ सुलभ करणार.
आमचं मंडळ व भावजया मात्र स्वतःचा जपजाप संपला की, स्वयंपाकासाठी असलेल्या ठराविक सामानासह मेनु ठरविणार, टिव्हीवरील किंवा मोबाईलच्या नोटीफिकेशन मधे गॅसचा भाव स्थिर आहे का...?? आपल्या शहरात विषाणु रूग्न आहे का...?? ही शोधवार्ता घेणार. या व्यतिरीक्त असा-कसा काळ आला गं बाई हा..? म्हणत आश्चर्यचकित होणार.
उरलो आम्ही तिघे भाऊ फक्त... आमचं एकच काम दररोज सर्व सामानाची एक यादी करणे, बागायतदार रूमाल किंवा मास्क लावणे नियमित एक-एक नवीन दुचाकी घेऊन खरेदीदार होणे... एका एका दुचाकीत आवश्यक लागणारे इधंन भरणे.... दहा वाजता घरी पोहोंचताच कार्यालयीन वर्क फ्राॅम होम ची कार्य संपविणे. जिभेला जास्त चवणे असल्याने नवनवीन पदार्थ... भाज्या...पीठाचे पदार्थ इत्यादीसाठी सौंना गुरू करून अगदी पदार्थ कित्ती छान झालाय हे रंगवून सांगणे... एवढ्यातच आम्ही दुपार गाठून जुनी कपाटं, जुनीफोटो, सीडी-व्हिडीओ कॅसेट व प्लेयर लावुन पाहायला तयार...!! इतक्या चाळीस दिवसात एक मात्र नक्की की, एकुण ही डझनभर गर्दी मात्र दुपारच्या चहासाठी आमचा गॅस मी पेटवायची आताशा वाट पाहु लागलेत. अर्थात सुरूवातीला एवढ्या जनांचा चहा करायला अवघड गेलं.... परंतू आता मात्र आम्ही पक्के चायवाले बाबु झालो आहोत. ते ही उगाचच मनात एकदा तरी नरेेंद्रजी भेटतील आणि आपण आपल्या हाती त्यांना चहा देऊ...
याच खुशीत...!!
संध्याकाळी मात्र अंगणात अबालवृध्दा सह एक बैठक नियमित ठरलेली. त्यात प्रत्येकाने दिवसभर केलेल्या सर्वविषयाची अगदी घड्याळ लाऊन हजेरी होत असे. पाच-सात मिनिटांचा कार्यक्रम संपला की मग कुणी काढलेली चित्रे... कुणाचं सुमधूर गाणं... कुणांची ऊखाणे स्पर्धा... कुणाची ॲक्शन ऽऽऽ रेडीऽऽऽ कॅमेरा टाईप स्क्रिनटेस्ट... कुणी केलेलं जनहिताचं कार्य... पुस्तक उतारा वाचन... श्लोक वाचन स्पर्धा.... गाण्याच्या-गावांच्या भेंड्या... कोविड-19 पासुन कसे वाचावे याबाबत चर्चासत्र... आणि एक आज्जीबाईची जुनी कहाणी... थोडावेळ गावच्या आठवणी... मग आजोबांनी नियमित यातून तिन क्रमांक काढायचे आणि छोटेखानी बक्षिस समारंभ...हाच उपक्रम...हेच घर एक मंदिर...!!!
दीपक मा.पाठक, परभणी
ईमेल: dipak111267@gmail.com
Comments